‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.