कविता
खोल ह्रदयात उमटला, नादमय विणेचा झंकार,
सावळे रूप विठाईचे, जाहले नयनात साकार !!
मकरकुंडले डुलती कानी, पीतांबर झळके कटीवर,
वारक-यांची वाट पाहत, उभा ठाकला विठू वीटेवर !!
टाळ मृदुंगाची धून, कानी गुंजते मधुर ,
दर्शनाची ओढ लागे, पाय चालती भर्भर !!
दोन वरीस वारी नाही, आसावले भेटीस मन,
कामात चित्त लागेना, वारीतच गुंतले ध्यान !!
वारीतला गुलाल बुक्का, उधळण भक्तीरंगाची,
पाहतसे वाट भक्तांची, चंद्रभागाही पंढरीची !!
उदास तु ही पांडुरंगा, रूक्मिणीही उदासली,
वैष्णवांच्या मेळ्यावीना, सूनी पंढरी भासली !!