थक्क करणारी कामगिरी

सोमनाथ खांदवे's picture
सोमनाथ खांदवे in जनातलं, मनातलं
21 Jul 2018 - 4:38 pm

परदेशी भाज्यांचे पिक घेऊन शेतकऱ्याने मिळवले वार्षिक 6 कोटींचे उत्पन्न .

एका अवलीयने आयटी मधील चकचकीत इमारतीत आपली भाजी विकायची असे स्वप्न पाहिले होते, तेच स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. आयटी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांसह देश-विदेशात ते या वेगवेगळ्या भाज्या पोहचवतात. मूळ परदेशात पिकवल्या जाणाऱ्या या भाज्यांचे पिक घेऊन एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले आहे. या भाज्यांच्या पिकातून त्यांना थोडेथोडके नाही तर वार्षिक ६ कोटी रुपये उत्पन्न मिळते. सगळा खर्च जाऊन त्यांना १ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. आळंदी येथील चऱ्होली खुर्द येथे राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे जयसिंग थोरवे.

आपल्या या व्यवसायाबाबत सांगताना थोरवे पत्नीची मोठी साथ असल्याचं आवर्जून सांगतात. आपली पत्नी मालन हिने आपल्याला या आधुनिक शेतीमध्ये मोठी मदत केल्याने हे फळ मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर आपल्यासोबत आजुबाजूच्या काही शेतकऱ्यांनाही त्यांनी अशापद्धतीच्या परदेशी भाज्यांची शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. जयसिंग आणि मालन थोरवे यांच्या या अनोख्या कामामुळे त्यांना यावर्षीचा आधुनिक शेती संबंधीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात येणारा पुरस्कार मिळाला आहे. या कामगिरीमुळे थोरवे कुटुंबाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

जयसिंग थोरवे लहान असताना आजीसोबत भाजी विकायला जायचे. शालेय वयापासूनच भाजीपाल्याची आवड निर्माण झाल्याने मोठेपणी आपण यातच काहीतरी करायचे असे जयसिंग यांनी ठरवले. याच क्षेत्रात झोकून देऊन काम केल्यामुळे त्यांना व्यवहारीक ज्ञान मिळाले. हिंजवडी येथे एका नातेवाईकांकडे गेलेले असताना जयसिंग यांना आयटी हबच्या उंचच उंच आणि चकचकीत इमारतींनी आकर्षित केले. त्यावेळी आपण याठिकाणी येऊन आपली भाजी विकायची असे स्वप्न त्यांनी गाठीशी बांधले. पण आयटी क्षेत्रात प्रवेश मिळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. मग जयसिंग यांनी आयटी क्षेत्राशी निगडित कोर्स केले आणि एका नामांकित कंपनीत नोकरी मिळवली. कालांतराने कंपनी बंद पडल्याने नोकरी गेली. नुकतेच लग्न ठरलेल्या जयसिंग यांनी आपली नोकरी गेल्याचे होणाऱ्या पत्नीला सांगितले. मात्र आपल्याकडे शेती आहे असे म्हणत मालन यांनी त्यांना अतिशय चांगली साथ दिली.

आयटी क्षेत्रात काम केल्याने तेथील कर्मचाऱ्यांना परदेशी भाजी आवडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. मग परदेशात नेमक्या कोणत्या भाज्या कशा पद्धतीने पिकवल्या जातात याबाबत त्यांनी आपल्या मित्राच्या मदतीने माहिती घेतली. मग सुरु झाला त्यांचा खरा प्रवास. जयसिंग यांनी आपल्या १२ एकर जमिनीत या परदेशी भाज्यांचे पिक घेण्यास सुरुवात केली. बरेच कष्ट घेतल्यानंतर त्यांना यात यश आले. आज मोठमोठ्या कंपन्या, मॉल याठिकाणी त्यांच्या भाज्या विकल्या जातात. पत्नी मालन यांनी इतर दोनशे शेतकऱ्यांना याचे प्रशिक्षण दिले,शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना भाज्यांचं उत्पन्न घेण्यास सांगितले, त्यांना बाजार पेठ मिळवून देण्याचे काम जयसिंग करतात. जयसिंग यांच्याकडे तब्बल ३७ प्रकारच्या परदेशी जातीच्या भाज्या आहेत. यात रेड कॅबेज, आईस बर्ग, रोमिनो, चेरी टोमॅटो यांचा समावेश आहे. येथील शेतकऱ्यांना या पिकामुळे जवळपास एकरी साडेचार लाख रुपये मिळतात. यामुळे शेतकरीदेखील खुश आहेत असे थोरवे यांनी 'लोकसत्ता ऑनलाईन'शी बोलताना सांगितले.

थोरवे यांच्या या भाज्या भारतातील गोवा, दिल्ली, बेंगळुरु, हैद्राबाद येथे जातात तर दुबई, युरोप, रशिया याठिकाणीही जातात. आपला हा वाढता व्यवसाय सांभाळताना दमछाक होत असल्याने त्यांनी आपल्या लहान भावालाही नोकरी सोडायला लावून या व्यवसायात आपल्यासोबत घेतले आहे. एकीकडे दुष्काळ आणि शेतात उत्पन्न मिळत नाही म्हणून मराठवाडा, विदर्भ येथे शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे थोरवे यांची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.
परदेशी भाज्यांचे पिक घेऊन शेतकऱ्याने मिळवले वार्षिक ६ कोटींचे उत्पन्न 
https://www.loksatta.com/maharashtra-news/jaysing-thorve-farmer-in-aland...

मांडणी

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jul 2018 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

वाटेत अडथळे आले तरी न खचता, रुळलेली वाट सोडून नवीन काही करून, उत्कर्ष कसा साधता येतो, हे स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध करणार्‍या थोरवे पती-पत्नींचे त्रिवार अभिनंदन !!! आणि ही कथा इथे प्रसिद्ध केल्याबद्दल तुमचे आभार.


(लोकसत्ता.कॉम वरून साभार)

कुमार१'s picture

21 Jul 2018 - 6:13 pm | कुमार१

त्रिवार अभिनंदन

श्वेता२४'s picture

21 Jul 2018 - 6:53 pm | श्वेता२४

या दोघांचेही अभिनंदन

सोमनाथ खांदवे's picture

21 Jul 2018 - 7:44 pm | सोमनाथ खांदवे

शेतकरी व आत्महत्या हे समीकरण सर्वांच्या मनात घर करून बसल्या नतंर अशा एखादया शेतकऱ्याची नेत्रदीपक प्रगती आपल्याला थक्क करून सोडते , आणि पुढाऱ्यां पेक्षा शेतकऱ्यांच्या यशोगाथा कुठल्याही सामान्य माणसाला वाचायला नक्कीच आवडतात .
हिंजवडी हमाल पंचायत ( सॉरी गाईज् ) मध्ये आयटी हमाल होण्या ऐवजी या बहाद्दराने आयटी वाल्यांच्या आवडी निवडी ओळखून त्यांना हव्याशा भाज्या शेतात पीकवायला सुरवात केली . खरंच श्री थोरवे चं कौतुक करावे तेव्हढे कमीच आहेत .

नाखु's picture

21 Jul 2018 - 9:34 pm | नाखु

आणि सोमनाथ भाऊंचे आभार.
तसंही तुमचं यात काय योगदान असे छिद्रान्वेशी शेतकरी मसिहा तुम्हाला टोमणे मारतील, त्याकडे शेतातील तणासारखे दुर्लक्ष करू नका.

शहरी भागातील नाखु

भावा इच्छा तेथे मार्ग हे खरे आहे, इच्छा अतिशय ज्वलंत हवी म्हणजे ध्यास घेऊन माणसे यशस्वी होतात.

जेम्स वांड's picture

21 Jul 2018 - 10:37 pm | जेम्स वांड

अक्कल असंल तितकं बोलावं, परदेशी भाज्या ,:D:D:D
का एक्सपोज करावं खांदवे साहेब.

सोमनाथ खांदवे's picture

21 Jul 2018 - 11:17 pm | सोमनाथ खांदवे

लिंक ओपन न करता प्रतिसाद द्यायची चूक करून झाली ना तुमच्याच तोंडाची वांड !!!! जेम्स गाड साहेब दुसऱ्यांची अक्कल काढण्याची घाई करू नये .
लिंक मधील बातमी मध्ये सुद्धा हेडिंग ' परदेशी भाज्या असेच आहे हो !!!'.

जेम्स वांड's picture

24 Jul 2018 - 1:03 pm | जेम्स वांड

उदारमनाने मला माफ कराल ही नम्र विनंती, शेती संबंधी प्रयोगात काही कडू अनुभव आल्यामुळे एकदम फाडकन बोलून गेलो, तरीही हे कारणे देणे झाले, जे करणे इष्ट नाही, माझ्याकडून चूक झालीये अन त्या बाबतीत मी तुमची हात जोडून माफी मागतो, शक्य असल्यास माफ कराल ही विनंती.

सोमनाथ खांदवे's picture

23 Aug 2018 - 8:13 am | सोमनाथ खांदवे

मा सरपंच / संपादक साहेब ,
क्षणिक त्राग्यातून वरील प्रतिसाद माझ्याकडून लिहला गेला , त्याबद्दल मला खेद वाटत आहे . या प्रतिसादात उल्लेख लेले शब्द मिसळपाव संस्कृती ला मानहानीकारक आहेत तरी कृपया वरील प्रतिसाद वागळवा ही विनंती .

उपयोजक's picture

22 Jul 2018 - 8:48 am | उपयोजक

या थोरवेजींना या व्यवसायात कोणी स्पर्धक नाही का?असाच व्यवसाय करणारे अजून कोणी नाहीत का?

कपिलमुनी's picture

22 Jul 2018 - 11:30 am | कपिलमुनी

पारंपरिक पिके ना घेता असे परदेशी भाज्यांचे उत्पन्न घेतल्याने आपली संस्कृती , भाषा नष्ट होईल ना !

अशा नवीन मार्गाची शेतकऱ्यांना गरज आहे.
लेखाबद्दल धन्यवाद

चष्मेबद्दूर's picture

22 Jul 2018 - 9:52 pm | चष्मेबद्दूर

शेतकरी भाऊंचे मनःपूर्वक अभिनंदन.

ज्योति अळवणी's picture

23 Jul 2018 - 12:40 am | ज्योति अळवणी

थोरवे पतीपत्नींचे मनापासून अभिनंदन

सुबोध खरे's picture

23 Jul 2018 - 11:31 am | सुबोध खरे

हिंजवडी हमाल पंचायत आयटी हमाल
ह ह पु वा

जयन्त बा शिम्पि's picture

23 Jul 2018 - 8:30 pm | जयन्त बा शिम्पि

तुमच्या जिद्दीला माझा सलाम ! ! समाजापुढे एक उत्तम आदर्श ठेवलात , अभिनंदन .

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2018 - 2:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

थोड्या वेळापूर्वी टिव्हीवर सौ थोरवे यांच्या कामगिरीबद्दल त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाल्याची बातमी पाहिली ! पुनरेकवार अभिनंदन !!

मृत्युन्जय's picture

3 Aug 2018 - 1:21 pm | मृत्युन्जय

उत्तम थोरवे दांपत्याचे अभिनंदन. पण शेतीमध्ये ५ कोटीची गुंतवणुक करणे किती शेतकर्‍यां ना जमेल? वर्षातुन १२ पिके जरी घेतली तरी एक्वेळची गुंतवणूक ४० लाख दिसते. म्हणजे एकरी ३ ते साडे ३ लाख. ही सामान्य शेतकर्‍यासाठी थोडी जास्त नाही वाटत?

विवेकपटाईत's picture

25 Aug 2018 - 8:28 am | विवेकपटाईत

त्रिवार अभिनंदन. शेतीतील नवीन प्रयोगच शेतकर्यांचे भाग्य बदलेल. हरियानातील एक शेतकरी अश्याच भाज्या पिकवितो काही वर्षांपूर्वी ऐकले होते. गेल्या दहा वर्षांत स्वास्थ्य प्रती जागरूकता वाढली आहे. भविष्यात फळे, भाज्या इत्यादीचा उपभोग वाढणार. किमान १० कोटी लोक ताजे फळ व भाज्यांसाठी अधिक पैशे मोजण्यासाठी तैयार आहेत. शेतातील उत्पादन कमी वेळात ताज्या अवस्थेत जास्ती दूर पोहचविण्यासाठी उत्तम महामार्ग, रेल्वे व छोट्या शहरात हि विमान सेवा किती गरजेची या वरून कळतेच. या बाबतीत तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे धोरण सकारात्मक आहे. समृद्धी महामार्ग व डीएफसी इत्यादी शेतकर्यांना उत्पादन वाढविण्यास मदत करेलच.

नाखु's picture

25 Aug 2018 - 7:29 pm | नाखु

धडपडणारी मुले आपल्या पूजनीय मुटे मास्तरांना कधीच का दिसत नाहीत,याचा त्यांच्या कट्टर समर्थक मंडळींनी विचार केला तर बरं होईल.

शहरी झुडुपातला अडाणी नाखु वाचकांची पत्रेवाला

Nitin Palkar's picture

25 Aug 2018 - 8:00 pm | Nitin Palkar

थोरवे उभयतांचे अभिनंदन.