यापूर्वीचे कथानक:
मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३
https://www.misalpav.com/node/43228
लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी :
किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते. मग थोड्या अंतरावर एका मोठ्या गुहेच्या तोंडावर शेकोटीभोवती जमलेले काही लोक दिसले, तिकडे गेलो.
चित्र 1. चित्रकार- William Smith ( Campfire Scene by Moonlight )
त्या लोकांकडून मला आश्चर्याची एक गोष्ट कळली, की ती गुहा खूप खोल, लांब असून किल्ल्यावर पहुचण्याचा एक मार्ग त्या गुहेतूनही होता. ते सर्व लोक विविध प्रकारचे कारागीर असून किल्ल्यावर पुष्कळ काम मिळत असल्याचे ऐकून तिकडे निघाले होते. मला अनायासेच किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी खात्रीची सोबत मिळाली.
सकाळी किल्ल्यावर पहुचल्यावर बघतो, तो किल्ल्याची बरीच पडझड झालेली असून इतस्ततः वाळू - मातीचे ढीग, घडवलेल्या दगडांच्या राशी, संगमरवरी कठडे आणि पुतळे, लाकडी ओंडके-फळ्या वगैरे सामान पसरलेले होते, आणि दुरुस्तीचे काम चाललेले होते. हे सर्व बघून ‘इस्किहार’ रत्नाबद्दल इथे मला कोण आणि कसला सल्ला देणार हा प्रश्नच पडला. मग इकडे तिकडे फिरत मी काही रेखाटने वगैरे करू लागलो.
.
चित्र 2 - 3. किल्ल्यातील दृष्ये. (चित्रकार - Hubert Robert)
तेवढ्यात एका भव्य इमारतीसमोरील कारंज्याजवळ एक उमदा तरुण आणि एक सुंदर युवती उभे असलेले मला दिसले, परंतु थोड्याच वेळात ते आत गेले. दुपारच्या वेळी पुन्हा बाहेर येऊन नवीन इमारतींचे बांधकाम, तटबंदीची दुरुस्ती, चौथऱयांवर पुतळे बसवणे वगैरे कामांची प्रगती बघत बघत ते मजजवळ आले. तो तरुण माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा असून कर्तबगार, हिकमती आणि साहसी असल्याचे त्याची चर्या आणि एकंदरीत हावभाव यांवरून दिसत होते, तर ती युवती काहीशी अल्लड आणि निरागस वाटत होती. मी चित्र काढत असलेले बघून त्या दोघांच्या मुद्रेवर स्मित उमटले, आणि मी कोण, इथे कशासाठी आलेलो आहे वगैरे विचारपूस त्यांनी केली.
माझी हकीगत - विशेषतः दा विंची यांनी मला शिष्य म्हणून निवडले असल्याचे ऐकून त्यांनी सूचक नजरेने एकमेकांकडे बघितले, आणि ‘ इस्किहार’ रत्नाच्या शोधात मी इथवर येऊन पहुचलो आहे हे मी सांगत असताना अभावितपणे त्या युवतीने आपल्या बोटातील अंगठी चाचपली - हे माझ्या नजरेने टिपले.
.
चित्र 4 - 5 : चेझारे आणि ल्युक्रेशिया बोर्जिया ( ‘Borgias’ चित्रपटातील दृश्ये).
माझा वृत्तांत ऐकून तो तरूण म्हणाला - "मित्रा, आता मी तुला आमची ओळख तुला करून देतो. मी चेझारे बोर्जिया आणि ही माझी बहीण ल्युक्रेशिया बोर्जिया. आमचे वडील रोड्रिगो बोर्जिया म्हणजेच रोममधले सध्याचे पोप अलेक्झांडर सहावे आहेत. तू आज इथे आलास, हे फार बरे झाले. स्पेनमधील चर्चमुळे तुम्हाला जो त्रास झाला, त्याबद्दल मी फार दिलगीर आहे, पण आता तू निश्चिंत रहा. यापुढे तुमच्यावर कोणतीही आपत्ती मी येऊ देणार नाही. आजपासून तू आमचा विशेष अतिथी आहेस" एवढे बोलून मला ते आपल्या बरोबर किल्यातील विशाल प्रासादात घेऊन गेले. किल्ल्यातील इतर इमारती पडझड झालेल्या असल्या तरी हा प्रासाद मात्र सुस्थितीत असून उत्तम रितीने सजवलेला होता. समोरच बोर्जिया कुटुंबाचे भव्य तैलचित्र होते.
चित्र 6: प्रासादातील भव्य दालन. (Palazzo Colonna).
चित्र 7: - पोप अलेक्झांडर सहावे आणि त्यांचे बोर्जिया कुटुंब
प्रासादातल्या एका दालनात माझी रहाण्याची उत्तम व्यवस्था लावून दिल्यावर "उद्या सकाळी आपण भेटू, तोवर तू घरी पाठवण्यासाठी एकादे पत्र लिहून ठेव, ते मी उद्याच रवाना करेन " असे म्हणून त्यांनी माझा निरोप घेतला.
हा सर्व प्रकार बघून माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. थोड्याच वेळात एक सेविका माझ्यासाठी ल्युक्रेशियाने पाठवलेली उंची वस्त्रे घेऊन आला. ती परिधान केल्यावर मी आरश्यात बघितले तेंव्हा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, अशी माझी छबी मला दिसली. मी आनंदाने आई आणि एलीसाठी पत्र लिहायला घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी चेझारे मला एका मोठ्या दालनात घेऊन गेला. तिथे जुन्या मूर्ती आणि चित्रे ठीक करण्याचे काम चाललेले होते.
.
चित्र 8: मी आई आणि एलीसाठी पत्र लिहायला घेतले. (चित्रकार : Gabriël Metsu)
चित्र 9: दालनात चाललेले जुन्या मूर्ती आणि चित्रे ठीक करण्याचे काम. (चित्रकार : Hubert Robert)
“रोम, मिलान, फ्लोरेन्स वगैरेमध्ये खूप प्राचीन मातब्बर घराणी आहेत आणि त्यांचे खूप मोठमोठे प्रासाद आहेत. मात्र त्यातल्या पुष्कळांची आता डबघाईची परिस्थिती आहे. आम्ही त्यांचे आता ओसाड पडलेले महाल, त्यातील जुन्या मूर्ती- चित्रांसह खरेदी करतो, आणि इथे आणून त्यांना ठीक करवून घेतो. तू जर काही काळ राहून या कामात मदत केलीस, तर अनायासे तुझा चित्रकलेचा सराव होईल, आणि मिळकत पण होईल, अर्थात याला तुझे गुरु दा विंची यांची संमती असेल तरच. तुझी तशी इच्छा असेल तर मी आजच याबद्दल त्यांना खलिता पाठवतो” -- चेझारे म्हणाला. मी लगेचच या गोष्टीला संमति दिली. ‘इस्किहार’ रत्नाबद्दल ‘पुढील सल्ला’ हाच आहे की काय, असाही विचार माझ्या मनात चमकून गेला.
पुढे किल्ल्यात एके ठिकाणी एका विस्तीर्ण खडकातून एक झरा वहात असून त्या खडकावर अद्भुत शिल्पे बसवलेली होती. “हा किल्ला आम्ही मिळवण्याचे मुख्य कारण म्हणजे ही शिल्पे. लिओनार्दो दा विंची यांच्याकडूनच याबद्दल आम्हाला माहिती मिळाली होती, आणि हा किल्ला ताब्यात घेऊन इथल्या सर्व शिल्पाची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा सल्ला त्यांनी वडिलांना दिलेला होता. आमचे वडील पोप बनताच तातडीने आम्ही हा किल्ला मिळवला.
चित्र 10 - 11 : खडकावरील अद्भुत शिल्पे - Apollo and 5 Nymphs ( संकल्पना: Hubert Robert. मूर्तिकार : François Girardon, Thomas Regnaudin, Gaspard and Balthasar Marsy).
चेझारेने दोन्ही पत्रे रवाना केल्यावर काही दिवसातच त्याच्या जासूदाने दा विंची आणि आईची पत्रे आणली. आई-एलीचे ठीक चालले होते पण त्यांना बाबांची आणि माझी फार आठवण येत असे. मी परत केंव्हा येणार त्याची त्या दोघी वाट बघत होत्या.
दा विन्चिंचे पत्र वाचताच चेझारेच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. “दा विन्चिंनी तुला हवे तितके दिवस आमच्याबरोबर रहाण्यास सांगितले आहे, आणि तुझ्यासाठी ही चिठ्ठी दिली आहे” असे म्हणत माझ्या हातात एक छोटीशी गुंडाळी दिली. त्यात फक्त एवढेच लिहिले होते - “पुतळे आणि प्रत्यक्ष व्यक्तींवरून मानवी शरीराचा कसून अभ्यास कर. त्यासाठी चेझारेची मदत घे. योग्य वेळ आली की मी तुला बोलावेन. तोपर्यंत चेझारे बरोबर रहा”.
..... “त्यांनी मला तुझ्यासाठी मानवाकृतींच्या अभ्यासासाठी सर्व सोय उपलब्ध करून द्यायला सांगितले आहे. इथे किल्ल्यात सर्वत्र जुन्या मूर्ती आहेतच, शिवाय किल्ल्यावर कामासाठी आलेले स्त्री- पुरुष खूप आहेत, त्यावरून तू अभ्यास सुरु कर. थोड्या दिवसातच मी तुझ्यासाठी निर्वस्त्र स्त्री - पुरुषही उपलब्ध करून देईन. चल, आता मी तुला आमचा कलाकृतींचा खास संग्रह दाखवतो, त्यावरूनही तुला खूप शिकता येईल” ... चेझारे म्हणाला.
मग तो मला अनेक चित्रे आणि पुतळे असलेल्या एका भव्य दालनात घेऊन गेला, प्राचीन ग्रीक, रोमन आणि हल्लीच्या नवनवीन कलाकृतींचा तो अद्भुत खजिना बघून माझे डोळे दिपले. यापूर्वी टोलेडोत किंवा आमच्या गावी असले काहीच मला बघायला मिळालेले नव्हते. आता खऱ्या अर्थाने माझे चित्रकलेचे शिक्षण सुरु होणार, याची मला खात्री पटली.
चित्र 12 : रोमन शवपेटिका (इ.स.215-225). Sarcophagus with triumph of Dionysos
.
चित्र 13 - 14 - 15 ग्रीक-रोमन मूर्ती.
.
चित्र 16: Jacques-Louis David: Mars Disarmed by Venus and the Three Graces
चित्र 17: Louis Jean Francois Lagrenee: ‘Pygmalion and Galatea’
..
चित्र 18 - 19 - 20 ग्रीक-रोमन मूर्ती.
तू निसर्गचित्रे चांगली काढतोस, हे मी बघितले आहे, पण फक्त निसर्गचित्रे रंगवून कदाचित तुला तुझे स्वतःचेही पोट भरता येणार नाही. चर्चसाठी येशू- मेरीची, बायबलातल्या प्रसंगांची चित्रे काढण्याचे काम निवडक, प्राख्यात कलावंतांनाच मिळते. तेही पोप, बिशप, कार्डिनल वगैरेंना आवडेल, असेच करावे लागते. माझे वडील आज पोप आहेत खरे, पण तू चित्रकला पूर्ण शिकून मोठा कलावंत होशील, तेंव्हा काय परिस्थिती असेल, सांगता येत नाही. त्यामुळे तू स्वतंत्रपणे तुझ्या आवडीची चित्रे काढ. तू उत्तम चित्रकार बनलास, की तुझी चित्रे घेण्यासाठी धनिक मंडळींमध्ये चढाओढ लागेल…. त्यावेळी मी असेन नसेन…
“ही चित्रे बघ. यात मानवी शरीराचा कसोशीने केलेला अभ्यास दिसून येतो. त्यासाठी या कलावंतांनी खूप कष्ट घेतलेले आहेत.
चित्र 21 : Titian : Sacred and Profane Love (दुवा)
.
चित्र 22 : Pompeo Girolamo Batoni : War and Peace
चित्र 23 : Rubens : Venus at a Mirror
या चित्रांमध्ये निसर्गदृश्ये पार्श्वभूमी म्हणून रंगवलेली आहेत. मुख्य भर मानवाकृतींवर आहे. यात चित्रित प्रसंग ग्रीक वा रोमन पौराणिक कथांमधून घेतलेले आहेत. काही वर्षांपासून इटलीत प्राचीन ग्रीक-रोमन मूर्ती उत्खननातून मिळू लागल्या आहेत, त्यांच्या प्रभावामुळे आजच्या कलेत अभूतपूर्व बदल घडून येत आहेत. हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्य नष्ट झाल्यावर हळूहळू ख्रिस्ती धर्माने आपली पकड घट्ट करत पूर्वीच्या रोमन देवतांना निषिद्ध ठरवून नग्नतेला पाप समजणे, नरकाची भीती, आत्म्याची मुक्तता वगैरे कल्पना समाजात दृढमूल केल्या. बायबलातील त्या पाप-पुण्याच्या कल्पनातून समंजस लोक आता बाहेर पडू लागले आहेत, आणि मनुष्याचे शरीर आणि भोवतालचे जग, यात जास्त रुची घेऊन शास्त्रीय आणि कलात्मक अभ्यास करू लागले आहेत. म्हणूनच दा विंची नी तुला मनुष्याकृतींचा सखोल अभ्यास करायला सांगितले आहे.
चित्र 24: Michel Dorigny - Diana and Actaeon
चित्र 25: Luca Giordano : Judgment of Paris
हे सर्व बघून आणि चेझारेचे विचार, दा विन्चिंचा आदेश ऐकून मी खूपच प्रभावित झालो आणि एकाग्रतेने कामाला लागलो.
… हळू हळू माझी चेझारे आणि ल्युक्रेशियाशी खूप घनिष्ठ मैत्री झाली. चेझारेला अनेक विषयांचे चांगले ज्ञान तर होतेच, शिवाय तो खूप साहसी आणि युद्धकुशल लढवय्या होता. आम्ही अनेक विषयांवर मोकळेपणाने चर्चा करायचो. ते दोघेही माझे बोलणे खूप आवडीने ऐकायचे.
चित्र 26: चेझारे आणि ल्युक्रेशिया माझे बोलणे खूप आवडीने ऐकायचे.
त्या चर्चेतून मला प्रथमच समजले की की त्यांचे वडील पोप आणि व्हॅटिकन मध्ये कार्डिनल असलेला चेझारे यांचावर विषप्रयोग करण्याचे, खुनाचा कट रचण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यापासून सर्वांचे रक्षण करणे हे त्याचे महत्वाचे काम आहे. साध्या-भोळ्या ख्रिस्ती लोकांसाठी पोप हे खुद्द परमेश्वराचे पृथ्वीवरील पवित्र प्रतिनिधी असले, तरी प्रत्यक्षात ‘पोप’- पद मिळवण्यासाठी आणि ते टिकवून ठेवत स्वतः जिवंत रहाण्यासाठी सगळे भले बुरे मार्ग चोखाळावे लागत असतात. “तुमचा शत्रू तुमचा घातपात करण्यापूर्वीच, आपणच त्याला संपवावा’ हे सूत्र आम्ही पाळतो” - चेझारे म्हणाला.
मी एलीविषयी जे सांगायचो, ते ऐकून ल्युक्रेशियाला तिला भेटण्याची खूपच उत्सुकता निर्माण झाली. एकदा संध्याकाळी आम्ही असेच गप्पा करत असताना बाहेरून कुणी काही सांकेतिक साद घालत असल्याचे ऐकू येताच चेझारे एकदम उठला आणि तातडीने बाहेर गेला. मला आश्चर्य वाटल्याचे बघून ल्युक्रेशिया म्हणाली, “मिशेलेत्तो आला आहे”.
मग तिने सांगितले की मिशेलेत्तो हा चेझारेचा अगदी खास मदतनीस असून त्याच्यावर चेझारे वेळोवेळी अगदी गुप्त, महत्वाची कामगिरी सोपवत असतो. तो आला याचा अर्थ काहीतरी अगदी महत्वाचे तातडीचे काम निघालेले आहे. मग आम्ही खिडकीतून बघितले तर मिशेलेत्तोने आणलेले काही कागद चेझारे वाचत होता.
चित्र 27 : चेझारे आणि मिशेलेत्तो
दुसरे दिवशी सकाळी काही सैनिकांना बरोबर घेऊन चेझारे आणि मिशेलेत्तो तातडीने कुठेतरी गेले.
“तो कुठे जातो, काय करतो, हे तो मला कधीच सांगत नाही. पण तो गेला की मला फार भीती वाटते. पण आता तुझ्या सोबतीत मी निश्चिंत राहीन” - ल्युक्रेशिया म्हणाली.
ल्युक्रेशिया बद्दल मला एलीबद्दल वाटायचे, तसेच ममत्व वाटू लागले होते, पण त्याहीशिवाय आपल्या मनात खोलवर तिच्याविषयी काही निराळ्याच भावना निर्माण होत आहेत की काय, असेही कधी कधी वाटायचे, विशेषतः आम्ही दोघे बागेत एकत्र फिरायचो, तेंव्हा.
.
चित्र 28 : चेझारे आणि मिशेलेत्तो - खास कामगिरीवर ... चित्र 29 : ल्युक्रेशियाबरोबर बागेत फेरफटका
थोड्याच दिवसात चेझारे परत आला, त्याच दिवशी अचानक आकाशातून एका पक्ष्याचा कर्कश्य चित्कार ऐकू आला आणि एक मोठा ससाणा आकाशातून झेप घेऊन चेझारेसमोर उतरला. “व्हॅटिकनहून संदेश” - चेझारे म्हणाला. खरोखरच तो पक्षी संदेश घेऊन आलेला होता.संदेश वाचून चेझारे गंभीर झाला. “ माझ्यावर वडिलांनी एक नवीन कामगिरी सोपवली आहे, आणि त्यासाठी लवकरात लवकर आपल्याला रोमला यायला सांगितले आहे. दा विन्ची काही विशेष युद्ध- साधनांची रचना करणार आहेत, त्यावेळी त्यांना मी तिथे हवा आहे” - तो म्हणाला.
चित्र 30 : एक मोठा ससाणा आकाशातून झेप घेऊन चेझारेसमोर उतरला
“म्हणजे माझे एलीला भेटण्याचे राहूनच जाणार” - ल्युक्रेशिया रडवेली होऊन म्हणाली. “आपण रोमला जाताना नाही का तिला भेटू शकणार ? - तिने विचारले.
“आपण असे करू, इथून लोरेंझोच्या गावी जाऊ आणि त्या दोघींनाही आपल्यासोबत रोमला घेऊन जाऊ. मग तर झाले?” चेझारे हसत म्हणाला.
मग काय, ल्युक्रेशिया उत्साहाने तयारीला लागली. आपल्याच वयाच्या एलीची सोबत आता आपल्याला व्हॅटिकनमधे लाभणार, याचा तिला फार आनंद झालेला होता. मलाही घरी जाण्याच्या कल्पनेने फार बरे वाटले. आपण खुद्द दा विन्चिंबरोबर व्हॅटिकनमधें रहाणार, असे आपल्या बॉबिओतील मित्रांना सांगितले तर ते आपल्याला खुळ्यातच काढतील, या कल्पनेनेच मला हसू आले. मग दोन-तीन दिवसात चेझारेने किल्ल्याची नीट व्यवस्था लावली, आणि आम्ही बॉबिनो-रोमच्या दिशेने कूच केले.
कसे असेल रोम ? माझे गुरु आता मला काय काय शिकवतील ? आपल्याला तिथे राफाएल, मिशेलएंजेलो वगैरेंची पण चित्रे बघायला मिळतील का ? पोप आपल्याशी कसे वागतील ? … असे अनेक प्रश्न माझ्या मनात गर्दी करत होते….
(क्रमशः:)
प्रतिक्रिया
15 Oct 2018 - 1:56 pm | श्वेता२४
पु.भा.प्र
15 Oct 2018 - 2:15 pm | चौकटराजा
उत्तम चित्रे ,प्रवाही भाषा! ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ! ब्रॅम स्टोकर ?नारायण धारप ?
16 Oct 2018 - 9:03 am | प्रचेतस
ब्रॅम स्टोकर- ड्रॅक्युला.
जोनाथन हार्करचे जर्नल
मिना मरेचे जर्नल
डॉ. जॉन सेवार्डची डायरी
वॅन हेल्सिन्ग.
अद्भूत कादंबरी.
ब्रॅम स्टोकर आणि मेरी शेलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. अभिजात भयकथा. ड्रॅक्युला आणि फ्रॅकेन्स्टाईन.
15 Oct 2018 - 3:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं. नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम चित्रांनी भरलेली प्रवाही कथा !
15 Oct 2018 - 4:49 pm | Jayant Naik
खूप सुंदर ! असेच लिहित रहा.
15 Oct 2018 - 6:27 pm | शशिकांत ओक
मुर्तीतील सौंदर्य आणि भावभंगिमांनी नटलेल्या कलाकृती पहायला मिळणे कठीण. ते कथानकात गोवून आम्हाला पहायला मिळते आहे...
मानवी शरीराच्या रचनेची इतक्या बारकाईने लक्ष घालून केलेली चित्ररचना कला, कल्पना, रसिकता यातून आनंददायक अनुभूति करवून देऊन नामवंत कलाकारांना तुम्ही गौरवित केले आहेत.
16 Oct 2018 - 8:53 am | शशिकांत ओक
सहसा घडत नाही. आपणच आपल्याला विवस्त्र निहाळायचे जमत नाही!
त्या मानसिकतेतून बाहेर पडून मॉडेल्सना उभे करून तासंतास दगडांना विशिष्ट आकार देणे कलाकारी बरोबर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम आहे हे प्रकर्षाने जाणवते.
15 Oct 2018 - 8:06 pm | यशोधरा
मस्त! सुरेख चित्रे!
16 Oct 2018 - 9:03 am | प्रचेतस
हा भागही जबरदस्त आहे काका.
क्लास लिहिताय. एका अद्भूत जगात लिलया फेरफटका मारला जातोय.
16 Oct 2018 - 5:34 pm | चित्रगुप्त
श्वेता, चौकटराजा, डॉ. म्हात्रे, जयंत नाईक, यशोधरा, शशिकांत ओक, प्रचेतस.... अतिशय आभार. सर्वांना कथामाला आवडत आहे, यातून पुढील भाग लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. लेखातील काही आवडले वा पटले नाही, तर ते जरूर कळवा.
17 Oct 2018 - 12:42 am | अथांग आकाश
मोनालिसा म्हणत असेल मलाच माझी कहाणी नव्याने समजत्ये! छान चालू आहे लेखमाला! पुढील भागांसाठी शुभेच्छा!
17 Oct 2018 - 6:19 am | कंजूस
काही कथा कादंबरी आहे म्हणून हे पान उघडून पाहिलेच नव्हते इतके दिवस. त्या काळातील चित्रकारांची चित्रे दाखवण्याची कथाशैली म्युझिअममधील फक्त चित्रे पाहण्यापेक्षा फारच परिणामकारक आणि उत्कंठावर्धक आहे.
चित्रकला माध्यम हे फोटोग्राफी माध्यामाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे.
मला ही चित्रकला यात्रा फारच पसंत पडली.
चित्रांतला उजेडाचा खेळ फारच सुंदर मांडला आहे.
उगाचच या मालिकेकडे कथा असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.
17 Oct 2018 - 2:28 pm | मित्रहो
या भागात परत नवीन रहस्ये आली विशेषतः तो संदेश काय असेल, रोमला जायचे कारण काय. दरवेळेला नवीन पात्र येत आहे. यावेळेला चेझारे.
खूप सुंदर चित्रे.
17 Oct 2018 - 8:58 pm | चित्रगुप्त
अथांग आकाश, कंजूस, मित्रहो, अनेक आभार.
@कंजूसजी: खरोखर चित्रकलेचे सामर्थ्य आणि वैभव अपार आहे. विशेषतः इ.स. १५०० - १९०० या चारशे वर्षात युरोपियन चित्रकेलेने जी उंची गाठली ती बघता विस्मय वाटतो. पुनर्जागरण काळातील इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची अद्भुत जोड मिळाल्याने तो अतिशय मनोरंजक आहे. त्याचा मागोवा या लेखमालेतून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
@ मित्रहो: कथानायक रोमला जातो, याचे कारण मी नुक्तीच केलेली रोमची भ्रमंति आणि तिथे बघितलेल्या अविस्मरणीय कलाकृती. जणुकाय मी खरोखरीच पाचशे वर्षांपूर्वी रोमला गेलो होतो की काय असे वाटते आहे. या भ्रमंतीवरही लेखनाचा विचार आहे.
17 Oct 2018 - 10:19 pm | बबन ताम्बे
आत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम ! कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर ! पुढील लेखांची आणि अलैकिक चित्रांची प्रतीक्षा !
21 Oct 2018 - 4:32 pm | तुषार काळभोर
अतिशय सुंदर कलाकृती आहेत सर्व. अगदी पहिल्या Campfire By Moon मधल्या सुरेख छाया-प्रकाशाच्या डिटेल्ड रेखनापासून ते Palazzo Colonnaच्या दालनापर्यंत आणि (हर्क्युलस/झ्युअस-सेंटॉर) शिल्पपर्यंत.... प्रत्येक कलाकृती केवळ अप्रतिम!!!
(पुनर्जागरण शब्द आवडला) Renaissance हा काळ युरोपातील कलाविश्वासाठी स्वर्गीय काळ होता हे नक्की! अशी चित्रशैली भारतात असती तर अनेक सोळाव्या ते विसाव्या शतकातील व्यक्ती खरोखर दिसायला कशा होत्या ते उमगले असते.
ता.क.:- शार्प ऑब्जेक्टस पुस्तक वाचत होतो. योगायोगाने या लेखातील दोन उल्लेख त्या पुस्तकात आहेत.
१. चित्र क्र ४-५ ल्युक्रेशिया बोर्जिया
२. चित्र क्र 15 artemis
21 Oct 2018 - 2:13 pm | चित्रगुप्त
@ पैलवानः
--- शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकात ल्युक्रेशिया बोर्जिया आणि artemis बद्दल नेमके काय लिहीले आहे, याची उत्सुकता आहे. वाटल्यास तेवढ्या भागाचा फोटो काढून इथे द्यावा ही विनंती.
21 Oct 2018 - 4:30 pm | तुषार काळभोर
परत पुस्तक चाळताना ल्युक्रेशिया बोर्जिया चा उल्लेख 'हत्या करणारी व्यक्ती' असा आहे. अरटेमिसचा सापडला नाही. थोडं बारकाईनं शोधतो परत. (पानाचा फोटो व्यनि ने पाठवलाय)
21 Oct 2018 - 4:46 pm | चित्रगुप्त
@पैलवानः आपण पाठवलेले पुस्तकातील पान वाचले. ल्युक्रेशियाबद्दल आतापर्यंत बहुतेक ठिकाणी वाईटच लिहीले गेले आहे. नेटफ्लिक्स वरील Borgias या सिरियल मधे तिचे सहानभूतीपूर्वक चित्रण केले गेले आहे. ११ की १४ व्या वर्षी राजकीय लाभासाठी वडिलांनी वयाने खूप मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून दिल्यापासून तिच्या जीवनाचे गाडे भरकटले. याच प्रकारे नंतर नंतर लावून दिलेली लग्ने वगैरेत तिचे एकूण ३९ वर्षांचे आयुष्य व्यतीत झाले. हे सर्व बघून-वाचून तिच्याविषयी सहानुभूतीच वाटते.
19 Oct 2018 - 7:55 am | वरुण मोहिते
सर्व भाग आज वाचून काढले . काही संदर्भ बुकमार्क करून ठेवले आहेत . पुढील भाग टाका लवकर.
19 Oct 2018 - 12:57 pm | विनिता००२
उत्सुकतेने वाचतेय :) सुरेख मालिका!
19 Oct 2018 - 1:37 pm | चित्रगुप्त
@ बबन तांबे, पैलवान, वरूण मोहिते, विनिता ००२, आभार. कथामालिका आवडते आहे हे वाचून आनंद झाला. प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठालेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.
19 Oct 2018 - 8:19 pm | ज्योति अळवणी
जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या
19 Oct 2018 - 8:19 pm | ज्योति अळवणी
जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या
20 Oct 2018 - 6:27 am | सुधीर कांदळकर
पहिले सारे भाग नव्याने वाचावे लागतात. अलौकिक चित्रांमागील इतिहास, त्यामागील कथा-दंतकथा समजून घेऊन एवढे सुंदर, आकर्षक कथानक; लेखकाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ती अलौकिक चित्रे त्या सुंदर स्वप्नातून घरबसल्या जागेपणी पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरेच अद्भुतरम्य.
अनेक अनेक धन्यवाद.
21 Oct 2018 - 2:27 pm | चित्रगुप्त
ज्योति अवलानी, सुधीर कांदळकर, अनेक आभार.
या कथामालेतील चित्रे काटेकोरपणे विचार केला, तर अगदी नेमकी त्याच काळातलीच आहेत असे नाही. उदाहरणार्थ सध्या जे कथानक चालू आहे, त्याचा काळ इ.स.१४९५ च्या आसपासचा आहे. या काळातील चित्रे त्यामानाने साधारणपणे जरा ढोबळ, अप्रगत होती. तसेच हॉलंड, फ्रान्स मधील चित्रे इटलीत उपलब्ध नसणार. कथेची एकंदरित रंजकता आणि पुनर्जागरण काळातील कलेचे दर्शन, या दृष्टीने जरा स्वातंत्र्य घेत आहे. हल्ली आपण बघतो ते सेंट पीटर्स चर्च, सिस्टाईन चॅपेल मधील मायकेल एंजेलोचे सुप्रसिद्ध चित्र १४९५ पर्यंत अस्तित्वात आलेले नव्हते. एवढ्या सुप्रसिद्ध निर्मितींचे उल्लेख मात्र कालानुसारच करणार आहे.
23 Oct 2018 - 11:20 am | श्वेता व्यास
हाही भाग अप्रतिम सर, उत्कंठा वाढते आहे, पुढील भागाच्या प्रतीक्षेत..
23 Oct 2018 - 12:05 pm | चांदणे संदीप
विंटरेस्टींग होत चाललंय सगळं!
Sandy
23 Oct 2018 - 5:55 pm | सविता००१
काका, अप्रतिम मालिका आहे ही. जगातली उत्तमोत्तम चित्रे आणि ती अशा सुरेख प्रवाही कथानकात गुंफलेली कधी वाचनात येइल असं वाटलंही नाही.
इतकी गुंतून गेले आहे या सगळ्या चित्रांमध्ये आणि कथेत की बास. लौकर कौकर पुढचे भाग येउदेत. फार उत्कंठा लागून राहते नाहीतर.
23 Oct 2018 - 8:05 pm | चित्रगुप्त
श्वेता व्यास, चांदणे संदीप, सविता, अनेक आभार. कथामाला रुचते आहे हे वाचून छान वाटते आहे.
27 Oct 2018 - 10:27 am | विवेकपटाईत
चारी लेख वाचले आहे आणि आवडलेही आहेत.
27 Oct 2018 - 1:45 pm | मदनबाण
झग्यातील गुटगुटीत पाखरं छान दिसतात ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस हाथ ले उस दे दे ये हे प्यार का हे दस्तुर... :- PYAR KA RANG - Raageshwari
1 Nov 2018 - 5:00 pm | चित्रगुप्त
@ विवेक पटाईत आणि मदनबाण, आभार.
मदनबाणः मोनालिसाच्या गूढ्स्मितासारखाच तुमचा गुटगुटीत पाखरांचा प्रतिसाद रहस्यमय वाटला. कोणत्या चित्राबद्दल बोलता ?
11 Mar 2019 - 4:18 pm | अनिंद्य
@ चित्रगुप्त,
लेखमाला एकाच बैठकीत सलग वाचायची ह्या हट्टापायी राहून गेली होती, आज सगळे भाग वाचले.
चित्र शिल्पे तर भरजरी आहेतच, शब्दशिल्पही साजेसंच आहे. आवडले.
पु भा प्र,
अनिंद्य
16 Aug 2022 - 11:21 am | चित्रगुप्त
गेल्या चार वर्षांपासून अधुरी राहिलेली ही कथामाला यावर्षी नक्की पूर्ण करायची असा निश्चय आहे.
नवीन मिपाकर या कथामालिकेचे चारी भाग वाचून अभिप्राय कळवतील, अशी आशा आहे. धन्यवाद.
22 Sep 2022 - 7:33 pm | diggi12
आम्ही वाट बघतोय
22 Sep 2022 - 8:16 pm | शाम भागवत
+१
24 Jul 2023 - 7:44 am | चित्रगुप्त
माझाच यापूर्वीचा एक प्रतिसादः
-- या प्रदीर्घ कथामालेचा पहिला भाग २१ आक्टोबर २०१७ ला प्रकाशित झाला, त्यानंतरच्या वर्षभरात आणखी तीन भाग लिहिता आले.
मात्र त्यानंतर आता जवळजवळ पाच वर्षे होत आली, तरी पुढली कथा सुचली नाही, आणि मनातून हा विषय मागे पडत गेल्याने ते आणखीनच कठीण झाले. मध्यंतरी अनेकदा लिहायचे ठरवून देखील प्रत्यक्षात ते झाले नाही.
यापुढे आपण एकच समारोपाचा भाग लिहावा, त्यात कथानायक 'लोरेंझो' हा आता वृद्धावस्थेस आलेला असून मध्यंतरीच्या अनेक वर्षांतल्या घटना सांगतो आहे, असे समजून लिहावे, असा विचार आहे, आणि हे काम लगेचच हाती घ्यावे अशीपण इच्छा आहे.
-- यापूर्वीचे चारी भाग विचक्षण वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेत, त्यांनी या शेवटल्या आगामी भागातून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी काही सूचना केल्यास फार फार चांगले होईल.
या निमित्ताने अगदी नवीन मिपाकरांना चारी भाग वाचता येऊन त्यांनाही यथायोग्य प्रतिसाद देता येतील.
-- तुमच्या अमूल्य सूचनांच्या अपेक्षेत.