गुढीपाडवा आला. सकाळ झाली .
पूर्वी मोरूचा बाप मोरूला म्हणे - ''अरे मोरू, उठ ! आज गुढीपाडवा आहे. आटपून तयार हो लवकर. वगैरे ''
लहानपणापासून मोरूला सवयच तशी होती. मोरूची हालचाल झाली पण डोळे मुळीच उघडेनात. बाबांनी उठवल्याशिवाय मोरूला मुळीच जाग येत नसे- गजराने तर नाहीच नाही .
पण आताचा हा आवाज वेगळाच अन नाजूक होता , ''अरे मोरू, उठ ना ! चहा घे -गार होईल …''
'' हे काय भलतंच ! बाबा चहा घेऊन आले कि काय? अन त्यांचा आवाज असा बायकी का झालाय? '' थांबा जरा '' म्हणून कुशीवर वळला , तेव्हढ्यात ''अरे आता उs s ठ ना ! '' असा दीर्घ पुकारा झाल्यावर उठून बसणं भाग होतं.