अभय-गझल

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
12 Feb 2013 - 11:57 am

आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले
माझे असून “माझे” संबोधता न आले

आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले

राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले

बरसात तू सुखाची, केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले

सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले

जयवी - जयश्री अंबासकर

गझलअभय-गझल