मरणे कठीण झाले
मरणे कठीण झाले
जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले
ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले
हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले
कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले
बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले
सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले
एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले