अतूट काही...
पाप पुण्य अन् काल आजच्या
पल्याडही जर असेल काही,
अनादि, आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी ...
काळाची विक्राळ कातरी
कापू पाहते त्या धाग्याला..
जळजळीत कधी चटके देतो
तीव्र अतीव दु;खाचा प्याला..
गळ्यात बेडी अंध भक्तीची
प्राण तिचे कंठाशी येती..
डोळस, निर्दय नास्तिकतेचे
घाव बैसती माथ्यावरती ..
पण
अतूट आहे टिकून अजुनी
जीर्ण बकुळीसम ती ताजी..
अनादि आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी..