२००३ सालच्या १९ मार्च रोजी भल्या पहाटे अमेरिकी विमानांनी बघदादवर आग ओकायला सुरुवात केली आणि २१ दिवसात बघदाद वर संपूर्ण ताबाही मिळवला! २००३ च्या मे महिन्यात युद्ध संपले, पुढे सात महिन्यांनी लपून बसलेला सद्दाम सापडला,३० डिसेंबर २००६ च्या सकाळी सहा वाजता सद्दामला दीडशे शियांची निर्घुण कत्तल केल्याच्या आरोपावरून फासावर लटकवलं. जल्लोष झाला, आता इराकचे प्रश्न सुटले या विषयावर जगातल्या दिग्गज नेत्यांची भाषणे झाली. १९ मार्च २०१३ रोजी म्हणजे अमेरिकेने इराकवर "इराकी जनतेला मुक्त करण्यासाठी" इराकवर केलेल्या हल्ल्याला बरोबर दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या लष्कराला "इराकी जनतेला मुक्त केल्याबद्दल" सलाम ठोकला. इराकी जनतेच्या आजच्या जीवनमानाचे वास्तव काय आहे ? गेल्या वर्षी नाशिक मध्ये माझ्या ऑफिसमध्ये आलेला आणि गेली काही वर्षे परिचित असलेला एक अत्यंत कर्तबगार उद्योजक "मी आणि माझ्या कुटुंबीयांना इराकमध्ये परमेश्वराने जन्माला घालण्याऐवजी अन्य कोणत्याही देशात कुत्र्याचा जन्म दिला असता तरी चालले असते" असे धक्कादायक आणि काळीजाचा थरकाप उडवणारे विधान करताना अतिशय हताश झालेला मी बघितला. सात आठ वर्षापूर्वी अतिशय वैभव संपन्न आणि सुखासीन आयुष्य जगणा-या कुटुंबांतला हा इसम " रोज सकाळी उठल्यावर आणि परमेश्वराच्या कृपेने उठलो तर आज झोपे पर्यंत दिवसभर सुरक्षित जगायचे एवढेच आम्ही कुटुंबीय ठरवू शकतो. अमेरिकेला आम्हाला मुक्त करायचे होते. २००३ सालच्या आधी आम्ही मुक्त नसू कदाचित पण सुरक्षित नक्की होतो. आता मुक्त झालो की नाही माहिती नाही पण आम्ही सुरक्षित नक्की नाही ! " अमेरिकेने २००३ साली इराकमध्ये घुसखोरी केल्या नंतर इराक गेल्या दहा वर्षांत संपूर्ण उध्वस्त झालंय. या विधानात सर्वात महत्वाची बाब अशी आहे की इराक युद्धामुळे उध्वस्त झालेलं नाही. इराक, युद्धानंतर अमेरिकेने आपल्या ताब्यात ठेवल्यानंतर बेचिराख झालंय.
जवळ जवळ सदतीस हजार इराकी जनता तुरुंगात डांबली गेली आहे ज्यांच्यावर काय आरोप आहे हे कुणाला माहिती नाही किंवा कित्येक जणांवर काहीच आरोप नाही. अबू घरिब इथला तुरुंग तर छळ छावणी आहे. इथल्या बंदिवानांवर कुत्री सोडणे, बेदम मारहाण, विवस्त्र अवस्थेत ठेवणे,लैंगिक अत्याचार असे प्रकार नियमित होत आहेत. अबु घरिब मधली थरकाप उडवणारी छायाचित्रे संपूर्ण जगाने पाहिल्यावर जी खळबळ उडाली ती बघून अमेरिकेचे तत्कालीन संरक्षण सचिव डोनाल्ड रम्सफिल्ड यांनी अमेरिकी काँग्रेस समोर झालेले अत्याचार मान्य केले होते आणि आवश्यक ते बदल इराक मध्ये करू अशी ग्वाही दिली होती. अर्थात त्याचा वास्तवावर आजतागायत फरक पडला नाही आणि अत्याचार सुरूच आहेत - अमेरिकेचे लष्कर तिथून निघाले असले तरी. या ग्वाही नंतर बंदिवानांच्या तोंडात प्लास्टिकचा पाईप आत मध्ये खोचून मारहाण असे नवीन प्रकारच्या तक्रारी अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आपल्या अहवालात प्रसिद्ध केल्या आहेत. या सुमारे सदतीस हजार बंदिवानांपैकी अर्ध्या महिला आहेत आणि त्यांची परिस्थिती आणखी भीषण आहे. हे बंदिवान आहेत कोण ? त्यांचा गुन्हा काय असतो ? चोर, डाकू , देशद्रोही , अतिरेकी ? नाही. सबाह हसन हुसेन नावाची एकेचाळीस वर्षाची महिला पत्रकार आपल्या नातेवाइकाची चोरीला गेलेली गाडी परत आणण्यासाठी गेली असता तिला २९ फेब्रुवारी २०१२ रोजी अटक झाली. तिची रवानगी तीक्रीतच्या तुरुंगात केली. सबाहची २३ जानेवारी २०१३ रोजी निर्दोष मुक्तता झाली पण तरीही तिला २८ फेब्रुवारी २०१३ पर्यंत तुरुंगात ठेवले होते. सबाह बाहेर आली ती संपूर्ण उध्वस्त होऊन. तिच्या शरीरभर सिगरेटचे चटके होते. प्रचंड मारहाणीच्या खुणा शरिरभर होत्या. तिला विवस्त्र करून पुरुष पोलिसांसमोर उभे केले जायचे. बर्फाच्या पाण्याचा मारा तिच्यावर व्हायचा.
इराकबरोबरचे युद्ध सुरु झाल्यापासून एका महिन्याच्या आतच खरेतर संपले होते. पण युद्ध संपल्यानंतरचा नरसंहार अभ्यासला तर एक देश पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या प्रयत्नांच्या खुणा नक्की सापडतील. बहुदा इराकच्या मध्यम वर्गाला जो शिक्षित आहे, बुद्धिवादी आहे आणि व्यावसाईक आहे अशा पूर्ण वर्गाला नेस्तनाबूत करण्याचे वेगवेगळे प्रकार इराक मध्ये आजही चालु आहेत हे दिसते. विशेषत:शिक्षण क्षेत्रात आणी वेगवेगळ्या विद्यापीठांशी संबंधित काम करणा-या मध्यम वर्गीयांना उध्वस्त करणारी आकडेवारी अंगावर शहरा आणणारी आहे. हत्या करण्यात आलेल्यात ५०% प्राध्यापक आहेत, १२% डीन आहेत, २% कुलगुरू वा उपकुलगुरू आहेत, ६% अन्यान्य विभाग प्रमुख, ६% सह प्राध्यापक आणि १३% शिक्षण क्षेत्राशी संबंधित बुद्धिवंत आहेत. शिक्षण क्षेत्रच मोडकळीला आणण्याचा एक कट दिसतो. २००३ सालच्या आधी इराक मधली १००% मुलं शाळेत जायची युद्ध संपल्यावर तीन वर्षे उलटून गेल्यावर म्हणजे २००६ साला पासून पस्तीस लाख मुलांपैकी खच्चून ३०% मुलं प्राथमिक शाळेत जातात. सतरा वर्षावरील सुमारे २५% युवा विद्यार्थी परीक्षा देऊ शकले. २००३ सालानंतर सुमारे ७०० प्राथमिक शाळा बॉम्ब फेक करून उध्वस्त केल्या गेल्यात, २७०० शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, ७४% शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय आजही नाही.
इराकची आजची एकूणच आरोग्य व्यवस्था भयानक आहे. नोंदणीकृत सुमारे १८ हजार डॉक्टरां पैकी सुमारे २५% डॉक्टर गेल्या दहा वर्षात इराक सोडून निघुन गेले. उर्वरित पैकी २५० डॉक्टरांना पळवून नेण्यात आले आहे आणि त्यांचा आजतागायत पत्ता नाही. अल जझीराचा जगप्रसिद्ध पत्रकार दहेर जमाईल याने इराकचा प्रवास करून आल्यावर १५ मार्च २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात प्रत्यक्षात युद्ध संपले असले तरी युद्धाने इराकला तहहयात रुद्र तांडव करणा-या अनेक जीवघेण्या बाबींचा शाप दिला आहे असे म्हटले आहे. कॅन्सर हा एक अत्यंत खतरनाक शाप. युद्धात प्रचंड मोठ्या प्रमाणात विषारी अस्त्रे वापरली गेली त्यातही मुख्यत: डीप्लीटेड युरेनियम आणि व्हाईट फॉस्फरस हे अत्यंत विषारी आणि दूरगामी परिणाम करणारे पदार्थ वापरले गेले. त्यांचा परिणाम हिरोशिमा आणि नागासाकी पेक्षा कितीतरी भयानक आहे. इराकच्या फ़ल्लुजह भागात झालेले आणि
होणारे जनुकीय नुकसान हे आजवर मानवी जीवनात झालेले सगळ्यात ज्यास्त नुकसान आहे. मिशिगन विद्यापीठात संशोधन करणा-या डॉ मोहघन बाईंचे म्हणणे आहे की बॉम्बिंग आणि गोळीबाराचा अति वापर झालाय इराक मध्ये त्यामुळे पारा, युरेनियम आणि शिसे या विषारी धातूंचा प्रचंड फैलाव बसरा आणि फ़ल्लुजह झालाय. पण लोक पुन्हा त्याच भागात आपले बस्तान बसवायचा प्रयत्न करत आहेत. आज या भागात कॅन्सरचे प्रमाण चाळीस पटीने वाढलंय. महिलांमध्ये प्रचंड गर्भपाताचे प्रमाण वाढलंय. शारीरिक विकृती असलेली संतती जन्माला येण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढलंय. या भागात सहाशे करोड विषारी गोळीबारूद ओतले गेले आहे !
गेल्या दहा वर्षात पंधरा लाख इराकी जनता मारली गेली. त्यात सुमारे निम्म्या स्त्रिया आणि जवळ जवळ पाच लाख लहान मुले मारली गेली. इराक मध्ये सुस्थितीत जगणा-या कुटुंबाना रेशनचे धान्य मिळवण्यासाठी आज मारामारी करावी लागते. प्रत्यक्ष हल्ल्याच्या आधी पंधरा दिवस ६ मार्च २००३ रोजी बुश साहेबांनी मोठी आरोळी ठोकली होती की इराकी जनतेच्या अन्नपाण्याची आणि औषधाची जबाबदारी अमेरिकेची असेल, आम्ही त्यांना सर्वकाही पुरवु. पण प्रत्यक्षात पिण्याचे शुद्ध पाणी, वीज आणि मलनिस्सारण व्यवस्था या बाबी इराक मध्ये आज स्वप्नवत आहेत. नोकरी करणा-यां पेक्षा नोकरी नसलेली जनता जास्त आहे. एके काळी बघदादच्या रस्त्यावरून स्वत:च्या गाडीतून फिरणा-या महिलेचे उर्वरीत सगळे कुटुंब आणि मालमत्ता उध्वस्त झाल्यामुळे जगण्याचे साधन म्हणून तिला वेशा व्यवसाय करावा लागतो.
महिलांना घरात सुद्धा सुरक्षित रहाता येत नाही. आधी आम्ही फक्त सद्दामचा मुलगा उदयला घाबरायचो. आज प्रत्येकाची भीती वाटते असे तिथल्या महिलांचे म्हणणे आहे. घटस्फोट आणि बाल विवाहांचे प्रमाण प्रचंड वाढलंय. इराक आज विधवांचा आणि घटस्फोटीतांचा देश आहे.एकूण महिलांच्या दहा टक्के महिला युद्धामुळे झालेल्या विधवा आहेत. एसटी बस सारख्या चाके असलेल्या घरांमध्ये या विधवांना एकत्रित कोंबून आपले दैनदिन जीवन कंठावे लागते. २००८ साली बुश साहेबांवर बुट फेकणारा पत्रकार " मी हा मारा इराकी विधवांच्या वतीने करतो आहे" असे ओरडला होता. त्या पत्र्याच्या गाडी मध्ये राहणारी नोरीया खलफ़ म्हणते "मला काही ही करून लग्न करायचे आहे. मला नवरा हवा आहे आणि माझ्या मुलाला बाप !"
"लोकशाही संपूर्ण भोगताना माझ्या भारतीय मित्र मैत्रिणींना आपण सतत अन्यायग्रस्त आहोत असे का वाटते?"
प्रतिक्रिया
12 Feb 2014 - 5:04 pm | आनंदराव
भयाण....!
12 Feb 2014 - 5:11 pm | सर्वसाक्षी
मुतालिकसाहेब
इराकचे अतिशय विदारक चित्र उभे केले आहेत. मात्र ही दह्शत/ हिंसा कोण करत आहे? अमेरिका की स्थानिक मूलतत्ववादी की सत्तेचे नवे ईच्छुक? हे प्रत्यक्ष अमेरिका करत आहे की तसे करणार्यांना अमेरिका पाठिंबा व सहाय्य देत आहे?
12 Feb 2014 - 5:27 pm | ज्ञानव
इराकमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीयांवर कमी अन्याय होतोय असे म्हणणे कितपत योग्य आहे?
मग पाकिस्तानने मुंबईत फारच कमी लोक मारले आणि अमेरिकेचा स्कोर चांगला आहे असे म्हणावे का?
इराकी जनतेवर झालेले अन्याय हे एक "परिमाण" आहे आणि तितका त्रास मला नाही म्हणून मी आनंद मानायचा ?
माझा मित्र पाकिस्तान्यांनी मारला आहे आणि त्याच्या कुटुंबाने आपली जबाबदारी कुणाकडेही भिक न मागता पेलली आहे.
पण मी "संपूर्ण लोकशाही भोगतोय" ह्या मानसिक वेदनेचा अर्थ जेव्हा संपूर्ण भारतात फेरफटका मारला जाईल तेव्हाच कळेल.
आणि गम्मत म्हणजे "भारतीय वंशाच्या" कुणीही अमेरिकेत दिवे लावले की आमचे डोळे दिपतातच....लोकशाही आहे...आणि त्या लोकशाहीनेच तर डोळे दिपलेत....
आम्हाला स्वराज्य हवे होते (महाराजांपासून ते टिळकांपर्यंत तेच स्वप्न पहिले गेले)लोकशाही मधूनच उपटली.
प्रतिसाद संपादित.
13 Feb 2014 - 9:08 am | ज्ञानव
पण काय आक्षेपार्ह होते ते तरी सांगा कि?
अमेरिके आधी इराण इराक युद्ध ऐकत आलोय म्हणजे असे हे भांडखोर देश, त्यांचा पुळका येतो.
राज्यकर्त्यांची गुलामगिरी "लोकशाही" म्हणून नांदवावी लागते आहे आणि त्यात हे चरचरीत मीठ चोळून म्हणताहेत कि आम्हाला अन्यायग्रस्त का वाटते?
एक हॉटेल टाकले कि चार म्युनिसिपाल्टीवाले, चार पोलीस, चार स्थानिक गुंड गल्ल्यावर चकरा मारतात ह्या लोकशाहीत. आरक्षण नावाची कीड लोकशाहीतच भोगतोय महाराज असते तर त्यांना हे चालले असते का? आम्ही नोकरी धंदा करायचा कि आंदोलने?
12 Feb 2014 - 5:39 pm | सुहास झेले
...!!
:(
12 Feb 2014 - 5:50 pm | प्रसाद१९७१
उगाच इराक चा पुळका यायला नकोय!!!. अमेरिकेचा काय दोष आहे, त्या इराकी ( आणि त्या भागातली ) लोक तशीच आहेत. त्यांना बंदुकीच्या धाकानी च ताब्यात ठेवता येते.
सोमालिया, सुदान ला काय अमेरिकेनी ताब्यात ठेवले आहे?
अमेरिकेचा फुकट खर्च झाला. आता अमेरिकेनी फक्त तेलक्षेत्रे ताब्यात ठेवावीत, बाकी इराक मधे काही का चालेना.
सुधीर महाशय, थोडा आम्हा भारतीयांबद्दल पण सहानभुती ठेवा.
हे भारतात सुद्धा स्वप्नवत च आहे.
भारतात कीती टक्के खरच शाळेत जातात आणि त्यांना खरे च काही शिकवले जाते का?
13 Feb 2014 - 7:42 am | आबा
या दर्जाची असंवेदनशिलता फक्त सामुहीक पातळीवरच असू शकते असा माझा गैरसमज होता !
नेमके सोमालिया आणि सुदानचेच ऊदाहरण घेऊन मर्फीज लॉ सिद्ध केलात ...
13 Feb 2014 - 9:38 am | प्रसाद१९७१
अजुन देशांची नावे लीबिया, इजिप्त, नाय्जेरिया, युगांडा, अल्जेरीया, इथियोपिया
13 Feb 2014 - 9:11 pm | आबा
क्वॉड इराट डेमॉनस्ट्रँडम
14 Feb 2014 - 12:32 am | बॅटमॅन
अॅड होमिनेम एट अॅड नॉसिअम.
12 Feb 2014 - 6:17 pm | आत्मशून्य
म्हणुनच कधी न्हवे ते सैफालिच्या कुर्बान मधिल क्लासरूम डिबेट प्रसंग स्मरणात राहिला आहे..
12 Feb 2014 - 7:01 pm | विनोद१८
इरा॑क मधली परिस्थिती तर भयानकच म्हणायला हवी, याबद्दल कुणाचे दुमत असेल असे वाटत नाही, त्या इराकी नागरीकान्बद्दल थोडी सहनुभुतीच वाटते आहे. पण म्हणुन ह्या आमच्या 'भिकारचोट' राज्यकर्त्यान्नी भारतात जे काही उद्योग चालविले आहे ते आम्ही काय म्हणुन गोड मानुन घ्यायचे ??? इराकच्या तुलनेत आपल्याकडची परिस्थिती जरा बरी असेल म्हणुन जे आहे व जसे आहे त्यात आनन्द का मानायचा ?? काय तुम्हाला तसे वाटते का ?? इथे लोकशाही आहे, तिनेच प्रत्येकाला ' ती लोकशाही पुर्णपणे भोगण्याचा हक्क दिला आहे ' तसाच जर गरज असेल तर कोणत्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचासुद्धा.
विनोद१८
12 Feb 2014 - 7:05 pm | टवाळ कार्टा
+१११
12 Feb 2014 - 7:32 pm | तिमा
इराकमधले वास्तव फारच भयानक आहे. भारतीयांनी विचार करावा की उद्या आपल्या देशामधे अशी परिस्थिती निर्माण झाली आणि सर्व मध्यमवर्गाला असेच टारगेट केले गेले तर आपली काय स्थिती होईल ? जात्यामधल्यांना सुपातल्यांनी हंसू नये अशी म्हण आहे.
12 Feb 2014 - 7:44 pm | मुक्त विहारि
आवडला....
12 Feb 2014 - 8:37 pm | प्यारे१
अमेरिकेबद्दल ह्या लोकांना राग वाटेल नाहीतर काय मग???
अशानं इन जनरलच अरबी जगात अमेरिकेबाबत घृणा निर्माण होते आहे.
गरीबांचा आत्यंतिक छळ करणार्या जमीनदाराबद्दल खोपटातल्या शेतमजूराच्या पोराला वाटेल तशीच्च घृणा.
12 Feb 2014 - 10:59 pm | कवितानागेश
वाईट वाटलं वाचून... :(
12 Feb 2014 - 11:46 pm | विअर्ड विक्स
भयाण वास्तव...... अमेरिकेच्या युद्धखोरीचे दुष्परिणाम दुसरे काय ? इराक हा कुठल्याही अर्थाने कर्मठ विचारवादी वगैरे देश नव्हता... अमेरिकेने केवळ आपल्या फायद्याकरिता हल्ला चढविला हे वास्तव आहे.......
13 Feb 2014 - 12:03 am | प्रसाद गोडबोले
वाचुन छान वाटलं !
मध्यपुर्वेत अशांतता राहणं हे भारताच्या फायद्याचं आहे असण माझं स्पष्ट मत आहे . आणि त्यातनं हे अमेरिका सगळं करत आहे ... हे म्हणजे जावयाच्या काठीने साप मारण्यातला प्रकार झाला ...
आपण फक्त ह्याचे रीपर्केशन्स मुंबईत एस्पिशीयली अमर जवान स्मारकावर उमटणार नाहीत येवढा खंबीरपणा दाखवणे अपेक्षित आहे !!
13 Feb 2014 - 1:15 am | अर्धवटराव
परिस्थीतीची विदारकता वाक्यावाक्याला जाणवतेय. आणि सर्वात वाईट म्हणजे परिस्थिती सुधरवायला काहि स्कोपच न दिसणे. जिथे उम्मीदच शिल्लक नाहि तिथे काय भयाण वास्तव असेल :(
भारताशी याच बाबतीत तुलना करायला हवी. इथे लोकशाहीने माणसाचा जगण्याचा, स्वतःचं आणि समाजाचं भलं करायचा स्कोप जीवंत ठेवलाय... किंबहुना हा स्कोप फार सशक्त आहे भारतात.
13 Feb 2014 - 1:38 am | विकास
सहमत!
:(
13 Feb 2014 - 10:48 am | Dhananjay Borgaonkar
शहारा आला वाचुन. खरच खुप भयानक परिस्थिती आहे इराक मध्ये.
रासायनिक अस्त्र नाश करण्यासाठी हल्ला केला आणि शेवट्पर्यंत अशी अस्त्रे सापडलीच नाहीत.
सामन्य जनतेच मात्र खुप हाल झाले. मधे एक एंग्लिश पिच्चर पाहिला होता ग्रीन झोन नावाचा,त्यात अमेरीकेचा खोटारडे पणा दाखवला आहे.
सिरीया, लिबिया या देशांची परिस्थीती सुद्धा भयावह आहे.
13 Feb 2014 - 10:52 am | यशोधरा
किती विदारक परिस्थिती..
13 Feb 2014 - 5:14 pm | कंजूस
वाचतोय
13 Feb 2014 - 9:28 pm | विवेकपटाईत
आपल्या देशात ही संचार माध्यमांच्या (फेसबुक) अराजकता पसरविण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यात यश थोडे मिळाले आहेत. आपली लोकशाही किती ही भ्रष्ट असली तरी ही आज आपल्याला जगातल्या अधिकांश देशांपेक्षा अधिक स्वतंत्रता आहेत. १२० लोकांची जेवणाची सोय आहे (अर्धपोटी का होईना)....
13 Feb 2014 - 9:44 pm | प्यारे१
>>>१२० लोकांची जेवणाची सोय आहे
नै हो, किमान १,२००,००० तरी असतील ;)
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पासून सुरुवात करुन आमच्या तलाठी रावसाहेबांपर्यंत सगळे सरकारी, निमसरकारी नि सामाजिक कार्यकर्ते पकडून १२ लाख असतील की. =))
(ते १२० कोटी लिहायचं आहे हे समजलेलं आहे.)
13 Feb 2014 - 9:42 pm | संपत
लेख वाचून वाईट वाटले पण थोडासा बुचकळ्यात पडलोय. लेखामध्ये एकूण सूर असा आहे की सद्दामच्या हुकुमाशाहीमध्ये इराक सुखी होता पण अमेरिकेने लादलेल्या लोकशाहीमध्ये सर्व उध्वस्त झाले. मग शेवटचे वाक्य हे उपहासाने आहे का?
13 Feb 2014 - 9:51 pm | प्यारे१
दगडाची तुलना विटेशी करता विट मऊ वाटते. अमेरीका तद्दन स्वार्थी नि अत्यंत चीड आणणारा देश आहे.
लोकशाही भोगायला कुठं काय शिल्लक हवं की. माणसं जिवंत असली तर वाद-संवाद करतील ना?
त्या तुलनेत सद्दामच्या मर्जीतले बरेचसे जगत तरी होते.
(माणसं अमेरिकेनंच मारली असंही नाही. अतिरेकी शक्ती सुद्धा भरपूर आहेत)
ह्या सगळ्या भोंगळ कारभारात भारताच्या भक्कम पायाची जाणीव खरंच होते.
गद्दाफी गेल्यावर लिब्या मध्ये अनागोंदी आहे, अल्जिरियाची वेगळ्या मार्गानं ऑलरेडी भोगून झालीये ह्या सगळ्यामध्ये माणसाचे काय हाल होतात ते त्याचं त्याला ठाऊक. ह्या बिचार्या स्थानिक लोकांना खरंच बाहेरच्या जगाची जाणीवच नाहीये.
14 Feb 2014 - 12:10 am | आत्मशून्य
काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. मी स्त्रियांना बुरखा घालायची सक्ती करु शकत नाही अथवा विमान चालु असताना वेळ झाली म्हणून हातातली कामे सोडुन नमाज अदा करायला कसे सांगायचे ? इराकमधे अल-कायेदाला आश्रय मिळणार नाही (९-११ च्या हल्यापुर्वी लादेन आश्रयसाठी सुरक्षित देशांची चाचपणी करताना सद्दामकडे विचारणा केली होती. कारण संपुर्ण इस्लामीकरण करायला तो सर्वात सोपा देश आहे असे वाटायचे), विज्ञानाची कास धरावीच लागेल वगैरे वक्तव्ये सद्दमची होती असे फार पुर्वीपासुन कानी आले होते. अर्थात ही मते ज्यावेळी एखादे बाबतीत माझे सर्वांगीण मत बनवायची पुरेसी क्षमता विकसीत न्हवती त्या काळातली आहेत. त्यामुळे सद्दामबद्दल कधी संताप असा आला नाही.
14 Feb 2014 - 12:16 am | आत्मशून्य
सद्दामने उद्दाम होउन मुद्दाम तेल विहीरी पेटवुन दिल्या हे वाक्य वाचुन ते बंधु भगीनी नक्किच डोक्यावर पडले असावेत असा समज मात्र झाला होता ;)
13 Feb 2014 - 10:45 pm | पैसा
यानंतर इराकमधे इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी डोके वर काढले तर ते पाप अमेरिकेच्या माथी. अमेरिका हा सगळ्यात मोठा अतिरेकी देश आहे.
13 Feb 2014 - 11:35 pm | अर्धवटराव
ते आहेत तशे. पण त्यांच्याही वरताण देश आहेत जगाच्या पाठीवर.
14 Feb 2014 - 11:10 am | प्रसाद गोडबोले
वर काढायला त्यांचे डोके खाली कधी होते ?
सातव्या शतका नंतर मध्यपुर्वेत शांतता कधी नांदली ?
उगाच अमेरिकेच्या माथ्यावर खापर फोडायच्या आधी खरच तिथं सगळं व्यवस्थित होतं का आधी हे तपासुन पहायला हवे ...
14 Feb 2014 - 12:21 pm | प्रसाद१९७१
+१००००००००००००००
अमेरिका उत्तम करते आहे.
14 Feb 2014 - 12:38 pm | प्यारे१
14 Feb 2014 - 12:54 pm | प्यारे१
संबंध काय अमेरिकेचा?
काय अधिकारानं अमेरिका तोंड घालते आहे? त्यांच्या त्यांच्यातल्या भांडणात दोन मांजरांच्या भांडणात तिसर्यानंच लोणी गिळावं अशी स्थिती.... का? स्वार्थ नि निव्वळ स्वार्थच ना? पेट्रोल नि सगळंच इंधन हवं म्हणून. बाकी काहीही नाही.
किमान इथं तरी अमेरिकेचं कौतुक नको. स्वत:च बुडवायचं नि परत स्वत: वर काढायचं धोरण!
बाकी ह्या अशांततेनं भारताचं नुकसान झालंय, अपरिमित नुकसान झालंय पण ही अशांतता भारतात आली ती आपले लोक भिकारी होते म्हणून.
शत्रूला जिवंत सोडायचा नसतो हे साधं गणित न समजल्यानं १६ वेळा युद्धात पराजित केलेला माणूस एकदाच सापडलेल्या राजाला मारुन गेला. पानिपतावेळी तर पत्र लिहून बोलावून आणलं गेलं अब्दालीला. कशाला????
14 Feb 2014 - 3:10 pm | प्रसाद गोडबोले
अमेरिकेचे कौतुक ह्या साठी की (मी वर म्हणल्या प्रमाणे) हा जावयाचा काठीने साप मारण्याचा प्रकार आहे .
बाकी मध्यपुर्वेतील अशांततेने भारताचे कसे काय बुवा नुकसान झाले ? उलट फायदाच झाला आहे ...... ज्या दिवशी पकिस्तान अफगाणिस्तान बॉरडर वर शांतता होईल ना त्या दिवशी हे पाकिस्तानी लोक कश्मीर कडे मोर्चा वळवतात की नाही ते बघा . अफगाणिस्तान धुमसत राहिले तर पाकिस्तान धुमसत राहील आणि त्यांना भारताच्या कुरापती काढायला वेळ मिळणार नाही .
शिवाय सध्या तेलाचे अर्थशास्त्र अमेरिकेच्या हातात आहे म्हणुन जरातरी व्यवस्थित आहे ... उद्या इराक , इराण इथल्या लोकांच्या हातात ते गेले तर अवघडच आहे .... टेअररिझम्ला फंडींग कुठल्या पैशातुन होते हे सार्या जगाला ज्ञातच आहे ...
14 Feb 2014 - 3:55 pm | प्यारे१
>>>मध्यपुर्वेतील अशांततेने भारताचे कसे काय बुवा नुकसान झाले ?
आजचं नाही, सातव्या शतकानंतरचं सांगतोय.
तिकडच्या अस्थिरतेमुळे, अशांततेमुळे तिकडून इकडे आले असतील ना बाबर आणि मंडळी.
बाकी हे लोक मेंढरांसारखे आहेत. सामान्य जनता अतिशय गरीब नि थोडी मठ्ठ अशीच आहे. ह्यांना युरोपियन अमेरिकनांनी आपल्या रंगाच्या नि अकलेच्या जोरावर ताब्यात ठेवलं नसतं तरच नवल.
टेररीझम साठी आवश्यक शस्त्रास्त्रं, दारुगोळा नि आवश्यक आर्म्स अम्युनेशन्स कोण बनवतं? ह्या माठ्यांना हे सगळं बनवता येतं का? मोठा वाटा कुणाचा आहे?
http://www.upi.com/News_Photos/gallery/Worlds-Top-5-arms-exporters/3105/
http://en.wikipedia.org/wiki/Arms_industry
(ह्या अशा लिन्क्स दिल्या की आपण अभ्यासू ठरतो. असो.)
16 Feb 2014 - 10:30 pm | पैसा
पाकिस्तान आताच काश्मिरमधे नाक खुपसत आहे आणि तेही अमेरिकेच्या पैशांवर. जर अमेरिकेने इतकी वर्षे आणि इतके पैसे पाकिस्तानला दिले नसते तर पाकिस्तान आज कुठे असतं?
17 Feb 2014 - 6:14 pm | बॅटमॅन
अमेरिका महा हरामखोर देश आहे.
हे बाकीचे देश गांधीवादी आहेत अशातला भाग नाही पण अमेरिकेने इराकवर फक्त आणि फक्त तेलासाठी हल्ला केला होता. सद्दाम हुसेनचं बाकी रेप्युटेशनही फार काही वाईट नव्हतं.
मध्यपूर्व आणि इस्लाम हा एक अॅस्पेक्ट झाला. पण त्यातही वाहाबींच्या उदयानंतरच गोची जास्त झालेली आहे.
'ते' फंडिंग सौदीतून मिळते हे तर जगजाहीर आहे.
मध्यपूर्वेतील लोकांचे एकूण तर्कशास्त्र अभ्यासताना अमेरिकेचा रोल नजरेआड केला जाऊ नये इतकाच मुद्दा आहे.
ते देशही मस्त स्वार्थी, क्रूर, इ.इ. आहेत पण अमेरिका त्या सर्वांचा बाप आहे. इतका दांभिक देश जगात दुसरा सापडणं कठीण. असो.
18 Feb 2014 - 10:50 am | अर्धवटराव
कदाचीत म्हणुनच तो देश आज सुपरपॉवर आहे. वाघावर बसुन सध्यातरी मजेत हिंडतोय आणि सर्वांना धाक दाखवतो आहे. उद्या काय होईल कोणाला माहित...
14 Feb 2014 - 3:31 pm | आयुर्हित
उध्वस्त इराक ची अत्यंत विदारक परिस्थिती वर्णन केली आहे सुधीर मुतालीक साहेबांनी.
"रासायनिक अस्त्र नाश करण्यासाठी हल्ला केला आणि शेवट्पर्यंत अशी अस्त्रे सापडलीच नाहीत", पण याचा कोणत्याच देशाने, कोणताच मार्गाने निषेध केला आहे काय? UNO मध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे काय?
या लेखात आपल्या फायद्यासाठी अमेरिका कुठल्याहि स्तराला जाऊ शकते, याचे हे जीवंत उदाहरण आहे.भारतावरही अशी वेळ केव्हाही येऊ शकते, कारणे द्यायला अमेरिका मोकळीच आहे. याचा आपण सर्वांनी बोध घेतला पाहिजे.
परवा पर्यंत नरेंद्र मोदींना विसा नाकारणारी अमेरिका, आतापासूनच(निवडणूक व्हायच्या आधीच)लाळघोटेपणा करायला लागली आहे, हे नैन्सी च्या भेटीने अधोरेखित केले आहे.
अर्धवट ज्ञान व काहीही अनुभव नसलेल्या लोकांना व आप सारख्या पक्षाला विदेशातून वित्त पुरवठा होत आहे, ही सुद्धा एक काळजीची बाब आहे. यामुळे पुढच्या काळात भारतात प्रचंड अस्थिरता येऊ शकते व हे देखील अमेरिका सारख्या देशांच्या पथ्यावरच पडणार आहे.
सध्याची भारतातील परिस्थिती पाहता, इराक सदृश्य स्थिती भारतात कितीतरी प्रमाणात आहेच की!
१)संसद देखील सुरक्षित नाही
२)मुंबई, पुणे, बोधगया, मालेगाव येथे झालेले बॉम्बस्फोट
३)काश्मिरी पंडित: काश्मिरातून स्थलांतरित झालेले आहेत.
४)बेळगाव, निपाणी येथी भाषा व सीमावाद ५० वर्षानंतरही सुरु आहेतच
५)झारखंडयथील नक्षलग्रस्त जनता
६)आसाम, पूर्वांचल येथील अशांतता
७)पश्चिम बंगालमध्ये मुळातच उद्योग कमी असून देखील(उदा.दाखल)टाटान्यानोचा प्लांट बंद होणे
८)कोकणात येऊ घातलेला अणुशक्ती उर्जा केंद्र आगामी उद्रेकाचे कारण असू शकते.
९)पुण्यात वर्षात किमान १०० लोक मारणारी/जखमी करणारी BRT
हे व असे अनेक उदाहरण आहेत जे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे.
नुसती हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काय करू शकतो, यावर देशहिताला प्राधान्य देऊन जर चर्चा झाली तर बरे होईल.
15 Feb 2014 - 2:32 pm | काळा पहाड
इराक बद्दल अजिबात सहानूभूती नाही. हे लोक अरब आहेत. यांना डोकं थोडं कमीच असतं. त्यातून तेलाचा माज. त्यातून मुसलमान आहेत. म्हणजे अतिरेकी. यांनीच ९/११ चा हल्ला केला होता ना? प्रतिहल्ला न करायला काय ते सेक्युलर्वादी कॉग्रेसवाले वाटले का? जर हे सगळं नको होतं तर नीट वागायचं होतं ना! जिथे तिथे अतिरेकी हल्ले कर, स्वतःचे वेगळे प्रदेश माग, इस्लामेतर लोकांना खतम करण्याची गोष्ट कर, जिथे तिथे स्वतःचे बुरखे दाढ्या नमाज पाळ असल्या गोष्टी कोणी करायला सांगितल्या होत्या? अमेरिकेने सध्या दोन देश घशात घातले आहेत आणि चांगली शिक्षा दिली. या अशिक्षित अडाणी माजोरड्या अरबांबद्दल अजिबात वाईट वाटत नाही.
15 Feb 2014 - 2:38 pm | काळा पहाड
इराक बद्दल अजिबात सहानूभूती नाही. हे लोक अरब आहेत. यांना डोकं थोडं कमीच असतं. त्यातून तेलाचा माज. त्यातून मुसलमान आहेत. म्हणजे अतिरेकी. यांनीच ९/११ चा हल्ला केला होता ना? प्रतिहल्ला न करायला काय ते सेक्युलर्वादी कॉग्रेसवाले वाटले का? जर हे सगळं नको होतं तर नीट वागायचं होतं ना! जिथे तिथे अतिरेकी हल्ले कर, स्वतःचे वेगळे प्रदेश माग, इस्लामेतर लोकांना खतम करण्याची गोष्ट कर, जिथे तिथे स्वतःचे बुरखे दाढ्या नमाज पाळ असल्या गोष्टी कोणी करायला सांगितल्या होत्या? अमेरिकेने सध्या दोन देश घशात घातले आहेत आणि चांगली शिक्षा दिली. या अशिक्षित अडाणी माजोरड्या अरबांबद्दल अजिबात वाईट वाटत नाही.
15 Feb 2014 - 6:13 pm | नगरीनिरंजन
नाओमी क्लाईन या पत्रकार-लेखिकेच्या "द शॉक डॉक्ट्रिन" पुस्तकात अमेरिकन कंपन्यांनी इराकमध्ये जी प्रचंड प्रमाणात लूटमार केली त्याचे तपशीलवार वर्णन आहे.
इराकी लोकांचा आर्थिक फायद्यासाठी अतिशय वाईट प्रकारे बळी दिला गेला आहे.
इराकी लोकांचा तसा भारतीयांना काहीच त्रास नव्हता तरीही वरच्या काही प्रतिक्रिया वाचून हृदयशून्यता म्हणजे काय ते कळले.
भारताने १९९१ साली आर्थिक खुलेपणाचे धोरण नसते स्विकारले तर भारतातही काही प्रकारचे उपद्व्याप केले गेले असते यात संशय नाही.
मूळच्या अमेरिकन पण आता ग्लोबल झालेल्या कंपन्यांच्या फायद्यासाठी कोणात्याही ठिकाणी काहीही केले जाऊ शकते.
नुकतेच म्यानमारमध्ये झालेले दंगे आणि त्यापाठोपाठ परकीय कंपन्यांसाठी किलकिली झालेली दारे हा निव्वळ योगायोग नाही असे वाटते.
16 Feb 2014 - 1:15 am | काळा पहाड
हृदयशून्यतेचा प्रश्न नाहीये. उलट इराण बद्दल अमेरिकेनं काही केलं तर वाईट वाटेल. कारण ते अरब नाहीत. इराक, सिरिया, जॉर्डन आणि मुख्य म्हणजे सौदी अरेबिया हे म्हणजे मुळचे भटके अरब. तेलामुळे श्रीमंत झालेले माजोरडे. अक्कल नावाचा प्रकार (वर्षानुवर्षे मेंदू वापरला न गेल्याने) नाहीच. त्यात सुन्नी असल्याने कर्मठ. यांना स्वर्ग दिला तरी त्याचा नरक बनवण्यात एक्स्पर्ट. तेव्हा अमेरिका नसती तर स्वतःमध्येच मारामारी करून मेले असते. इराक नं इराण वर १९८० मध्ये केलेला हल्ला काय किंवा कुवेत वरचा हल्ला काय, हा देश फुफाट्यात जाणारच होता. अमेरिकेमुळं त्याला तेलाचं एक नवीन परिमाण मिळालं एवढंच. बाकी भारताला त्रास नव्हता हे फक्त सांगण्यापुरतं. आपण कुठं तोंडच उघडत नसल्यामुळं आपले शेजारी सोडता आपल्याला शत्रू नाहीत. हे म्हणजे भिकारी माणसानं आपल्याला कुणीच लुटू शकत नसल्याचा टेंभा मिरवण्यासारखं झालं. अमेरिका हरामखोर आहेच. पण इराक वर कसा अन्याय झाला आणि तिथले लोक चांगले असून सुद्धा कसे वाईट दिवस कंठतायत हे सांगताना इतिहास एकांगी करतोय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाला फारच सोप्या पद्धतीनं विषद करतोय याचं भान ठेवावं.
17 Feb 2014 - 5:28 pm | प्रसाद१९७१
काळा पहाड ह्यांच्या प्रतिसादानी जाम खुश केले. धन्यवाद.
हे वाक्य तर भारताची वस्तुस्थिती अगदी निट दाखवते