कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ - मूल स्थान इत्यादि - लेख १

Primary tabs

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
15 May 2018 - 7:26 am

दिल्लीला भेट देणारा प्रत्येक प्रवासी, प्रख्यात कुतुब मिनार, त्याच्याजवळील कुव्वत-उल-इस्लाम ही आता पडझड झालेली मशीद आणि तिच्या प्रांगणातील लोहस्तंभाला भेट दिल्याशिवाय राहात नाही. ह्यांपैकी कुतुब मिनार आणि मशीद ह्यांचा इतिहास पुरेसा स्पष्ट आहे, परन्तु लोहस्तंभाकडे पाहून त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. हा स्तंभ कोणी आणि का निर्माण केला, तो पहिल्यापासून येथेच आहे की आधी तो अन्य कोठे होता आणि तेथून येथे आणला गेला आहे, अन्य अनेक स्तंभांप्रमाणे हाहि बाहेरून येथे आणला गेला असेल तर त्याचे मूळ स्थान काय असावे ह्याविषयी तो विचार करू लागतो. हा स्तंभ सुमारे सोळाशे वर्षांचा जुना आहे हे समजल्यावर इतकी वर्षे न गंजता वा हवापाण्याचा त्याच्यावर कसलाच दृश्य परिणाम न होता तो कसा टिकून आहे, तो कोठल्या तन्त्राने निर्माण केला गेला आहे आणि त्यावरील लेख कोणी आणि कसा कोरला असावा हेहि कोडे त्याला पडते. सुमारे १८३० सालापासून प्रारंभी ब्रिटिश आणि तदनंतर भारतीय आणि अन्यदेशीय अभ्यासकांच्या अभ्यासामधून काही ठोस उत्तरे आणि काही पुष्कळसे पटण्याजोगे तर्क अशा प्रश्नांची उत्तरे म्हणून बांधण्यात आले आहेत. त्या तर्कांपैकी हा स्तंभ मूळ कोठे असावा ह्याचे अभ्यासकांना सापडलेले एक तर्कप्राप्त उत्तर हा या लेखमालिकेचा प्रमुख विषय आहे. त्याच्या अनुषंगाने अन्य प्रश्नांची उत्तरेहि शोधण्यात येतील.

प्रथम सध्या समोर दिसणाऱ्या स्तंभाचे वर्णन पाहू. १९६१ साली भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शताब्दिवर्षात हा लोखंडी स्तंभ जागेवरून संपूर्ण काढून तो नीट टिकावा म्हणून त्याच्यावर रासायनिक संस्करण केले गेले आणि तो पुन: मूळ स्थानी जसा होता तसा उभारला गेला. त्यावेळी त्याची मोजमापेहि घेतली गेली ती अशी: स्तंभाची एकूण उंची: २३’ ६" (तेवीस फूट, सहा इंच), स्तंभाच्या जमिनीतील टोकापासून स्तंभाभोवती बांधलेल्या संरक्षक चबुतऱ्याच्या वरील पातळीपर्यंत लांबी: ३’ १". त्यावरचा सिलिंडर: १७’, त्यावरील स्तंभशीर्ष: ३’ ५", चबुतऱ्यापाशी सिलिंडरचा व्यास १’ ४.७", स्तंभशीर्षाच्या वरील बाजूचा व्यास: ११.८५". स्तंभाचे वजन सुमारे सहा टन आहे.

लोहस्तंभावरील प्रमुख लेख, आणि त्या लेखाचे शेजारीच भिंतीत लावून ठेवलेले वाचन (श्रेय - विकिपीडिया)
---

स्तंभावरती उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या काळांतील अनेक लेखांमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठा असा सहा ओळींचा, गुप्तकालीन ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला एक लेख आहे. धातूवर कोरला गेल्यामुळे त्यातील अक्षरे स्पष्ट आहेत आणि १८३८ मध्ये Journal of the Asiatic Society of Bengal, Vol VII, 1838, p.629 येथे प्रसिद्ध झालेल्या जेम्स प्रिन्सेपच्या वाचनापासून अनेक अभ्यासकांनी त्याची वाचने केली आहेत. त्यांपैकी जे. एफ. फ्लीट ह्यांचे (Corpus Inscriptionum Indicarum, Vol.III, p. 139) वाचन असे आहे:

यस्योद्वर्तयत: प्रतीपमुरसा शत्रून्समेत्यागतान्।
वङ्गेष्वाहववर्तिनोऽभिलिखिता खड्गेन कीर्तिर्भुजे।
तीर्त्वा सप्तमुखानि येन समरे सिन्धोर्जिता वाह्लिका:।
यस्याद्याप्यधिवास्यते जलनिधिर्वीर्यानिलैर्दक्षिण:॥
खिन्नस्येव विसृज्य गां नरपतेर्गामाश्रितस्येतराम्।
मूर्त्या कर्मजितावनिं गतवत: कीर्त्या स्थितस्य क्षितौ॥
शान्तस्येव महावने हुतभुजो यस्य प्रतापो महान्।
नाद्याप्युत्सृजति प्रणाशितरिपोर्यत्नस्य शेष: क्षितिम्॥
प्राप्तेन स्वभुजार्जितञ्च सुचिरन्नैकाधिराज्यं क्षितौ।
चन्द्राह्वेनसमग्रचन्द्रसदृशीं वक्त्रश्रियं बिभ्रता।
तेनायं प्रणिधाय भूमिपतिना भावेन विष्णौ मतिम्।
प्रांशुर्विष्णुपदे गिरौ भगवतो विष्णोर्ध्वज: स्थापित:॥

अर्थ

  • वंग प्रदेशामध्ये युद्धात एकत्रितपणे समोर आलेल्या शत्रूंना आपल्या छातीने परतवल्यामुळे ज्या (नरपति)च्या भुजावर खड्गाने कीर्तिलेख लिहिला गेला,
  • सिंधूची सात मुखे पार करून ज्याने युद्धामध्ये वाह्लिकांना जिंकले,
  • ज्याच्या पराक्रमाच्या वायूंनी अद्यापि दक्षिणसागर सुवासित आहे,
  • (ह्या श्रमांनी) थकल्यामुळे जो नरपति हे जग सोडून आपल्या (उत्तम) कर्मांचे फल म्हणून मिळविलेल्या दुसऱ्या जगात वसतीसाठी जो गेला आहे आणि तरीहि जो कीर्तिरूपाने पृथ्वीवर उपस्थित आहे,
  • महारण्यामध्ये आता शान्त झालेल्या वणव्याप्रमाणे शत्रूंचा नाश करणाऱ्या ज्याचा महान् पराक्रमशेष अद्यापिहि पृथ्वी सोडत नाही,
  • ज्याने आपल्या बाहूंनी पृथ्वीवर चिरकाल सार्वभौमत्व मिळविले,
  • ज्याचे मुखवैभव पूर्णचन्द्राप्रमाणे आहे,
  • अशा ’चन्द्र’ हे नाव धारण करणाऱ्या त्या भूमिपालाने
  • विष्णूवर मति स्थिर करून हा उंच असा विष्णूचा ध्वज 'विष्णुपद’ नावाच्या गिरीवर स्थापन केला.

ह्या लेखावरून स्तंभाविषयी पुढील स्पष्ट माहिती मिळते. ’चन्द्र’ हे नाव धारण करणारा (चन्द्राह्व) पराक्रमी आणि एकछत्री राज्य स्थापन करणारा राजा ह्या स्तंभाचा निर्माता आहे. त्याने दक्षिणसागर, वंगभूमि आणि सिंधूपलीकडील प्रदेशात संचार करून शत्रूंवर विजय मिळविले. तो विष्णुभक्त होता. स्तंभ विष्णूचा ध्वज आहे आणि विष्णुपदगिरि अशा नावाच्या उंच जागी त्याची मूळ स्थापना झाली होती. लेखाच्या भाषेविषयी असे म्हणता येते की ती उच्च प्रतीची विदग्ध संस्कृत असून लेखकाचे काव्यनिर्मितीवर आणि भाषेवर चांगले प्रभुत्व होते.

आता प्रश्न असा उभा राहतो की हा पराक्रमी, चन्द्र असे नाव धारण करणारा, आणि वंग, दक्षिणसागर, सिंधुपार येथेपर्यंत वर्चस्व निर्माण करणारा राजा कोण असावा? येथे आपल्यासमोर तीन नावे उभी राहतात, ती म्हणजे अलाहाबाद किल्ल्यातील अशोक स्तंभावर दिसणाऱ्या गुप्तकालीन लेखामध्ये उल्लेखिलेला समुद्रगुप्त, त्याचा पिता चन्द्रगुप्त आणि समुद्रगुप्ताचा पुत्र चन्द्रगुप्त दुसरा (ज्याला विक्रमादित्य असेहि उपपद आहे). ह्या तीनहि नावांचे आणि अन्य काही नावांचेहि प्रतिपादक विद्वान् आहेत, पण बहुतेकांचा कौल चन्द्रगुप्त दुसरा अर्थात् चन्द्रगुप्त विक्रमादित्य (इ.स. ३७८-४१३ सुमारे) ह्याच्या पक्षात आहे. (ह्या विषयाचे पूर्ण विवेचन आणि निर्णय Rise and Fall of the Imperial Guptas ह्या अश्विनी अग्रवाललिखित ग्रंथामध्ये पृ.१८३ येथे पाहण्यास मिळेल.) चन्द्रगुप्त विक्रमादित्य हा आपल्या पित्याच्या कारकीर्दीत मालवप्रान्तातील (माळवा) उज्जयिनीचा शासक नेमला गेला होता, आणि तो स्वत: राज्यावर आल्यावर आपली राजधानी पुरातन पाटलिपुत्रातून हलवून उज्जयिनी येथे आणली होती हेहि माहीत आहे.

दुसरा चन्द्रगुप्त हा मोठा विष्णुभक्त होता, कारण तसा स्पष्ट उल्लेख त्याची कन्या प्रभावतीदेवी हिच्या - जिचा विवाह वाकाटककुलामध्ये रुद्रसेन दुसरा ह्याच्याशी झाला होता - 'Poona Plates' ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ताम्रपटामध्ये (Corpus Inscriptionum Indicarum, Vol V, p. 5) मिळतो. ताम्रपटात चन्द्रगुप्ताचा उल्लेख ’परमभागवत’ असा करण्यात आला आहे. एकूणातच गुप्त घराणे विष्णुभक्त होते, हे चन्द्रगुप्त विक्रमादित्याचा पुत्र कुमारगुप्त ह्याच्या काळातील रेशीम-विणकरांच्या श्रेणीचा मंदसोर येथील लेख (Corpus Inscriptionum Indicarum, Vol III, पृ. ७९), तसेच चन्द्रगुप्त विक्रमादित्याचा पौत्र बुधगुप्त ह्याच्या काळात सागर जिल्ह्यातील एरण येथे महाराज मातृविष्णु आणि महाराज धन्यविष्णु ह्या दोघा भावांनी जनार्दनाच्या नावाने अर्पण केलेला जो ध्वजस्तंभ उभारला त्यावरील लेख इत्यादिवरून स्पष्ट होते (Corpus Inscriptionum Indicarum, Vol III, पृ. ८८).

विचारसंस्कृती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

15 May 2018 - 8:56 am | प्रचेतस

उत्तम सुरुवात.
हा स्तंभ उदयगिरीत (विदिशा) येथे उभारण्यात आला होता असे काहीसे वाचनात आले होते. तिथून दिल्लीपर्यंत त्याचा प्रवास कसा झाला हे समजून घेणे रोचक ठरावे.

शाली's picture

15 May 2018 - 9:01 am | शाली

रोचक लेख. मस्त!

मनो's picture

15 May 2018 - 9:26 am | मनो

छान, चांगली ओळख.

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 9:33 am | manguu@mail.com

इतकी भारी टेक्नॉलॉजी होती तर नुसता खांब का उभा केला ? अखखा राजवाडा , मनोरा वगैरे उभा करायचा

गुप्त स्थापत्यशैली जबरदस्त होती. गुप्तांनी अनेक बांधकामे उभारलीत

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 12:54 pm | manguu@mail.com

https://en.m.wikipedia.org/wiki/Gupta_Empire

स्तूप , लेणी इ आहेत, छान

मंगूजी, असं करता तुम्ही! काय गरज आहे का इतक्या अभ्यासपूर्ण लेखावर काड्या टाकण्याची. थोडंसं हुडकलंत तरी गुप्तकालिन स्थापत्य, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीविषयी माहिती मिळू शकेल. कृपया, थोडे अन्वेषणश्रम घ्याच असा फुकटचा सल्ला.

डँबिस००७'s picture

15 May 2018 - 12:21 pm | डँबिस००७

मिपावर सर्व ठिकाणी पिंका टाकण्या ईतके पान खात जाऊ नका !! सुधरा जरा !

एस's picture

15 May 2018 - 10:21 am | एस

रोचक सुरुवात. कृपया स्तंभावरील लेखाचे छायाचित्र देता आले तर जरूर टाका इथे. पुभाप्र.

अरविंद कोल्हटकर's picture

18 May 2018 - 1:22 am | अरविंद कोल्हटकर

लेखाची छायाचित्रे जालावर सहज सापडतात. मला दिसलेल्यांपैकी हे पुढील छायाचित्र हे पुरेसे स्पष्ट आहे.

इरसाल's picture

15 May 2018 - 10:58 am | इरसाल

स्तंभा भोवती लावलेली संरक्षक जाळी नव्हती, तेव्हा प्रत्यक्ष स्तंभाला हात लावुन "अनुभुती" घेता यायची. छान वाटायचं.
परत पाठीमागे दोन्ही हात करुन त्या कवेत (उलटी कव) ज्याला स्तंभ घेता येईल तो भाग्यवान म्हणुन लोकांची झुंबड उडालेली असायची. हा प्रकार वाढल्यावर मग ती जाळी बसवण्यात आली.

प्राची अश्विनी's picture

15 May 2018 - 12:50 pm | प्राची अश्विनी

चिनी कम मधला हाच स्तंभ ना?

हेच म्हणणार होतो, खूप वर्ष पूर्वी दिल्लीला गेलो असतांना हा प्रकार करून पहिला आहे. आता संरक्षण जाळी लावली ते बरंच झालं.

अरविंद कोल्हटकर's picture

18 May 2018 - 1:27 am | अरविंद कोल्हटकर

त्या प्रथेचे हे चित्र पहा


sagarpdy's picture

15 May 2018 - 11:01 am | sagarpdy

उत्तम सुरुवात. पुभाप्र

पुंबा's picture

15 May 2018 - 11:31 am | पुंबा

जबरदस्त सुरुवात काका..
वाखुसा.
पुभाप्र.

गामा पैलवान's picture

15 May 2018 - 12:01 pm | गामा पैलवान

मंगूश्रीपंत,

इतकी भारी टेक्नॉलॉजी होती तर नुसता खांब का उभा केला ? अखखा राजवाडा , मनोरा वगैरे उभा करायचा

ज्याला कुतुबमिनार म्हणतात तो मूळचा धृवस्तंभच आहे. तुम्हांस माहित नाही वाटतं? अंगठाछाप कुतुबुद्दीन ऐबकची औकाद होती का मनोरा बांधायची?

आ.न.,
-गा.पै.

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 12:29 pm | manguu@mail.com

मालक अंगठाछाप असला तर घर बांधता येत नाही ? सुरसच !

manguu@mail.com's picture

15 May 2018 - 12:49 pm | manguu@mail.com

ते ध्रुवास्तंभ असो नैतर कुटूबमिनार असो नैतर Jacob's ladder असो , जे काय आहे ते आज प्रतिवर्षी 10 कोटींचा रेव्हेन्यू भारत सरकारला देते आहे,
------

माझा प्रश्न लोकांना इतका का टोचला ते समजत नाही,

कपिलमुनी's picture

15 May 2018 - 12:24 pm | कपिलमुनी

आवडला

प्राची अश्विनी's picture

15 May 2018 - 12:55 pm | प्राची अश्विनी

+१

कुतुबमिनारही बांधकामाचा उत्तम नमुना आहेच.

स्तंभ कोणत्या गिरीवर होता चौथ्या शतकात हे पुढच्या लेखात येणार बहुतेक.

मंगूश्रीपंत,

माझा प्रश्न लोकांना इतका का टोचला ते समजत नाही,

मला अजिबात टोचला नाही. उलट मला माझं ज्ञान पाजळायची संधी मिळाली म्हणून मी खूष आहे.

आ.न.,
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

15 May 2018 - 7:43 pm | दुर्गविहारी

उत्तम आणि माहितीपुर्ण धागा. मि.पा.वर सध्या मेजवानी म्हणावे असे धागे येत आहेत. दुर्दैवाने वाचायला वेळ होत नाही. तरी वेळ मिळेल तसे वाचेन. पु.भा.प्र.

अर्धवटराव's picture

15 May 2018 - 9:23 pm | अर्धवटराव

तुमची अभ्यासाची हौस दांडगी आहे राव.
पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 May 2018 - 10:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर अभ्यासू लेख !

पैसा's picture

18 May 2018 - 3:14 pm | पैसा

काही वर्षांपूर्वी दिल्लीला गेले तेव्हा कुतुबमिनार पर्यटकांना वर चढायला बंद केला होता. या स्तंभाच्या फार जवळ जायला मिळत नव्हते.

शशिकांत ओक's picture

18 May 2018 - 7:01 pm | शशिकांत ओक

नमस्कार अरविंद जी,
आपल्या प्रगाढ ज्ञानाचा प्रभाव या लेखमालेतून पुन्हा प्रत्ययास येत आहे. त्यामुळे प्रस्तूत विषयातील बारकावे भाषेच्या अंगांनी, पुरातत्वातील संदर्भातून आणि विदेशी अभ्यासकांच्या दृष्टीने या वास्तु परिसरातील घटनाक्रम, नोंदीनुसार मते मतांतरे यातून वैचारिक नवनीत मिसळपाव चा आस्वाद घेता घेता वाचायला मिळेल...