पायाखालची वीट दे....!
पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे
दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे
हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे
पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे
संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही
वेतनवाला आयोग दे
देवा मला चारदोन
सवंगडी धीट दे
हरामींना कुटण्यासाठी
पायाखालची वीट दे
वास्तवाच्या शोधासाठी
डोकं थंडगार दे
लढवैयांच्या लेखणीला
'अभय' आणि 'धार' दे
- गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
13 Jul 2015 - 3:01 pm | तुडतुडी
देवा मला चारदोन
सवंगडी धीट दे
हरामींना कुटण्यासाठी
पायाखालची वीट दे>>>
भारी
13 Jul 2015 - 3:40 pm | अमोल मेंढे
खुपच छान मुटे साहेब
13 Jul 2015 - 3:44 pm | जडभरत
छान आहे!
13 Jul 2015 - 3:50 pm | वेल्लाभट
वा वा वा वा !
क्या बात है ! सुरेखच
13 Jul 2015 - 4:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली रचना. आशय पोहचला.
देवा, विठ्ठला आता पाऊस पडू दे बाबा.
-दिलीप बिरुटे
13 Jul 2015 - 5:36 pm | सौंदाळा
मुटेसाहेब,
कविता आवडली. परिणामकारक आहे.
13 Jul 2015 - 8:19 pm | होबासराव
हरामींना कुटण्यासाठी
पायाखालची वीट दे
वास्तवाच्या शोधासाठी
डोकं थंडगार दे
13 Jul 2015 - 8:48 pm | सतिश गावडे
विठ्ठल ही वारकरी पंथाची देवता. ज्ञानदेव हे या पंथाचे संस्थापक.
वारकरी पंथास पूजनीय असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात,
मुटेसाहेब, तुमचं मागणं या पंथाच्या शिकवणीच्या विपरीत आहे.
13 Jul 2015 - 11:40 pm | शैलेन्द्र
"भले त्यास देवू कासेची लंगोटी " म्हणणारे तुकाराम वारकरी नव्हते का?
13 Jul 2015 - 11:49 pm | जडभरत
भले तरी सोडू कासेची लंगोटी
परी नाठाळाचे माथी हाणू काठी!!!
असा आहे अभंग आणि तो बरोबर पण आहे. जो दुष्ट आहे त्याला फटका हा पाहिजेच!
14 Jul 2015 - 12:09 am | जडभरत
मतलब मी नंगा झालो तरी चालेल पण दुष्टाच्या डोस्क्यात फटका घातल्याशिवाय राहणार नाही.
अॅल भले!!!
14 Jul 2015 - 12:00 am | जडभरत
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्
असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.
14 Jul 2015 - 12:00 am | जडभरत
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्
असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.
14 Jul 2015 - 12:30 am | जडभरत
ज्ञानेश्वरी ४-५१ ते ५९.
5 Aug 2015 - 12:49 am | गंगाधर मुटे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार :)