ठिपके
शहरदिव्यांचे पिवळट ठिपके
काळ्याकरड्या रस्त्यांवरच्या
धुरात भेसुर
चमचमण्याच्या
थोडे आधी
तिथून निघूया,
पाखरठिपक्यांच्या नक्षीला
भगव्यापिवळ्या मावळतीशी
किलबिलणारा
कंठ फुटेतो
जरा थांबूया
मग बोलूया,
चांदणठिपक्यांची रांगोळी
गारूड पाडून विस्कटण्याच्या
थोडी आधी
चंद्रधगीने
जरा वितळू दे
मग थांबूया.