ओमर खय्याम भाग - १ ओमर खय्याम भाग - २ ओमर खय्याम भाग - ३ ओमर खय्याम भाग - ४ ओमर खय्याम भाग - ५ ओमर खय्याम भाग - ६ ओमर खय्याम भाग - ७ ओमर खय्याम भाग - ८ ओमर खय्याम भाग - ९ ओमर खय्याम भाग - १० ओमर खय्याम भाग - ११ ओमर खय्याम भाग - १२ ओमर खय्याम भाग - १३ ओमर खय्याम भाग - १४ ओमर खय्याम भाग - १५
मुर्खांचे मालक !
आपल्या आयुष्यात आपल्याला कितीतरी गोष्टींचा सामना करावा लागतो. सगळ्यात मोठा सामना करवा लागतो तो स्वत:च्या मनाशी. आपण मनाशी किती खेळत असतो याचा विचार केलात तर चक्रावून जाल. त्यातल्याच काही भावनांपैकी एक आहे खंत आणि आपण केलेल्या चुकांची कारणे. यानी मन अस्वस्थ झाले की ते शांत करायचे अनेक मार्ग लोकांनी शोधून काढले आहेत. काहींनी तर शास्त्रे लिहीली आहेत. उदा. भविष्य इ.इ. खय्याम म्हणतो सोड ते सगळे. पण या आयुष्यात तुझ्या हातून अनेक चुका होतील. कारण तू मनुष्यप्राणी आहेस, आणि चुका करणे हा त्याचा स्थायीभाव आहे. त्यासाठी तुला जबरदस्त शिक्षाही होतील. त्यांची कारणे शोधून कुठल्याही शास्त्रात बसवायला जाऊ नकोस ! ह्या संसारात मन रमव, काम कर आणि त्या चूका परत न करण्याची शपथ घे.
खय्याम म्हणतो,
शास्त्रांचा अभ्यास सोड, तेच बरं आहे
ते हात मुलायम केसातून फिरव, तेच बरं आहे.
चुकलास तर नशीब करेल रक्तबंबाळ
पण काळजी नको ती रक्तवर्णी पेल्यात ओत,
(तेच बरं आहे)
आपल्या चुकांची उत्तरे शास्त्रात बसवायला गेले की काय होते ? आपल्या प्रश्नांनी लोकांची पोटे भरतात. आपले प्रश्न सुटतच नाहीत. परत, शास्त्र सांगणारे, त्यांची ती लायकी आहे का, हा ही एक संशोधनाचा विषय आहे. मला एक नाथ माहीती आहेत. यांचे वडील नाथ/महाराज होते. हे स्वत: एका बॅंकेत कारकून होते. वडील गेल्यावर यांनी बॅंकेतली नोकरी सोडली आणी वडिलांची जागा घेतली. जणू काही यांना त्या शास्त्रांमधले वडील गेल्यावर एकदम कळायला लागले. पण बॅंकेतल्या कारकूनीत काय ठेवले आहे ? येथे एक दोन वर्षात दोन तीन फ्लॅट होतात. बरं यांच्या शिष्यगणात एकही शिष्य त्यांची गादी चालवायला समर्थ नव्ह्ता ? थोडक्यात काय त्यांनी एक कारखाना टाकला आहे, अध्यात्माचा, लोकांना मुर्ख बनवायचा. त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा मालक. या धंद्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे बरका मित्रांनो ! मालकांचा मुलगा मालक आणि गिर्हाईकाचाच मुलगा गिर्हा्ईक. कारण आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच त्यांच्या फोटोसमोर येता जाता वाकवतो !! मला आश्चर्य वाटते, त्यांचे जाउ देत. ते लोकांना लुटायलाच बसले आहेत. पण यांच्या वडिलांच्या शिष्यगणात सुबूध्द माणसे असतील, तर एकाच्या तरी मनात वरील विचार का नाही आला? का आपण आपली बुध्दी या महाराजांच्या पायाशी गहाण टाकली आहे ?
निद्रा !
ज्या माणसाला स्वर्ग, नरक आणि पृथ्वी हे सारखेच वाटतात त्यांना ही रुबाया अर्पण आहे. सगळ्यात महत्वाची म्हणजे रात्री लागणारी शांत झोप. याचे मोल अनमोल आहे. मला असे बरेच लोक माहिती आहेत त्यांना रात्री झोप येत नाही आणि असेही लोक माहिती आहेत ज्यांना कुठेही झोप येते. प्रामाणिकपणे, ज्यांना झोप येते ते मला सुखी/नशिबवान वाटतात मग ती कुठल्याही कारणाने असो. मनाच्या अवस्थेमुळे असो किंवा मद्यामुळे (संसारातील कष्टामुळे) असो.
खय्यामने हे फार छान शब्दात वर्णन केले आहे.
खय्याम म्हणतो,
त्या मद्यालयाची धूळ माझ्या कपाळी,
दोन्ही जगाच्या चांगल्या-वाईटाची सोडली काळजी.
ती लोळण घेतात माझ्या पायाशी,
पण मी सापडेन तेथेच जेथे धुंद झोपलो मी.
मद्यालयाची म्हणजे या जगाची. दोन्ही जगाच्या म्हणजे, स्वर्ग, नरक या कल्पनेतल्या जगांचा आणि पृथ्वी. यांच्यात मी चांगल्या-वाईटाची, सुखाची-दु:खाची, काळजी सोडली आहे. मी पुण्य मिळेल म्हणून काही करत नाही, आणि लोकांना त्रास होईल असे वागत नाही. मी चांगले वागायलाच पाहिजे म्हणून चांगला वागतो. पाप पुण्य, यासारख्या गोष्टींच्या पलिकडे गेलो आहे, त्या मुळे मला याचा त्रास होत नाही. मला रात्री शांत झोप लागते, तळमळत पडायचा प्रसंग माझ्यावर येत नाही.
कलंदर !
या दुनियेत आपण आलो मग हातचे राखून कशाला जगायचे ? ज्या परमेश्वराने हे जग (मद्य) जन्माला घातले आहे, त्यानेच आपल्याला जन्माला घातले आहे. या जगातल्या सर्वोतम गोष्टींचा आस्वाद घ्या. त्यासाठी लागणारे कष्ट उपसा. या जगात कलंदर म्हणून जगा. त्या वागण्यात चुका अटळ आहेत, पण त्याची खंत करत बसू नका. सगळ्यांनी या जीवनाशी हाच करार करावा व एकामेकांच्या संगतीत याचा आनंद घ्यावा.
खय्याम म्हणतो,
संयम, मद्याचा सोडून चांगला,
सुंदरीच्या हाती मिळाले तर बहार.
पिणे, होणे कलंदर आणि चुकणे हेही छान,
मद्याचा एक घोट माह ते माही हा करार.
(सगळ्यांकडून सगळ्यांना)
“अझ माह ता माही” म्हणजे चंद्र ते समुद्रातील माशांपर्यंत. थोडक्यात जगभर !
कलंदर ही एक सुफी संप्रदायाची एक शाखा होती. यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सारखे फिरतीवर असत. त्यांना एका ठिकाणी राहणे मानवत नसे. जेथे ते जात तेथे त्यांना चांगला मान असे.
रक्ताचे नाते !
जेव्हा मैफिलीत सुरईतून पेल्यामधे मदीरा ओतली जाते आणि ती सुरई परत दूर करुन जागेवर ठेवली जाते तेव्हा त्या सुरईच्या जागेपासून ते त्या पेल्यापर्यंत ते लाल भडक थेंब सांडत जातात .......हे बघून खय्यामला ही रुबाया सुचलेली दिसते. मैत्री कशी करावी याचे हे उत्तम उदाहरण आहे. रक्ताचे नाते नसले तरीही त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी खय्यामला अभिप्रेत आहे.
हे विश्व पडलेले तबक, उलटे.
अडकले जगातले शहाणे.
त्यापेक्षा मैत्र कर पेला आणि सुरईसारखे,
ते जमिनीवरचे लाल थेंब, समज रक्ताचे नाते.
खय्याम म्हणतोय हे सगळे अतिशहाणे जीव या विश्वाच्या तबकाखाली अडकले आहेत ते काय तुझी मदत करणार, त्यापेक्षा मित्रांबरोबर आनंदाने वेळ घालव आणि मित्रांशी नाते जोड, ते नाते तुला रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त प्रिय होईल याची मी खात्री देतो.
पाकळ्यांचा खच
खय्याम म्हणतो,
बघ वार्याने गुलाब विसकटले आहेत,
कोकीळ सौंदर्याचा घेत आहेत आस्वाद.
तू वेळ घालव तेथे थोडा, कारण
मातीत पाकळ्यांचा खच आत्ताच पडला आहे.
तुझ्या आयुष्याच्या बागेतले गुलाब तुझ्या आयुष्यातल्या घटनांनी विसकटले असतील. पण त्याचाही आनंद घे ! या गुलाबांच्या जशा पाकळ्या खाली जमिनीवर पडतात, त्या प्रमाणे त्या घटनाही तुझ्या मनातून पडू देत. पण त्याचा दुसरा अर्थही लक्षात घ्यायला विसरु नकोस-
मातीत पाकळ्यांचा खच पडला आहे म्हणजे अर्धे आयुष्य संपले आहे आतातरी तुला जे पाहिजे ते करुन आयुष्याची मजा घे !
फुले वाळून त्याच्या पाकळ्या मातीत पडल्या आहेत. तुझेही आयुष्य निम्मेअधिक असेच गेले आहे. आतातरी जरा आनंदाचा आनंदाने उपभोग घे.
श्वास !
आयुष्य किती क्षणभंगूर आहे याच्याबद्दल आपण अनेक वेळा ऐकले असेल. पण त्या क्षणभंगूरतेचे टोकाचे उदाहरण, खय्यामने दिले आहे. एकदा हे उदाहरण पटले की मला खात्री आहे आपल्याकडे जे नाही त्याचा व्यर्थ शोक करायचा आपण थांबवू. आपले सुख हे आपल्याकडे काय आहे आणि काय नाही यावर थोडेच अवलंबून असते ? आणि सुख हे असे शोधून कसे सापडणार ? ते तुमच्या मनातच असते.
या क्षणी आपण आहोत, पुढच्या क्षणी आहोत का नाही हे कोण सांगू शकणार ? म्हणून खय्याम म्हणतो आत्ताचा हा श्वास मी बाहेर टाकणार आहे की नाही कोणास ठाऊक ! आणि मरताना त्या क्षणी घेतलेला श्वास आपण बाहेर टाकत नाही. जीवन आणि मरण यातले अंतर हे असे एका श्वासाइतकेच असते.
खय्याम म्हणतो,
व्यर्थ शोक, किती वेळ करणार, नाही त्याचा
आणि व्यर्थ शोध, सुखाचा आयुष्यात पुढच्या.
त्यापेक्षा माझा पेला भरु देत, हा श्वास,
नाही माहीत, होणार आहे का उच्छ्वास.
आपणही ग्रेट ! एवढे मोठे अंतर एका श्वासात पार करतो ! :-)
खरी ताकद !
काय काय लक्षात ठेवणार आपण, हाही एक प्रश्नच आहे. परमेश्वराने आपल्याला विसरायची ताकद दिली आहे हे त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. तसे नसते तर मला वाटते रस्त्यांवर वेड्यांची संख्या जास्त दिसली असती.
खय्याम म्हणतो ह्या जगाला शरण न जाणे हे आपण देवाने दिलेल्या या शक्तीमुळेच शक्य आहे..
खय्याम म्हणतो,
क्रूर जगातील दु:खाला नको जाऊ शरण,
नको आठवू, जे गेले त्यांचे मरण.
हे ह्रदय दे सुंदर प्रेयसीला, नको राहूस मदीरेविना,
मुळीच नको सोडूस हे आयुष्य वार्यावर !
हे जग इतके सुंदर आहे की त्या दु:खापोटी मग ते कसलेही असो. मृत्यूचे असो, प्रेमभंगाचे असो, पराभवाचे असो, विश्वासघाताचे असो, ते विसर. त्या दु:खामुळे तुला भणंगासारखे आयुष्य जगायची मुळीच आवश्यकता नाही. अधिक जोमाने हे आयुष्य जगायला सुरवात कर. हे कसे शक्य आहे ? आहे ! देवाने तुला एक अशी ताकद शक्ती दिली आहे, त्याचा उपयोग करुन तू हे सहज करु शकतोस. त्या शक्तीचे नाव आहे
“विसरण्याची ताकद”
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
13 Jul 2011 - 5:28 pm | कच्ची कैरी
>>>ओमर खय्याम ....भाग ->>><<
बाकी १५ भाग कधी प्रकाशीत झाले माहितच नाही ,खूपच वेळ काढावा लागेल वाचायला .
13 Jul 2011 - 6:20 pm | प्रास
या भागातही भारी मजा आणलीत!
इथे
ती ऐवजी ते हवं आहे का, तेवढं बघा बरं....
बाकी
आवडलं, खरंच आवडलं. एकदम भन्नाट आहे......