निरोप घेऊन जाता जाता
क्षणभर बाप्पा मागे फिरला
खांद्यावरती हात ठेऊन
मनामधल सार बोलला
गड्या मला घरी सोडून
मंडळामध्ये शोधतोस
नावावरल्या व्यापाराला
तुही चालना देतोस
वाटल होत जोडीन
गप्पा मारत दिवस काढू
नैवेद्याच्या जोडीने
तुझ माझ ताट वाढू
सोडून वेड्या घरात मला
चौकामध्ये फिरतोस
मनामधल मागण्यासाठी
बाहेर नवस बोलतोस?
नको मला हार-तुरे
नकोत असल्या सजावटी
भक्त मिळावा साख्यासारखा
नकोत चेहरे बनावटी
विचार तुमच्या सुखाचाच रे
लाच कशाला घेऊ मी
नारळ, पैसे घेऊन तुमचे
कुठे नेउनि ठेऊ मी
चल माझी वेळ झाली
जाता जाता इतकच सांगतो
मंडपात मूर्ती सुरेख असली
तरी मी तुमच्या घरात थांबतो