ओमर खय्याम भाग - १ ओमर खय्याम भाग - २ ओमर खय्याम भाग - ३ ओमर खय्याम भाग - ४ ओमर खय्याम भाग - ५ ओमर खय्याम भाग - ६ ओमर खय्याम भाग - ७ ओमर खय्याम भाग - ८ ओमर खय्याम भाग - ९ ओमर खय्याम भाग - १० ओमर खय्याम भाग - ११ ओमर खय्याम भाग - १२ ओमर खय्याम भाग - १३ ओमर खय्याम भाग - १४ ओमर खय्याम भाग - १५ ओमर खय्याम भाग - १६ ओमर खय्याम भाग- १७
सापळे !
आपण या जगात पाऊल टाकले की खय्याम म्हणतो देवाने का दैवाने ठिकठिकाणी सापळे लावलेलेच आहेत. मित्रांनो बघा जरा, हे सापळे कोणते आहेत ?
पहिला म्हणजे आपला मेंदू. हा माहिती साठवतो आणि आपले विचार भूतकाळावर ठरवतो. मग लागते सापळ्यांची रांग. खाणे, पिणे, कपडेलत्ते, संसार, गाडी, घोडा, धर्म, अध्यात्म, सुख, दु:ख, संपत्ती, चव, वास, दॄष्टी, भ्रम, यादी फार मोठी आहे, न संपणारी.
खय्याम म्हणतो,
मी जाईन तेथे आहेतच सापळे,
पाऊल टाकताच पकडीन म्हणतोस.
सुटका नाही म्हणतात सगळे,
बंडखोर मात्र मी, तुझ्या आज्ञेनेच हे सगळे.
या विरुध्द काही केले किंवा या सापळ्यातून सुटा असे सांगितले की मलाच बंडखोर ठरवले जाते. हे सगळे तुझ्याच इच्छेनेच चालले आहे, चालू देत ! (मिपा स्टाईल)
न्याय !
जर आपला अंत होणारच आहे तर –
खय्याम म्हणतो,
नको दु:ख व्यर्थ, आनंदात रहा !
जमले तर अन्यायात न्याय प्रस्थापित कर !
हे जग नश्वर आहे,
तसेच समज आणि हो मोकळा !
हे वास्तव आहे आणि सगळ्यांना ते माहीत असते पण स्विकारायला फार अवघड ! याचे कारण या अधिच्या रुबाईत लिहिलेले सापळे. पण एक लक्षात घेतले पाहिजे, हे सगळ्याचे अस्तित्व आपण आहोत म्हणून आहे. अन्यायात न्याय प्रस्थापित कर हा सल्ला फार महत्वाचा आहे.
दैववाद !
खूष रहा ! तुझे बक्षीस त्यांनी ठरविले आहे कालच !
ईच्छा आकांक्षा मागे तुझा भूतकाळच.
सुखात रहा, कारण तुझा आग्रह नसताना,
त्यानी उद्या काय करणार आहेस हे ठरवले आहे, कालच !
हे एकदा मान्य केले की मी तुम्हाला खरंच सांगतो बरेच प्रश्न मार्गी लागतात. मुख्य म्हणजे आपल्या डोक्याला ताप होत नाही. याचा अर्थ निष्क्रीय रहायचे असे नाही.
आपल्या इच्छा, आकांक्षामागे आपला भुतकाळच असतो हे किती खरे आहे ! मागे वळून बघूनच आपण पुढे काय करायचे ते ठरवत असतो.
रक्त!
ही एक मनाच्या क्षुब्ध अवस्थेत लिहिलेली रुबाया आहे.
मागे म्हटल्याप्रमाणे मित्र (खरे) नसणे हीच अवस्था किती भयानक असू शकते हे याच्यावरुन आपल्याला कळते. यात मदिरा म्हणजे मदिराच आहे.
खय्याम म्हणतो,
सुरईच्या नरड्यातून कोणीतरी ते लालभडक रक्त काढा रे !
ती रंगीत मदीरा पेल्यात भरा.
या मदिरेशिवाय एवढ्या शुध्द मनाचे
माझे असे आज मित्रच उरले नाहीत !
मित्रांनी केलेला विश्वासघात हा मला वाटते आपल्या मनावरचा सगळ्यात मोठा घाव असतो. ती जखम भरुन येते की नाही...... हे सांगणे कठीण आहे.
मला वाटते नसावी.
हा घाव कोणाच्याही नशिबी न येओ हीच त्याच्यापाशी प्रार्थना !
आज्ञा !
एक हिंदू धर्म सोडला तर इतर जवळजवळ सर्व धर्मात परमेश्वराच्या आणि माणसाच्या मधे एक प्रेषित आहे. या प्रेषिताचे काम काय, तर परमेश्वराचे म्हणणे आपल्याला सांगणे. आता जर परमेश्वर सर्वशक्तीमान असेल तर त्याला या मध्यस्थाची गरज का भासावी हे मला कळत नाही. म्हणून खय्यामचा परमेश्वर त्याच्या कानात सांगतोय, मला काय म्हणायचे आहे हे सरळ माझ्याकडूनच ऐक ! मला जे सांगायचे आहे ते तुला समजण्यासाठी कोणाची गरज नाही आणि आता ऐकतो आहेस तर ऐक – या सगळ्यावर माझा खरोखरच अधिकार असता तर मी तुझे मद्य प्याले असते आणि त्यामुळे माझी ही विश्वनिर्मितीची धुंदी उतरली असती. म्हणजे या सॄष्टीची आत्ताची अवस्था तुम्ही केली आहे ती मी निश्चितच जन्माला घातली नसती.
खय्याम म्हणतो,
आकाशवाणी कानात कुजबुजली,
आज्ञा शक्यतो माझ्याकडूनच ऐक !
आवर्तनांवर जर माझा ताबा असता तर
तुझ्या मद्याने या धुंदीतून असते मला वाचवले !
परमेश्वराचा परमेश्वर कोण ? मला या प्रकारचा विचार आईनस्टईनने कुठेतरी मांडल्याचा आठवतोय ! त्याच्या एका लेखात ज्यात त्याने परमेश्वराच्या अस्तित्वावर चर्चा केली आहे. आठवती आहे का कुणाला ?
अजून एक स्वर्ग ? कुठे असतो तो ?
खय्याम म्हणतो,
थोडेसे अन्न वेलींखाली,
कवितेचे पुस्तक आणि मदीरेची सुरई
शेजारी तू गाणारी माझ्यासाठी ,
अजून कुठे आणि कसला स्वर्ग ?
स्वर्ग म्हणजे अजून काय असते ?.....आणि कशाला शोधायला जायचा तो ?.....
तुझी दाढी आणि माझ्या मिशा ! :-)
बर्याचवेळा आपण परमेश्वराला साकडे घालतो, नवस बोलतो, त्याला प्रलोभन दाखवतो, रडतो, भेकतो आणि माझी इच्छा पूर्ण कर म्हणतो. जणूकाही त्याला एवढेच काम आहे ! तसेच त्याला घाबरुन आपण मद्य पिणार नसू (म्हणजे या संसारचा उपभोग घेणार नसू, संन्यास घेणार असू) तर तसे काही करायचे कारण नाही कारण ते बघण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही कारण त्याला इतर भरपूर कामे आहेत. थोडक्यात काय देवाला मागणे मागून संकटात टाकू नका आणि त्याला घाबरुन या आयुष्याचा उपभोग घ्यायचे थांबवू नका !
खय्याम म्हणतो,
आल्या दोन सुरया मद्याच्या हातात
तर खुशाल पीत रहा मित्रांच्या मैफिलीत,
काळजी नको, घाबरायचे कारण नाही
तुझी दाढी आणि माझ्या मिशांसाठी त्याच्याकडे वेळ नाही.
थोडक्यात काय, आपण करु तेच खरं. आनंदात निर्भयपणे जगणे हेच मह्त्वाचे. ते नैसर्गिक आहे.
मृत्यू
ओमर खय्याम मृत्यू : डिसेंबर ४, ११२२ -या भाषांतराचा व लेखमालेचा शेवट !
खय्याम म्हणतो,
असतो मी जर नियंता तर आलोच नसतो,
जाणे माझ्या हातात असते तर कुठे गेलो असतो ?
असतो सुखात जर मी ह्या जगात,
आलो नसतो, गेलोही नसतो आणि राहिलोही नसतो.
मित्रांनो, या जगात आलेल्या प्रत्येक जिवाचा अंत हा होतोच. तसा आपल्या या मित्राचाही अंत झाला. तो कसा, हे खाली वाचा.
याच बरोबर हा रुबायांच्या भाषांतराचा उपक्रमही संपला. अर्थात परत भेट, आपल्याला हे आवडले असेल तर, दुसर्या विषयावर...............खोट बोलण्यात अर्थ नाही, मलाही चुकल्या चुकल्या सारखे वाटेलच............
आपण सर्वांनी माझा हा प्रयत्न समजवून घेतलात, त्या बद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. या प्रवासात जर कोणाच्या प्रतिक्रीयेला उत्तर द्यायचे राहीले असेल तर ते मुद्दामहून नाही हे मी निश्चितपणे सांगू शकतो.
आपला,
जयंत कुलकर्णी.
ओमर खय्याम
मृत्यू : डिसेंबर ४, ११२२
त्यादिवशी बगदादचा इमाम मुहम्मद त्याला भेटायला आला होता. खय्याम त्याच्या आवडत्या जागेवर म्हणजे त्याच्या छोट्याशा बागेतील एका पामच्या झाडाखाली, त्याचा आवडता शास्त्रज्ञ अबू अली सिना, यांचे औषधावरचे पुस्तक वाचत बसला होता. या अबू अली सिनालाच पाश्चात्य जग “ऍव्हिसेना” ह्या नावाने ओळखते. ते पुस्तक वाचत असतानाच त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. आपला मृत्यू जवळ आल्याचे त्याने ओळखले. खय्यामने पुस्तकात खूण म्हणून एक दिनार ठेवला आणि तो इमामला म्हणाला “मला वाटते माझा काळ जवळ आला आहे. माझ्या सर्व मित्रांना बोलवा. मला त्यांच्याशी एकदा शेवटचे बोलू द्यात.” मग त्याचे मित्र जमल्यावर गुडघे जमिनीवर टेकून तो म्हणाला
“हे परमेश्वरा, आजवर खरंतर मी यथाशक्ती तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यात काही कमी पडले असेल तर तू मला क्षमा कर. माझे हे तुझ्याबद्दलचे ज्ञान खंरतर मी तुला शरण गेल्याचेच चिन्ह आहे.” मग तो सावकाश उठला आणि त्याने त्याची शेवटची रुबाया मित्रांसाठी म्हटली.
तो म्हणाला –
“मी आता कंटाळलो आहे माझ्याच चुकांना,
आळशीपणाला, माझ्या वेदनांना आणि दु:खांना.
मृत्यूनंतर जसे तू जीवन देतोस, मलाही तुझ्या आनंदासाठी
या निराकार पोकळीतून बाहेर काढ !”
( खय्याम इथे या जगाला, ज्यात त्याने आयुष्य काढले त्याला एका पोकळीची उपमा देतोय व मला त्यातून घेऊन जा म्हणून विनवतोय ! हा विरोधाभासही लक्षात घ्या. तो स्वत: दुखाला कंटाळलाय पण देवाला म्हणतोय, तु मात्र मला येथुन घेऊन जा आणि आनंदात रहा.)
हे म्हटल्यानंतर त्याने एकेक करुन सर्व मित्रांचा निरोप घेतला आणि तो शांतपणे त्या दिवाणावर पडला. त्या सगळ्यांना दरवाजापर्यंत सोडून इमाम परत आला. तेव्हा ओमर खय्यामने शांतपणे शेवटचा श्वास घेतला होता आणि त्याचा चेहरा प्रसन्न होता.
मित्रहो निशापूरच्या आपल्या मित्राचा अंत हा असा झाला.
त्याच्या मृत्यूची बातमी सर्वदूर पसरली आणि त्याच्या शत्रूंनाही आपल्या जवळचेच कोणीतरी गेल्यासारखे वाटले. त्यानंतर काही वर्षाने त्याचा परममित्र निझामउल्क निशापूरवरुन जात होता, तेव्हा तो मुद्दाम खय्यामची कबर बघायला गेला. त्याचे वर्णन त्याने असे केले –
” मला ओमरची कबर शोधायला विशेष कष्ट पडले नाहीत. ती एका बागेत मध्यभागी होती. कबरीवर डाळींबाच्या आणि अंजिराच्या झाडांनी सावली धरली होती. त्या झाडांनी त्या कबरीवर पाने वाहिली होती आणि गुलाबांनी त्यांच्या पाकळ्या ! त्याखाली ती कबर पूर्णपणे झाकून गेली होती.”
खय्यामचे नशीब थोर, आजही खय्यामच्या कबरीवर आणि अवतीभोवती असेच गुलाब फुलले आहेत आणि ती एका सुंदर बागेत आह,े त्याच्या अंतिम इच्छेप्रमाणे !
खय्यामची कबर व स्मारक ! फार सुंदर आहे ही जागा.
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
19 Jul 2011 - 4:11 pm | इरसाल
कार्य बाहुल्यामुळे मागील काही भागांवर प्रतिसाद देवू शकलो नाही क्षमा असावी.
ह्या भागाचा शेवट गहिवरून टाकणारा आहे.
तुमच्या लेखात मागील सर्व भागांच्या लिंक आहेतच पुन्हा एकदा पहिल्यापासून वाचून काढीन.
आभारी आहे.
19 Jul 2011 - 5:06 pm | नन्दादीप
अप्रतिम भाग....
19 Jul 2011 - 7:46 pm | समंजस
सगळेच भाग छान होते.
ओमर खय्याम वर आणि बद्दल एकाच ठिकाणी.. एवढं.. या पुर्वी वाचलं नव्हतं.
धन्यवाद तुम्हाला.
[शेवटची रुबाई ... अजोड!!]
19 Jul 2011 - 8:12 pm | विलासराव
आहे हा भाग.
आत्त्ताच हा भाग वाचला .
आता पुर्ण लेखमालाच वाचावी लागेल.
20 Jul 2011 - 12:57 pm | जयंत कुलकर्णी
धन्यवाद !
सर्व वाचकांना व हे वाचून प्रतिसाद देणार्या वाचकांचे खास आभार !