जालीय अस्तित्व अर्थात आयडी

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
26 Apr 2020 - 9:16 am

आंतरजालावर मिपा, मायबोली, उपक्रम, मनोगत, ऐसी अक्षरे या सारखे काही संवादी संकेतस्थळे असतात. या आभासी मंचावर अनेक लोक आपल्या विचारांची, भावनांची अभिव्यक्ती मांडत राहतात. विषय कुठलेही वर्ज्य नाहीत, व्यक्त होणे सुसंस्कृत असावे एवढीच अपेक्षा. सभासद लिहू वाचू शकतात. सभासद नसलेले फक्त वाचु शकतात. सभासदाचा बायोडेटा त्याच्या अकाउंटवर ठेवता येतो. काही लोक तो फक्त आपल्या आयडी पुरता मर्यादित ठेवतात. खर्‍या नावाने लिहिणारे, पारदर्शी माहिती ठेवणारे फार थोडे. स्त्री की पुरुष,वय,रहिवास,व्यवसाय नोकरी इत्यादी व्यावहारिक माहिती. काही लोक देतात काही नाही.पारदर्शक नसण्याची अनेक कारणे असू शकतात. सुरक्षितता,खाजगीपणा,विक्षिप्तपणा,खोड्याळपणा,तटस्थपणा काहीही असू शकतात. व्यवस्थापनही या माहितीचा आग्रह धरत नाही. त्यामुळे इथे व्यक्ती ही आयडी असते.अगदी डूआयडी असली तरीही. इथे आपण डूआयडी विचारात घेतल नाहीये. ती पण शेवटी आयडीच. तो पुन्हा भन्नाट विषय आहे. काही लोक आपल्या व्यक्तिमत्वाशी सूचक अशी आयडी धारण करतात. इथे सभासद असंख्य आहेत. लिहिते,वाचनमात्र,अर्धलिहिते मूकनिरिक्षक अशा भूमिका बजावत असतात. कोणीही कुठल्याही विषयावर लिहू शकतो. प्रतिवाद,प्रतिसाद,वाद,विवाद,संवाद,विसंवाद,कुसंवाद करु शकतो. तरी प्रत्येकाच्या आवडीची अशी काही क्षेत्र असतात,कल असतो,मउ कोपरा असतो,राजकीय,सामाजिक विचारधारा असते, आयुष्यात पाहिलेले चढ उतारांचा अनुभव असतो,व्यक्तिमत्वाचा असा एक पिंड असतो. तो त्याच्या लेखनात प्रतिसादात डोकावत असतो. पिंडे पिंडे मतिर्भिन्न: । हे ही आलच. आपलीच विचारधारा कशी योग्य असून समोरचा कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यात आपला वेळ, एनर्जी खर्च करताना अनेक आयडी दिसतात. समोरच्याला पटेपर्यंत कळफलक बडवत राहतात. नाही पटल तर दूषणे देतात,उपहास करतात,कीव करतात वा लायकी काढतात. हे सगळ करताना आपल्या समोर फक्त आयडी असतो. माणुस नसतो. आयडीच्या अपारदर्शकतेमुळे आपल्याला बाकी काही बोध होत नाही फक्त आयडी, त्याचे त्या संकेतस्थळावरचे वय, त्याचे लेखन व त्याचा प्रतिक्रियेचा ट्रॅक एवढच दिसत. त्यातून आपण त्या आयडीच्या आंतरजालीय व्यक्तिमत्वाचा अंदाज बांधत असतो. आयडी जेवढी पारदर्शी तेवढा आपला अंदाज बांधण्याचे पॅरामिटर्स वाढतात व तो अंदाज खरा ठरण्याची शक्यताही वाढते. ज्यांची आंतरजालीय वय जास्ती आहेत त्यांनी जालीय उन्हाळे पावसाळे अधिक पाहिलेले असतात, जालीय इतिहास त्यांना बर्‍यापैकी माहित असतो. नवीन आयडींना तो माहित असण्याची शक्यता कमी. त्यांचा भर तत्कालीन उस्फूर्ततेवर असतो. त्यामूळे प्रतिसाद देताना ते कोणत्या आयडीला प्रतिसाद देतो आहे हे ते पहात नाहीत. ते फक्त तत्कालीन लिखाणावर प्रतिसाद देत असतात. मूळ लेखनातील गर्भितार्थ त्यांच्या लक्षात येत नाही. काही नवोदित आयडी मात्र जालीय उत्खनन करुन समोरच्याचा इतिहास पक्का करुन घेतात. त्यामुळे त्यांचा सभासदत्वाचा कालावधी जरी कमी असला तरी ते जालीय जेष्ठतेत कमी पडत नाहीत. कधी कधी ते जालीय जेष्ठांची सुद्धा विकेट घेतात. पण अभ्यासू आणि विनयशील (द्वंद्व समास) आयडी फारच थोड्या. मानसशास्त्रातील सर्व प्रकारची व्यक्तिमत्व इथे आयडी रुपाने वावरत असतात. प्रत्यक्ष कट्टा वा गटग वगैरे कार्यक्रमातून फिजिकली ओळख होते. त्या आयडी विषयी मनात बांधलेले अंदाज कधी खरे ठरतात तरी कधी कोसळून पडतात.त्या ठिकाणी या आयडी माणसे होतात.अर्थात अल्पकाळातील सहवासातून माणसे समजतातच असे मात्र नाही हा मुद्दा आहेच. तसेही आयुष्यभर एकमेकाच्या सहवासात राहून एकमेकांना न समजलेली माणसे आपण पहातोच. कुठल्या आयडी ला जालीय विश्वात किंवा माणसाला अजालीय विश्वात किती अंतरावर ठेवायच हे ठरवण्याच काम आपला मेंदु करतच असतो. त्यासाठी बरीच इनपुटस लागतात. ती जर मिळाली नाही तर उपलब्ध असलेल्या इनपुटस वर आपण काहितरी निर्णय घेत असतो तो प्रसंगी बदलत ही असतो. आंतरजालावरचे उत्खनन हे पुराणातील समुद्रमंथनासारखे असते यातून काही रत्ने बाहेर येतात.

आंतरजालावर दीर्घकाळ वावरल्यानंतर एक साचलेपण येते. त्याच त्याच गोष्टी, तेच ते प्रतिसाद याचा कंटाळा यायला लागतो. विचारणार्‍याची पहिली वेळ असु शकते पण तुमच्यासाठी ती शंभरावी वेळ असते. मग तुम्ही दुर्लक्ष करायला लागता. प्रत्येकवेळी नवीन वाचकाच्या माहितीसाठी कॉपी पेस्ट करायचा कंटाळा यायला लागतो. आंतरजालीय वा प्रत्यक्ष वय जसे वाढेल तसा विरक्तीचा घटक प्रभावी व्हायला लागतो.आपण इथे कितीही आपटली तरी त्यामुळे जग थोडच बदलणार आहे? ते आपल्या पद्धतीने चालुच रहाणार आहे. तुमच्या सह किंवा तुमच्या शिवाय.मरु दे तिकड जग, आपण काही जग सुधारण्याचा मक्ता घेतला नाही हा विचार बळावायला लागतो. मग विरक्तीबरोबर तुमची उदासीनताही वाढायला लागते. काही जिनीयस लोक मात्र सातत्याने नव्याचा शोध घेत राहतात. या ना त्या मार्गाने माहिती मिळवीत राहतात.ती इतरांनाही देत राहतात. इतकी की कधी इतरांनाही अजीर्ण होत. शेवटी किती वाचायच, काय वाचायच आणि कधी वाचायच हे वाचकच ठरवत असतात.तुम्ही आंतरजालावर सोडलेली माहिती ही कुणाला ना कुणाला उपयोगी पडत असते पण आपल्यासाठी ते अज्ञात राहतात.या आंतरजालावर आपण नकळत गुरफटत जातो. हा मला तेव्हा अस म्हणाला तो तसं म्हणाला मग याचा हिशोब चुकता करा त्याचा हिशोब चुकता करा असे स्कोअर सेटलिंग होत जाते मग त्याचे स्कोअर सेटलिंग, मग कंपूबाजी, अखंड प्रवास सुरुच राहतो या चक्रव्यूहात.आपल्या किंवा आपल्या आयडीच्या अंतापर्यंत. बाकी काहीही असो आंतरजालामुळे आपली मानसिक आरोग्याची समीकरणे बदलणार आहेत हेच आमचे भाकीत.

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Apr 2020 - 10:34 am | प्रचेतस

उत्तम लेख लिहिलात काका. कित्येक जालीय वर्षांतील आयडी डोळ्यांसमोर तरळून गेले. बरेचसे जीवाभावाचे मैतर झालेत. आज जरी ते जालीय विश्वात फारसे सक्रिय नसले तरीही भेटीगाठी अखंड होत असतात.

कंजूस's picture

26 Apr 2020 - 10:53 am | कंजूस

पटलं.
--------
ग्रुपचा उपयोग होतो. आवडत्या विषयासाठी मतांची देवाणघेवाण यासाठी ओळख. जर ते भेटण्यासारखे असले तर भेटता येते. संपर्क वाढतो. इतर संस्थळांवरही हेच काम होतं.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Apr 2020 - 1:28 pm | प्रकाश घाटपांडे

कंपूबाजी ला समविचारी लोक एकत्र येणे अशा सकारात्मक अर्थाने देखील घेतले जावे. शेवटी समानशीले व्यसनेषू सख्यं।

संजय क्षीरसागर's picture

26 Apr 2020 - 1:55 pm | संजय क्षीरसागर

आयडी काहीही आणि कितीही असले तरी त्या मागची व्यक्ती एकच असते. त्यामुळे लेखनावरुन व्यक्तीचा व्यासंग लगेच कळतो, प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकता नसते.

आयडी ऐवजी लेखनावर फोकस ठेवणं कायम श्रेयस असतं.

जर व्यक्ती बहुरंगी असेल तर साचलेपण अजिबात येत नाही. अशा व्यक्तीला जाल हे अभिव्यक्तीचं उत्तम माध्यम आहे.

जालावरचे मतभेद, पुरेसा ओपननेस असेल तर लगेच संपुष्टात येतात.

जालीय ट्रोलींगचं एकमेव कारण म्हणजे लिहीणार्‍या व्यक्तीविषयी, लिहू न शकणार्‍यांना वाटणारी असूया ! एकदा हे लक्षात आलं की ट्रोलींगला सहजपणे फाटा दाखवता येतो.

| इती मम जालपुराणं संपन्नं |

चौकटराजा's picture

27 Apr 2020 - 12:11 pm | चौकटराजा

सहमत !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2020 - 2:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयडी ऐवजी लेखनावर फोकस ठेवला की प्रश्न उरत नाही. मिपावर अनेक वर्षांपासून विविध आयडी पाहिले आहेत. आयडींपेक्षा लेखनावर आपलं प्रेम. म्हणूनच काही मोजक्याच आयडींशी आपली मैत्री जुळली आणि टीकलीही. वाटेल तेव्हा मिपाने भावभावना व्यक्त करायला एक हक्काने जागा आणि काही चांगले मित्रही दिलेत. आभार मिपा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(आपला पारदर्शी कट्टर मिपाकर)

संजय क्षीरसागर's picture

26 Apr 2020 - 2:19 pm | संजय क्षीरसागर

गैरसमज जालावरच काय प्रत्यक्ष जीवनातही होतात. पण जाल हे जलद अभिव्यक्तीचं, सहज हाताशी असलेलं माध्यम आहे हे नक्की !

चलत मुसाफिर's picture

27 Apr 2020 - 3:49 pm | चलत मुसाफिर

लेख आवडला. जुन्या मिपाच्या आठवणी मनात तरळून गेल्या (तेव्हा आम्ही वाचनमात्र होतो)

गामा पैलवान's picture

27 Apr 2020 - 4:38 pm | गामा पैलवान

प्राडॉ,

आयडी ऐवजी लेखनावर फोकस ठेवला की प्रश्न उरत नाही.

तुमच्या संक्षींच्या सहमतीशी मीही सहमत! :-)

हेच विधान माझ्या शब्दांत थोड्या वेगळ्या प्रकारे मांडेन : आयडी ऐवजी लेखनावर फोकस ठेवला की नेमका प्रश्न विचारता येतो.

आ.न.,
-गा.पै.