पुस्तकं जिवंत असतात.
जन्माला यायच्या आधीच लेखकाच्या हृदयात ती धडधडत असतात. एखादं नवजात पुस्तक हळुवार जवळ घेतलंत तर जावळांचा वासही येतो.
अनोळखी हातात ती आधी फडफडतात पण एकदा त्या हातानी आपलं म्हणलं की त्याच्या नजरेखाली शांत निवांत होतात.
काही पुस्तकं वाढतात,विकसित होतात, थोर होतात आभाळएवढी; काही खुरटी च राहतात.
अधलीमधली सामान्य माणसासारखी आयुष्यभर अजून एक पायरी वर चढायची धडपड करत राहतात.
पुस्तकांना आकांक्षा असतात
कधी व्यक्त कधी लपलेल्या..
डोळ्यातून उरात झिरपत राहणाऱ्या...
पुस्तकांचीही स्वप्नं असतात
स्वप्नांना पोसतात पुस्तकं..
भावनांचे समुद्र कोंडलेले असतात पुस्तकात
तुम्ही मुक्त केले की मनस्वी पाखरं होतात त्यांची
विचारांचे झरे झुळझुळतात पुस्तकात
त्यांना वाट दिली की नदी होते त्यांची
कधी गंगा कधी कालिंदी
राग दुःख द्वेष असूया मत्सर याची लेणी माणसं जेव्हा पुस्तकांना देतात तेव्हाच ती ते निःसंकोचपणे मिरवतात यात आश्चर्य वाटायला नको कारण त्यांच्यात नसतेच 'मीपण' !
पुस्तकांच्या ढाली करून पुस्तकांच्या भिंतीआडून पुस्तकांच्या खिडकीतून पुस्तकांच्या दुनियेत हळूच बघा तरी
पुस्तकांच्या वाटांवरून नवी नवी पुस्तके हातात हात घालून एकमुखाने
पुस्तकांच्या पर्वतावर शांती आहे असे ठामपणे सांगत आहेत.
- माया ज्ञानेश
जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा :)
प्रतिक्रिया
23 Apr 2017 - 9:30 am | सस्नेह
खूप छान लिलयस...तरल, हळवे..
23 Apr 2017 - 9:55 am | पैसा
_/\_
23 Apr 2017 - 11:17 am | नंदन
आमेन!
24 Apr 2017 - 3:01 pm | पद्मावति
पुस्तकांच्या वाटांवरून नवी नवी पुस्तके हातात हात घालून एकमुखाने
आहा...क्लास्स!!पुस्तकांच्या पर्वतावर शांती आहे असे ठामपणे सांगत आहेत.
25 Apr 2017 - 2:07 am | रुपी
सुंदर!
25 Apr 2017 - 10:19 am | स्मिता चौगुले
सुंदर!