नाशिकचा उद्योग ०३ : याज्ञिकीने तारले !
औरंगजेबाच्या मृत्यू नंतर म्हणजे इस १७०७ नंतर काही वर्षांनी पेशवाईचा ऱ्हास होई पर्यंत म्हणजे इस १८१८ पर्यंत नाशकात संपूर्ण मराठयांची राजवट होती म्हणजे पेशवाई होती. पेशवाई अवतरणे हा सर्वार्थाने एक प्रचंड मोठा बदल होता. पेशव्यांचा एकूणच मराठी मुलुखाच्या औद्योगिक उत्कर्षासाठी कसून प्रयत्न सुरु होता असे दिसते. पण त्या प्रयत्नांची दिशा आजच्या संदर्भातच नव्हे पण तत्कालीन जागतिक संदर्भात सुद्धा जी होती ती तशी का होती असा प्रश्न पडतो. युरोपातला उद्योग ज्वालामुखी सारखा अगदी तोंडाशी येऊन खदखदत होता. फार पुढे नव्हे १७५० साल युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचे पडघम वाजु लागले होते.
