जीम-जीम-जिमात!!

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
17 Feb 2014 - 11:31 am

मला बारीक असण्याचा, सडपातळ असण्याचा न्यूनगंड वगैरे नाहीये बरं का... असलाच तर अभिमानच आहे. बहुतांशी लोक स्वतःला 'मेंटेन' करण्याचा सतत प्रयत्न करत असतात, मला मात्र तसं काही करावं लागत नाही. मी आपोआपच मेंटेन होतो. गेली चार-पाच वर्षं मी जसा होतो तस्साच आहे. या कालावधीत माझा खुराक वाढला, थोडीफार उंचीही वाढली, पण रूंदी अजिबात वाढली नाही. आई वडील सुद्धा (कोणे एके काळी) बारीक होते, त्यामुळे मी सुद्धा आहे, माझी ठेवणच तशी आहे, अशा सबबी मी 'तू जाडा केव्हा होणार' असं विचारणा-या मंडळींना देत असतो. 'अरे तू काही खातोस की नाही?' असं विचारणा-या मित्रांसोबत हॉटेल मध्ये गेल्यावर सगळ्यात जास्त खादाड मी आहे, हे जेव्हा सगळ्यांच्या लक्षात येतं तेव्हा साहजिकच विविध प्रश्न उठतात. सर्वप्रथम मी ऑर्डर दिली कीच 'अरे तुला एवढं जाणार आहे का? उरलं तर मी संपवणार नाहीये हा!' यापासून सुरुवात होते. मग खायला मी सुरुवात केली, की -

'तू नेहमीच एवढं खातोस की आज जरा जास्त भूक लागलीये तुला?'
'नाही रे माझा खुराक एवढाच असतो.'
'अरे मग दिसत कसं नाही अंगावर? जातं कुठे एवढं खातोस ते?'
'तूच विचार कर, कुठे जात असेल!!' असं म्हटल्यावर हलका हशा, आणि मग सगळे आपापल्या खाण्यात मग्न! कधी कधी 'बारीक माणसंच जास्ती खातात.. आमच्या ओळखीचा एक आहे ना सेम तुझ्यासारखाच आहे दिसायला...' वगैरे वगैरे गप्पा सुरू. मग ग्रुपातल्या जाड्या सदस्यांच्याच कुरबुरी सुरू होतात. 'लकी आहात तुम्ही बारीक आहात ते... मी केवढं कमी खातो/ते... तरी वजन कमीच होत नाही. वोडाफोनचा कसा बॅलन्स ट्रान्सफर करता येतो, तसं वजन ट्रान्सफर करता आलं असतं तर किती बरं झालं असतं...' इत्यादी इत्यादी.

पण आपल्या बारीकपणाबद्दल मला न्यूनगंड नसलेला काही मैत्रीणींना पाहावत नाही... त्या मुद्दामून माझ्यासमोर 'वन्स अपॉन अ टाईम' माझ्याहून लुख्ख्या असलेल्या पण आता पावडर-बाबा झालेल्या कोणा 'हँडसम' पोराची स्तुती सुरू करतात. सुरुवातीला मी दुर्लक्षच करतो... पण नंतर नंतर अति होतं. मग त्या मैत्रीणींमधली आपल्याला आवडणारी, किंवा एकूणच कोणीही आपल्याला आवडणारी मुलगी अशा 'डोल्ले-शोल्ले' पोरांनाच जास्त भाव देते हे पाहिल्यावर... त्यात अशा काही 'स्टड' पोरांना एफबीवर हॉट पोरींपेक्षा जास्त लाईक्स मिळतात हे पाहिल्यावर मनात हळूहळू न्यूनत्वाची भावना घर करू लागते. शर्ट काढून आरशासमोर उभं राहून एका तरी अँगलने आपण 'माचो' दिसतो का याची तपासणी होते. काहीही मेहनत न घेता पोटावर उमटलेल्या बिस्कीटांशिवाय आपल्याकडे दाखवण्यासारखं काहीही नाही, हे मनात एकदा पक्कं झाल्यावर -

'आई, मला पैसे दे... मी जीम जॉईन करतोय'
'अजिबात मिळणार नाहीत... तीन-तीन महिन्याचे पैसे भरून ठेवतोस, आणि धड महिनाभर सुद्धा नीट जात नाहीस'
'यावेळी जाईन... पक्का!!'
'बाबांकडे माग.. जीमसाठी माझ्याकडे नाहीयेत'

'बाबा... पैसे द्या. जीम लावतोय.'
'जीम?? मूर्खपणाचा कळस!!'
'अहो द्या हो...'
'अरे... ते असं शरीर फुगवण्यात काहीही अर्थ नसतो. तू त्यापेक्षा एरोबिक एक्सरसाईजेस कर'
'कार्डिओ असतं की जीममध्ये! ते सुद्धा लावतो यावेळी'
'कशाला? अजून बारीक व्हायला?' तेवढ्यात आई स्वयंपाकघरातून ओरडते -
'त्यापेक्षा तू घरातल्या घरात सूर्य नमस्कार घाल. रोज बारा घातलेस तरी पुष्कळ होईल'
'ए आई नाही गं त्याने काही होत नाही. बाबा द्या ना हो पैसे'
'मी कुठून देऊ? माझ्याकडे नाहीयेत. आईकडे माग'
'तिनेच तुमच्याकडे पाठवलंय.'
'हो? बरं मग तिला विचार जरा.. साडेचार झाले म्हणावं.' मग पुन्हा आई आतून ओरडते -
'बाबांना सांग चहा मघाशीच झालाय पुन्हा मिळणार नाहीये'

अशी माझी टोलवाटोलवी करत शेवटी एकाच महिन्याचे पैसे द्यायला आई तयार होते. आणि बाबा पाकिटातून पैसे काढून देतात. जीमला गेल्यावर लक्षात येतं की आता रिन्यूएशन झाल्यानंतर जीम फुल एसी झालेला आहे त्यामुळे मेंबरशीप फी जर्रा वाढलेली आहे. म्हणजे दुप्पट झालेली आहे. मी घरी परत येतो. परत टोलवाटोलवी होते. मग पुन्हा जीममध्ये जातो. माझी शरीरयष्टी बघून 'तुला सपलीमेंट लागणारच... त्याशिवाय पर्याय नाही' अशी पहिल्या दिवसापासून ब्रेनवॉशिंगला सुरुवात होते. मी अर्थातच त्याकडे दुर्लक्ष करतो.

करूनी मात याआधीच्या
प्रत्येक अपेक्षाभंगावर...
जीम-जीम-जीमात जाऊनिया
चढवेन मांस अंगावर!

असं ठरवून मग व्यायामाला सुरुवात होते. सुरुवातीला थोडे अंग ताणायचे व्यायाम झाल्यानंतर 'आता नमश्कार मार... येतात ना?' असं ट्रेनर विचारतो. हा ट्रेनर नवा असतो. रिन्युएशन पूर्वीच्या जुन्या ट्रेनरशी मी 'तुम्ही ज्याला नमस्कार म्हणता ते जोर; सूर्य नमस्कार वेगळे' असा वाद घातलेला मला आठवतो. तेव्हा मला 'नमस्कार घाल' म्हटल्यावर मी व्यवस्थितपणे सूर्य-नमस्कार घातल्याचं आणि अख्खं जीम स्वतःचं काम सोडून मी नेमकं काय करतोय ते बघत बसल्याचं मला आठवतं. तेव्हा ट्रेनरशी झालेल्या त्या वादातून काहीही निष्पन्न न झाल्याचं स्मरून यावेळी मी नुसतीच होकारार्थी मान डोलावून जीममधले 'नमश्कार' मारायला सुरुवात करतो. मग ते झाल्यावर ट्रेनर ज्या क्रमाने जी ओझी उचलायला सांगेल, ती उचलायची, अन घरी जायचं.

घरी जाताना वाटेत अंडी आणि केळी घ्यायची. पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाने ती बकाबका खायची. दुस-याच दिवशी नेमकी आईची संकष्टी मध्ये तडमडते आणि 'आज अंडी नाही खायची... हवं तर बटाटे खा' असा खरमरीत आदेश मिळतो. सगळ्या उत्साहावर तेवढ्यानेच पाणी पडतं, आणि एक ठरावीक खुराक नियमितपणे न पाळता येण्याचं मला निमित्त मिळतं. त्यामुळे व्यायाम वाढत गेला, तरी खुराक काही केल्या त्या प्रमाणात वाढत नाही आणि मग साईज जराही न वाढलेल्या शरीराचा पीळ मी कुरवाळत बसतो. साहजिकच मित्र-मैत्रींणींमधून 'तू जीमला जातोस? दोन महिने झाले? काही फरक पडलाय असं वाटत नाही' अशा मानसिक खच्चीकरण करणा-या प्रतिक्रिया निघतात.

हे सगळ अर्थातच आता सवयीचं झालंय. हल्ली एका नव्या गोष्टीची सवय करून घ्यावी लागत्येय. सगळी जिमं हल्ली 'युनिसेक्स' होत चाल्लीयत. काही जण पार्ट टाईम, काही जण फुल टाईम! एखाद्या मशिनवर मी व्यायाम करत असताना माझा एक सेट झाला, आणि जरा हात किंवा पाय मोकळे करायला मी बाजूला झालो, की या बाया मध्ये घुसतात, आणि त्यांचे तीन सेट होईपर्यंत त्या मशिनवरून हलतच नाहीत. बरं त्यांची एखादी मैत्रीणसुद्धा असते त्यांच्याबरोबर... त्यांना माहिती असतं की मी तिथे व्यायाम करतोय, पण स्वतःचं झालं की त्या मैत्रीणीला त्या व्यायाम करायला देतात. ती सुद्धा तीन सेट मारल्याशिवाय हलत नाही. कहर म्हणजे यांचा हा व्यायाम गप्पा मारत चालतो. त्यामुळे एका मशिनवर त्या जवळ जवळ पंधरा मिंटं ठिय्या देऊन बसतात. तोवर माझं शरीर थंड पडतं, पीळ निघून जातो. त्यात त्यांचा आणि माझा व्यायामाचा अनुक्रम सारखाच असेल, तर मग पंचाईतच होते. त्या प्रत्येक मशीनवर माझा भरमसाट वेळ वाया घालवतात. बरं एकवेळ दिसायला जरा ब-या असत्या तर पंधरा मिंटं काय अर्धा तास बसल्या असत्या तरी चाललं असतं. माझ्या डोळ्यांना तरी तेवढ्या वेळात व्यायाम मिळाला असता. तसंही नाही. या सगळ्या काकु-बाई!! यांना बोलायचं तरी कसं, 'आटपा लौकर!' म्हणून.

पण या सगळ्या काकुबाईंच्या गोतावळ्यात, एखादी त्यातल्या त्यात फटाकडा निघतेच. आणि मग ती प्रत्यक्षपणे आपल्या मध्ये मध्ये करत नसली, तरी एकूणच व्यायामात आपलं पूर्ण लक्ष लागत नाही. त्या दिवशी आपोआपच जास्त अवजड वजनं उचलली जातात. ती वजनं आपल्याला झेपत नाहीत, हे आपल्याला कळतं, आणि चुकून नजर पडलीच आपल्यावर तर तिलाही कळतं. आरशात बघताना हात आपसूकच उचलला जाऊन केस वळवतो. जीममध्ये लावलेल्या गाण्याच्या तालावर पाय हलकेच थिरकतात. आज पूर्ण वेळ जीममध्ये आपण ताठ मानेने, खांदे पाठी घेऊन वावरत असतो. पण या सगळ्याचा काही म्हणजे काही उपयोग नसतो. त्या ललनेकडे माझ्यापेक्षा कितीतरी चांगले आणि मुबलक प्रमाणात पर्याय उपलब्ध असतात. काही ओळखीचे सुद्धा असतात. अशा ललना आल्या, की ट्रेनरना माझ्यासारख्यांचा विसर पडतो. त्यांना तरी का दोष द्यावा म्हणा! या ललना प्रसंगी एकदम गप्प गप्प आणि गंभीर मुद्रा घेऊन व्यायाम करत असतात, तर कधी किचाट आवाजात मोठमोठ्याने ओळखीच्यांशी गप्पा मारत व्यायामातून माझं लक्ष विचलित करत असतात. त्यामुळे शक्यतो स्त्रिया ज्या वेळी कमी असतात, ती वेळ साधून जीमला जायला मी सुरुवात करतो. नकोच ती झंझट! हळूहळू व्यायामातला उत्साह निघून जातो. सकाळी कॉलेजमध्ये सब्मिशन्स आणि संध्याकाळी मित्र-मैत्रीण बाहेर भेटायला बोलवतात. 'आज एक दिवस नाही गेलो जीमला, तर काय बिघडणार आहे' असा विचार करून दांड्या मारायला सुरुवात होते. बघता बघता एक महिना संपतो. मी ब-यापैकी नियमित जातोय असं पाहून आई तीन महिन्यांचे पैसे देऊन टाकते. आणि त्यापुढचा जेम-तेम एखाद आठवडा जीमात काढून मी शेवटी 'काय फरक पडतो मी बारीक राहिलो तर...' अशा निष्कर्षाप्रत येऊन पोचतो, न्यूनगंडावर तात्पुरती मात होते, आणि मी पुन्हा माझं बिन-व्यायामाचं सुखी आयुष्य जगायला सुरुवात करतो.

राहणीमौजमजाविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

17 Feb 2014 - 12:38 pm | वेल्लाभट

सहिये!

सेम झालं होतं माझं पण. पण आता सालं वजन वाढायला लागल्यावय ७ वर्षात ३५ किलो वाढले कि हो. वजन कमी असणे हे फिट असल्याचे प्रमाणपत्र आहे असे म्हणा ना.

मुक्त विहारि's picture

17 Feb 2014 - 2:16 pm | मुक्त विहारि

खुसखुशीत लेख...

आमचे पण तुमच्या सारखेच झाले होते.

शेवटी विनोबांना गुरु केले आणि आपलेच पाय अन आपलाच रस्ता असे समजून, तोच मार्ग पत्करला.

>>माझा एक सेट झाला, आणि जरा हात किंवा पाय मोकळे करायला मी बाजूला झालो, की या बाया मध्ये घुसतात, आणि त्यांचे तीन सेट होईपर्यंत त्या मशिनवरून हलतच नाहीत. बरं त्यांची एखादी मैत्रीणसुद्धा असते त्यांच्याबरोबर... त्यांना माहिती असतं की मी तिथे व्यायाम करतोय, पण स्वतःचं झालं की त्या मैत्रीणीला त्या व्यायाम करायला देतात. ती सुद्धा तीन सेट मारल्याशिवाय हलत नाही. कहर म्हणजे यांचा हा व्यायाम गप्पा मारत चालतो.

आमच्या जिममध्ये पण असेच भ्रमाचे भोपळे, चुरमुर्‍याची पोती येत असतात गफ्फा हाणत वर्क आऊट करायला. मी वर्क आऊट करत असलेल्या मशीनवर दोन मिनीटांपेक्षा जास्त वेळ घालवला की मी शांत आवाजात विचारतो, 'How many sets are remaining?'. निमूटपणे बाजूला होतात किंवा जे काही करत असतील ते पटकन संपवतात.

बरीच ओळखीची गोष्ट वाटतेय =))

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2014 - 11:55 pm | संजय क्षीरसागर

एकदम दिलसे लिहीलंय!

शिल्पा नाईक's picture

18 Feb 2014 - 10:54 am | शिल्पा नाईक

अरे कसल सही लिहिलय.
माझा पण सेम अनुभव. स्त्री म्हणून थोडा वेगळा इतकच.
ते लोकांचे comments पण सेम :D
हाईट म्ह्णजे एका सहकार्याने उपाय सुचवला होता म्हणे तु आता चोरुन अन फुकट मिळेल ते खात जा म्हणजे थोडि जाड होशील.
:D

दोन महिने कोल्हापुरात तालिम लाव १०-१५ किलो सहज वाढेल....!आमचे गावचे टगे हेच करतात्,वर्षातले २ महिने तालिम्,बाकीचे १० महिने वसुली...!

वजन वाढवायचं की अंगातली रग ;)

आरोही's picture

18 Feb 2014 - 2:47 pm | आरोही

मस्त हा ......
आवडला लेख .....