अभय-काव्य
नाच्याले नोट : नागपुरी तडका
नाच्याले नोट : नागपुरी तडका
चमचमी बूट हाय, मलमली कोट हाय
सिगारेट सिलगवाले, हजारची नोट हाय
फ़ाटलेलं दफ़्तर, चड्डीले भोक हाय
बापाच्या नशीबात, जह्यराचा घोट हाय
मरणारे मरतात, चरणारे चरतात
लेका इथं कोणाच्या, हाडावर चोट हाय?
वाणी-दास-पुढाऱ्याच्या, मिशीले तूप हाय
दूध-दूभतं करणार्याचे, पाठीले पोट हाय
जसं तुले हाय तसं, मलेबी वोट हाय, पण;
ढ्यँगपाट्या सरकाराच्या बापामंदी खोट हाय
सात, आठ, नवव्या आयोगाचे योग हाय
कापसाले भाव म्हणान तं फ़ेंडीवर सोट हाय
द गडू शेट द गडू शेट ......:)
द गडू शेट द गडू शेट
भरले का हो तुमचे पेट?
तुम्ही म्हणे उडवून लावता
भल्या भल्यांचे जम्बो जेट?
इकडून सूड तिकडून अभ्या
बॅट्या टक्या किसन प्यारे
उचकायाचा मामिला
उगा का रे लावता नेट?
व्यासपीठ हे विरंगुळ्याचे
मामू , मामे, फरक काय?
पदर खोचून उभा/भी आहे
तुमच्या समोर मामि थेट.:)
काय सांगू कस्सं सांगू
खरं काय खोटं काय
कधी तरी कुठेतरी
कट्ट्यामध्ये होइल भेट.
( ट ला ट लावून पाडलेली कविता:))
“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!
“रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा...!
शेतमालाचे भाव वाढले की
आपला जळफळाट होतो...कारण
आपल्या मनात दडी मारून
बसला आहे एक रावण
आपल्या मनातल्या रावणाला
सीता पळवून न्यायची असते
भूमीतून निपजलेल्या वस्तूंची
किंमत मोजायचीच नसते
आमची मानसिकता रावणीच
संधी मिळताच जागी होणारी
पोशिंद्याला सदैव अशोकवनात
बंदिस्त ठेवू पाहणारी
कधी मरेल हा रावण
तुमच्या आमच्या मनातला?
आणि कधी होईल मुक्त
बळीराजा रानातला?
नका घेऊ गळफास
नका घेऊ गळफास
किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास
बाबाजींना सांगू आम्ही
काकाजींना सांगू आम्ही
दादाजींना सांगू आम्ही
मामाजींना सांगू आम्ही
नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!
जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले
नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले
डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!
छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
कोणाच्या ना बापा भिऊ, लुटारूंच्या पाठी ठेवू
पायाखाली तुडवत जाऊ, साऱ्या अडथळ्यांस ....!
गंड मार्गदर्शन काव्य- मार्फत प्रेरणा दायी हम्मा (आम्ही प्रेरणा देतो :) )
कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली
काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला
न पळी राहिलीए ना पंचपात्र
किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे
रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच
त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे
संपत आलेल्या किणकीणाटाला
खणखणाट समजून अथवा भासवून
उगाच खडे फोडतात कधी कधी
शिळ्याकढीला ऊत आणून
कधी सत्तेच्या आशेने
कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या
मृगजळी स्वप्नाने
कधी कामधेनू आपल्याही
गोठ्यातून निघून गेली या दु:खाने
मैत्र झुलवून बघ
मैत्र झुलवून बघ
चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ
नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर
शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग
दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर
देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही
मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती
मान ठेवून बघ
पायाखालची वीट दे....!
पायाखालची वीट दे....!
पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे
दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे
हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे
पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे
संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही
वेतनवाला आयोग दे
नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?
नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते?
गरिबावरती गरजते, धनिकावरी बरसते
एक सांगा भाऊसाहेब
सरकार म्हंजे यापेक्षा वेगळं काय असते?
हिरवं गेलं, निळसर गेलं, भगवं आलं
अस्काऱ्याच्या म्हशीले टोणगं झालं
टोणग्याच्या पाठीवर मलमली झूल
म्हशीच्या वेणीले धोतऱ्याचं फूल
साल बदललं तरीबी हाल बदलत नसते?
सातव्या आयोगाचा तिजोरीवर डल्ला
सामूहिक लग्नाचा शेतकऱ्याले सल्ला
अकलेचे कांदे बदबद पिकले
नाकाचे नकटे प्रवचन शिकले
समज ना उमज पण खुर्चीत धसते?
'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका
'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका
'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥
म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥
ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली
शेतकर्यांना स्मशानात थेट घेऊन गेली
कुणास पडलं सुतूक, जरी बदाबदा मेले? ....॥