पेशवाईची अखेर आणि दुसरा बाजीराव
दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांचे राज्य घालवले अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. तो अखेरचा पेशवा असल्याने या समजुतीला बळ मिळते. त्या काळाबद्दल खोलवर वाचन करताना (एकत्रित यादी शेवटी दिली आहे) मला असा आढळलं की ही समजूत खोटी आहे. मागच्या भागात वल्ली आणि गामा पैलवान यांनी थोडक्यात प्रतिसाद लिहिले आहेतच, पण मला असे वाटले की याबद्दल सविस्तर लिहायला हवे. म्हणून हा सारांश इथे मांडतो आहे. राज्य बुडवण्यासाठी दुसरा बाजीराव हा कारणीभूत नसला तरी याचा अर्थ असा नाही की तो शूर होता किंवा त्याच्या हातून चुका झाल्या नाहीत. त्याने आपल्या कुवतीनुसार धडपड केली आणि अखेरपर्यंत त्याला आपण काय गमावले याची जाणीव होती.