शाळा
सकाळ झाली आज शाळेत जायचा कंटाळा आलेला होता. पण काय करणार कंटाळा करुन जमणार नाही. शाळा उघडणे तर आवश्यक होते. मुले वाट पाहत बसुन असतात. आई वडील शेतात कामाला गेले की त्यांना घरात कोणी राहु देत नाही. कुलुप लावले की मुलांचे व पालकांचे हक्काचे ठिकाण म्हणजे शाळेचे मैदान आणि शाळाच. त्यांचा विचार येताच गणेशने आळस झटकला आणि सकाळची त्याच्या वाटणीची कामे करु लागला. स्वाती आणि गणेश दोघे जिल्हा परिषदेत शिक्षक. दोघांचा सकाळ पासुनचा दिनक्रम हा घड्याळ्याच्या काट्यावर बांधलेला. चुका करण्यास, वेळ वाया घालवण्यास सक्त मनाई.