तसे या विषयावर लिहिणारच नव्हतोत, परंतु मि पा वर चर्चा भीमा कोरेगाव वर लेख वाचले, मांदियाळीत चर्चा बहुत होते जाणवले, ततपश्चात "लिहून पाहू" ने झपाटले, आणि शेवटी टंकले...!
तसे ऐतिहासिक संदर्भ पाहता आमच्या भूतकाळात आम्ही सदर ईसमाचे चित्रपट पाहिलेले नाहीत. (किंबहुना थेटरात जाऊन पाहिलेले नाहीत म्हणणे जास्त उचित). बाजीराव मस्तानी वा रामलीला चा एकही प्रसंग आमुच्या डोळ्यांसमोरून गेल्याचे आम्हास स्मरत नाही. हे त्यांचे बहुचर्चित चित्रपट. (तेव्हा त्यांच्या इतर चित्रपटांची काय 'कथा वर्णावी').
पद्मावतीच्या मुहूर्तासच माश्या शिंकलेल्या, या संजयास तेव्हाच दिव्य दृष्टीने भविष्य समजावयास हवे होते, परंतु हा संजय 'तो' नव्हे - अन्यथा त्यास चित्रपटाचे पेटते पडदे दृष्टीस पडते ना! या सद्गृहस्थावरील जीवघेणा हल्ला, कलाकारांच्या जीवाची बोली, करोडोंच्या बाता, अन समाजमाध्यमांवरील लाथा. असा हा एकूणच रोमांचित करणारा ( विनाकारण ) प्रसिद्ध पावलेला हा या चित्रकृतीचा प्रवास मन थक्क करणारा आणि मती गुंग करणारा.
अजून चित्रपट तयार नव्हता, त्याची कथा माहित नव्हती, कोण्या माणसाने चित्रीकरण स्थळावर जाऊन पाठपुरावा करून ठोस पुरावा मिळविलेला नाही की चित्रपटात खरोखर पद्मावती राणीच्या चारित्र्याचे हनन झालेले आहे, तरीही चित्रकृतीस विरोध होत आहे. बरे केवळ शाब्दिक विरोध नव्हे तर हिंसात्मक भाषा आणि त्यास कृतीची जोड हे पाहता आम्हास येणाऱ्या भूतकाळाचीच चिंता वाटते आहे.
आम्हाला आमुच्या भारतीय संस्कृतीचा कोण अभिमान हे पटवून द्यायची हि स्पर्धा इतकी जीवघेणी कि ओठांतून उपरोधिक "वा.....!" नैसर्गिकपणे निघावा. पद्मावतीस सुरु असलेला विरोध म्हणजे अंधारात साप आहे असे समजून त्यास मारण्यासाठी काठ्या जमिनीवर आपटणे आणि एकमेकांची उरःफोड व शिर:फोड अशीच आहे. यातून पुढे अस्तित्वात असलेला साप तर मरणार नाहीच परंतु 'हाती काय?' या प्रश्नास (स्वतःच्याच) रक्ताने माखलेल्या काठ्या आणि डोकी हेच उत्तर असेन याबद्दल आमच्या मनात बिलकुल दुही नाही.
भारतात अजून लोकशाही आहे असा आमचा तरी समज आहे. यात व्यक्तीस्वातंत्र्य सर्वात महत्वाचे. व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी हि सर्वोच्च न्यायालयाची आणि हे हक्क त्यांस घटनेने दिलेले. सर्वोच्च न्यायालय हे वरपांगी विचार करून सुलतानशाहित चालणारे निर्णय देणारे ठिकाण नव्हे. समाजातील सर्व घटकांचा सांगोपांग विचार करून भविष्यकालीन परिणामांचा घटक लक्षात घेऊनच निर्णय देणारे आहे. सर्वोच्च न्यायालयाने तर या चित्रपटास कधीचाच हिरवा कंदील दर्शविला आहे. चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डाने देखील वर"करणी" परिणाम नसल्याचे दर्शवत कट्स सुचवून चित्रपट प्रदर्शनास सज्ज असल्याचे सांगितले आहे. तरीही या चित्रपटास होणारा विरोध हा आत्यंतिक क्लेशाचा आणि लोकशाहीस मारक असल्याचे प्रतीकच आहे. भारतात प्रत्येकास विचार प्रकट करण्याचे स्वातंत्र्य आहे. चित्रपट हा देखील विविधांगी विचारांचाच परिपाक असतो. हि एक कलाच आहे, आणि कलेस विरोध करणे ही मागास विचारांची लक्षणे. कलेची जपणूक हि कलाकारांची जबाबदारी नव्हे. कलेचा विकास हि त्यांची जबाबदारी परंतु जपणूक हा भाग समाजाचा. व्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क हा जितका निकोप भावनेने स्वीकारला जातो तितका समाज हा प्रगतिशील आणि एकोप्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतो.
सध्या या चित्रपटास होणारा विरोध हा आपल्या समाजाच्या मानसिक वाटचालीचे प्रतिनिधित्व करतो आहे. जगाची भाविष्याकडून भविष्याकडे जाण्याची ओढ आहे पण आपल्याकडे मात्र भाविष्यातून भूतकाळात जाण्याची आत्मीयता दिसते. आमच्या भूतकाळात संस्कृतीत सगळ्याच गोष्टी चांगल्या असे छाती पिटुन सांगावयाचे आणि त्याचा डोळे झाकून अंगीकार करावयाचा हे मूर्खांच्या मांदियाळीत आल्याचेच सूचक उदाहरण आहे.
चित्रपटास काही ठराविक राज्यांत विरोध होतोच आहे आणि हि आपली दुभंगलेली मने दर्शवित आहे. ज्या ठिकाणी शतकानुशतके चालत आलेल्या जाती परंपरेची पाळामुळांसाकट नायनाट करण्याची संधी आपल्या सगळ्यांना आलेली तेथे आपण "आजही गडे मुरदे उखडण्यात" धन्यता मानतो आहोत. असल्या कोत्या मानसिकतेवर औषध आजतागायत कोणाला सापडलेले नाहीय.
चित्रकृती बनत रहायला हव्या, त्या समाजाचा आरसा असतात. जोवर हा आरसा सपाट काचांवर असेल तोवर सत्य समजत राहील. कारामणुकीकरिता तुम्हास जाड वा बारीक दिसणारे आरसेही बनविलेले असतात. त्यात तुम्हाला तुम्ही जसे पाहिजे तसे मनः शांतिकरिता दाखविले जाते. तुम्ही सुंदर दिसाल असा आरसा बनेलही पण सत्य सांगणारे आरसे हेच खरे. आभासी जग हे तकलादू असते, व त्याचे भविष्य हे अंधःकारमय असते.
उरला प्रश्न पद्मावतीच्या नामांतराचा आणि प्रदर्शनाचा, तर आमच्या मते तो चित्रपट आहे तसाच प्रदर्शित होऊ द्या. पटला तर पहा अन्यथा बहिष्कार टाका. आपणास कोणी बळजबरी थोडी ना करणार चित्रपट पहावयाची.
चित्रपटास आणि दीपिकाच्या उघड्या पोटास विरोध करून शंभर स्त्रियांचा जोहार करणेची भाषा करणे ऐवजी स्त्रियांची कमी होणारी संख्या, स्त्री भ्रूण हत्या, स्त्री पुरुष समानता, स्त्रियांवरील अत्याचार यावर लक्ष द्यावे असे आम्हास वर"करणी" तरी वाटते.
प्रतिक्रिया
15 Jan 2018 - 11:44 pm | आनन्दा
खरे आहे.. पण संजयच्या इतिहासात डोकावले तर त्याला इतिहासाची मोडतोड करायला आवडते असे दिसते, त्यामुळे दुसरी बाजू नसेलच असे मानणे एकंदरीतच कठीण
16 Jan 2018 - 2:51 pm | Nitin Palkar
दोन चार दिवसांची धुळवड. निर्माता, दिद्गर्शक आणि कलाकार हे धंद्याला बसलेले आहेत एवढाच विचार करावा. इतिहास, कला यांच्यात रस असणाऱ्या सुज्ञांनी दुर्लक्ष करावे हे आपले माझे मत्त. बाजीराव मस्तानीच्या वेळची धुळवड या संजयाला चांगलाच देऊन गेली होती असे समजते. त्या मुळे मागील पानावरून पुढे चालू...... थेटरात जाऊन न बघण्याचा निर्णय आपल्या पुरता आपण घ्यावा....
16 Jan 2018 - 6:21 pm | तेजस आठवले
अहो हे सगळे घडवून आणले आहे त्याने. प्रसिद्धीचा सोस तर आहेच, त्याशिवाय कोणत्या लोकांच्या भावनेशी खेळून फायदा उठवता येईल ह्याची गणिते पण आहेत.लोकशाही ह्याचा अर्थ वाट्टेल ते करणे असा काहीजण करून घेतात. मिपा हे मुक्त संस्थळ असल्याचा काही आयडी जसा गैरफायदा घेतात तसेच ह्या देशात लोकशाही असल्याचा काही लोक गैरफायदा घेतात.
समाजमनाचे आरसे असलेले चित्रपट बनणे केव्हाच बंद झालेले आहे. आता मिळेल त्या माध्यमातून मिळेल त्या मार्गाने प्रसिद्धी आणि पैसे मिळवणे हे एकच ध्येय आहे. कलाकृतीच्या सुरुवातीला एक संदेश दाखवला (ह्या कलाकृतीतील सगळी पात्रे काल्पनिक ..त्यांचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी .... असल्यास योगायोग समजावा इ.इ.) की आपण पुढे काहीही करायला मोकळे...
पहिल्या बाजीराव पेशव्याचा पराक्रम, युद्धकौशल्य, प्रशासनावरील पकड, विचार करण्याची पद्धत,विद्युतवेगाने केलेल्या विजयी चढाया हे सोडून त्याचे माहित असलेले/ नसलेले नृत्यकौशल्य कशाला दाखवायचे ?दोन सख्ख्या बहिणी जरी एकमेकांच्या सवती झाल्या तरी एकत्र नृत्य करणार नाहीत.बाजीराव मस्तानी चित्रपटातला काशीबाई - मस्तानी ह्यांचे नृत्य ही तर काहीच्या काही सिनेमॅटिक लिबर्टी झाली.
ओलेत्याने देवदर्शन घेणे आणि प्रार्थना करणे हे सोज्वळ सात्विकतेच्या चौकटीत असणे अपेक्षित होते. पण त्याचे अश्लील उथळ स्वरूप दाखवून कॉंट्रोव्हर्सी निर्माण ह्यापूर्वीपण केली गेली होतीच की.थोडक्यात काय, लोकांच्या भावनेशी खेळून त्यांना मामा बनवायचं, आणि आपला गल्ला भरायचा.बाकी धमक्या वगैरे निषेधार्हच आहेत.
16 Jan 2018 - 6:56 pm | सूड
सहमत!!
16 Jan 2018 - 10:30 pm | रीडर
+10
17 Jan 2018 - 8:28 pm | दुर्गविहारी
मुळात पद्मावतीवर वाद सुरु असताना मि.पा.वर धागा आलाच नाही हे आश्चर्य म्हणावे लागेल. बहुतेक पुर्वीचे मि.पा. राहिलेले नाही. मायबोलीवर धागा निघून नेहमीप्रमाणे अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढुन झाले आहेत.
हे अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे काय हे आज अखेर मला कळालेले नाही. बर या लोकांना मत मांडण्याचा अधिकार पाहिजे, पण आपल्या तथाकथित कलाकृतीमुळे दुसर्याच्या भावनेला धक्का बसणार नाही याची काळजी घ्यायला नको. उद्या भन्साळीची आई पोर्न स्टार ( या बध्दल लिलाताईंची क्षमा मागतो ) होती असे दाखविणारा चित्रपट कोणी काढला तर हा नरसाळ्या अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणुन गप्प बसणार आहे का ?
बर याच्याच ईतर चित्रपटावेळी वाद झालेले नव्हते. मग याच आणि ईतिहासाशी संबधी असलेल्या याच्याय ईतर चित्रपटाच्या बाबतीतच वाद का होतात. याची कारणे स्प्ष्ट आहेत.
सुरवात झाली ती देवदासपासून. ह्या चित्रपटात कथावास्तुपेक्षा, दारुची बाटली किती हजाराची वापरली आहे, माधुरीचा झगा किती किलोचा आहे, सेट किती कोटीचे आहेत असली फडतुस चर्चाच जास्त. बर गाण्यात काय दाखवावे याला काही ताळतंत्र, प्रेक्षकांना एश्वर्या आणि माधुरी एकत्र थयाथया नाचायला पाहिजेत म्हणुन त्यांचे एकत्र नृत्य असणारे गाणे या दिवट्याने टाकले. अरे एक कोठेवाली आणि एक घरंदाज बाई कधीतरी एकत्र नाचेल काय ?
नंतर बाजीराव, मस्तानीचा धागड धिंगा. यावर मि.पा.वर वेगळा धागा निघाल्याने फार लिहीत नाही. पण अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण काहिही केले तरी चालून जातय असे या टुकार ईसमाला वाटायला लागले असावे. त्यात आपण मराठी प्रेक्षकांनी बहुतेक वाचकाच्या पत्रव्यवहारात निषेध नोंदवण्यातच समाधान मानले. त्याचवेळी एखाद्याने तरी याला थोबडला असता, तरी हे पुढचे धाडच त्याने केले नसते.
सुदैवाने राजपुतांनी तरी हि चुक केलेली नाही. आतातरी भन्साळीचा गोरखधंदा बंद होइल असे वाटते. मी स्वतः या बंदीचा समर्थक आहे, मग बाकीच्यांचे मत काहीही होवो. याने उथून आमच्या पुर्वजांवर चिखलफेक करणारे चित्रपट काढायचे आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखली आम्ही ते निमुटपणे पहायचे याला काय अर्थ आहे? बर. याच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे समर्थक ब्लॅक फ्रायडेच्या वेळी, मेसेंजर ऑफ गॉडच्या वेळी, विश्वरुपमच्या वेळी, पैगंबराच्या कार्टूनच्या वेळी कोणत्या बिळात लपलेले असतात?
बर या लोकांच्या म्हणण्याप्रमाने उद्या चित्रपट प्रदर्शित होउ दिला आणि त्यात या नरसाळ्याने काहीही दाखवले असले तर नंतर निषेध नोंदवून उपयोग काय? हा परत स्वतःचे उखळ पांढरे करून असलाच एखादा पुढचा चित्रपट काढायच्या तयारीला लागणार. तेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होउच नये या भन्साळ्याला आयुष्यभराचा धडा मिळावा हिच ईच्छा.
18 Jan 2018 - 7:44 pm | सुबोध खरे
याच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे समर्थक ब्लॅक फ्रायडेच्या वेळी, मेसेंजर ऑफ गॉडच्या वेळी, विश्वरुपमच्या वेळी, पैगंबराच्या कार्टूनच्या वेळी कोणत्या बिळात लपलेले असतात?
+१००
आणी
पुरोगामी = दांभिक आणि दुटप्पी
18 Jan 2018 - 4:28 am | रमेश आठवले
अद्दल घडली
सिनेमा निर्मितीच्या मागे मूळ उद्देश असतो पैसे कमवणे . जितके जास्त प्रेक्षक तितका जास्त गल्ला .जास्त तिकिटे विकली जावी म्हणून सिनेमात काल्पनिक प्रणय प्रसन्ग व नाच घातले जातात. भन्साळी तेच करत आले आहेत. बाजीराव मस्तानी या चित्रपटात बाजीराव यांच्या कर्मठ सोवळ्या ब्राह्मण पत्नी काशीबाई ह्या बाजीरावांची रखेल मस्तानी हिच्या बरोबर नाच करतानाचे दृश्य दाखविण्यामागे हाच हेतू. त्या काळात असे काही घडले असेल हे सर्वसाधारण माणसाला पटण्या सारखे नाही. तरी त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली घुसवण्यात आले आणि थोडयाफार विरोधा नन्तर पेशव्यांच्या वन्शज मंडळींनी आणि मराठी प्रेक्षक यांनी स्वीकारले.
त्या मुळे तोच फॉर्मुला पदमावती सिनेमात वापरला गेला.परंतु ह्या खेपेस भन्साळी आणि या चित्रपटाचे निर्माते तोंडघशी पडले आहेत. आत्ता पर्यंत चार राज्यात बंदी घातली गेली आहे आणि इतर काही राज्ये त्यांचे अनुकरण करण्याची शक्यता आहे. निर्माते सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. पण कायदा या सुव्यवस्थेचे निमित्त करून राज्यांनी घातलेली बंदी उठवायला न्यायालय तयार होईल असे वाटत नाही. भन्साळी आणि या चित्रपटाचे निर्माते यांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे.
18 Jan 2018 - 4:02 pm | माहितगार
आजच्या बातम्यांचा अपडेट वाचला नै ?
18 Jan 2018 - 4:26 pm | माहितगार
अभिव्यक्ति स्वातंत्र्यासाठी आम्हालाही असे सगळे वाटते. लोकशाहीचा एक आधारस्तंभ जनतेची सुज्ञता असतो खरा म्हणजे हा आधारस्तंभ मध्यवर्ती असतो. जनता या राज्यघटना लोकशहीत जोपर्यंत आणि जेवढा विश्वास ठेवते तो पर्यंत आणि तेवढी राज्यघटना लोकशाही इ. इ. अस्तीत्वात असते. जनता काही वेळा शांत राहीली तरी पुढच्या प्रसंगी उद्रेक करु शकते. त्यामुळे केवळ आम्हास वाटले हा निकष आत्मकेंद्री आणिस्वल्पदृष्टीचा ठरू शकतो. पुस्तके चित्रपट इत्यादी बद्दल टिकाकारांची टिपणी आणि त्यास उत्तर जोडण्याची काही वेळा सक्ती करता आली पाहीजे असे वाटते म्हणजे आपले म्हणणे मांडल गेल्याचे व्यवस्थीत समाधान देता येऊ शकेल. एक तर्फी अभिव्यक्तीस्वातंत्र्य या क्षणी दडपले जाईल .
भाजपाला थांबवता आले नाही म्हणून त्यांचे तात्पुरते नुकसान होईल पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने मागणी करणार्या राज्यघटनेत दुरुस्तीच्या मागण्या वाढल्यास काँग्रेसही थांबवू शकेल का ? खासकरून महारास्।ट्र बंगाल तामीळनाडू प्रमाणे राजस्थान उत्तरप्रदेश मध्यप्रदेश बिहार गुजराथ ही राज्यांना पुरोगामी प्रबोधन चळबळीचा फारसा इतिहास नाही पण त्या लोकसंख्येचे लोकशाही प्रभाव नाकारताही येत नाहीत . तामीळनाडूचे जलीकट्टूचे आग्रह स्विकारता आमचे का नाही यास सर्वोच्च न्यायालयाकडे आणि भारतीय लोकशाहीकडे उत्तर नसल्याचे स्वतः चेलमेश्वरांनीच म्हणून ठेवले आहे.
18 Jan 2018 - 9:59 pm | रमेश आठवले
आगे आगे देखिये होता है क्या.