वाल्मिकी रामायणासहीत विवीध रामायणांचा परिचय असतोच, शिवाय गीत रामायण सोबतीला रामायणासंबधीत पॉपकॉर्नसारखे अधे मध्ये चघळायला वाद विषय, खरे म्हणजे हल्ली तोच तो पणा नकोसा झाल्याने कधी मधी गीत रामायणातल्या एखाद -दोन गीतांपलिकडे रामायण बद्दल मजल जात नाही.
पण http://ccrss.org वर असलेल्या ओवी गीतांना सहज चाळता चाळता हाती आलेले मराठी स्त्री लोकगीत रामायणाच्या या अनोख्या रूपाने लोकगीतांतलं रामायण आजही खिळवून ठेऊन पुन्हा एकदा वाचावे वाटेल असे आहे - कुठे कुठे काव्यशास्त्र विनोदाचा धाट आहे असे वाटावे, काही वेळा रामायण आहे कि राधा-कृष्णाच्या लीला असेही वाटून जाईल. जात्यावरच्या ओवी रुपात असले तरी सामुहीक सूर लावून आळवता येईल असे असावे.
राम लक्ष्मण दोन्ही गुलाब सारख
सावळी सीताबाई फुल जाईच बारीक
दाताला दातवण तुझ्या कपाळाला कुंकू ताज
आता माझे बाई रामाला सीता साज
अशी साधीसुधी सुरवात असलेल हे स्त्री गीत अत्यंत रम्यपणे पुढे बहरत जाते.
रामाच्या मळ्यामधी हिरवा मंडप जाईचा
राम करीतो अंघोळ सीता घालिती रांगोळ्या
पहिली माझी ओवी राजा रामाला गाईली
सांगते बाई तुला सीता जानकी राहिली
(पहिली ओवी तर रामा बद्दल झाली पण सीतेचेच वर्णन राहीले ना !)
दुसरी माझी ओवी रामराजा चांगल्याला
सांगते बाई तुला ऐना सीताच्या बंगल्याला
(ओव्यांची रचना करणाऱ्या कवियत्रीने रामाला शेतास मुबलक पाणी देता येईल एवढे सितेस नहाणे घातले आहे. सितेचे विवीध प्रकाराने वर्णन करुनही राधा कृष्णाच्या वर्णनात तल्लीन होता येते तसे या ओव्यातून सीता-रामाच्या बाबतीत कवियत्री गाता गाताच तल्लीन होत असली पाहीजे. )
पाऊस राजानी फळी धरीली सुर्यातळी
सीताच्या न्हाणीवरी राम लावी केळी
पाऊस राजानी फळी धरीली काळी कोट
सीताच्या न्हाणीवरी राम हाकी मोट
(पहा राम लागला की नाही कामाला ! पावसांच ढगांच वर्णन या गीतात बऱ्याच ओव्यात काळा कूट्ट असे आले आहे. रावणा एवजी औरंगजेबाला बऱ्याच ओव्यातून लक्ष्य केले आहे. बंगल्याचा उल्लेख नसता तर राजगड वगैरेंच्या उल्लेखांमूळे राजाराम कालीन ओव्यातर नाहीत अशी शंका आली असती.)
रामाला आला घाम सीता पुसती पदरानी
कोण्या नारीची झाली दिष्ट रथ गेलीत बाजारानी
रामाला आला घाम सीता पुशी लहुलाया
कोण्या नारीची झाली दिष्ट माझ्या पिरतीच्या रामराया
(जाते दळताना कवियत्रीस घाम आला असेल तेवढा राम आणि सीतेस पुन्हा पुन्हा येत राहतो पण हेच वर्णन वेगवेगळ्या प्रतिमा घेऊन मराठी भाषेचे सौंदर्य खुलवतं जाते. माझ्या पिरतीच्या रामराया, कोण्या नारीची झाली दिष्ट असे म्हणताना दृष्ट लावणाऱ्या इतर नारीं बद्दल द्वेषापेक्षा राधेने कृष्णाला चिडवून घ्यावे तसे इथे रामाला चिडवून घेणे चालू आहे का ?
पहिल्या ओवीत सीता जाईच फूल होती आता शेवंतीने जाईची जागा घेतली आहे.)
राम लक्ष्मण दोही गुलाबाच घर
जनक राजाची सीताबाई मधे शेवंती सयवर
राम लक्ष्मण दोही गुलाब पिवळी
जनक राजाची सीताबाई मधी शेवंती कवळी
या ओव्यांमधून लक्ष्मण आणि सीतेचे नाते वहिनी दीराच्या नात्याने दृढ महाराष्ट्रीय स्वरूपाचे असलेले दिसते, राम मध्ये आणि एकाबाजूस सीता आणि दुसऱ्या बाजूस लक्ष्मण असा उत्तरभारतीय दुरावा या नात्यात या ओवीत दिसत नाही. रामाची सीता राम लक्षमण दोघांच्या मध्ये आहे आणि डोलदार दिसते आहे.
राम लक्ष्मण दोही गुलाबाच हार
रामायाची सीता मधे दिसते डौलदार
सातवी माझी ओवी मारवती चांगल्याला
रामाच्या बागमधी ऐना सीताच्या बंगल्याला
(मारवती म्हणजे मारूती हे वेगळे सांगणे न लगे)
तुळशीबागमधी हिरव्या नागणीला पान
सीता ग बाई बोल मला सांगाया नाही कोण
तुळशीबागमधी हिरवी नागणी पसरली
रामाची सीताबाई चंद्रहाराला विसरली
राम कुंडावरी कुणी वाहिल घुंगर
सांगते बाई तुला सीता रामाची सुंदर
राम कुंडावरी हिरवा मंडप जाईचा
सुमित्राच्या लक्ष्मण राम कवसल्या माईचा
राम कुंडावरी हिरवी पालखी कुणाची
सांगते बाई तुला सीता जानकी रामाची
कावळा कोकतो राजगडाच्या अड्यावर
राजगडाच्या अड्यावर रत्न सीताच्या चुड्यावर
मुठ मुठ मोती रामरायाच्या सदर्याला(सदरा)
सांगते बाई तुला सीताबाईच्या पदराला
रामाला आला घाम सीता पुसी पदरान
कोणाची झाली द्रीष्ट रथ गेला बाजारान
सीताबाई सांग कथा आपल्या संसाराची
राम बाई भरताराची वेळ झाली आंघोळीची
रामाला आला घाम सीता पुसीती लहुलाया
कोणाची झाली तुला द्रीष्ट माझ्या रामराया
पडता पावसा फळी धरली सूर्य तळी
सीताच्या न्हाणीवरी रामचंद्र लावी केळी
एवढ्या सांगावा सांगते चिंचबाईच्या पानावरी
एवढ्या रामाच्या सीताबाईच्या कुंकु दंडत मेणावरी
राम ग लक्ष्मण दोघी मोतीयाचे सर
सावळी सीताबाई शेवंती सुकूमार
मोठे मोठे मोती रामरायाच्या पगडीला
सीता मागती पगडीला
नाशीक त्रिंबक सीताबाईच माहेर
आष्टीच्या पाताळाच राम करतो आहयेर
पडतो पावस फळी धरली काळीकुट
सीताच्या न्हाणीवरी रामचंद्र हानी मोट
जनक राजाच्या ओसरीला धनुष्याचा केला घोडा
राम सितेचा जनमी जोडा
आधी रामाला घाम आला होता सीता पुसत होती आता सीतेस घाम येतोय आणि राम पुसतो आहे.
राम लक्ष्मण सीता चालले सडकेने
सीताले आला घाम राम पुसे पदराला
पडला पाऊस औरंगबाजी काळा कुट
सिताच्या न्हाणीवर रामचंद्रा हाकी मोट
रामाची सिताबाई भेटली गंगात
काळी चंद्रकळा मोती भरले भांगात
सिताबाई सवासीन मला भेटली गंगात
चोळी मधुरी अंगात, मोती भरले भांगात
सिताला नाही सव रानात राहायाची
रामाने पाठविली चोळी हरणीबाईची
सिताच्या चोळीवरी खडी काढली जिन्नासाची
सिताबाई गोरी गोंधिल नाकावरी
रामराया साज सिता तुझ्या नथावरी
सिताबाई गोरी इन गोंधन कानावरी
रामसारखा भरीतार हिरा चमके नतवरी
चला जावू पहाया सिताचा संसार
तांब्याच्या उतळणी राम इचा भरतार
रामकुंडावरी हिरवा मंडप जाईचा
आंघोळीला आला पुत्र कौशल्याबाईचा
पडतो पाऊस औरंगबाजी काळा कुट्ट
सिताच्या न्हाणीवरी रामराया हाकी मोट
सोन्याची पंचारती त्याला कापराच्या वाती
सितानं ओवाळला रामासंगट मारुती
गंगादाराच्या पायर्या सिता चढती जोमान
छत्री धरली रामान
सकाळीच्या पारी ऐका मोराची आरोळी
राम करीतो आंघोळी सीता काढती रांगोळी
(खाली शिंदेशाही तोडे असे वाचावे)
िशंदीबाई तोडी सीताबाईच्या हातात
उजेड पडला रामरायाच्या रथात
िशंदी शाई तोडे सीतामाईच्या हातात
पडला उजेड रामरायाच्या रथात
िशंदी शाही तोडे सीतामाईच्या हातामधी
उजेड पडला रामाच्या रथामधी
रामयाची सीता इले खांबासी आवरती
क्षणभर नाही राम इसरती
राम म्हणू राम राम िनघाले फेरिला
सिता ने बांधीले वले नारळ नेहरीला
(चढण्यासाठी असलेला 'यंगणे' हा खास वैदर्भीय शब्द या काव्यातून येत राहतो)
गंगाद्वारच्या पायर्या सिता येंगती दमान
छत्री धरली रामान
सितेला घेवून राम चालला नटत
साथी या वानेराची फौज बसली वाटत
अरुण्य वनामधी हिरव्या काचाच्या कमानी
बंगला बांधीला रामानी
राम कुंडावरी राम करितो अंघोळ
सभा मंडपात सीता घालीती रांगोळी
सीतामाई राखीन डोंगर चढती दमान
चोळी भिजली घामान छत्री धरली रामान
गंगा द्वाराच्या पायार्या सीता चढती जोमान
छत्री धरली रामान
(सीतामाई आता थकल्या आहेत पायऱ्या चढण्याची सीतेची पद्धत बदललेली आहे, मुख्य म्हणजे ओवी एकसूरी न होता त्यात सहज विनोद साधण्याचा प्रयत्न आहे.)
गंगा द्वाराचा पयिर्या सिता चढती बसून
राम बोलतू हसून
सीताबाई गोरी हिन गोदन गालावरी
रामासारखा भरतार हिरा चनके नथवरी
(वर म्हटल्या प्रमाणे वहिनी दीराचे नाते एकदम महाराष्ट्रीय करून रंगवले आहे, उडदाचे वरण जरासे चिकट होते आणि लक्ष्मणास ते मानवत नाही तो तक्रार करतो पण राम तेच वरण चुपचाप खातोय, खुसखुशीत थट्टा विनोद रंगण्यासाठी या ओव्या गाताना एका पेक्षा अधिक स्त्रीया लागत असाव्यात)
सीता स्वयपाकाले उडदाच वरण
रामाच्या परीस लक्ष्मणाच गर्हाण
(फलटन म्हणजे बहुधा पलटण असावे ?)
फलटण शहरामधी काय वाजत झाई झाई
रामाशेजारी सीताबाई
राम कुंडावरी सोन्याच गायमुख
आंघोळीला उतरल राजा दशरथाच लेक
पावसानी फळी धरली कोळी कुट
सिता न्हानीवरी रामराया हानी मोट
पाऊस पडतो औरंगबाज काळा कोट
सिताच्या न्हानीवरी रामराया हाकी मोट
राम चालस वाटे वाटे सीता चाले कोठे कोठे
रामासारीका भरतार सीताला िमळाले कोठे
पाऊस पडतो औरंगबाजी काळाकोट
सिताच्या न्हानीवरी रामराया हानी मोट
(केळींच्या घडांचे भाव जरासे कमी होतील)
पाऊस राजाने फळी धरली सुर्यातळी ग
सीताच्या न्हाणीवरी रामचंदर लावी केळी
राम देवअवतारी सिताबाई मुजरा करी
नेसली हिरवी साडी लेली कुंकवाची चीरी
पाऊस राजाने फळी धरली काळी कोट
सीताच्या न्हाणीवरी रामचंदर हाकी मोट
पावसानी फळी धरली काळी कोट
सीताच्या न्हाणीवरी राम हाकीतो मोट
पाऊस पडतो डोंगरी ग काळी कोट
सीताच्या न्हाणीवरी रामराया हाकी मोट
(राम भरतार हिराईच्या नथावरी असे म्हणत हलकेच थट्टा चालू आहे, सुरवातीस सावळी असलेली सीता पाहता पाहता गोरी झालेली दिसते)
सिताबाई गोरी गोंधन नाकावरी
राम भरतार हिराईच्या नथावरी
अग्नी डोह गेले बाई दशरथाचे मुल
सिताबाई पेटी पडं वर जाईचे फुल
वळवाच्या पावसानी फळी धरली काळी िनळी
सिताच्या न्हाणीवरी राम सया लावी वेळी
(चला केळी लावून एकदाचे केळीच्या पानावर रामास जेवण लाभले तर !)
सिताला सासुरवास कापट्याचा आणि दाणी
रामाला जेऊ घाली केळीच्या पानावरी
(रामजींचा रथ आंबराई, चिंचबनात सोन्याचा कळस गुंतवून घेत झाई झाई दणादणा चाललेला आहे...)
सीता सुकून पाहून ताळाखाच्या पाण्यामंधी
पाहीला ग गेली वनवासाला राम व्हते ज्वानीमधी
रामाच्या गडावरी कोण करणा दोरी
रामापरास सीता गोरी
रामाच्या गडावरी कोण करता सुन
रामापरास सीता उंच
रामाजीचा रथ रथ चाल झाई झाई
सोन्याचा कळस गुंतीला आंबराई
रामाजीचा रथ रथ चाल दणादणा
सोन्याचा कळस गुंतीला चिंचबना
रामाला आला घाम सीता पुशी पदराला
कोणाची झाली दिष्ठ रथ गेला बाजाराला
रामाला आला घाम सीता पुशी माडीतुनी
कोणाची झाली दिष्ठ रथ गेला झाडीतुनी
सिता तुझ्या न्हाणीत उन उन पाणी
मारलेत बाण राम हो तेगार पाणी
सिता वनवासी डोंगर चढती दमानं
चोळी भिजली घामानं छत्री धरली रामानं
गाव पारनेरची नदी वाही खळखळा
सीता नेसली चंद्रकळा
बारव्या विहीरीवरी आहे पातळाची घडी
आंघोळीला उतरले सिता जनकाची जोडी
पहाटेच्या पाहारी कर्णा वाजतो झाई झाई
आता जाग करी रामजीला ग सिताबाई
कावळा कोकतो राजगडाच्या आढ्यावरी
सांगते बाई तुला रत्न सीताच्या चुड्यावरी
भयान वनात दिवा जळतो तुपाचा
उजेड पडला सिताच्या रुपाचा
राम लक्ष्मण दोघ ऐनीचे गडी
सिता पतीवृती हिच्या कवाडाला कडी
अग सुरी असे मुख सिता ग बाई तुझी न्हाणी
दगडाची न्हाणी ये उकळ्या मारे पानी
पाऊस राजाने फळी धरली काळी कोट
सीताच्या न्हाणीवर रामचंद्र तुझी मोट
सकाळी उठुन कोण करी हारी हारी
राम चालले आंघुळी सीता काढते रांगोळी
रामाची राणी राणी चढली पायरी
चौथी भिजली घामानी रामाची राणी
दुरताईन देखु मन माहेर सुदंर गावना
मजार राम सीतान मंदीर
पडतो पाऊस औरंगाबादी काळाकुट
िसताच्या न्हानीवरी रामचंद्र हाके मोट
सजवीला रत रतामध्ये कोण
राम आिण लक्ष्मण सीतामाय सवाशीन
राम लक्ष्मण दोन्ही धनुष्याच बाण
रथात बसली सीता केतकीच पान
सिता चालली वनवास गोताले लागे ठेच
जडे रामाचा वनवास
रामाची राणी राणी चढली पायरी
चोळी भिजली घामानी छत्री धरली रामानी
राम लक्ष्मण गुलाबाचे हार
शेवंती सुकुमार माझी
रामाला अाला घाम सीता पुशी पदरानी
कोणाची ग झाली दिष्ट रथ गेला बाजारानी
रामाला आला घाम सीता पुशी लहुलाया
कोणाची रे झाली दिष्ट तुला माझ्या रामराया
सोन्याच साजपात्र सिताच्या स्वयंपाकाला
रामाला रात्र झाली लढाई जायाला
सडकनी चालले राम लक्ष्मण
रामाला आला घाम सीता पुसती फडक्यानं
रामाला आला घाम सीता पुशी पदरान
कोणाची झाली दृष्ट रथ गेला बाजारान
अडल का टाकुनी पडल का मधी पाई
उभी अाहे तिथ रामाची सिता बाई
रामाला आला घाम िसता पुशी लहु लाया
कुणाची झाली दृष्ट तुम्ही माझ्या रामराया
रामाला आला घाम सिता पुशी पदरांना
कुणाची झाली दृष्ट रत गेला बाजाराला
रामाला अाला घाम सीता पुसीती पदरानी
रामा तुझा रथ गेला बाजारानी
रामाची सीता मला भेटली गंगेत
नाकामध्ये नथ चोळी कंचुकी आंगात
रामा आला घाम सीता पुसती फडक्यानी
रामा तुझा रथ गेला धडाक्यानी
रामेश्वरीच्या पायर्या सिता येंगती दमानी
चोळी भिजली घामानी छत्री धरली रामानी
रामाला आला घाम सिता पुसी फडक्यान
कोणाची झाली दृष्टी रथ गेला सडकान
रामाला आला घाम सीता पुसी दंडोदंडी
कोणाची झाली दिष्ट रथ उभा रामकुंडी
सोन्याच्या हरण्याची अंगी कंचोळी दाटते
सुन सुंदरा शोभते दशरथ राजयाला
शेरभर सोन सीताबाईच्या पदराला
सुन शोभे आयुध्याला दशरथ राजाला
नाशिक त्र्यंबक गंगुबाईचे माहेर
जरीच्या पातळाचा रामाने केला अाहेर
पाऊस पडतो डोंगरी काळकुट
सिताच्या न्हाणीवर हाकी राम मोट
आंघोळीला आली हिरवी पालखी कोणाची
सिता रामाची जानकी
पाऊस पडतो औरंगबाजा काळाकोट
सीताच्या न्हाणीवरी राम हाकीतो मोट
राम तुझा रथ आडला इल्या पिवळ्या धजा
सिताबाई रथावरी रामजीचे देतो रजा
एकुण काव्य बरच प्रदीर्घ आहे. विस्तार भयाने तुर्तास येथेच थांबतो. हे स्त्री गीतातील रामायण पुढे खूप मोठे आणि पुर्वार्धाचा सुद्धा अजून बराच भाग वाचनीय आहे, या दुव्यावर उपलब्ध दिसतो उत्तरार्ध जरा भजनी टाईप असावा. वरच्या आलेल्या उल्लेखात तुळशी बागेत नागणी पसरणे उल्लेख समजला नाही.
'कूणाची दृष्ट लागली रथ गेला बाजारातून' या उल्लेखाच प्रयोजन निटस लक्षात येत नाही, म्हणजे आधी म्हटले तसे थट्टा विनोद आहे की, कदाचित स्वतःच्या कुटूंबातील व्यक्तिवर एकीकडे कौतुक करत आबराखत जबाबदारीची जाणीव देऊ इच्छिणारी केलेली टिका आहे?, घरात एवढी सुगुणी सुरुप सीता आहे तुला ती आवडते तरी दृष्ट लागल्याप्रमाणे रथ बाजारातून का जातोय, कदाचित मी काढलेला असा अर्थ चुकीचाही असेल आणि केवळ थट्टा मस्करी असेल, चुकभूल देणे घेणॅ.
मिपा वाचकांना उर्वरीत भागातील काही कडवी आवडल्यास जरुर उधृत करावीत.
प्रतिक्रिया
16 Apr 2017 - 12:50 pm | भीमराव
प्रस्तुत काव्य रामायण फलटण गावाच्या आसपासच्या माताभगीनिचं आसलं, कारण फलटणाच्या ऊल्लेखाबरोबर तिथे निघनाऱ्या राम रथाचं पन वर्णन आहे.
16 Apr 2017 - 1:00 pm | यशोधरा
काय सुरेख आहे हे! वाचते आता. धन्यवाद इथे दिल्याबद्दल.
16 Apr 2017 - 1:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख वाचायला मजा आली.
-दिलीप बिरुटे
16 Apr 2017 - 2:22 pm | पद्मावति
वाह! सुरेख आहे.