एकदा जन्म झाला की आत्म्याच्या तोडीची म्हणता येईल अशी साथ आपल्याला देणारे अश्रूंशिवाय दुसरे काय असते. माध्यमं आणि भाषा यांनी कितीही उंची गाठली तरी व्यक्त होण्यातली अश्रूंची हुकुमत त्यांना कधीच साधता येणार नाही. अश्रू हा नात्यांचा पहिला पाया असतो. ज्या नात्यांनी डोळे कधीच पाणावले नाहीत ती सारी नाती खोटी!औचित्यभंग नको म्हणून मनुष्याला एकवेळ हसणं आवरता येईल, पण मनाचा वज्रबांध जमीनदोस्त करत गालावर ओघळणारा अश्रू भावनांचं गाठोड जपून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. विद्युल्लते सोबत तेज चमकावे तसे भावनां सोबत अश्रू वाहतात. स्वतःला चाणाक्ष आणि व्यवहारी म्हणवणारे आपण जगाची किंमत पैशांत करतो. परंतु प्रत्येक सजीव-निर्जीव गोष्टीचे मूल्य म्हणजे त्या गोष्टीमुळे व्यक्ती मध्ये किती अश्रू निर्माण होऊ शकतात हेच होय. म्हणूनच तर हृदयाच्या जवळचे काही अत्यंत प्रिय आपल्यापासून दुरावले की त्या दुराव्यासाठी डोळे पुनःपुन्हा पाणावतात. किती अश्रू वाहतात याची मोजदाद आपण ठेवत नाही. पण अशा घटनांनी खोल हृदयात एक शेवटचा अश्रू जन्म घेत असतो. जोवर तो स्फुंदतो तोवर डोळ्यांच्या कडा कोरड्या होत नाहीत. 'त्या' अश्रूने पाणावलेल्या डोळ्यांना आत्म्याचे शुद्ध स्वरूप दिसू शकत नाही. तो शेवटचा अश्रू एकदा बाहेर पडला की ते दुःख/मोह विरून जातो. तो शेवटचा अश्रू वाहून गेला म्हणजे आपल्या सगुणाचा निर्गुण होतो. तो शेवटचा अश्रू सगळ्यांच डोळ्यांतून बाहेर पडत नाही. ते प्रयत्न शेवटपर्यंत चालू असतात. यात सफल मात्र मोजकेच होतात. प्रयत्न थांबत नाहीत. म्हणून नवजात बालक आपल्या पहिल्या टाहो सोबत अश्रूंना मोकळी वाट करून देते.