राग दरबारी

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
9 Apr 2013 - 3:05 pm

आजकाल पुस्तकं वाचताना मला माझ्यात झालेला एक बदल जाणवतो.
पूर्वी 'कोणतं पुस्तक छान आहे, आवडलं आहे?' या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं होतं.
जे पुस्तक वाचताना भूक, झोप, इतर व्यवधानं यांचा पूर्ण विसर पडतो; जे पुस्तक एकदा हातात घेतलं की शेवट होईपर्यंत हातातून सोडवत नाही; दुर्दैवाने ते बाजूला ठेवायची वेळ आलीच तर संधी मिळताक्षणी ते जिथं सोडलं होतं तिथून पुढे चालू केलं जातं - ते चांगलं पुस्तक!

पण आजकाल माझं मत बदललं आहे.
अनेक चांगली पुस्तकं वाचताना हा बदल जाणवतो.
'राग दरबारी' ही श्रीलाल शुक्ल यांची कादंबरी वाचताना हे पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात आलं माझ्या.

जे पुस्तक (खरं तर कोणतीही कलाकृती) मला विचार करायला भाग पाडतं; जे मला अस्वस्थ करतं; जे माझ्या मनात प्रश्न निर्माण करतं; जे मी घेतलेले अनेक अनुभव माझ्यात पुन्हा एकदा जागवतं; जे मला एकहाती वाचायची चैन करू देत नाही आणि अक्राळविक्राळ रुप धारण करुन नाचतं समोर, जे वाचताना हे आजही किती लागू आहे असं वाटत राहत - ते चांगलं पुस्तक असं आता माझं मत बनलं आहे. आणि 'राग दरबारी' माझ्या या सगळ्या निकषांना पुरुन उरलं. ३३५ पानांच पुस्तक वाचायला मला जवळजवळ एक महिना लागला यातच माझ्यासाठी या पुस्तकाची गुणवत्ता आहे.

पुस्तकाच्या नावावरून संगीताबद्दल पुस्तक असेल किंवा राजकीय सत्तेबद्दल पुस्तक असेल असा अंदाज होता - यातला दुसरा अंदाज बरोबर आहे हे पहिल्या पानातच लक्षात आलं माझ्या.

'शिवपालगंज' हे तुम्ही आम्ही पाहिलेलं कोणतंही गाव असू शकतं -आजही आहे ते. 'जे इतरत्र नाही ते इथं आहे आणि जे इथं नाही ते कुठेच आढळणार नाही' या महाभारताच्या गौरवाची आठवण यावी असं गाव आहे हे! शहरापासून हे जवळ आहे आणि मुख्य म्हणजे रस्त्याच्या बाजूला आहे. त्यामुळे बाहेरच्या जगापासून अलिप्त नाही हे गाव पण ते आपलं आपल्यात रममाण पण आहे. या गावाच्या छोटयाशा परिघात घडणारी एक गोष्ट.

हे गाव कसं आहे? रात्रीच्या अंधारात गावात प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्त्रिया शौचास बसल्या आहेत.कुत्री भुंकत आहेत. गावात काही दुकानं आहेत; सरकारी कार्यालयं आहेत; दारुच दुकान आहे. इथं रस्त्यावर येणारे घरांचे चौथरे आहेत. गावात एक कॉलेज आहे ज्याला वर्ग भरवण्यास पुरेशी इमारत नसल्याने ते जणू 'शांतीनिकेतन' आहे. या गावात एक 'गांधी चबुतरा' आहे - ज्याच्या आड गावाचे पुरुष मूत्रविसर्जन करतात आणि इथं निवांत कुत्री बसलेली असतात. गावापासून पाच मैल अंतरावर एक मंदिर आहे - जिथं जत्रा भरते. इथं कर गोळा करताना आपला वाटा घेणारे कर्मचारी आहेत आणि फुकट हादडणारे गावगुंड आहेत. दरवर्षी नेमाने वृक्षारोपण होणारे उजाड मैदान आहे. गावाची घाण पोटात घेणारा एक तलाव आहे. आपल्या गावची जी परिस्थिती आहे तीच दिल्लीची आहे याची इथल्या लोकांना अगदी स्पष्ट जाणीव आहे आणि त्यामुळे आपलं कोणी काही घडवू आणि बिघडवू शकणार नाही याची खात्रीही.

कादंबरीत पात्रं तशी पाहायला गेली तर मर्यादित आहेत; पण त्यांचं विश्व मात्र असीम आहे. पुस्तकाची सुरुवात रंगनाथच्या नजरेतून होते. रोजच्याप्रमाणे रेल्वे दोन तास उशीरा येणार अशा अंदाजाने रंगनाथ रेल्वे स्थानकावर पोचतो तर गाडी आज फक्त दीड तास उशीर होऊन निघून गेलेली आहे. "शिकायती किताब के कथा-साहित्य मे अपना योगदान देकर" रंगनाथ बाहेर पडल्याचा उल्लेख पहिल्याच पानावर आहे. पुस्तकात उपहास ठासून भरलेला आहे याची खूण इथे मिळते, या उपहासात्मक टिपण्यांनी पुढे हसू येत राहतं, ते पटत राहतं, लेखकाची निरीक्षणशक्ती एकदम 'भारी' आहे अशी दाद आपण देत राहतो. पुस्तक इथंच थांबलं असतं तर बरं झालं असतं - असं नंतर वाटायला लागतं; कारण हा उपहास नंतर नंतर अंगावर यायला लागतो; विषण्ण करायला लागतो.

शिवपालगंजइतकाच प्रातिनिधिक आहे तो रंगनाथ. शहरातून खेडयात आपल्या मामाकडे काही महिने प्रकृती सुधारण्यासाठी तो चालला आहे. त्याने एम.ए. केलं आहे इतिहासात. तिथं आहेत वैद्यजी - रंगनाथचे मामा. वैद्यजी बरंच काही आहेत. ते वैद्य तर आहेतच शिवाय कॉलेजचे व्यवस्थापक आहेत; सहकारी संस्थेचे व्यवस्थापक आहेत. त्यांना अशा दोन दोन पदांवर राहायला आवडत नाही. पण काय करणार? दुसरं कोणी जबाबदारी पेलण्याइतकं लायक नाहीच या गावात! 'ब्रह्मचर्या'वर उपदेश करतात ते आणि वीर्यनाश टाळण्यासाठीच्या त्यांच्या गोळ्या कॉलेज विद्यार्थ्यांमध्येही चांगल्या खपतात. ते संस्कृतही वाचू शकतात.

रुप्पन हा वैद्यजींचा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा. बरीच वर्ष तो एकाच वर्गात आहे. तो एक 'युवा नेता' आहे. बाप नेता असल्याने त्याची नेतागिरी जन्मजात आहे. काहीही मनाविरुद्ध व्हायला लागलं की रुप्पन 'कॉलेजचे विद्यार्था रस्त्यावर उतरतील' अशी धमकी देतो. इथले दरोगाजी दोन पुढा-यांना खेळवत स्वतःचा फायदा करून घ्यायचा प्रयत्न करतात आणि फसतात. छंगामल कॉलेजातले शिक्षक वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे आहेत - त्यांच्यापैकी कुणालाच विद्यार्थ्यांना शिकवण्यात रस नाही आणि त्यांच्याकडे ते कौशल्यही नाही. विद्यार्थीही उगाचच कॉलेजात येतात. प्राचार्यांच्या मते वैद्यजींच्या 'दरबारात' हजेरी लावणे हे सर्वात महत्त्वाचे काम, तेवढे ते इमानेइतबारे करत राहतात. इथे शिकवणा-यांत तट पडतात, कोर्टबाजी होते वगैरे ब-याच घडामोडी होत राहतात. अर्धाअधिक उघडाच असणारा आणि वैद्यजींच्या दरबारात भांग घोटण्याचे काम करणारा सनीचर एके दिवशी गावचा प्रधान बनवला जातो.

बद्री पैलवान आहे. हा वैद्यजींचा मोठा मुलगा. त्याचा शिष्य छोटू पैलवान आहे जो स्वतःच्या वडिलांना नियमित मारहाण करतो. मुलाने बापाला मारहाण करण्याची त्या घराण्यात परंपराच आहे. 'फ्लश' खेळण्याचे कौशल्य असणारा जोगनाथ आहे - त्याला कसे गुन्ह्यात अडकवले जाते आणि कसे सोडवले जाते याची रोचक कहाणी आहे. एक लंगड आहे इथं. लाच न देता तहसील कार्यालयातून एक कागद मिळवण्याची त्याची लढाई आहे. इथल्या सहकारी संस्थेत घोटाळा होतो. रामाधीन कलकत्त्यात अफूचा व्यापार करण्याचा अनुभव घेऊन गावी परतला आहे. तो आता वैद्यजींचा विरोधक आहे. त्यावरुन गावात राजकारण होत. कॉलेजच्या व्यवस्थापन समितीची बैठक व्हावी अशी रामाधीन मागणी करतो. गयादीन व्याजाने पैसे देतो आणि त्याचे एक कपडयांचे दुकान आहे. त्याच्याकडे कॉलेजातली शिक्षक मंडळी सतत सल्लामसलतीसाठी येतात - पण तो प्रत्यक्ष कुणा एकाची बाजू घ्यायचे नेहमीच नाकारतो. कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचा हा उपाध्यक्ष. एका अर्थी वैद्यजींच्याच पक्षातला.

शिवपालगंजमध्ये घडणा-या अनेक घटनांचे सविस्तर चित्रण या कादंबरीत येते. सहकारी संस्थेतला घोटाळा; कॉलेजच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक आणि नव्या कार्यकारी मंडळाची निवडणूक; सनीचरचा निवडणूक प्रचार आणि निवडणूक 'जिंकण्याच्या' तीन यशस्वी पद्धती; शिक्षकांची कोर्टबाजी आणि त्यावरचे कोर्टाचे ताशेरे; दरोगाजींची बदली; बापाने मुलाविरुद्ध केलेली मारहाणीची तक्रार ऐकणारी न्याय-पंचायत; सरकारी योजनाच्या जाहिराती आणि विकासाची भाषणबाजी; हिंदी सिनेमाचा जनमानसावर असलेला प्रभाव; कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यांचे दिशाहीन जगणे; कोर्टात साक्ष देण्यात वाकबगार असलेले खेडूत; ताकदवान बापाला विरोध करणारी मुलं आणि त्यामुळे हतबल झालेला बाप; आंतरजातीय विवाहाचे राजकारण आणि त्यातून सुटका; शहरातल्या लोकांशी ग्रामीण सत्तावानांचे नाते; कुटुंब नियोजनाचा गावात प्रसार करणारा एक अविवाहित कर्मचारी; कोर्टातला खटला बाहेर मिटवू पाहणारे दरोगाजी; सहकारी संस्थेत घोटाळा झाला या आरोपाची जबाबदारी घेत पदाचा राजिनामा देणारे वैद्यजी आणि त्याच सभेत बद्रीला बिनविरोध त्याच पदावर बसवणारे गावकरी ....एकामागून एक घटना होत राहतात .. अगदी ख-या जगण्यात घडाव्यात तशा .. त्याच गतीने, त्याच पद्धतीने, त्याच फळांना जन्म देत ...

या सबंध कादंबरीत स्त्रियांचे उल्लेख ठराविक प्रसंगी आणि ठराविक संदर्भात येतात. एक आहे: गावचा राधेलाल शहरात जाऊन दुस-याची बायको पळवून घेऊन आला आहे - लग्नाची म्हणून. तिची छेड काढणे हा विद्यार्थ्यांचा आवडता उद्योग आहे. बकरी चारणारी एक तरूण मुलगी आहे. गयादीनची मुलगी बेला आहे, जिला रुप्पन प्रेमपत्र लिहितो, छोटा पैलवान भर कोर्टात तिचे नाव दुस-याशी जोडतो, बद्री तिच्याशी लग्न करु इच्छितो, आणि गयादीन तिचे लग्न जातीतल्या मुलाशी लावायची धडपड करतो. ही मुलगी बेला कधीच समोर येत नाही - तिला काय वाटते, तिच्या भावना काय आहेत याची काही किंमत नाही. ती फक्त एक साधन आहे इतरांच्या भावनांचे! तिला जणू काही अस्तित्वच नाही. देवीच्या जत्रेत नटूनथटून वावरणा-या स्त्रिया आहेत. जत्रेच्या परिसरात एका 'गाणा-या स्त्रीची दलाली करणारा' पुरुष आहे. हिंदी सिनेमातली गाणी माहिती असणारी ग्रामसेविका आहे - जी दुस-यांना प्रेमपत्र लिहायला मदत करते असा एक उल्लेख आहे. स्त्रिया इथं अदृश्य आहेत, त्यांची भूमिका आणि स्थान दुय्यम आहे - समाजात आणि पुरुषांच्या भावविश्वातही .... १९६८ मधल्या एका प्रातिनिधिक खेडयात काही वेगळ चित्र कसं दिसेल?

१९६८ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकातला ग्रामीण भारत आजही बराचसा तसाच आहे, काहीही बदल झालेला नाही या जाणीवेने पुस्तक वाचता वाचता जीव गुदमरायला लागतो. या सगळ्यातून सुटका नाहीच या अपरिहार्यतेने घुसमट वाढते. साहित्याचा आणि जीवनाचा काय संबंध असतो हे धारदारपणे सांगणारी लेखकाची शैली चकित करून जाते आधी; आणि वेदना देते शेवटी शेवटी.

'शायनिंग इंडिया'च्या भूलाव्यातून ज्यांना बाहेर पडायचं आहे त्यांनी हे पुस्तकं अवश्य वाचावं .. कारण आजही आपल्या देशात असंख्य शिवपालगंज आहेत. आजही हे पुस्तकं तितकंच खरं आहे जितकं पाच दशकांपूर्वी होतं! बदल झाले आहेत - पण ते किती वरवरचे आहेत हे 'राग दरबारी' जाणवून देतं! हे पुस्तक आपण अजून किती प्रवास करायचा बाकी आहे याची जाणीव करून देत राहतं.

हे पुस्तक मनोरंजन करत नाही, हे पुस्तक तुम्हाला आभासी स्वर्गात नेत नाही; हे पुस्तक तुमचा निवांतपणा घालवतं - तुमची झोप उडवतं....अशी अस्वस्थ करणारी पुस्तकं वाचावीत का? आहेत ते प्रश्न काय कमी आहेत म्हणून अशी गंभीर पुस्तक वाचावीत? .. असे प्रश्न पडू शकतात ...अशा प्रश्नांची उत्तरं आपण आपल्यालाच द्यायची असतात - खरीखुरी! हे पुस्तक अशा गंभीर आत्मचिंतनासाठीही अतिशय मोलाचं आहे.

राग दरबारी
श्रीलाल शुक्ल

राजकमल पेपरबैक्स, नयी दिल्ली
२०१२
किमत: रुपये २५०/-
(या पुस्तकाला १९६९ चा 'साहित्य अकादमी' पुरस्कार मिळाला आहे आणि बाजारात सध्या या पुस्तकाची चौदावी आवृत्ती आहे. कादंबरी हिंदी भाषेत आहे.)

वाङ्मयसमाजविचारसमीक्षाशिफारस

प्रतिक्रिया

तर्री's picture

9 Apr 2013 - 3:20 pm | तर्री

आवडीचा विषय > उत्तम परिचय > आभार .

प्रचेतस's picture

9 Apr 2013 - 3:24 pm | प्रचेतस

उत्तम परिचय.

परवाच साहित्यदर्शनच्या पुस्तक प्रदर्शनात गेलो होतो.
राग दरबारीचा मराठी अनुवाद नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलाय जो तिथे होता. तेव्हा कादंबरी न घेतल्याची आता खंत वाटतेय. आता परत जाऊन नक्कीच घेणार.

लॉरी टांगटूंगकर's picture

9 Apr 2013 - 4:41 pm | लॉरी टांगटूंगकर

आधीपण एकदा, बहुदा तुमच्याच ब्लॉग वर वाचलं होतं. पुन्हा वाचलं. आवडलं..
वाचतो आता पुस्तक ..

पीडीएफ जालावर शोधाशोध केल्यास मिळून जाईल ...

यशोधरा's picture

9 Apr 2013 - 4:45 pm | यशोधरा

मस्त लिहिलं आहे.

अहा! अतिशय आवडतं पुस्तक आहे हे!
नंदनबाबाच्या कृपेने हे हातात पडलं, मलाही वाचायला महिन्याहून बराच जास्त वेळ लागला. एकेका प्रकरणावर चवीचवीने आस्वाद घेत विचार केला जातो.. आपोआप.. नकळत..

तिरक्या लेखनाचा बेताज बादशहा असं वर्णन करावं लागेल!

@वल्ली: हिंदी येतं ना तुला? मग अनुवाद का? :)
या कादंबरीची भाषाच याची मुख्य USP आहे. तेव्हा वेळ लागला तरी हिंदीतच वाच अशी आग्रहाची शिफारस.

बाकी इतका छान परिचय वाचूनही तोकडाच वाटतोय यातच पुस्तकाचची ताकद दिसून येते!
परिचयाबद्दल आभार!

प्रचेतस's picture

10 Apr 2013 - 1:08 pm | प्रचेतस

असे असेल तर मग हिंदीतूनच वाचायला हवी.
सागरने घेतलेली आहेच ही हिंदी कादंबरी. त्यालाच आणायला सांगतो आता ;)

चौकटराजा's picture

9 Apr 2013 - 5:03 pm | चौकटराजा

या पुस्तकाबद्द्ल कुठेतरी वाचल्याचं स्मरतंय. आपण याचा परिचय देऊन मोठेच काम केले आहे. मी व इथला एक धन्या नावाचा प्राणी आहे .दोघानाही इंग्रजी येते पण मराठीत वाचायला जास्त आवडते. मी मराठीतील अनुवाद वाचायचा प्रयत्न जरूर करेन. बाकी हिंदी गद्य व पद्य साहित्याबद्द्ल मला प्रचंड आदर आहे. हिंदी ही खूप संपन्न भाषा आहे .

आतिवास's picture

10 Apr 2013 - 12:38 pm | आतिवास

धन्यवाद तर्री, वल्ली, मन्द्या, यशोधरा, ऋषिकेश,चौकट राजा.
वल्ली आणि चौकट राजा, या कादंबरीचा मराठी अनुवाद मी वाचला नाही; त्यामुळे अनुवादाच्या गुणवत्तेबद्दल माहिती नाही. नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलाय म्हणजे चांगला असेल याची खात्री आहे. पण ऋषिकेश म्हणतात तसं मूळ हिंदीतून ही कादंबरी वाचणं जास्त रोचक आहे.

मन्द्या, मीमराठी या संकेत स्थळावर विशाल कुलकर्णी यांनी हा दुवा दिला आहे.

मला हे पुस्तक अतीशय भिक्कार वाटले. ग्रामीण जीवनावर द मा मिरासदार कित्येक पटीने उत्तम लिहितात.

आतिवास's picture

11 Apr 2013 - 11:14 am | आतिवास

:-)
'राग दरबारी' मला अतिशय आवडलेल्या पुस्तकांपैकी एक!
एखादं पुस्तक का आवडावं आणि का आवडू नये याचं काही गणित असत नाही; तुम्हालाही हे पुस्तक आवडलं असतं तर बरं झालं असतं असं वाटून गेलं क्षणभर. पण अर्थात तुमच्या मताचा आदर आहेच.

द. मा. मिरासदारांचं काही वाचून कैक वर्ष उलटली. आता तुम्ही आठवण करुन दिली आहे; तर वाचते त्यांची काही पुस्तकं पुन्हा एकदा.

रमताराम's picture

14 Apr 2013 - 12:17 am | रमताराम

'राग दरबारी'ची तुलना दमांच्या कथांशी....? अच्छा, विजुभाऊंचा प्रतिसाद आहे होय. ठीक ठीक.

'राग दरबारी' हा आमच्या मते भारतीय साहित्यातील एक मैलाचा दगड आहे तसेच एक महत्त्वाचे वळणही. राजकारण हा केंद्रबिंदू मानून एक कादंबरी लिहिणे हे एक धाडसच. त्यातच 'खेड्याकडे चला, तिकडे सगळे आलबेल आहे/होईल.' (अलिकडे ऐकलेल्या 'इंडियात बलात्कार होतात भारतात बलात्कार होत नाहीत.' या विधानासारखेच) या भाबड्या, स्वप्नाळू गृहितकातील फोलपणा दाखवून ती झापडे दूर करून आपले ग्रामजीवन लख्ख प्रकाशात पहायला लावणारे पुस्तक.

आतिवास's picture

14 Apr 2013 - 4:37 pm | आतिवास

प्रतिसाद आवडला.

'राग दरबारी'ची तुलना दमांच्या कथांशी....? अच्छा, विजुभाऊंचा प्रतिसाद आहे होय. ठीक ठीक.

असो या प्रतिसादाबद्दल अजून काय बोलणार. राग दरबारी ग्रामीण नव जीवनावर बरेचकाही बोलते मात्र ते एकसुरी असल्याने तितकेसे पोहोचत नाही. त्या पेक्षा दमांच्या गवत/ धपडणारी मुले वगैरे कथा खूप काही सांगून जातात.
असो...... रमताराम आजोबाम्च्या खवट "स पेठी" प्रतिसादामुळे काहीवेळ बहार आली.
अवांतरः आजोबा बराच काळ पेरु गेटापाशी काढलेला दिसतोय हल्ली

लाल टोपी's picture

14 Apr 2013 - 3:00 am | लाल टोपी

पुस्तक परीक्षण आवड्ले. १९६९ ची परीस्थिती आणि आजची स्थिती फारसा फरक नाही जाणवत

पैसा's picture

14 Apr 2013 - 10:05 am | पैसा

आता फ्लिपकार्टवर शोधते.

आतिवास's picture

15 Apr 2013 - 12:53 pm | आतिवास

आभार विजुभाऊ, रमताराम, लाल टोपी, पैसा.