टिकले तुफान काही
ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही
निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही
देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही
संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही
उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही
तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही
कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही
तापून षड-रिपुंनी पेटून पाहिले पण;
भट्टीतही जरा ना जळले तुफान काही
घेरून मध्यभागी केलाय कोंडमारा
नाहीच डोंगरांना नमले तुफान काही
होते तिथेच आहे थिजल्या समान काही
लोळून पायथ्याला निजले तुफान काही
खेळून धूर्त खेळी, स्वामित्व भोगणारे
सत्ता रवंथताना विरले तुफान काही
कक्षेत यौवनाच्या येताच प्रेमभावे
सौख्यात नांदताना दिसले तुफान काही
विकण्यास आत्मसत्ता जेव्हा लिलाव झाला
बोंबीलच्या दराने खपले तुफान काही
भाषेत गर्जनेच्या आवेश मांडला पण;
किरकोळ आमिषाला फसले तुफान काही
दिसण्यात शेर होते, दाढीमिशी करारी
निर्बुद्ध वागण्याने, मिटले तुफान काही
आश्वासने उधळली, सूं-सूं सुसाटतेने
वचने निभावताना नटले तुफान काही
मोठ्या महालमाड्या शाबूत राखल्या अन्
उचलून झोपडीला उडले तुफान काही
ना पाळताच आला आचारधर्म ज्यांना
गर्तेत लोळताना बुजले तुफान काही
हकनाक व्यस्त झाले चिंतातुराप्रमाणे
आव्हान पेलताना दमले तुफान काही
गल्लीकडून काही दिल्लीकडे निघाले
मध्येच मुद्रिकेला भुलले तुफान काही
बसताच एक चटका सोकावल्या उन्हाचा
पोटात सावलीच्या दडले तुफान काही
भोगात यज्ञ आणिक कामात मोक्षप्राप्ती
संतत्व लंघताना चळले तुफान काही
पूर्वेकडून आले, गेलेत दक्षिणेला
फुसकाच बार त्यांचा, कसले तुफान काही?
सत्तारुपी बयेचा न्याराच स्वाद भारी
आकंठ चाखण्याला झुरले तुफान काही
आरंभशूर योद्धे दिसले जरी ’अभय’ ते
गोंजारताच अख्खे निवले तुफान काही
- गंगाधर मुटे 'अभय’
-------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
28 Dec 2013 - 3:23 am | अभ्या..
मस्तच हो अभयराव. भारी जमलेय.
.
.
राजूभाई झिंदाबाद, स्वाभिमानी शेतकरी झिंदाबाद.
28 Dec 2013 - 7:10 am | इन्दुसुता
रचना आवडली
28 Dec 2013 - 7:10 am | पाषाणभेद
छान आहे.
28 Dec 2013 - 9:49 am | अनुप ढेरे
हे वाचून मनसेच्या टोल वाल्या आंदोलनाची आठवण झाली
28 Dec 2013 - 7:51 pm | निरन्जन वहालेकर
अतिशय सुन्दर रचना ! ! खुप आवडली ! ! !
29 Dec 2013 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा
जब्बरदस्त!!!
19 Jul 2016 - 10:39 pm | अनुप ढेरे
अप्रतिम!
19 Jul 2016 - 10:43 pm | अभ्या..
काय ढेरेशास्री, चक्क दोनदोन्दा अप्रतिम चा प्रतिसाद?
माजरा क्या हय?
19 Jul 2016 - 10:46 pm | अनुप ढेरे
मुटे अ़कलबद्द्ल लोकांनी फकस्त 'त्या' धाग्यावरून मत बनवू नये म्हणून वर कहाडले दोन छान धागे!
19 Jul 2016 - 10:46 pm | अनुप ढेरे
अंकल म्हणायच आहे मला.
19 Jul 2016 - 10:57 pm | गंगाधर मुटे
धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.
गंगाधर मुटे तोच आहे
मात्र
२०१३ आणि २०१६ मध्ये मिसळपावच्या स्वभावात किती फरक पडला आहे ते स्पष्ट होईल.
@इथे मिसळपावचा अर्थ मिसळपावरिल एक कंपू/एक झुंड असा घ्यावा. एक कंपू/एक झुंड म्हणजे मिसळपाव नव्हे हेही लक्षात घ्यावे.
20 Jul 2016 - 12:05 am | सुंड्या
शानदार जबरदस्त