रापण.....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
6 Mar 2023 - 3:34 pm

त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी

-प्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे.
-
तारर्कर्लीच्या समुद्र किनाऱ्यावर भटकंतीचा आनंद घेतला.तेव्हां एक वेगळाच अनुभव आला.

रापण,कोकणात कोळ्यांचा पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय. यावेळेस बघायला मिळाला.जाळ्यात अडकलेल्या जलचरांची अवस्था बघून वरील गझल आठवली.काही ओळी सुचल्या त्या पंक्तीबद्ध करायचा प्रयत्न केला.याचे श्रेय मी गझलकारांना देईन.

गझलकार अंत्यत संवेदनशील,प्रतिभावान. वरील गझल म्हणजे बावनखाणीतल्या विविध रंग,रस आणी भावनांची सशक्त अभिव्यक्ती.जेवढी सशक्त गझल तेव्हढेच सशक्त संगीत आणी स्वर श्रीधर फडके यांनी दिला आहे.

https://youtu.be/7Mot_taqFSM

रापण मारण्यासाठी उपयोगात येणाऱ्या जाळ्यास स्थानिक भाषेत पाटी म्हणतात

रापण

अंधारल्या रात्री,किनारा जागताना पाहिला मी
निळ्याशार समुद्राचा,चंदेरी काठ पाहिला मी
-
लवलवत्या चपळ जलचरांचा, खेळ पाहिला मी
अवखळ,अल्लड लाटांचा, नाविकांशी शृंगार पाहिला मी
-
घटा घटात पेटलेल्या,भुकेचा डोंब पाहिला मी
तटावर समुद्राच्या,जीवन मरणाचा संघर्ष पाहिला मी
-
त्या कोवळया जीवांचा तडफडाट पाहीला मी
त्या पाटीतून सुटण्याचा, व्यर्थ धडपडाट पाहिला मी
-
वाळूत चालताना मृतांचा, बाजार पाहिला मी
जीवो जीवस्य भोजनम्,डार्विनचा सिद्धांत पाहीला मी

आठवणीजाणिवप्रेरणात्मककरुणमुक्तक

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

6 Mar 2023 - 3:47 pm | प्रसाद गोडबोले

वाह !

मग काय सुरमई खाल्लात की पापलेट ?

रापण हा सामूहिक मासेमारीचा प्रकार आहे. टेहेळणी करणाऱ्या व्यक्तीला किनाऱ्यानजीक माशांच्या मोठ्या थव्याची हालचाल, खळबळ, चमचम दिसली की तो सर्वांना भोंगा किंवा तत्सम आवाज करून इशारा देतो आणि लगेच गावातले अनेक लोक एकत्र येऊन पाण्यात जाळे फिरवत फिरवत त्या कळपाला वेढतात. मग जाळ्याची टोके एकत्र करून ते किनाऱ्यावर उथळ पाण्यात अडकवतात. म्हणजे मासे मरत नाहीत. हळू हळू उपसत लागतील तसे विक्रीला काढता येतात. सौदे ठरवायला उसंत मिळते. सर्वांना एकसमान वाटा मिळतो.

आता अजूनही ही पद्धत चालू आहे हे माहीत नव्हते. तुम्ही हल्लीच बघितली म्हणजे अजून चालू आहे.

गंमत म्हणजे लहानपणी कोंकणात आम्ही पोरे क्रिकेट खेळताना कॅच सुटला की त्या फिल्डरला राप्या, रापू असे म्हणायचो. सोपा कॅच रापला असेही म्हणायचो.

कर्नलतपस्वी's picture

6 Mar 2023 - 4:19 pm | कर्नलतपस्वी

मार्क्स भौ,गवी भौ प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

यंत्रयुगात रापण हा पारंपारिक प्रकार आजही बघायला मिळाला. वयोवृद्ध अनुभवी रापणकर केळुसकर आणी नुकतीच मिसरूड फुटलेला नवशिका रापणकर संस्कार यांच्या बरोबर मनसोक्त गप्पा मारल्या.

वागळी (स्टिंग रे) ,बांगडा,सुरमई, खेकडा असे मासे पण ओळखीचे झाले.

बाकी मी शाकाहारी असल्याने अंबोळी,सोल कढी वरच समाधान मानले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Mar 2023 - 4:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त कविता!! कुठले कुठले मासे खाल्लेत?
तूनळीवर "रापण" म्हणुन शोधल्यावर ही क्लिप मिळाली

https://www.youtube.com/watch?v=juFRG66qNIg

रापण हा प्रकार माहिती होताच पण तो माशांचा वास सहन होत असल्याने कधीच हे पाहिले नाही.
गविसर यांचा प्रतिसाद मस्त.

कुमार१'s picture

7 Apr 2023 - 4:01 pm | कुमार१

आवडली.

उपेक्षित's picture

10 Apr 2023 - 10:51 am | उपेक्षित

इकडे गोयं मध्ये रापणीचे मासे म्हणजे खाणारे सगळे तुटून पडतात. इकडे अजूनही पारंपरिक पद्धत टिकून आहे. बाकी शुद्ध शाकाहारामुळे कधी खायचा संबंध आला नाही.

जाता जाता - ३/४ महिन्यांपूर्वी आमच्या इकडे सांखळी ला १०० ला १५/२० बांगडे मिळत होते जागोजागी ;)