चकाकीच्या नावाखाली दमणूक

जेडी's picture
जेडी in जनातलं, मनातलं
12 Apr 2020 - 10:10 pm

सद्या 'वर्क फ्रॉम होम' सुरू आहे. प्रवासाचे दिड तास वाचत आहेत. धूळ, प्रदूषण, रहदारी यापासून सुटका आहे. पण तरीही खूप दमायला होतं . गेल्या काही दिवसांत कोणतीच नवीन रेसिपी बनवली नाही. तरीही संध्याकाळ पर्यंत जीव मेटाकुटीला येतोय. कामवाल्या मावशी येत नाहीत. त्यामुळे दोन्ही वेळचा स्वयंपाक, ऑफिसचे काम पण हे तर मी पूर्वीही करायचे पण आता प्रवासाचा वेळ वाचूनही सायंकाळपर्यंत जीव मेटाकुटीला येतो. फरशीही मी काही रोज पुसत नाहीये पण तरीही दिवसभर घरातले काम, ऑफिसचे काम ( अगदी काटेकोरपणे त्या मिटिंग करणे, सारखे तेच तेच स्टेटस घेणे, देणे). चहा , कॉफीला किंवा बाथरुमला गेले आणि पिंग आला आणि रिप्लाय द्यायला थोडा वेळ झाला कि झोप झाली का असा टॉंट ऐकायचा)

असं का होतंय याचा विचार केल्यावर माझा विचार आपण चकाकीच्या नावाखाली किती काम वाढवून ठेवलंय यावर येवून ठेपलाय. दिवसातून कमीतकमी तीनवेळा भांडी. सकाळी चहा नाश्त्याची, दुपारचा स्वयंपाक, जेवण, आणि रात्री परत तेच. आताच्या बायकांना पूर्वीपेक्षा जास्त काम आहे या म्हणण्यावर मी येवून थांबलीय. नको इतक्या स्वच्छतेची सवय लागलीय आणि त्याने नुसतेच दमायला होते आहे.

आता आपण कपबशा घासून ठेवतोय, पूर्वी आई कपबशा विसळून ठेवायची. नाश्त्यात बऱ्याचदा दुध असायचे किंवा लोक लवकरच जेवून कामधंद्याला बाहेर पडायचे. त्यामुळे नाश्त्याचे अशी वेगळी भांडी पडत नसत. फारतर कधी पोहे केले जायचे. सतत नवीन पदार्थही नसत, चपातीही उपवासादिवाशीच असे नाहीतर रोज सकाळ संध्याकाळ भाकरीच. आता जवळपास रोज सकाळी संध्याकाळी चपातीच त्यामुळे पोळपाट लाटणे रोज धुवा. आता तर आठवड्यात वेगवेगळे नाश्ते त्याची हजार भांडी, घासून घासून, उभे राहून पाट, गुडघे यांची दुखणी मागे लावून घेतलीत आपण. जेवणाचे डबे फार असे नव्हतेच. दुपारचे जेवण फडक्यात बांधूनच भाकरी दिली जायची. त्यावरतीच भाजी, त्याच भाकरीवर घातलेली असे. ते भाकरीच गाठोडं दुरडीत बांधून दिले जायचे कधीतरी रस्सा, सांबार असलं तर त्यासाठी कडीचा डबा असे. पण खूप वेळा तो नसेच. भात दिला तरी दहीभात घरीच कालवून दिला जाई. तो हि केळीच्या पानात. शेतातही प्लेट्स, वाट्या, तांब्या, भांडे, चमचे असली थेरे काहीच नसत तर शेतातही केळीच्या पानावरच जेवण असे. घागर रिकामीच नेऊन ती भरून आणायची फक्त. आता मात्र कसले कसले डबे, अगदी चटणी पासून, ताकापर्यंत. आणि त्यांची झाकणे, चमचे, डबे भरून न्यायच्या पिशव्या. . शाळेतसुद्धा एकच स्टीलचा डबा असे त्यातच भाजी भाकरी किंवा भाजी चपाती असे. घरी जरी जेवलो तरी पुन्हा सर्व साफसफाई असतेच. मुख्य म्हणजे टेबल, फरशी पुसून घेणे. पुसलेले कापड धुणे. पूर्वीच्या घरात जमीन असायची. शेणाच्या गोळ्याने खरकटे उचलायचे आणि गोळा फेकून हात धुवायचा कि झाले.
फरशी तर रोज पुसावी लागते. जमीन आठ दिवसातून एकदा सारवावी लागायची. चुलीतली राख भरणे, पोतेरा करणे हि जरी कामे असली तरी तो पोतेरा काय रोज धुवावा लागत नसे. किचन कट्टा , शेगडी मात्र रोज धुवून, चकाचक करून ठेवावी लागते. कट्ट्यावरच्या टाईल्स हि रोज धुवा. कट्टा पुसायला ठेवलेली फडकी, अगदी घासण्या पण स्वच्छ धुवून ठेवाव्या लागतात. पूर्वी एकच राखेचा डबा. त्यात निरमा टाकून नारळाच्या शेंडीने घासायचे. त्या शेंड्या रोज फेकून दिल्या तरी चालायच्या. तो डब्बा बापजन्मात कोणी घासून पुन्हा त्यात राख भरली नसावी.

कामवाली मावशी आता नाहीये, पण त्यांचे कसे पंधरा मिनिटात काम होते आणि आपण कसे साबण असलेल्या भांड्याकडे , कानाकोपर्यातल्या कचर्याकडे कानाडोळा करायचो ते आता जमेना झालय.

सणासुदीच्या आदी सारवण. दसऱ्याच्या आधी सर्व गोधड्या बापयमाणसे धुवून आणत असत. भांडी जरी काळी झाली तरी ती चकचकीत करण्याचा सोस नसायचा. अगदीच काळे होणार असेल तर भांड्याला बाहेरून ओली माती लावायची मग भांडे काळे होत नाही तर लगेच निघते. सरसकट जर्मन, पितळी कलई लावलेली भांडी असत. आता मात्र हि भांडी, ती भांडी. ह्यात पदार्थ जास्त ठेवायचा नाही मग तो स्टीलच्या भांड्यात काढून ठेवायचा. फोडणी द्यायला वेगळी भांडी वापरायची. प्रत्येकाला वेगळा चमचा, डाव. पाणी पिण्यासाठीही जमिनीतले रांजण असायचे. ते एकदा भरून ठेवायचे आणि पाणी संपेपर्यंत धुवायचे नाहीत. त्यातले पाणी काढण्यासाठी एकच वगराळे. तांब्यात पाणी भरून प्रत्येकाने भांड्याने प्यायचे. पाच सहा जरी पाहुणे आले तरी दोन तांबे भांडे भरून देवून त्यातूनच लोक पाणी भांडे तोंडाला न लावता प्यायचे. आता मात्र प्रत्येकाचे वेगळ ग्लास तेही काचेचे, ट्रे. ते रोज वापरत नसतात मग ते आधी धुवा आणि नंतरही धुवा. प्रत्येकाने ग्लास काढून पाणी पिवून बेसिन मध्ये टाकायचा. घरातले सर्व ग्लास काढून संपल्यावर आईला सांगायचे, ग्लास संपलेत, धुवून दे.

पूर्वी आई भाकरी करायची त्याच परातीत पालेभाजी धुवायची आणि पुढे त्याच तव्यात ती हिरवी भाजी परतायची. डाळ डिचकीत शिजवून भाकरीच्याच तव्यात फोडणी करून डाळीत फोडणी ओतायची. अगदी कांदा जरी चिरला तरी विळीच्या समोर तिच्या लाकडी पाटालाच खोलगट प्लेट असायची त्यातच कांदा कापून ठेवायचा. विळी मटनाशिवाय धुतली जायची नाही. आता रोज चाकू, चोपिंग बोर्ड धुतला जातोय. मुख्य म्हणजे कुकर नव्हता. मला तरी कुकरने गँस ची बचत होत असली तरी भांडी खूप पडतात असे वाटते. कुकर, झाकण, डाळीचा डबा, डब्याचे झाकण इतकी जादाची भांडी पडतात. पक्कड म्हणजे मोठी जीने पातेले हि पकडता यायचे ती काय रोज घासली जायची नाही. चुलीवरून भांडी उतरायला फडक्यांचाच वापर होई, ती फडकीही रोज धुतली जात नसत.

संडास, बाथरूम तर पूर्वी घराच्या बाहेरच असत, ते रोज धुवून चकचकीत करायचे टेन्शन नसे आता मात्र आपण रोज संडास बाथरूम रोज चकचकीत करतोय. बेसिन चीही त्यात भर पडलीय. पांढऱ्या फरशावर लगेच डाग, धूळ दिसते मग ते सारखे सारखे स्वच्छ करा. बेडशीट, पिलो कव्हर आठवड्यातून एकदा धुणे. अगदी पायपुसण्याही आठवड्या-पंधरवड्यातून धूत आहोत.

पूर्वी अभ्यासात आईबाप कमीच लक्ष घालायचे किंवा घालायचेच नाहीत, आता मुलांचे हजार प्रोजेक्ट करण्यासाठी त्यांना मदत करा, साहित्य शोधा, बाजारातून आणा, याव करा आणि त्याव करा. मुलं खेळूनसुद्धा आपआपलीच येत. आता मुलांना खेळायला सुद्धा खाली घेवून जावे लागते (हे लोकडाऊन च्या काळात नव्हे). पूर्वीच्या काळी मुलांचे खेळ बाहेरच असत, आता हजार खेळण्यांचा पसारा घरातच पडतो. बाबा लोकांचा बरचसा वेळ नुसता ऑफिससाठीच वाहून घेतल्याने ह्याची सर्व जबाबदारी बायकांवरच. पूर्वी घरातले माळवे, परस बागेतली भाजीच जास्त असायची किंवा आठवडी बाजारून एकदाच आणली जायची. आता मात्र बायका बाहेर पडून लागल्याने ती ही जबाबदारी त्यांच्यावरच येवून पडलीय. रोजच्या रोज फर्निचर पुसून काढणे हा हि नवीन उद्योग मागे लागलेला आहे.

भांड्याच्या कंटाळ्याने डिशवॉशर घ्यायचे ठरवतेय पण भारतीय स्वयंपाकासाठी तो काही कामाचा नाही असेच सर्व सांगत आहेत. पूर्वी घरातली माणसेहि आठ दिवासातून दोनदाच शर्ट पँट धुवायला टाकत, घरचेही कपडेही रोज धुतले जात नसत. तेच वारंवार घातले जात. फक्त बायकांची कपडे आणि पुरषांची अंतरवस्त्रे एवढेच धुवायला असत. आता रोजचे वेगळे युनिफॉर्म्स, बायकांचे बाहेरचे आणि घरी घालायचे कपडे, टोवेल्स, बेडशीट असले बरेच काय काय असते. पण निदान वाशिंगमशीनला मान्यता मिळाल्याने त्या सर्रास वापरल्या जावू लागल्यात. तरीही कपडे निघत नाहीत ची टूम आहेच..

किती ती चकचकाटाची स्वच्छता आपण मागे लावून घेतलीय

समाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

चलत मुसाफिर's picture

13 Apr 2020 - 8:12 am | चलत मुसाफिर

सद्यकालचे तपशील बरोबर आहेत. पण पूर्वी ही कामे नव्हती किंवा कमी होती हे म्हणणे चुकीचे आहे. पूर्वी घरोघरच्या बायका पहाटे उठून स्वतःला कामाला जुंपून घेत त्या पार दिवस मावळेपर्यंत. आजारपण आले तरी यातून त्यांची सुटका नसे. तेव्हा घरकामाची विविध यंत्रे नव्हती.

आता यंत्रे आली असली तरी कुटुंबांच्या (केवळ बायकांच्याच असे नव्हे) एकूण गरजा व अपेक्षा फार वाढल्या आहेत. परिणामी, आताची अनेक घरकामे आपण मागे लावून घेतलेली आहेत. ती टाळता येऊ शकतात हे मला मान्य आहे.

मला वाटते पूर्वी मुले खूप असत, त्यांचे करण्यात, एवढी बाळंतपणे करण्यात दिवस जात असावा. शेतातल्या धान्यांची उगनिगा असायची पण त्यांचेही काही ठराविक दिवसच असायचे. उन्हाळ्यात वाळवणे आसायाची. गडी माणसे कामाला असायची. धुण्याला परटीन असायची, तिला रोजची भाकरी आणि वार्षिक धान्य दिले जायचे. रोजच्या फरशी, कट्टा, खूप सारे कपडे, नको इतकी भांडी काढणे नव्हते. नुसतीच बिनकामाची दमणूक नसायची. एकत्र कुटुंब असल्याने मदतीला माणसेही खूप असत

जेडी's picture

13 Apr 2020 - 5:09 pm | जेडी

अजुन सकाळी अंगण, रस्ता झाडायला तराळीण पण यायची तिलाही एक भाकरी द्यावी लागे.

कंजूस's picture

13 Apr 2020 - 8:34 am | कंजूस

खरं आहे.

वामन देशमुख's picture

13 Apr 2020 - 8:58 am | वामन देशमुख

रांधा वाढा उष्टी काढा हे कधीच संपणार नाही असं दिसतंय.

चौथा कोनाडा's picture

13 Apr 2020 - 1:23 pm | चौथा कोनाडा

अतिशय समर्पक लिहिलंय ! लेख आवडला !
अति-स्वच्छता, अति-चकाकी हे रोगच !
भिंतींना वारंवार रंग देणं, फर्निचर बदलणं, नुतनीकरण करणं या देखिल व्याधीच !
गावाकडं जावा, अजुनही धुळकटपणा मळकटपणा आहे. पण, ते ही लोक आता चकाकीच्या आहारी जाऊ लागलेत !
पुन्हा मळकट रहायची सवय अंगी बाणवणे उत्तम !

Cuty's picture

13 Apr 2020 - 2:26 pm | Cuty

या लाॅकडाऊनच्या काळात तर ही गोष्ट तीव्रतेने जाणवू लागली आहे. सर्वजण घरी. मग नाष्टा, लंच,डिनर सर्व गोष्टी अगदी साग्रसंगीत. त्यात कामाला मावशी पण नाहीत. कधीकधी वाटते आपण आता करोनाऐवजी कामानेच मरतो की काय?

मराठी कथालेखक's picture

13 Apr 2020 - 4:13 pm | मराठी कथालेखक

विस्तृत वर्णन आवडलं.
पुर्वी नेमकं काय नी कसं होतं याबद्दल मला स्वतःला फारसा अनुभव नाही (त्यातही खेडेगावचा नाहीच नाही) पण ऐकून /वाचून माहिती आहे.
पण एकंदरीत पटलं.. खूप चकाचकपणा आणि नेटकेपणाचा हव्यास म्हणून आपण काम वाढवतो.
तरी दीक्षित डाएटमुळे काही महिलांची सकाळची न्याहारी, सायंकाळचे काही खाणे यातून सूटका झाली असावी.

मराठी कथालेखक's picture

13 Apr 2020 - 4:18 pm | मराठी कथालेखक

मला वाटतं पुर्वी घरांना मोठ्याल्या खिडक्या नसायच्या छोटी खिडकी , झरोका असायचा, त्यामुळे घरात धूळ कमी यायची, तसंच प्रकाशही कमी असायचा. दिवसा बाहेरचा उजेड आणि तो कमी असेल तर तसंच रात्री एखादा पिवळा बल्ब किंवा एखादी ट्युबलाईट (खेडेगावात ती पण नसावी फारशी कदाचित). उजेड कमी असल्याने उगाच थोडीशी धूळ , कळकटपणा नजरेत भरत नसावा. आता LED /CFL/ False ceiling lights वगैरेंनी घर उजळून गेलेलं असतं, थोडाही कळकटपणाही खुपतो. मोठाल्या खिडक्या, बाल्कनी यातुन धूळ पण येते बरीच.

एक सामान्य मानव's picture

13 Apr 2020 - 5:10 pm | एक सामान्य मानव

घरातील कामे सर्व सदस्यानी वाटुन घेतली तर हा प्रश्न येणार नाही. पूर्वी लोक खूप घाण व अजागळ रहात म्हणून आताही रहावे काम टाळ्ण्यासाठी हे काही पटले नाही. कदाचित पूर्वी अशा रहाणीमानामुळेच आरोग्याचे बरेच प्रश्ण होते. साथिचे रोग व त्यामुळे होणारे म्रुत्यू तर खुपच होत. आता निदान शिकलेल्या व सुस्थितितील लोकाना हे आजार व आरोग्याच्या समस्या कमी झाल्या आहेत.

पुर्वी लोक अजागळ होते? नाही , असे अजिबातच नाही. उलट पुर्वी बाहेरुन कोणी आला की बाहेरच हातपाय धुत असत आणि मगच आत येत असत. साथीचे रोग पसरत कारण तेन्व्हा लस नव्हत्या. आता मेडिकल क्षेत्रात बरीच प्रगती झालीय म्हणुन साथी नाहीत.

वामन देशमुख's picture

13 Apr 2020 - 6:45 pm | वामन देशमुख
वामन देशमुख's picture

13 Apr 2020 - 6:47 pm | वामन देशमुख
वामन देशमुख's picture

13 Apr 2020 - 6:47 pm | वामन देशमुख