ऐसे ऐकिले आकाशी
(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा
वितान अवकाशाचे व्यापून-
अचूकतेची लय सांभाळीत-
परस्परांशी अंतर राखून-
कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो,
फिराल तुम्ही अथकपणाने
विश्वांताचा क्षण आला तरी
अमुच्या आभासी पण तरिही
अभेद्य ऐशा बेड्या घालून?"
(२) पिठूर केशरी चंद्रधगीने
स्फटिकतळ्यातील मासोळीला
म्हटले बिलगून जललहरीतून,
"झगमगणारे लोलक दाहक
त्वचेवरून देशील का काढून?
मावळतीवर जेव्हा तारे-
भल्या पहाटे फिक्कट होतील-
तेव्हा त्यांना तेज त्यातले
थोडे थोडे देईन वाटून"