आठवतेय का?
आठवतेय का?
पावसातली पहिली भेट
धुक्याची दुलई पांघरूण
लपुन बसलेली वाट
आणि तोल जाता जाता
तू हाती घेतलेला हात
ओल्या गवताळ मातीचा
थंड हुळहुळता स्पर्श
आणि भिजल्या पापण्यात
तुझ्या श्वासांची ऊब
मला उगीच असलेली
घरी जायची घाई
आणि तुझ्या आर्जवात
शहारलेली जाईजुई
डोळ्यांनीच दिलेघेतलेले
कितीतरी मुके निरोप
आणि परतीच्या वाटेवर
हरवलेली दोन मनं
आठवतेय ना?
पावसातली पहिली भेट