त्या पक्ष्याची वाट पहात आहे.....
बसेन ते झाड माझे,
शिटेन ती फांदी माझी,
असले त्याचे आक्रमण नाही!
घरटोघरटी माझी पिले
माझ्याच पिढ्या, माझेच वंश
असली माणुसकी त्याची नाही!
मैत्री कधी कुणाशी केली नाही,
पण बुडत्या मुंगीसाठी
पान टाकायचे विसरला नाही!
चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि
तोऱ्याने मान फिरवणे नाही!
पंखांचे मिटणे केवळ सुंदर
जणू मौनाचे शिल्प पुरातन!
पाय कधी दिसू नयेत
इतके त्याचे असणे प्रगाढ,
युगायुगांची पौर्णिमा उजळावी
इतके त्याचे पंख सतेज!
स्थलांतरावर जगत रहावे
इतकी त्याची तकतक नाही,
घिरट्या घ्याव्यात एकाच किनाऱ्यावर
इतके उड्डाण तोकडे नाही!
किनाऱ्या किनाऱ्याने शोधित जावे
इतका तसा तो दुर्मिळ नाही,
पण दिसत रहावा सदा आसपास,
इतका वावर सहजच नाही!
त्या पक्ष्याची वाट पहात आहे.....
या वर्षात,त्या पक्षाने परतून यावे,
इथेतिथे अधूनमधून दिसत रहावे
आमचे किनारे निळे निळे करावेत
कारण,
आताशा समुद्र काळाकाळा होत आहे!
शिवकन्या
प्रतिक्रिया
11 Jun 2016 - 11:27 am | चाणक्य
कोण आहे हा पक्षी ?
11 Jun 2016 - 3:48 pm | मारवा
पाय कधी दिसू नयेत
इतके त्याचे असणे प्रगाढ,
या ओळी सिम्पली सुपर्ब !!!!
क्लास