जीम-जीम-जिमात!!
मला बारीक असण्याचा, सडपातळ असण्याचा न्यूनगंड वगैरे नाहीये बरं का... असलाच तर अभिमानच आहे. बहुतांशी लोक स्वतःला 'मेंटेन' करण्याचा सतत प्रयत्न करत असतात, मला मात्र तसं काही करावं लागत नाही. मी आपोआपच मेंटेन होतो. गेली चार-पाच वर्षं मी जसा होतो तस्साच आहे. या कालावधीत माझा खुराक वाढला, थोडीफार उंचीही वाढली, पण रूंदी अजिबात वाढली नाही. आई वडील सुद्धा (कोणे एके काळी) बारीक होते, त्यामुळे मी सुद्धा आहे, माझी ठेवणच तशी आहे, अशा सबबी मी 'तू जाडा केव्हा होणार' असं विचारणा-या मंडळींना देत असतो.