माझ्या महाराष्ट्राचं गाणं
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या अभिमानास्पद वैशिष्ट्यांना एकत्र गुंफण्याचा माझा प्रयत्न :
===================
बेलाग कातळ कड्याची कपार
त्यातून खुणवी गरुडाचे घर
घाटाचे वेटोळे माळती डोंगर
माडा पोफळीशी खेळतो सागर
पाटाच्या पाण्याची खळाळ लकेर
घामाच्या खताने फुलते शिवार
शेताच्या बांधाशी चटणी भाकर
कष्टाच्या घासाला तृप्तीचा ढेकर
खिलारी जोडीला पोळ्याचा शृंगार
भारूडा भुलवी लावणी शृंगार
ओवीच्या अंतरी शांतीचा सागर
अभंग झंकारे झेलून प्रहार
भक्तीने भिजतो चंद्रभागातीर
दिंडीच्या रिंगणी विठूचा गजर