शतशब्दकथा: अंगरखा
पुन्हा तेच आटपाट नगर होते. तोच राजा होता. तेच दरबारी होते. तीच प्रजा होती. तोच लहानगा होता. आणि पुन्हा तोच जादूचा अंगरखा होता. राजा पुन्हा बाहेर पडला. पुन्हा तो मुलगा ओरडला, "राजा नागडा!" राजा संतापला. परत गेला.
दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. तिसऱ्या दिवशीही तसंच. हे आता रोजचंच झालं. पब्लिकला त्याचं काही वाटेनासं झालं. कुजबूज चर्चेत बदलली. चर्चा मोठ्या आवाजात. आंदोलने झाली. उठाव झाले. दडपले गेले. राजा काही बधेना. जादूचा अंगरखा घालून फिरणे सोडेना. कुणाचेच ऐकेना. सूज्ञांनी हात टेकले. लोक दुर्लक्ष करू लागले.
एक दिवस राजाला विषाणू डसला. राजा आजारी पडला. व्हेंटिलेटरवर गेला. खपला.