साद
कुठून येते हे धुके अन्
वेढते भवताल सारे
फिकटल्या चंद्रासवे मग
हरवती अवघेच तारे
कोन ढळती दशदिशांचे
वाट बिनचुक सांगणारे
अन् तमाच्या खोल डोही
वितळती दिग्बंध सारे
गडद ह्या छायेतळी जरी
उमगती गूढार्थ न्यारे
मर्म कोड्यांचे कळे परी
प्रश्न उरती टोचणारे
या धुक्याच्या पार वाहे
कोणती सरिता बरे?
त्या प्रवाही वाहताना
साद घाली कोण रे?