पावन
पहाट झाली होती. आभाळ सर्वदूर व्यापून होते. रप् रप् पाऊस झाडा झुडुपात, चिखलात वाजत होता. घोडखिंडीतील पाणी आता लाल होऊन वाहत होतं. वरनं पावसानं आणि खालनं मावळ्यांनी घोडखिंडीत झुंबड उडवली होती.
तलवारींच्या खण् खणाटांनी आणि आरोळ्यांनी खिंड दणाणून गेली होती. हबशी सिद्दी मसूद आणि त्याची रानटी फौज पुढे घुसायचा प्रयत्न करीत होती. बांदलसेना हर प्रकारे तो हाणून पाडत होती.