दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांचे राज्य घालवले अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. तो अखेरचा पेशवा असल्याने या समजुतीला बळ मिळते. त्या काळाबद्दल खोलवर वाचन करताना (एकत्रित यादी शेवटी दिली आहे) मला असा आढळलं की ही समजूत खोटी आहे. मागच्या भागात वल्ली आणि गामा पैलवान यांनी थोडक्यात प्रतिसाद लिहिले आहेतच, पण मला असे वाटले की याबद्दल सविस्तर लिहायला हवे. म्हणून हा सारांश इथे मांडतो आहे. राज्य बुडवण्यासाठी दुसरा बाजीराव हा कारणीभूत नसला तरी याचा अर्थ असा नाही की तो शूर होता किंवा त्याच्या हातून चुका झाल्या नाहीत. त्याने आपल्या कुवतीनुसार धडपड केली आणि अखेरपर्यंत त्याला आपण काय गमावले याची जाणीव होती. राज्य गमावण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरु झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज अथवा थोरला बाजीराव याचे काही गुण जरी त्याच्या अंगी असते तर त्याला कदाचित ती प्रक्रिया थांबवता आली असती आणि राज्य टिकवता आले असते. त्याचा दोष इतकाच दिसतो की त्याच्या अंगी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन लोकोत्तर यश मिळवण्याचे गुण नव्हते आणि अशी संधी त्याला आली असताना ते शिवधनुष्य पेलण्यास तो असमर्थ ठरला.
या मराठेशाहीच्या अंताची सुरवात १८१७ मध्ये नाही तर कधी झाली होती, दिल्ली ताब्यात घेऊन आख्या भारताचा कारभार चालवणाऱ्या मराठा सत्तेचा ऱ्हास कधी झाला, हे प्रश्न मग उभे राहतात. फक्त मराठ्यांच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील हा निर्णायक क्षण (decisive moment) म्हणजे १८०३ असे मला वाटते. या वर्षानंतर मराठ्यांचे विधिलिखित अटळ बनले. ते टाळणे शक्य होते पण फार अवघड होते. असाच एक दुसऱ्या महायुद्धातील असा निर्णायक क्षण म्हणजे स्टालिनग्राडचा लढा आणि नंतरची कर्स्कची लढाई (ऑगस्ट १९४३). इथे जर्मन लष्कराने आक्रमक पुढाकार गमावला (lost operational initiative) आणि पूर्व आघाडीवर त्यांना सतत बचावात्मक भूमिका घेणे भाग पडले. पूर्व आघाडीवर विजयाची शक्यता कर्स्क इथे पूर्ण नाहीशी झाली. त्यानंतर २ वर्षे हिटलरच्या मृत्यूपर्यंत लढाई चालू होती. पण जर्मनीचा पराभव दिवसेंदिवस अटळ होत गेला.
मराठयांच्या बाबतीत एक गोष्ट दिसते की दौलतीस (मग ती पेशवेपद, होळकर, शिंदे अशी कोणतीही असो) पुढचा वारस कोण होणार या प्रश्नावर सतत अंतर्गत कलह चालू राहिला - . त्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी सर्वांचे लष्करी पराभव केले आणि हा देश ताब्यात घेतला. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंग्रजांनी १८०३ साली दिल्ली मराठ्यांच्या ताब्यातून घेतली. इंग्रजांनी मोगलांचा पराभव करून नव्हे तर मराठ्यांचा पराभव करून दिल्ली घेतली. नागपूरकर भोसल्यांना १८०३ साली ओरिसा, कटक हा भाग इंग्रजांना द्यावा लागला. त्यामुळे भारताची सत्ता इंग्रजांनी मराठ्यांकडून मिळवली हे स्पष्ट दिसते.
आपण जर सवाई माधवरावाच्या जन्माच्या वेळची (ई. स. १७७४) परिस्थिती पाहिली तर आपल्याला नंतरच्या दुसऱ्या बाजीरावाच्या वेळेसारखीच स्थिती दिसते. थोरल्या माधवरावाच्या वेळेपासूनच (१७६१-१७७२) दोन प्रतिस्पर्धी पक्ष पेशवेदरबारात उभे राहिले होते. त्या वेळी नारायणरावाच्या खुनात सहभाग असणाऱ्या रघुनाथरावास पेशवाईचा धनी म्हणून मानणे बऱ्याच जणांना मान्य नव्हते. म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयास गेले. त्या वेळी जनमत नाना फडणीसांच्या मागे उभे राहिले. महादजी शिंदे यांनी आपले सैन्यबळ नानांच्या मागे उभे केले. मुंबईकर इंग्रजांचा पराभव महादजी शिंदे यांनी वडगाव इथे केला. सालबाईच्या तहानुसार इंग्रजांनी माघार घेतली. रघुनाथरावास नाना सांगेल ते मान्य करून कोपरगावास गोदावरीकाठी (म्हणजे गंगेकाठी) राहावे लागले. इंग्रजांचा पराभव जरी झाला असला तरी त्यांचा संपूर्ण नाश झालेला नव्हता, मुंबई किंवा कलकत्ता मराठयांच्या ताब्यात आलेले नव्हते. उलट इंग्रज दिवसागणिक अजूनच बलवान होत होते. त्यांनी १७९० च्या दशकात निझामाचा दरबार आणि राजकारण ताब्यात घेतले (जे मराठ्यांना ५० वर्षे जमले नव्हते). त्यांनी टिपू सुलतानाचा पराभव करून त्यालाही ठार मारले. ह्या दोन्ही घटना अवघ्या १० वर्षातील आहेत.
रघुनाथरावाचा जेष्ठ पण दत्तक मुलगा अमृतराव. औरस पण लहान पुत्र दुसरा बाजीराव. त्याचा लहान भाऊ चिमाजीअप्पा. बाजीरावाची आई आनंदीबाई यांचे पत्रात 'कारभारी (म्हणजे नाना) मर्द माणूस. बाजीरावाच्या जन्मावेळी धार किल्यात होतो तें किल्ल्यावर तोफा चालवल्या' असा उघड वैराचा आरोप आहे. बाजीरावाच्या अभ्यासाविषयी 'बाजीराव यांचा स्वभाव हूड. फार खेळतात. एकदा मेलेला उंदीर सापडला त्यास काड्या जमा करून अग्नी लावला. पूर्वी गुरुजी होते त्या वेळेस असे नव्हते' अशी तक्रार केलेली दिसते. एकंदरीत नानास 'मूल शहाणे होऊ नये' असे वाटते हा आनंदीबाईंचा ग्रह होता. त्यामुळे तीन बंधूंच्या मनात नाना फडणिसाबद्दल द्वेष नाही तरी किमान अविश्वास नक्कीच भरलेला होता.
नाना आणि सवाई माधवराव
विकिपीडियावरून साभार
नाना फडणीसांनी सवाई माधवरावाच्या सुरक्षेच्या नावास्तव त्याला नेहमी कडेकोट बंदोबस्तात ठेवले. पेशवाईचे सर्व राजकारण नानांनी चालवले. नानांनी या काळात बराच पैसाही जमवला. उदाहरणार्थ कल्याणच्या सुभेदाराच्या दत्तक पुत्रास मान्यता देण्यासाठी पेशव्यास १ लक्ष (खासगी की सरकारी ते कळत नाही) आणि नानास २,००० रुपये मिळालेले अधिकृत कागदात दिसतात. यामुळे नानाच्या प्रतिस्पर्धकांच्या मनात पेशवा आणि त्याला कडक नियंत्रणात ठेऊन मिळणाऱ्या भरपूर कमाईची संधी असा एक पायंडा पडला. प्रसंगी निजाम किंवा इंग्रज यांची मदत नाना फडणीसांनी घेतली (उदाहरणार्थ टिपूविरुद्ध). पेशव्यांशी निष्ठा किंवा राष्ट्राशी निष्ठा हा प्रकार त्या काळात कमी झाला. या ना त्या मार्गाने आपले कमाईचे स्थान अबाधित राखणे हा प्रकार सुरु झाला. गरगरीत वाटोळा रुपया हाच खरा देव अशी त्या काळची परिस्थिती बनली.
सवाई माधवरावाच्या राज्याच्या अखेरच्या काळात महादजी शिंदे सैन्यासह पुण्यास आले. आधी कबूल केलेली सैन्यखर्चाची बाकी वसूल करणे आणि कारभारात महादजी शिंदे याना सहभागी करून घेणे अश्या शिंद्यांच्या रास्त मागण्या होत्या. नानास भीती पडली की शिंदे आपल्याला कैद करतात अथवा सैन्याचा बळावर आपल्या मागण्या मान्य करवून घेतात की काय, पण शिंद्यानी सामोपचाराने आपल्या मागण्या मान्य करवून घेण्याचे प्रयत्न केले. पेशव्यांसही स्वतंत्रपणे वागण्यास महादजीने प्रोत्साहन दिले. नानांनी महादजीबरोबरचे वाटाघाटीचे गुऱ्हाळ चालतच ठेवले. त्याचा लवकर निर्णय लागू दिला नाही. त्यामुळे शिंद्यांची मोठी फौज निष्कारण गुंतून पडली. त्यातच महादजी शिंदे यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या फौजेचा पगार देण्यास पैशाची कमी पडू लागली. त्यातूनच निजामाकडून खंडणीची बाकी वसूल करण्यासाठी खर्ड्याची स्वारी करण्यात आली. बाजीरावासही नानाने तुमची व्यवस्था स्वारीनंतर करून देऊ असे फक्त आश्वासन दिले.
या परिस्थितीत अनेक गुंते पडून असताना नानांचे दुर्दैव म्हणून सवाई माधवरावाचे निधन झाले. या वेळी बाजीरावाबद्दल कुणालाच फार माहिती नसल्यामुळे पेशवे घराण्याचा अस्सल वारस म्हणून सरदार आणि जनतेची सहानुभूती बाजीरावाच्या बाजूने होती. नानांनी बाजीरावास पुण्यास आणून त्याच्याबरोबर जुळते घेऊन राज्यकारभार करणे हा योग्य मार्ग सोडून आपले स्थान अबाधित राखण्यासाठी आपल्या नियंत्रणात राहणारा दत्तक पेशवाईच्या गादीवर बसवण्याची धडपड चालू केली. त्यांना लोकांचा पाठिंबा मिळेना. बाजीरावास कळून चुकले की नाना आपल्यास पेशवा बनू देणार नाहीत. त्याने मग शिंद्यांशी गुप्त करार केला की मला पुण्यास पेशवा बनवा म्हणजे मी तुम्हास दीड कोट रुपये देतो. इकडे नानास कळून चुकले की बाजीरावास आणल्याशिवाय पेशवाईचा गुंता सुटणार नाही. म्हणून शेवटी परशुरामभाऊ पटवर्धन यांनी बाजीरावास पुण्यास आणले. बाजीरावाकडे शिंद्यास देण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसे नव्हते. विल्यम टोन हा यावेळी १७९६ मध्ये बाजीरावापाशी होता. त्याने लिहून ठेवले आहे- 'मध्यंतरीच्या भानगडी चार-पाच महिने चालू असतानाच नानाने सरकारी खजिन्यातील सर्व मत्ता युक्तीने लांबवली होती. निदान २० कोट तरी रोख रक्कम खजिन्यात असावी असा त्या वेळी जाणत्या मंडळींचा तर्क होता'. बाजीरावाने शिंद्यास म्हणावे की मला परशुरामभाऊ यांनी आणले, तुम्ही नव्हे असा प्रकार सुरु झाला. म्हणून शिंदे म्हणू लागले की आम्हास परवानगी द्या, आम्ही नानाकडून पैसे वसूल करतो. महादजी शिंदे यांच्या बायकांनी त्यांचे वारस दौलतराव शिंदे यांच्यावर मारेकरी घातले. या सर्व घोळात कित्येक महिने निघून गेले.
इकडे अहिल्याबाईनंतर होळकरांचे वारस तुकोजी होळकर हे आजारी होते. त्यांच्या मृत्यूनंतर थोरला मुलगा काशीराव हा सैनिकी मोहीम करण्यास शारीरिकदृष्ट्या असमर्थ होता, पण त्याचे तीन भाऊ मल्हारराव, विठोजी आणि यशवंतराव हे शूर होते. तुकोजी होळकरांनी मृत्यूसमयी काशीरावास वारस नेमले. काशीरावास दौलतराव शिंदे यांनी जवळ केले, त्यामुळे त्याच्या बाकी तीन भावाना भीती पडली की दौलतराव शिंदे होळकरांची दौलत काशीरावास गुंडाळून त्याच्याकरवी घशात घालतील. अशातच काशीरावाच्या संमतीने शिंद्यानी मल्हारराव होळकरावर हल्ला करून त्यास ठार मारले. त्यामुळे त्याचे दोन भाऊ शिंद्यांविरुद्ध बंड करून उठले. या आपसातल्या भांडणात नाना अथवा बाजीराव यांनी मध्यस्ती करून वेळीच हा संहार थांबवला नाही. शिंद्यांच्या फौजेच्या ताब्यात बाजीराव असल्याने शिंदे म्हणतील तसा कारभार चालू झाला. विठोजी होळकरास हत्तीच्या पायी देऊन मारण्यात आले.
जनरल वेलस्ली
होळकरांचा आपण सहज पराभव करू हा शिंद्यांचा अंदाज खोटा ठरवत यशवंतराव होळकराने शिंद्यांचा पराभव केला आणि पुणे लुटले. या वेळी बाजीरावास शिंद्यांचा आश्रय राहिला नाही आणि होळकरावर विश्वास ठेवता आला नाही. त्यामुळे त्याने मुंबईकर इंग्रजांची मदत मागवली. त्यानुसार आर्थर वेल्सली याने दक्षिणेत आणि जनरल लेक याने उत्तरेत अशी एकाच वेळी मोहीम सुरु केली.
१८०३ साली भारताच्या इतिहासातले एक निर्णायक वर्ष सुरु झाले.
मराठा तोफखाना (असईच्या लढाईत) - विकिपीडियावरून साभार
बाजीराव जरी इंग्रजांच्या ताब्यात असला तरी त्याचे शिंद्यांशी जवळचे संबंध होते. बाजीरावाने शिंदे आणि नागपूरकर भोसले याना एकत्र येऊन इंग्रजांचा पराभव करण्यास भरपूर प्रोत्साहन दिले. होळकराने सुरुवातीस या युद्धात सामील होण्यास नकार दिला, पण नंतर स्वतंत्र लढाई दिली. या पद्धतीने सर्व मराठा सैन्य एका बाजूस तर इंग्रज, निझाम आणि थोडे मराठा सरदार दुसऱ्या बाजूस असा निर्णायक लढा सुरु झाला. मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य या वेळी इंग्रजांपेक्षा वरचढ होते ते कसे ते खालील यादीत दिसते.
दक्षिणेत इंग्रज फौज (जनरल वेल्सली) एकूण सुमारे ५०,०००
- ८,००० स्टुअर्ट
- ८,००० स्वतः वेल्सली
- ९,००० स्टीव्हन्सन
- ८,००० कॅपिटॉन मरे (सुरत)
- १५,००० सखो रुद्र, निजामाकडून
उत्तरेत इंग्रज फौज (जनरल लेक) एकूण सुमारे २०,०००
- ११,००० कानपुर येथे
- ३,५०० अलाहाबाद
- ५,५०० कटक, ओरिसा
शिंद्यांची फौज उत्तरेत
- १७,००० पायदळ २०,००० स्वार (जनरल पेरॉन)
शिंद्यांची फौज दक्षिणेत
- ५,००० पायदळ
- ८,००० गोपाळराव
- बाबा फडक्यांची हुजुरात
नागपूरकर भोसल्यांची फौज
- १०,००० ते २०,००० पायदळ
- ३०,००० ते ४०,००० स्वार
यशवंतराव होळकर
- ७०,००० स्वार (हा आकडा तपासून पाहण्यास मला वेळ झाला नाही)
असईची लढाई -विकिपीडियावरून साभार
मराठ्यांच्या हालचाली सावध, धीमेपणाने होत होत्या. दौलतरावाने प्रथम भोसले येऊन मिळण्याची वाट पाहिली. नंतर होळकरांबरोबर वाटाघाटी बराच काळ चालल्या. याउलट जनरल वेलस्ली हा त्यावेळी नवीन सेनापती होता. त्याला स्वतःची प्रगती करून घेण्याची ही संधी मिळाली होती. त्यामुळे त्याने मोठ्या तडफेने आक्रमक हालचाली केल्या. पुढं वेलस्लीने नेपोलियनचा वॉटरलू येथे पराभव करून फार कीर्ती मिळवली. नंतर वेल्सलीस आयुष्यातील सर्वात अवघड लढाईचे नाव विचारले असता त्याने असईच्या लढाईचे नाव घेतले. ही लढाई कशी घडली ते थोडक्यात पाहूया (विस्तृत मजकूर विकिपीडियावर आहे - खाली पहा)
जनरल वेलस्ली स्वतः लिहितो की बचावात्मक हालचाली करून ही लढाई दीर्घकाळ लांबवण्यापेक्षा मी ठरवले की सुरुवातीपासूनच आक्रमक हालचाली करायच्या. शिंदे आणि भोसले निजामाच्या राज्यात घुसून लुटालूट करण्याच्या बेतात होते. वेलस्लीने स्टीव्हन्सनला जाफराबाद इथे ठेवले आणि स्वतः नगरच्या किल्ल्यावर त्याने हल्ला केला. तोफांच्या माऱ्याने त्याने लगेच किल्ला घेतला आणि तिथे आपला पुरवठा करणारा बेस स्थापन केला. आपली पिछाडी सुरक्षित केल्यावर वेलस्ली उत्तरेस औरंगाबादच्या दिशेने गेला. दौलतरावाने या हालचाली पाहून आपला बेत बदलला आणि त्याच्या फौजा भोकरदन इथे आहेत अशी वेलस्लीला खबर मिळाली. त्याने स्टीव्हन्सनला भोकरदन इथे येण्याचे हुकूम दिले आणि इंग्रज फौज दोन बाजूनी मराठ्यांच्या शोधात भोकरदनच्या दिशेने गेल्या.
असईची लढाई - विकिपीडियावरून साभार
२३ सप्टेंबर १८०३ या दिवशी वेलस्लीला मराठी फौज भोकरदनऐवजी ६ मैल दूर असई इथे आढळली. दौलतराव आणि स्वार आधीच पुढच्या मुक्कामावर गेले होते. १०० तोफा आणि पायदळ मात्र केळणा नदी आणि जुई नदी यांच्यामध्ये नदीचा उतारावर तोफा डागून बसले होते. हे पायदळ निसटून जाईल या भीतीने वेलस्लीने स्टिव्हन्सनची वाट न पाहताच आपली कमी फौज असली तरी ८,००० लोकांनिशी अचानक हल्ला करण्याचा निश्चय केला. त्याचे वाटाडे सांगत होते की नदीस अजून दुसरा उतार नाही, पण वेलस्लीने दोन खेडी केळणा नदीच्या दोन काठांवर पाहिली आणि ठरवले की त्याच्यामध्ये नदीस उत्तर असलाच पाहिजे. इंग्रज इंजिनिअरने पाहणी करून तो उतार शोधून काढला आणि वेलस्ली मराठ्यांच्या डाव्या बाजूने नदीपार झाला.
मराठयानी वेल्स्लीवर तोफांचा मारा केला आणि त्याचे कित्येक सैनिक तिथे ठार झाले. आपले राखीव घोडेस्वार आणि संगिनी (बायोनेट) यांचा हल्ला करून वेलस्लीने तोफा बंद पाडल्या, आणि उरलेल्या पायदळास पळवून लावले. वेलस्लीची इतकी हानी झाली होती की त्याने मराठ्यांचा पाठलाग केला नाही. तोफांचे आवाज ऐकून स्टीव्हन्सन संध्याकाळी वेल्सलीस जाऊन मिळाला. यानंतर काही महिन्यात वेलस्लीने शिंद्यांचा आणि भोसल्यांचा पाठलाग करून बऱ्हाणपूर येथे पराभव केला.
जनरल लेक
जनरल लेक याने उत्तरेत मोठे राजकारण तडीस नेले. दौलतरावाचा फ्रेंच सेनानी पेरॉन हा दौलतरावावर नाराज होता. त्यास हाताशी धरून मायदेशी सुखरूप पोचवण्याचे आश्वासन इंग्रजांनी दिले. वार्षिक ४० लक्ष रुपये तनखा देऊन पोसलेला एक उत्कृष्ट सेनानी मराठ्यांनी अश्या प्रकारे गमावला. लेक याने घोड्यांनी ओढून नेण्याजोगा हलता मोबाईल तोफखाना आपल्या सैन्यात जोडला. प्रत्येक तुकडीला अश्या काही तोफा वाटून दिल्या. अशी जय्यद तयारी केल्यावर त्याने अलिगढ इथल्या शिंद्यांच्या तळावर हल्ला केला. अलिगडचा किल्लाही त्याने घेतला. पुढे आग्रा आणि दिल्लीवरही त्याने विजय मिळवला. उत्तरेतल्या पराभवाची बातमी ऐकून दक्षिणेत दौलतरावास इंग्रजांबरोबर तह करून माघार घेणे भाग पडले.
इंग्रजांनी अश्या रीतीने एका वर्षात मराठ्यांचा निर्णायक लष्करी पराभव केला आणि हे निश्चित केले की मराठ्यांमध्ये पुन्हा आपल्या पराभव करण्याजोगी लष्करी शक्ती उरता कामा नये. १८०३ या एक वर्षात दिल्ली आणि आग्र्याचा किल्ला, अलिगडचा तळ, महादजी शिंदे यांनी आग्र्यात सुरु केलेले बंदुकीचे आणि तोफांच्या दारूचे कारखाने, दिल्लीच्या बादशाहीवरचे नियंत्रण असे बरेच काही शिंद्यानी गमावले. भोसल्याना ओरिसा हा प्रांत सोडून द्यावा लागला. इंग्रज फौजा दापोडी आणि शिरूर येथे राहू लागल्या. त्यांना पुण्यावर हल्ला सहज शक्य झाला. पुढे बाजीरावाने कितीही प्रयत्न केले तरी त्याला भक्कमपणे पाय रोवून बसलेल्या इंग्रजांना मात देता आली नाही. त्यामुळे १८०३ चा पराभव हा मराठ्यांच्या आणि भारताच्या इतिहासात असा घातक ठरला.
संदर्भ
1) सरदेसाई गो. स. रियासत उत्तर विभाग https://docs.google.com/file/d/0B_hbiN5lXt31bFp6Q0VmVVVZNlU/edit
2) पेशवाईच्या सावलीत - नारायण गोविंद चापेकर https://docs.google.com/file/d/0B0vwUrnl4_0dQlBfZTNaSFZzVGc/edit?usp=sha...
3) Fall of Mughal empire by Jadunath Sarkar https://archive.org/details/in.ernet.dli.2015.231251
4) Battle of Assaye – Wikipedia https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Assaye
5) मंत्रावेगळा, वाळल्या फुलात, चांदराती रंगल्या - ना स इनामदार
6) Baji Rao Ii And The East India Company 1796 1818 By Pratul Chandra Gupta https://archive.org/details/in.ernet.dli.2015.279666
7) The Last Peshwa And The English Commissioners 1818-1851 Pratul Chandra Gupta https://archive.org/details/in.ernet.dli.2015.81221
8) Nana Sahab Peshwa And The Fight For Freedom https://archive.org/details/in.ernet.dli.2015.147235
प्रतिक्रिया
6 Feb 2018 - 7:36 am | प्राची अश्विनी
माहितीपूर्ण लेख.
6 Feb 2018 - 8:18 am | manguu@mail.com
छान
6 Feb 2018 - 8:56 am | प्रचेतस
उत्तम लेख्न. तत्कालीन राजकीय परिस्थितीची तपशीलवार माहिती तुमच्या लिखाणाद्वारे मिळत आहे.
हा स्टुअर्ट म्हणजे वडगावच्या लढाईत मारला गेलेला कॅ. जेम्स स्टुअर्टच का? इष्टुर फाकडा भूताच्या नावे ह्याच्या दंतकथा वडगावात पसरल्या. इष्टुर फाकडाच्या भूताला गावात येऊ न देण्याचे काम ग्रामदैवत पोटोबा करतो अशी आजही पंचक्रोशीतल्या भाविकांच श्रद्धा आहे.
6 Feb 2018 - 11:16 am | मनो
तो वेगळा. त्याची माहिती टाकतो उद्या लॅपटॉप वरून.
7 Feb 2018 - 12:38 am | मनो
इंग्रजीची मराठी नावे केलेली फार भारी आहेत - अँडरसन == इंद्रसेन, थॉमसन == तामसेन, मॅडॉक == मंडूक, रॉस लॅम्बर्ट == रासलंपट.
याच्यावर नवीन भागात लिहितो ...
7 Feb 2018 - 8:30 am | प्रचेतस
=))
ह्याच्यावर लिहाच.
8 Feb 2018 - 8:12 pm | अत्रुप्त आत्मा
@अँडरसन == इंद्रसेन, थॉमसन == तामसेन, मॅडॉक == मंडूक, रॉस लॅम्बर्ट == रासलंपट. ~
6 Feb 2018 - 9:05 am | श्रीगुरुजी
तुमची अभ्यास जबरदस्त आहे. खूप नवीन माहिती मिळत आहे.
खंडाळा घाटात इंग्रजांविरूद्ध वि. मराठे अशी एखादी लढाई झाली होती का?
>>> छत्रपती शिवाजी महाराज अथवा थोरला बाजीराव याचे काही गुण जरी त्याच्या अंगी असते तर त्याला कदाचित ती प्रक्रिया थांबवता आली असती आणि राज्य टिकवता आले असते.
तसे झाले असते तर फार तर पराभव लांबविता आला असता, परंतु भविष्यात पराभव झालाच असता.
6 Feb 2018 - 11:20 am | मनो
बोरघाटातल्या लढाईचे तपशील टाकतो उद्या. मी ते वाक्य पराभव लांबवता आला असता असच टाकलं होतं, पण इतका निराशावाद बरा नव्हे, म्हणून खोडून असं केलं.
6 Feb 2018 - 9:32 am | ज्योति अळवणी
खूप सुंदर माहिती. अभ्यासपूर्ण लेख. पेशवाई काळातील परिस्थिती बद्दल खूप कुतूहल आहे. पण कुठे आणि कशी माहिती मिळवावी माहीत नव्हतं. तुमचा लेख मनापासून वाचते. धन्यवाद
6 Feb 2018 - 11:01 am | मनो
धन्यवाद ज्योतिताई. शक्य झाले तर पेशवाईच्या सावलीत हे पुस्तक इथे जरूर वाचा.
https://docs.google.com/file/d/0B0vwUrnl4_0dQlBfZTNaSFZzVGc/edit
त्यातले निवडक किस्से पुढल्या भागात टाकतो.
6 Feb 2018 - 9:57 am | उत्तरा
खुप अभ्यासपूर्ण आणि छान माहिती.. महादजी शिंदे यांच्याबद्दल, त्याकाळातली परिस्थिती जाणुन घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. या लेखात त्या काळची माहिती मिळण्यास मदत झाली.
6 Feb 2018 - 10:01 am | शलभ
खूप माहितीपुर्ण लेख.
6 Feb 2018 - 11:42 am | बिटाकाका
मनःपूर्वक आभार! हा ओघ कृपया बंद करू नका हि कळकळीची विनंती!
6 Feb 2018 - 11:11 pm | मनो
काळजी करून नका बिटाकाका, लिहायला अनेक विषय आहेत. नौकरी सांभाळून लिहायला वेळ मिळेल तसे लिहीत राहीन.
6 Feb 2018 - 11:48 am | आनन्दा
वाचत आहे, बरिच नवीन माहिती मिळाली
6 Feb 2018 - 11:51 am | आनन्दा
बाकी माझ्या मते, साक्षात शिवाजीराजे जरी आले असते तरी तेव्हा इंग्रजांना ठोपावणे कठीण होते..
इंग्रजांना थोपवण्याची संधी कदाचित सवाई माधवरावाच्या काळात होती असेल.. बाजीरावाच्या काळापर्यंत इंग्रज बरेच बलवान झाले होते.
6 Feb 2018 - 2:35 pm | पगला गजोधर
.
तुमच्यामते इंग्रजांना थोपवण्यात किंवा परतावून लावण्यात काय काठिण्य होते ? सामाजिक ? धार्मिक ? आर्थिक ? कश्यामुळे ???
6 Feb 2018 - 6:59 pm | आनन्दा
राजकीय आणि सामाजिक..
बघू, माझी मते वेगळ्या धाग्यावरच मांडेन..
6 Feb 2018 - 3:28 pm | टवाळ कार्टा
असहमत, इंग्रजांपेक्षा मुघल कैकपटीने जास्त ताकदवान असतानाही शून्यातून स्वराज्य उभे केलेले
6 Feb 2018 - 4:27 pm | मराठी कथालेखक
शिवाजी महाराजांनी ज्या परिस्थितीत (जवळपास)शून्यातून सार्वभौम असे स्वराज्य निर्माण केले ते बघता इंग्रजांना थोपवून मराठा राज्याचे सार्वभौमत्व टिकवू शकले असतेच. राज्य निर्माण करण्यासाठी , टिकवण्या-वाढवण्यासाठी पराक्रमाला मुत्सद्देगिरी आणि राजकारणाची जोड असावी लागते. माझ्या मते शिवाजीराजांचे राजकारणातील कसब हा एक अफलातून वैशिष्ट्यपुर्ण विषय आहे. त्याचे पुर्ण आकलन कुणाला आजवर झाले असेल असे मला वाटत नाही. मी काही इतिहासाचा गाढा अभ्यासक नाही. पण राजांचं राजकारण म्हणजे एक भारावून टाकणारा विषय वाटतो. राजांच्या पराक्रमापेक्षाही मी त्यांच्या राजकारणाचा जबरदस्त फॅन आहे ...
अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत...मूळात इतकी कर्तृत्ववान व्यक्ती पुन्हा पुन्हा जन्मत नाही... आणि जर तरचा विचार करायचा तर मलाजर शिवाजीराजेच आणखी जास्त जगले असते तर.. हा विचार करायला जास्त आवडेल.
6 Feb 2018 - 6:44 pm | आनन्दा
बघतो, वेळ काढून एकदा काथ्याच घेतो कुटायला..
6 Feb 2018 - 10:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
संभाजी महाराजांच्यानंतर मराठेशाहीची सर्वात मोठी समस्या अशी झाली की मराठी राज्य/साम्राज्य सर्वाधिकारी राजा नसलेले (पक्षी राजाच्या नावाने पेशवा बिरुद धारण करणार्या पंतप्रधानाने चालवलेले) राज्य/साम्राज्य झाले. त्यामुळे, राजकिय-सामरिक-दृष्ट्या सबळ नसलेल्या पेशव्याचा (काहींदा तर पेशव्यांपेक्षा) सबळ झालेल्या शिंदे, होळकर, इ सरदारांना दरारा वाटेनासा झाला. किंबहुना पेशवाईच्या उतरत्या काळात पेशव्यांना सरदारांबद्दल भिती/संशय वाटत राहिला. अर्थातच, भारताच्या अर्ध्या-दोनतृतियांश भूभागावर पसरलेले असले तरी वेगवेगळ्या सरदारांच्या अधिपत्याखाली असलेले विभाग हे एकसंध एकछत्री साम्राज्य होण्याऐवजी एकमेकाशी आणि कधी कधी खुद्द पेशव्यांशी स्पर्धा करणार्या सरदारांचे विस्कळीत कडबोळे झाले. प्रत्येक सरदार जसजसा प्रबळ बनत गेला, तसतशी वरून काहीच वचक नसल्याने ही स्पर्धा वाढून परिस्थिती बिघडत गेली. अश्या परिस्थितीचा 'फोडा आणि जिंका' या तत्वात तरबेज असलेल्या चलाख इंग्रजांनी फायदा उठवला नसता तरच आश्चर्य !
जर त्यावेळी या सगळ्या सबळ सरदारांना जरबेने-प्रेमाने एकत्र बांधणार्या शिवछत्रपतींसारख्या राजाचे एकछत्री नेतृत्व लाभले असते तर भारताचा इतिहास फार वेगळा झाला असता.
6 Feb 2018 - 10:34 pm | आनन्दा
ज्या वेळी वतनदारी परत सुरू झाली तेव्हाच मराठेशाहीच्या अस्ताची बीजे रोवली गेली असे माझे मत आहे..
6 Feb 2018 - 11:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
वतनदारी, एखादा मुलुख सरदाराला सांभाळण्यासाठी देणे किंवा मांडलिक राज्ये खालसा न करता अबाधित ठेवणे या किंवा अश्या प्रकारची व्यवस्था मोठ्या भूभागावर पसरलेल्या साम्राज्याला आवश्यक असतेच. मुख्य प्रश्न, "त्या भूभागचे मोठमोठे तुकडे सांभाळण्याची जबाबदारी दिलेल्या सरदार-अंमलदारांना जरबेने-प्रेमाने हुकुमतीत यशस्वीरित्या बांधून ठेवणे केंद्रिय सत्तेला जमते की नाही ?" हा आहे. केंद्रिय सत्तेला ते जमले नाही तर महत्वाकांक्षी सरदार/अंमलदार/मांडलिक यांनी एकमेकाशी साम्राज्याला घातक ठरेल अशी स्पर्धा करणे किंवा अगदी केंद्रिय सत्तेला आव्हान देणे, हा सर्वसाधारण प्रघात, जगभर सर्वच दिसतो... मराठे याला अपवाद कसे ठरतील ? किंबहुना, मोठ्या साम्राज्याची उभारणी आणि व्यवस्था यांत मोठा सहभाग असलेले राजे-रजवाडे-सरदार-अंमलदार हे वैयक्तितरित्या राजकिय-सामरिक-मानसिकतेने जवळजवळ सम्राटाइतकेच सबळ असू शकतात. त्यांना सतत आपल्या पायरीवर ठेऊन आणि आवश्यक तेव्हा त्यांच्यातल्या स्पर्धेचा साम्राज्य बलवान आणि आपल्या हातात ठेवण्यासाठी उपयोग करण्यात जोपर्यंत एखादा शासक/घराणे यशस्वी ठरते तोपर्यंतच केवळ त्या घराण्याची सम्राटमालिका अबाधित राहू शकते. अन्यथा, ते साम्राज्य त्यातीलच एखाद्या वेगळ्या घराण्याच्या शासकाच्या ताब्यात जाते... याशिवाय, इतर मित्र/शत्रू राज्ये/साम्राज्ये त्याचे लचके तोडणे किंवा त्याला संपूर्ण गिळंकृत करणे यासाठी टपून बसलेलेच असतात, हा मानवी इतिहास आहे.
दुसर्या फळीच्या सर्व शासकांना दूरदृष्टी, शक्ती व जरब यांच्या चलाख वापराने एकत्र बांधण्यात अयशस्वी ठरणारा केंद्रिय शासक (सम्राट) सत्तेवर येणे हीच अवस्था बहुतेक सर्व साम्राज्यांच्या अधोगतीला कारण ठरलेली दिसते.
6 Feb 2018 - 10:34 pm | मुक्त विहारि
+ १
30 Mar 2020 - 4:43 am | चौकस२१२
तर्क कळला.. होळकर, शिंदे आणि पेशवे यांचाच उल्लेख दिसतो त्या काळात ...मग हा प्रश्न उभा राहतो कि त्यावेळी सातारा आणि कोल्हा पूर ला वारस होते ना छत्रपतींचे ! त्यांनी का नाही पुढाकार घेतला ? (पण हा प्रश्न विचहऱ्याला तरी मुभा आहे का?) का "आळी मिळी गुप चिळी "वंशजांवर भक्ती ठेवा एवढंच
आणि सध्याच्या काळात जिथे ना राजे राहिले ना पेशवे राहिले तिथे जेवहा छत्रपतींचे वंशज म्हणून भारतीय नागरिक टेम्भा मिरवतात आणि मुख्यमंत्र्याला त्याचं जातीवरून टोचे मारले जातात त्या "पुरोगामी " महाराष्ट्रात हे विचारायचंच नाही ! याचा खेद वाटतो ...
अजब न्याय आहे हा ( हे लेखकास उद्देशून नाही तर एकूण समाजातील वागण्यावर केलेलं विधान आहे )
6 Feb 2018 - 11:50 am | मुक्त विहारि
बर्याचदा, आपला इतिहास एका वाक्याभोवती फिरतो, "कुर्हाडीचा दांडा, गोतास काळ"
6 Feb 2018 - 12:36 pm | जानु
उत्तम माहिती, लिहते रहा हीच सदिच्छा.
6 Feb 2018 - 1:04 pm | बबन ताम्बे
तुमच्या माहितीपुर्ण लेखामुळे त्यावेळची प्रत्यक्ष वस्तुस्थिती उलगडत जाते.
ती लढाईची चित्रे त्यावेळी चित्रकाराने प्रत्यक्ष काढलेली असावीत का? वरच्या असईची लढाई या चित्रात काही मराठी सैनिक फक्त गुढग्यापर्यंत धोतर आणि मुंडासे या वेशात दिसतात. बाकी शरीर मात्र उघडेच आहे. नेटवर एका चित्रकाराने काढलेले पानिपतच्या लढाईतील मराठी सैनिकाचे चित्र पाहण्यात आले. तोही असाच उघडा दाखवलेला आहे. त्यावेळची सामाजिक स्थिती त्यावरुन लक्षात येते. ब्रिटीशांचे सैनिक (नेटीव्ह सुद्धा) मात्र प्रॉपर युनिफॉर्म मधे दिसतात.
7 Feb 2018 - 12:22 am | मनो
मला एक लेख वाचल्याचे आठवते, नक्की नाव अथवा लेखक विसरलो पण त्याचा मुद्दा असा होता की औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या काळात कापड तुलनात्मक खूप महाग होते (म्हणजे एका कपड्यास महिनाभर खाणे होईल इतके पैसे लागत असं काहीतरी प्रमाण होते). त्यामुळे तुम्ही सामान्य शेतकरी अथवा सैनिक असाल तर तुम्हाला एक धोतर परवडेल इतकीच तुमची आर्थिक स्थिती असायची. अगदी ब्रिटिश सैनिकांची हीच स्थिती होती.
ब्रिटिश काळातले हे सैनिक (रिक्रूट) पहा. (विकिपेडियावरून साभार). हे १८१५-१८१६ सालचे चित्र आहे. युरोपियन सैनिक मात्र अंगभर पोशाख घालत, कारण ते साधे सैनिक नसतात, अधिकारी असत.
विरोधाभास हा की भारत हा जगातला सगळ्यात मोठा कापड उत्पादक होता ब्रिटिश काळ सुरु होण्यापर्यन्त. 'silk as thin as woven air " अशी भारतीय रेशीमची ख्याती होती. ब्रिटिश राज्यात हे सगळे कारागीर देशोधडीस लागले आणि भारत इंग्लंडमधून कापड आयात करत होता अगदी १९२०-१९३० सालापर्यंत.
7 Feb 2018 - 4:21 am | मनो
मूळ लेख सापडला, तो इथे आहे.
http://www.sleuthsayers.org/2013/06/the-3500-shirt-history-lesson-in.html
म्हणूनच पेशवाईत वस्त्रे देणें हा प्रकार मानाचा मानला जात असावा कारण वस्त्रे खरोखर महाग होती. मोगलांची खिलत देण्याचा प्रकार हा असाच.
7 Feb 2018 - 12:53 pm | बबन ताम्बे
एकंदर अन्न, वस्त्र, निवारा या मुलभुत गरजांपैकी वस्त्र हा प्रकार भलताच महागडा आणि चैनीचा होता त्यावेळी. पानिपतावर मराठी फौज उत्तरेच्या हाडे गोठविणार्या थंडीत गारठली, त्याचे कारण हेही असावे, नाही का?
7 Feb 2018 - 1:09 pm | manguu@mail.com
म्हणजे औद्योगिक क्रांती आणून युरोपियननानी उपकारच केले म्हणायचे.
6 Feb 2018 - 1:42 pm | गामा पैलवान
मनो,
तुमच्या ज्ञानलालसा आणि वर्णनकौशल्यास अभिवादन. असेच लेख येऊ द्या.
आ.न.,
-गा.पै.
6 Feb 2018 - 2:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या सखोल अभ्यासाचा फायदा आम्हाला तुमच्या लेखांमुळे मिळत आहे, त्या कालखंडाची सहजपणे न मिळणारी माहिती कळत आहे. धन्यवाद!
असेच लिहित रहा आणि आमचे ज्ञानवर्धन करत रहा असा आग्रह करू इच्छितो. पुभाप्र.
6 Feb 2018 - 2:31 pm | सस्नेह
माहितीपूर्ण लेख.
6 Feb 2018 - 2:48 pm | सुखीमाणूस
तुमची लेखनशैली सुन्दर आहे.
खूप माहिती मिळते आहे.
तुम्ही बरेच कष्ट घेत आहात त्याबद्दल धन्यवाद!!!
6 Feb 2018 - 3:01 pm | पद्मावति
उत्तम लेख.
6 Feb 2018 - 3:31 pm | पैसा
खूप छान लिहिता आहात. अनेक तुकड्यात ही माहिती कुठे कुठे वाचली होती, पण त्याचा एकसंध परिणाम कसा झाला हे तुमच्या सुसूत्र लिखाणामुळे कळते आहे. सवाई माधवराव किंवा बाजीराव (दुसरा) यांच्या कारकीर्दीबद्दल असे तपशीलवार लिहिणे आपल्याकडे टाळले जाते. कारणे बरीच आहेत. एका काळात संभाजीराजांबद्दल बरेच गैरसमज पसरवले गेले होते, त्यांचे बरेच निराकरण नंतर झाले. तसेच दुसर्या बाजीरावाचे संतुलित यथायोग्य मूल्यमापन अजून व्हायचे बाकी आहे असे वाटते.
6 Feb 2018 - 6:51 pm | गामा पैलवान
आनन्दा,
मला वाटतं की जशी पेशव्यांनी नौदलाची हेळसांड केली तशी शिवाजीमहाराजांनी केली नसती. त्यामुळे इंग्रज वरचढ होऊच शकले नसते.
आ.न.,
-गा.पै.
6 Feb 2018 - 7:25 pm | अरविंद कोल्हटकर
लेखासाठी केलेली तयारी आणि जमविलेली माहिती जाणवत आहे. असेच उत्तमोत्तम लेखन येऊ दे.
मी असे मत वाचले होते - बहुधा शेजवलकरांच्या लेखनात - की मराठेशाहीच्या पराभवाची आणि इंग्रजांच्या विजयाची मुळे बंगालमधील नागपूरकर भोसले आणि पेशवे ह्यांच्या चुरशीमध्ये पोहोचली आहेत. नागपूरकरांनी पूर्वेचा भाग आपला राखीव अशी स्वत:ची समजूत करून घेतली होती. इकडे बादशहाला बंगालकडून काहीच पैसा येत नसल्याने त्याने पेशव्यांना गळ घालून त्यांनी हे काम करून द्यावे असा मनसुबा रचला. त्याप्रमाणे पेशवा बाळाजी बाजीराव पूर्वेकडे सरकला आणि मराठेशाहीच्या ह्या दोन महत्त्वाच्या आधारस्तंभांमध्ये १९ ऑक्टोबर १७४२ ह्या दिवशी समोरासमोर लढाई होऊन नागपूरकरांचा पराभव झाला. ह्याच दुफळीचा लाभ इंग्रजांनी नंतर उठविला आणि प्लासीच्या लढाईत पूर्ण बंगाल घशात घातला.
(इंग्रजांना बंगालसारखा सुपीक प्रदेश पूर्णत: आपल्या सत्तेखाली आणता आला. त्यांना मोठी बाजारपेठ आणि खेळत्या भांडवलाच एक स्रोत मिळाला. इंग्लंडमध्ये ह्याच वेळी सुरू झालेल्या औद्योगिक क्रान्तीला ह्या दोन्ही बाबी अतिशय लाभदायी आणि opportune ठरल्या आणि १९व्या शतकाच्या अखेरीपर्यंत जागतिक राजकारणात ब्रिटनला जे प्रथम स्थान मिळाले होते त्याची पायाभरणी बंगालमध्येच झाली असेहि मत शेजवलकरांनी मांडले आहे. थोडक्यात म्हणजे मराठ्यांच्या अन्तर्गत चुरशीला इतकी अनपेक्षित फळे आली.)
6 Feb 2018 - 7:31 pm | पगला गजोधर
.
म्हणजेच एकाच धर्माची , भाषेची , संस्कृतीची लोकांच्यात सुद्धा युद्धे होतात..
याचाच अर्थ, द्विराष्ट्रवाद (फक्त हिंदूंसाठी वेगळा देश फक्त मुस्लिमांसाठी वेगळा) हा विचार फ्लॉप आहे ..
6 Feb 2018 - 7:51 pm | आनन्दा
हरदासाची कथा मूळपदावर.
6 Feb 2018 - 8:01 pm | पगला गजोधर
कथा नै ओ, गीता गीता ....
- - - पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.
6 Feb 2018 - 8:09 pm | मुक्त विहारि
द्विराष्ट्रवाद (फक्त हिंदूंसाठी वेगळा देश फक्त मुस्लिमांसाठी वेगळा) हा विचार फ्लॉप आहे.....
आयला, कधी न्हवे ते पगच्या विचाराशी सहमत व्हायला लागत आहे.
कारण,
पाकिस्तानचे उदाहरण डोळ्यासमोर आहेच, शिवाय जोडीला दक्षिण व उत्तर कोरिया हे पण आहेतच.शिवाय इसिस पण आहेच की
असो,
7 Feb 2018 - 7:08 am | सुखीमाणूस
समान नागरी कायदा हवा जर सगळ्या धर्माना देशात शांतपणे राहू द्यायचे असेल तर...
7 Feb 2018 - 10:57 am | पगला गजोधर
कुण्या एकाच धर्माचा हा देश नव्हे, दुसऱ्या धर्माचे नागरिक या देशात भाडेकरू नव्हेत, त्यांचाही देशावर सर्वासारखा हक्क आहे, त्यामुळे उठसुठ त्यांना पाकिस्तानात जा, म्हणणारे, द्विराष्ट्रवादाचे छुपे समर्थक होय,
फक्त हिंदु या देशाचे प्रथम नागरिक, व इतर धार्मिक दुय्यम नागरिक, असे विचारधन असलेले सुद्धा द्विराष्ट्रवादाचे समर्थक होय,
समान नागरी कायदा, म्हणजे मॅजोरीटी हिंदू धर्म संस्कृती संकल्पना कवटाळलेले व इतर धर्मीयांवर ते लादले जाणारे नियम कायदे नव्हेत...
7 Feb 2018 - 3:16 pm | सुखीमाणूस
मुसलमानांनी एकपत्नित्व पाळू नये असे म्हणता होय...
7 Feb 2018 - 5:02 pm | श्रीगुरुजी
>>> समान नागरी कायदा, म्हणजे मॅजोरीटी हिंदू धर्म संस्कृती संकल्पना कवटाळलेले व इतर धर्मीयांवर ते लादले जाणारे नियम कायदे नव्हेत...
मग काय कुराणात छापलेलं कितीही अन्यायकारक असलं तरी ते तसंच सुरू ठेवायचं?
7 Feb 2018 - 6:14 pm | पगला गजोधर
कुठलाच धर्मग्रंथ चालणार नाही....
7 Feb 2018 - 6:24 pm | श्रीगुरुजी
मग समान नागरी कायदा हा धर्मातीत आहे का हिंदू धर्मग्रंथावर आधारीत आहे?
6 Feb 2018 - 10:16 pm | माहितगार
द्विराष्ट्रवाद या शब्दाचा अर्थच मूळी एका राष्ट्राचे आपापसात द्वंद्व असलेले अधिक भाग असा होतो , नाहीतर द्विराष्ट्रवाद या शब्दास प्रयोजनच शिल्लक राहीले नसते.
कोणतेही आपापसातले द्वंद्व परकीयांना साहाय्यकारी होते. काश्मिर बद्दल उगाच काव काव करायची आणि काहीच मानवी आधिकार न देणार्या चीन पुढे नत मस्तक व्हायचे , आमेरीकेपुढे नत मस्तक व्हायचे आणि आपल्याच राष्ट्राचा मोठा भाऊ असलेल्या भारतालाही महासत्तांशी तडजोड करावयास लावायचे यातून पाकीस्तान ने काय साधले.
भविष्यातील काळाची रेष ज्यांनी वेळीच संपूर्ण यादवी केली नाही ते, ते ज्यांनी अर्धवट तडजोडी केल्या त्या सगळ्याच बाजूंपुढे प्रश्न चिन्ह उपस्थित करेल
7 Feb 2018 - 7:04 pm | manguu@mail.com
द्विराष्ट्राच्या नावाने फक्त काँग्रेसलाच का जबाबदार धरतात ?
१९४० ला मुस्लिम लीगने मांडलेल्या द्विराष्ट्राला आधी काँग्रेसनेच नकार दिला होता. नंतर हिंदू महासभा ( साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर ) आणि काँग्रेस या दोघानीही त्याला मान्यता दिली होती , हे का नाही सांगितले जात ?
30 Mar 2020 - 4:52 am | चौकस२१२
हे जरी खरे असले आणि आज सुद्धा दोन मुसलमान सुद्धा एकमेकांशी भांडताना दिसत असले तरी द्विराष्ट्रवाद हा मुसलमानांच्या दृवष्टने "जिथे इस्लामी जनता तिथे इस्लामी कायदा " या तत्त्वप्रणाली नुसार होत आणि आहे ... दोन हिंदू एकमेकात भांडले म्हणू हे सिद्ध होत नाही कि "वैश्विक इस्लाम " हि कल्पना मुसलमानांच्या डोक्यातून गेली आहे किंवा जाईल ..
एक साधी गोष्ट आहे " ज्या धर्माच्या अनुयायांना "धर्म आधी आणि देश वैगरे नंतर" हे पक्कं पटलेले आहे ते, आणि ज्या धर्माचं लोकांना "आधी देश आणि मग धर्म हे "चालेल " अश्या दोन धर्माचे अनुयायी एक ठिकाणी असले कि हे द्वंद्वा होणारच.. हे नाकारून स्वतःची फसवणूक करून घेण्यात आपण हिंदू अग्रगणी ...!
6 Feb 2018 - 9:05 pm | आनंदयात्री
या जबरदस्त माहितीपूर्ण लेखाबद्दल अनेक धन्यवाद. या लेखातून झालेले आकलन असे कि, त्या काळी दुसऱ्या बाजीरावासमोर मराठेशाहीच्या चार आधारभूत स्तंभांना एकत्र ठेवण्याचे आव्हान होते, मुळातच नेतृत्वगुण नसल्याने किंवा जडणघडणीच्या वयात तो कमावण्याचा वाव न मिळाल्याने ते आव्हान त्यांना पेलता आले नाही आणि हि वाताहत झाली.
6 Feb 2018 - 9:18 pm | नीलकांत
तुम्ही इतिहासाच्या अतिशय कमी चर्चील्या जाणार्या कालखंडावर उत्तम माहिती देत आहात. तुमचे लेखन खुपच स्पष्ट व सुलभ आहे. ही लेखमाला अशीच चालू द्या. भारतभर पसरलेली मराठेशाही कशी अस्ताला गेली हे सुध्दा आपल्याला अगदी स्पष्ट ठाऊक असलंच पाहिजे.
उत्तम लेखमालेबद्दल धन्यवाद.
6 Feb 2018 - 9:28 pm | माहितगार
+१ आणि मुख्य म्हणजे अभ्यासपूर्ण , वेगळी पण रोचक आणि उल्लेखनीय मांडणी सोबतच शक्य तेवढ्या तटस्थतेने .
6 Feb 2018 - 9:34 pm | निशाचर
माहितीपूर्ण लेख
6 Feb 2018 - 9:38 pm | माहितगार
दक्षिण आशियाचे वंश परंपरा प्रेम अद्यापही जोरात आहे. जनता वंश परंपरेवर प्रेम करते म्हणल्यावर ओघानेच वंशीयांना आणि त्यांच्या भोवतालच्यांना आपापसात खेळता येते.
6 Feb 2018 - 10:03 pm | माहितगार
छ.शिवाजी आणि पेशवे यांनी वापरलेल्या लूटीत एक महत्वाचा फरक रयत या घटकाकडे बघण्याच्या दृष्टीकोणात पडलेला फरक ही असावा. आधी रयतेच हित केंद्र स्थानी होते त्याची जागा सरंजाम शहा आणि त्यांनी उद्युक्त केलेल्या लुटारुं टोळ्यांनी घेतली. जेव्हा अधिक पैशाचे अमिष नसते तेव्हा केवळ प्रेम कामाशी येते आणि तो प्रेमाचा आधिकार मराठी राजवटीने कुठेतरी गमावला गेला होता का अशी शंका वाटते . नागपूरकर भोसल्यांनी बंगालात केलेल्या लूटींच्या बंगाली जनतेच्या सर्वच आठवणी कदाचित स्पृहणीय नसाव्यात हे पेशव्यांनीही केले पण मराठी इतिहासकार ही बाजू मांडताना सर्वसाधारण पणे कचरतात का अशी शंका वाटते. चुभूदेघे. संदर्भ बार्गी
6 Feb 2018 - 10:32 pm | आनन्दा
सहमत आहे.. हे साधारण दुसऱ्या पानिपतच्या वेळेस सुरू झालं बहुतेक, दिल्लीचे तख्त देखील फोडायची गरज खरे तर नव्हती असे ऐकून आहे..
6 Feb 2018 - 10:07 pm | वीणा३
अशा लेखांसाठीच इथे रोज चक्कर मारते. काही ना काही सुंदर हाती लागतंच. अतिशय धन्यवाद !!!
7 Feb 2018 - 1:16 am | अमितदादा
संदर्भासहित लिहलेला उत्तम लेख... असे आणखी लेख येऊद्यात.
7 Feb 2018 - 2:31 am | चावटमेला
छान लेख. पुभाप्र
7 Feb 2018 - 2:50 am | तिमा
अशा लेखांनी रोज मिपावर यावेसे वाटते. लिहित रहा. दुसर्या बाजीरावाबद्दल एवढी तपशीलवार माहिती नव्हती.
7 Feb 2018 - 9:23 am | सिरुसेरि
सखोल माहिती . उत्तर पेशवाईत फंदफितुरीचे प्रमाण वाढले होते . शनीवार वाड्यातल्या बातम्या , संगमावरच्या अल्पिष्टन साहेबाला रोज हेरांमार्फत कळत असत .
30 Mar 2020 - 4:55 am | चौकस२१२
यावरून भन्साळींच्या चित्रपटासाठी केलेले पण चित्रपटात नसलेले "फितुरी" या गाण्याच्या शब्दाचे बोल आठवले ....खरंच भन्साळीची कल्पकता आवडली
7 Feb 2018 - 2:58 pm | श्रीगुरुजी
बाळाजी नातूने अलुपिष्टन साहेबाशी सूत जमवून पेशव्यांशी फितुरी केली होती यावर पण लिहा.
7 Feb 2018 - 7:12 pm | गामा पैलवान
बबन ताम्बे,
उबदार कपड्यांचा पुरवठा कमी पडला असू शकेल. मात्र भारतात कपड्यांचं बऱ्यापैकी वैपुल्य असावं. अन्यथा घरातल्या बायका मध्ययुगीन युरोपप्रमाणे सूत कातण्याच्या कामाला जुंपल्या गेल्या http://www.sleuthsayers.org/2013/06/the-3500-shirt-history-lesson-in.html असत्या.
आ.न.,
-गा.पै.
8 Feb 2018 - 7:28 am | बबन ताम्बे
गा. पै.
कपड्यांचे वैपुल्य असू शकेल. पण त्या वेळच्या सामान्य माणसांना अंगभर कपडे मिळणे दुरापास्त होते असे चित्रांवरून दिसते. इनफँक्ट जुने फोटो जरी बघितले तरी त्यात सामान्य जनता अशीच उघडी आणि पोट खपाटीला गेलेली दिसते.
8 Feb 2018 - 3:39 pm | पैसा
मावळे, पठाण मोगल इ सैनिक अंगरखे व मांडचोळणा घातलेले दिसतात. महाराष्ट्रातील घोडे बाळगणारे सैनिक अंगभर कपडे घालून दिसतात. वरचे चित्र उत्तर भारतीय आणि गरीब तसेच कमी सामाजिक दर्जा असलेल्या लोकांचे असावे.
१९ व्या शतकाची सुरुवात होण्यापूर्वीच अनेक आक्रमकांनी लूट करून भारतातील सुबत्ता कमी व्हायची सुरुवात झालेली होती. बंगाल मधील विणकरांचे हाल बंगाल इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर सुरू झाले.
9 Feb 2018 - 2:19 pm | बबन ताम्बे
जुन्या (ब्रिटीशकालीन) फोटोंमधे हडकुळी जनता दिसते.
7 Feb 2018 - 7:16 pm | गामा पैलवान
पगला गजोधर,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला .
१.
पाकिस्तानातल्या लोकांनी वेगळा पाकिस्तान मागितला नव्हता. तरीही पाकिस्तान कसा काय उत्पन्न झाला? कारण की कोणीतरी तिथल्या मुस्लिमांवर पाकिस्तानी हे लेबल लावलं. असंच धर्मांध लेबल तुम्ही हिंदू लोकांवर चिकटवीत आहात.
म्हणूनंच ज्यांना पाकिस्तानात जावंसं वाटतं त्यांना पाकिस्तानात जाऊ देणं याला मी उदारमतवाद मानतो.
२.
द्विराष्टवादाची सुरुवात ज्या सईद अहमद खानांनी केली त्यांनी ती धोंड सांभाळावी. तोपर्यंत हिंदूंच्या संरक्षणासाठी हिंदू या देशाचे प्रथम नागरिक मानले पाहिजेत. कारण की हिंदू या देशाला आई मानतात.
३.
समान नागरी कायदा म्हणजे काय ते न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तुमच्या उपरोक्त मताची दखल घ्यायची गरज नाही.
आ.न.,
-गा.पै.
8 Feb 2018 - 6:51 am | कलंत्री
या विषयाला अनूसरुन एखादा कट्टा व्हायलाच हवा.
8 Feb 2018 - 6:56 am | रुपी
अभ्यासपूर्ण आणि उत्तम लेख! इतका सखोल अभ्यास करुन निवडक पण महत्त्वाची माहिती देण्याचे तुमचे प्रयत्न स्तुत्य आहेत.
8 Feb 2018 - 12:26 pm | उपेक्षित
अतिशय सुंदर चालू आहे मालिका, नवीन नवीन माहिती कळत आहे आम्हाला.
8 Feb 2018 - 5:34 pm | एमी
लेख आवडला.
8 Feb 2018 - 5:50 pm | पाटीलभाऊ
उत्तम लेख
8 Feb 2018 - 5:53 pm | हतोळकरांचा प्रसाद
खूप सुंदर!! खूप आवडला लेख!
9 Feb 2018 - 1:47 am | मनो
एक गोष्ट इथे मुद्दाम नमूद करायला हवी.
महाराष्ट्र एका बाबतीत फार भाग्यवान आहे. आपल्याकडे इतिहासाचे संशोधन जवळपास दीड शतकापासून चालू आहे. एकापेक्षा एक विद्वान आणि तेजस्वी असे संशोधक मराठ्यांच्या इतिहासावर काम करून गेले आहेत. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, द. ब. पारसनीस, जदुनाथ सरकार, शेजवलकर, सुरेंद्रनाथ सेन, सेतुमाधवराव पगडी, द. वा. पोतदार, अप्पासाहेब पवार, श. ना जोशी, ग. ह. खरे अशी कित्येक नावे आपल्याला सापडतील. कित्येकांनी अत्यंत खडतर परिस्थितीत गावोगाव भटकून कागद जमा केले. स्वतःच्या पैशानी प्रकाशन, छपाई करून पुस्तकात छापले. जदुनाथ सरकार हे फारसीचे विद्वान पण त्यांना मराठी येत नव्हते. प्रौढ वयात ते इतिहास संशोधनासाठी मराठी शिकले. ग. ह. खरर्यांच्या स्वतःच्या शब्दातच सांगायचे तर - 'आनंदाश्रमात जाऊन अंघोळ करायची आणि एका मित्राकडे घेऊन ठेवलेले दीड पावशेर दूध व बाजारातून आणलेला दोन पैशांचा पाव याचा फराळ करावयाचा आणि पुन्हा अभ्यास अथवा द्रव्योत्पादक काम यास लागवयाचे. रात्री थंडा फराळ करून आनंदाश्रम किंवा मंडळात झोपायचे असे सहा महिने मी काढले.' (पूर्ण मजकूर इथे वाचता येईल)
ही परंपरा आजही चालू आहे. श्री. गजानन मेहेंदळे हे आमच्या सर्वांचे गुरुजी. आजही ७० वर्षांच्या वयात शिवचरित्राविषयी काही वाचले नाही असा त्यांचा दिवस जात नाही. मला फारसी इंटरनेटवर शिकण्यास अनेक अडचणी आल्या, त्या सर्व वेळी योग्य मार्ग दाखवण्याचे काम आपल्या संशोधन आणि लेखनातून वेळ काढून त्यांनी आवर्जून केले. मोडीचे तज्ञ् आणि वर्ग घेऊन कित्येक लोकांना शिकवणारे मंदार लवाटे सर आणि कोणत्याही किल्ल्याबद्दल तपशीलवार माहिती असणारे श्री. सचिन जोशी हे भारत इतिहास संशोधक मंडळाचे आधारस्तंभ आहेत. पेशवे दफ्तराबद्दल काहीही ज्यांना विचारता येते ते बलकवडे सर आणि शिलालेख इतर काही याबद्दल ज्यांना हक्काने विचारता येते ते महेश तेंडूलकर. मिसळ्पाववरचे 'बॅटमॅन' यांनी डच साधनावर भरपूर अभ्यास केला आहे आणि नवीन नोंदी उजेडात आणल्या आहेत. श्री मानसिंग कुमठेकर यांनी आजही जुनी दप्तरे धुंडाळून कागद शोधून काढले आहेत. त्यांचा एक फोटो इथे देतो म्हणजे त्या कामाचा अंदाज येईल. (मूळ लेख जरूर वाचा इथे)
या संशोधकांच्या अविरत धडपडीमुळे आपल्याला आज मूळ पत्रे आणि पुस्तके सहज मिळतात. त्यामुळे इतिहास संशोधनाचे श्रेय हे या संशोधकांना जाते. त्यांनी केलेल्या कामामुळे आज आपण हा इतिहास इतक्या सहज मांडू शकतो हे नमूद करणे म्हणून आवश्यक वाटले.
9 Feb 2018 - 9:37 am | manguu@mail.com
छान
9 Feb 2018 - 9:46 am | प्रचेतस
श्री. मानसिंग कुमठेकर ह्यांचा संग्रह त्यांच्या घरीच ब्याट्याबरोबर पाहिला आहे. अजोड काम आहे ते.
श्री. कुमठेकरांची मुलाखत बॅटमनने मिसळपावसाठी घेतली होती.
9 Feb 2018 - 12:00 pm | बिटाकाका
तुमचे आणि तुम्ही उल्लेखिलेल्या सर्वांचे या अद्वितीय कामासाठी मन:पूर्वक आभार!!
9 Feb 2018 - 1:35 pm | गामा पैलवान
मनो,
इतिहासातून काहीतरी शिकायचं असतं. लोकांना शहाणं करायची तुमची सर्वांची तळमळ अभिमानास्पद व कौतुकपात्र आहे. रामदासस्वामींनी म्हंटल्याप्रमाणे 'शहाणे करोनी सोडावे, सकळ जन' याची प्रचीती तुम्हां सर्वांच्या कार्यातनं येतेय.
त्याबद्दल धन्यवाद आणि कृतज्ञता ! :-)
आ.न.,
-गा.पै.
16 Feb 2018 - 3:53 pm | पुंबा
मनोंनी उल्लेख केलेल्या इतिहास संशोधकांचा अतीव आदर वाटतो. आपल्या समुहाची वाटचाल कशी झाली आहे याचा अभिनिवेशहीन धांडोळा घेण्याची आवश्यकता नेहमीच असते. पुर्वजांना आलेल्या अडचणी त्यांनी कश्या सोडवल्या, नक्की कोनत्या अंतःप्रेरणेने उत्कर्ष झाला, कोणत्या चुकांमुळे पतन झाले अश्या विभिन्न प्रश्नांचा मागोवा घेताना वर उल्लेखलेल्या महान वाटाड्यांचा आधार जनसमुहाला मोलाचा ठरतो हे निश्चित. पण.. आपण इतिहासातून खरेच काही शिकतो का? निदान आपल्याकडे इतिहास या विषयाखाली केवळ व्यक्तिपुजा, राजेरजवाड्यांच्या जंत्र्या नाही तर जातीय धार्मिक झुंडींचे लांगूलचालन एवढेच होताना दिसत नाही का? हजारो वर्षांच्या आपल्या इतिहासात कित्येक उत्कृष्ट कल्पना आपल्या पुर्वजांना सुचल्या व त्यांनी त्या अंमलात आणल्या. त्या कल्पनांपासून किती तरी शिकता येण्यासारखे आहे. पण तसे न होता इतिहासाचा दुरूपयोग आता भांडणांत ब्राऊनी पॉईंट्स मिळवण्यासाठी आणि जाती नाही तर धर्मांच्या झुंडी हाकण्यासाठीच केला जातो आहे ना आजकाल?
माझ्या मते, इतिहास हा विषय महत्वाचा आहे तो त्यातून मिळू शकणार्या मूल्यांसाठी, आजच्या समस्यांना झुंजताना इतिहासातील कल्पनांपासून प्रेरणा घेण्यासाठी. आजकाल इतिहासाच्या नावाखाली आपण जे दिवे लावतो आहोत त्यावरून तरी या विषयाचा वीटच अधिक येतो आहे.
12 Feb 2018 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संदर्भाने केलेले लेखन आवडतेच आपले माहितीपूर्ण लेखन आवडले.
लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
29 Mar 2020 - 8:56 pm | योगविवेक
किती कष्टाचे काम आहे इतिहासाच्या महासागरात उतरून नीरक्षीर विवेक करायचे....
आता ओक काका लिहायला घेतात म्हणतात....
30 Mar 2020 - 7:56 am | मनो
सध्या पानिपतच्या लढाईसंबंधी इंग्रजी पुस्तक पूर्ण केले आहे. त्यात या विषयाशी संबंधित साधारण ८० जुनी चित्रे आहेत. त्या चित्रांच्या परवानग्या घेणे चालू आहे. त्यातली अनेक प्रथमच प्रसिद्ध होत आहेत. गोविंदपंत बुंदेले यांच्या वाड्यातील चित्रे, पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतात आजही शिल्लक उरलेला अब्दालीच्या सैन्यातील जम्बुरक, मराठ्यांची छावणी कुठे असावी ते दाखवणारे नकाशे आणि युद्धाची जागा दाखवलेले नकाशे, फ्रेंच भाषेतील साधने, साधारण २५ फारसी पोथ्या अशी किती नावे सांगू. जूनपर्यंत पुस्तक प्रकाशित होईल अशी अपेक्षा होती, पण व्हायरसच्या मनात येईल त्याप्रमाणे होईल असं दिसतंय :)
पुस्तकाचे मुखपृष्ठ, मी बनवलेले - पाहूया प्रकाशक हेच वापरतो की नवीन.
या लेखानंतर बहुतेक मी शनिवारवाडा आणि सिंहगडच्याबद्दल लिहिलं आहे.
शनिवारवाडा
http://www.misalpav.com/node/43325
सिंहगड (भाग १)
http://www.misalpav.com/node/43804
सिंहगड (भाग २)
http://www.misalpav.com/node/43853
रायगडचे रजपूत किल्लेदार (१६८९ ते १७०७)
http://www.misalpav.com/node/45073
ओककाका लिहितील तर आनंदच आहे, त्यांनी फक्त थोडी मांडणी वेगळी करायला हवी होती असं वाटतं.
त्या काळातले संशोधक वेगळे होते, त्यांनी प्रत्यक्ष कष्ट इतके घेतलेले आहेत की आजकाल आपण फार सुखात काम करतो असं म्हणावे लागते. अगदी २० वर्षांपूर्वीपर्यंत जी साधने दुरापास्त होती, ती आज आपल्याला online मिळतात (ब्रिटिश लायब्ररी, MET न्यूयॉर्क, BnF पॅरिस अशी कितीतरी अस्सल पहिल्या दर्जाची सामग्री इंटरनेटवर आहे). तरीही आजपण जुन्या संशोधकांच्या तोडीचं काम क्वचितच पाहायला मिळतं.
31 Mar 2020 - 6:54 am | तुषार काळभोर
मुखपृष्ठ अतिशय उत्कृष्ट आहे.
ती ढाल प्रचंड सुंदर आहे. तलवार आणि म्यान मराठी उत्तर भारतीय पद्धतीची (मुघल/इंदूर/ग्वाल्हेर) आहे का?