अभय-गझल
गुंफता कवन हे
नमस्कार मंडळी,
एका उर्दू संकेतस्थळावरील काव्यदालनात विहरताना मला एक रोचक धागा दृष्टीस पडला होता. त्या धाग्यातील कल्पना मला आवडली, आणि ती मिपावरही आपण उतरवावी असा मनात विचार आला. त्यासंदर्भात संपादक मंडळाशी संवाद साधून त्यांच्या सहमतीने, वतीने मी ही कल्पना, हा उपक्रम आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहे.
गुंफता कवन हे
उपक्रमाचं साधारण स्वरूप असं आहे, की एक काफ़िया घेण्यात यावा, आणि त्याला आपापल्या प्रतिभासाच्यात घालून सभासदांनी त्यांना सुचतील तसे शेर जोडत जावे आणि आकारास यावी एक सुंदर कविता; एक सुंदर ग़ज़ल.
मढे मोजण्याला
मढे मोजण्याला
लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला
नको पाडसा आज कळपास सोडू
चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला
जवानीत होता उतावीळ श्रावण
अता फ़ागही ना विचारीत त्याला
तुझी आत्मग्लानी वृथा-व्यर्थ आहे
कुणी येत नाही मढे मोजण्याला
करा की नका काम कोणी पुसेना
बिले चोख ठेवा; लुटा आंधळ्याला
इथे देवळाच्या चिखल भोवताली
स्मशाने चकाचक ’अभय’ तालुक्याला
- गंगाधर मुटे "अभय"
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=
प्रबंध
चिरदाह वेदनेचा मजला अखंड व्हावा
मन त्यातही रुळावे, अन दाह थंड व्हावा
येऊनिया न यावा माझा प्रयास कामी
नशिबासही कसा हा माझाच छंद व्हावा
ते शब्द आठविता, जणु काळही थिजावा
एका क्षणाक्षणाचा बघता निबंध व्हावा
एकी अशी असावी, निश्चय असा असावा
हातात हात यावे, अन मार्ग रुंद व्हावा
झिरपावी या मनात एकेक गोष्ट ऐसी
प्रत्येक भावनेचा न्यारा सुगंध व्हावा
विश्वास या मनीचा, एकाकी मंद व्हावा
आतून हाक यावी, अन तो बुलंद व्हावा
माझेच मी पुसावे अश्रू असे हसूनी
कसलातरी मनाचा माझ्या प्रबंध व्हावा
- अपूर्व ओक
अस्थी कृषीवलांच्या
अस्थी कृषीवलांच्या
पाया रचून गेले कर्तव्य जागणारे
होते तसेच आहे नुसतेच बोलणारे
होऊ नकोस कष्टी चिंतातुराप्रमाणे
जालिम इलाज कर तू विध्वंस रोखणारे
माजून तर्र काही दिसतात कर्मचारी
प्रत्येक कागदाला पैशात घोळणारे
देणार साथ काया नाही मनाप्रमाणे
उडत्या मनास छळते हे शल्य बोचणारे
रस्ता नवीन नवखा दुर्गम-दरी-पहाडी
संगे हवे कशाला वाटेत धापणारे?
धर्मांध शोषकांच्या झुंडी तयार झाल्या
जातीत पांगलेले अन्याय सोसणारे
अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये
वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये
एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये
कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?
तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये
रंग आणखी मळतो आहे
रंग आणखी मळतो आहे
रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे
गारपिटाचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे
मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे
पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !
भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे
बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे
ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे
'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे
- गंगाधर मुटे
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==
टिकले तुफान काही
टिकले तुफान काही
ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही
निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही
देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही
संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही
उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही
तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही
कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही
चीन विश्वासपात्र नाही
चीन विश्वासपात्र नाही
सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही
उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही
समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही
आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही
"खावू लुटून मेवा" हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही
तोडीस तोड उत्तर जमले बघा मलाही
आता पुढील चर्चा मुद्देविहीन नाही
स्वातंत्र्ययुद्ध अथवा संग्राम कोणताही
लढतात तेच जे-जे हुजरेकुलीन नाही
शब्दबेवडा
शब्दबेवडा
आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो
हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!
ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीता शोधणे भुलुन गेलो! अशोकवनात रमून गेलो!!
अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो
आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना
परमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो