आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ३)
भारतीपूरच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असते मंजुनाथाचे मंदिर. हा मंजुनाथ भारतीपूरच्या पंचक्रोशीत आपली सत्ता गाजवत असतो. त्यासाठी त्याचा सहाय्यक असतो भूतराया नावाचा देव. तो अंगात येतो आणि लोकांवर वचक ठेवतो. मंजुनाथ सर्वशक्तिमान पण निष्क्रिय असतो तर भूतराया सेवक पण क्रियाशील असतो. या भूतरायाची कीर्ती इतकी मोठी की प्रत्यक्ष राष्ट्रपती त्याच्या दर्शनाला येऊन जातात आणि प्रसाद म्हणून कपाळभर कुंकू माखून घेतात. भूतरायाचा प्रभाव एव्हढा मोठा की भारतीपूरमध्ये कोणीही आपले वाद विवाद कोर्टात घेऊन जात नाही. सगळे वादविवाद भूतरायच्या मर्जीने सुटतात.
