डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जनातलं, मनातलं
21 Jul 2021 - 11:53 am

पुर्वपिठिका

भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

पर्णकुटीतले आम्ही दोघं व बाहेरचे माझे १८६ शिष्यगण, सर्वमिळुन एकुणात १८८ नग त्यावेळी आश्रमात होतो.
करोना काळात एवढ्या मोठ्या संख्येने ते पण मास्क न लावता आश्रमात एकत्र जमल्याचा ठपका ठेउन त्यांनी साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार आम्हा १८८ निष्पाप मनुष्यप्राण्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणी मला गुरूदेवांच्या हत्येचा संशयीत म्हणून अटक करून पुढील चौकशीसाठी पोलीस चौकीत नेले.

पुढे चालु…..

सलग १२ तास चाललेल्या माझ्या चौकशीत मी सर्व सत्य माहिती तपास अधिकाऱ्यांना सांगितली, परंतु त्यांचा विश्वास बसला नाही. ऋन्म्याने दिलेले शपथपत्र आणि पुराव्यांच्या आधारावर माझ्यावर कलम १०७ आणि ३०६ अंतर्गत सर्वज्ञानी गुरूदेवांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेऊन गुन्हा दाखल केला.

पहिल्या गुरूदेवांमुळे घनिष्ट संबंध निर्माण झालेल्या अप्पा राशिनकरांना माझ्या अटकेची बातमी शिष्यगणांपैकी कुणीतरी दिली होती. दुसऱ्या दिवशी मला कोर्टापुढे हजर करण्यााआधी अप्पा कोणातरी सदा मांडवघाले नावाच्या वकीलाला घेऊन पोलीसचौकीत आले होते.

सदा मांडवघाले वकीलांनी लॅाकअप मधे येउन “भिऊ नका मी तुमची केस लढणार आहे” अशा धैर्यदायक शब्दात उगाचच माझे सांत्वन करून वकालतनाम्यावर माझी सही घेतली. “आज जामीन घेऊनच टाकू“ असे अश्वासन देउन ते अप्पांना घेउन इन्सपेक्टर संग्राम सुर्यवंशी आणि लेडी कॅान्स्टेबल सकपाळ मॅडमशी माझ्या केसबद्दल चर्चा करायला निघुन गेले.

कोर्टात दोन्ही बाजुंकडुन जोरदार युक्तीवाद झाले. तपास यंत्रणांनी केलेली माझ्या २१ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी आणी सदा मांडवघाले वकीलांनी केलेली माझ्या जामीनाची विनंती फेटाळून मला २१ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि माझी रवानगी पुन्हा एकदा आर्थररोड जेल मध्ये झाली.

तिथे पोचताच जेलर साहेबांनी मला लगेच ओळखले. अवघ्या काही महीन्यांनी पुन्हा आमची जेलमधे भेट झाल्याच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वॅार्डनला सांगुन १८८ क्रमांकाच्या टीव्ही, पलंग, पंखा असलेल्या आरामदायक बराकीत माझी व्यवस्था त्यांनी केली. मला देण्यात आलेल्या कैद्याच्या कपड्यांवरचा क्रमांकही नेमका १८८ होता.

वॅार्डन बरोबर माझ्या बराकीकडे जाताना वाटेत येरवडा जेलमधुन गेल्या आठवड्यात इथे हलवलेल्या काही दिड शहाण्या गुंड कैद्यांनी नवीन पाखरू समजून माझे रॅगींग करायचा प्रयत्न केला, पण वॅार्डननी त्यांना समज दिली.

या तुरूंगात जन्मठेप कापत असलेले पप्पु पेजर, मुन्ना मोबाईल, येडा अन्ना, गुरू गुलाब खत्री, करीम हटेला, बनियन फटेला असे कुख्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अपकिर्तीचे गॅंगस्टर्स माझे चेले आहेत हे वॅार्डनने त्यांना सांगीतल्यावर त्या अतिशहाण्यांची बोबडीच वळली. माझ्यासमोर लोटांगण घालुन ते क्षमायाचना करायला लागल्यावर मी देखील उदार अंत:करणाने त्यांना क्षमा करून टाकली.

पप्पु पेजर, मुन्ना मोबाईल, येडा अन्ना, गुरू गुलाब खत्री, करीम हटेला, बनियन फटेला वगैरे वगैरेंना ठेवलेल्या १८८ क्रमांकाच्या बराकीत आम्ही पोचल्यावर त्या मंडळींनी असा काही जल्लोष करून माझे स्वागत केले की मला एकदम भरूनच आले!
स्वॅग से करेंगे सबका स्वागत या गाण्यावर आपला हुद्दा, कर्तव्य विसरून वॅार्डन साहेबांनी त्यावेळी केलेले बेभान नृत्य तर कहर होते.

आनंदाच्या भरात पेटवलेल्या असंख्य चिलमींतुन निघणारा धुर, नाच गाणी, टाळ्या, शिट्ट्यांनी जेलचे वातावरण ऊल्हासीत झाले होते.

दोनेक तासांनी उन्माद कमी झाल्यावर सगळ्या भाई लोकांनी माझ्या पुन्हा तिथे येण्या विषयी विचारपुस केली. मला फक्त २१ दिवसांची कोठडी मिळाल्याचे ऐकुन बिचाऱ्यांचा हिरेमोड झाला. मलाही थोडे वाईट वाटले! कोण कुठली ही लोकं? मागे काही आठवड्यांसाठी अंमली पदार्थ सेवन प्रकरणी इकडे यांचा थोडा सहवास लाभला होता. पण कीती तो जिव्हाळा माझ्याबद्दल!

However, इथे या लोकांच कीतीही प्रेम मिळणार असलं तरी मला माझ्या ध्येयापासुन दुर जाऊन चालणार नव्हते. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला सर्वज्ञानी गुरूदेवांना शोधून काढणे भाग होते. जग काहीही म्हणुदे पण माझे मन मला सांगत होते की पेट्रोल पंचमीची साधना करण्याचा आत्मघातकी मुर्खपणा गुरूदेव करणे शक्यच नाही! कुठेतरी पाणी मुरतय, कुठे मुरतय ते शोधून काढणे हे माझे काम होते.

त्यातल्या त्यात थोडा थंड डोक्याचा म्हणून मी मुन्ना मोबाईलशी या विषयावर बोललो आणी मला एक स्मार्टफोन मिळवून देण्याची विनंती केली. त्याने ताबडतोब त्याच्या एका पंटरचा फोन मला दिला आणि उद्या कल्लु मामाला सांगुन नवीन लेटेस्ट मॅाडेलचा फोन मागवुन देण्याचे अश्वासन दिले आणि ते पुर्ण केले.

पुढचे दोन दिवस मी देश विदेशातल्या आमच्या लाईनीतल्या झाडुन सगळ्या बाबा, बुवा बायांना फोन केले पण कुणालाच त्यांची शष्प माहिती नव्हती. दोन दिवसांत काहीच धागेदोरे हाती न लागल्याने मी थोडा निराश झालो होतो, तेवढ्यात आजुबाजुच्या पंटर्स पैकी कुणाच्यातरी तोंडात वडापावचे नाव आले आणि मला आशेचा एक किरण दिसला.

मनांत एक कल्पना चमकली आणि माझ्या दोन्ही गुरुदेवांचा ज्या संकेतस्थळावर वावर होता त्या "वडापाव. कॉम" संकेतस्थळाचे सदस्यत्व घेण्यासाठी मी अर्ज केला! आणि काय चमत्कार; अहो एकवेळ युके चा व्हिसा पहिल्या फटक्यात पंधरा वीस दिवसात मिळेल पण ज्याचे सदस्यत्व मिळण्यात अनेकांची उमेदिची अनेक वर्षे निघून जातात अशा "वडापाव. कॉम" चे सदस्यत्व मला काही तासांत मिळून गेले. गुरुकृपा दुसरे काय!
जय गुरुदेव!!

मी अधाशीपणे तिथले गेल्या काही महिन्यांतले सगळे लेखन उपसुन काढले, पण व्यर्थ! सर्वज्ञानी गुरूदेवांचा तिथे प्रत्यक्ष वावर आढळला नाही. पुन्हा नैराश्य मला घेरणार तेवढ्यात त्यांच्यापाशी असलेल्या परकाया प्रवेश सिद्धीचे स्मरण झाले आणि दुसऱ्या कुठल्या आयडीत शिरून त्यांचा संचार सुरू आहे का त्यादृष्टीने तपास सुरू केला.

माझ्या २१ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली पण माझे गेल्या काही महिन्यांत वडापाव. कॉम वर प्रसिद्ध झालेले सर्व साहित्य वाचुन पुर्ण झाले नाही.

ऋन्म्याने पुरावा म्हणून दाखवलेल्या राखेच्या ढिगाऱ्याची फॅारेंसीक तपासणी केल्यावर तज्ञांनी दिलेल्या अहवालात त्या राखेत कुठलेही मानवी अवशेष आढळून आले नसल्याचा निर्वाळा दिला होता.
२१ दिवसांनी मला पुन्हा कोर्टात हजर केल्यावर माझे वकील सदा मांडवघाले यांनी फॅारेंसीक तपासणी अहवालाच्या आधारावर आक्रमकपणे युक्तीवाद करून नाहक मला तुरूंगवास घडवल्याबद्दल तपासयंत्रणांचे वाभाडे काढले आणि संबंधितांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची धमकीही दिली.

कोर्टाने त्यांचा युक्तिवाद मान्य करून तपासयंत्रणांच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढले. पुन्हा “निर्विचारातुन विदेहत्वाकडे” सारखे वाह्यात लेखन न करण्याची मला तंबी देउन पुराव्याअभावी माझी या प्रकरणातुन निर्दोष मुक्तता केली!

माझ्या सुटकेची वार्ता सोशल मिडिया वरून हा हा म्हणतां जगभरातल्या माझ्या अनुयायांपर्यंत पोचली आणि त्यांच्या आनंदाला उधाण आले. निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या शिष्य आणि भक्तगणांनी आश्रमापर्यंत वाजत गाजत माझी स्वागतयात्रा काढली.

आश्रमात पोचल्यावर सर्व शिष्यगण निरूपद्रवी पदार्थांचे अमर्याद सेवन करून आनंदोत्सव साजरा करण्यात गुंग झाल्याची संधी साधून मी आणि बुसाबा आनंद समाधीत रममाण होण्यासाठी हळुच माझ्या खाजगी पर्णकुटीत शिरलो.

चार रात्री आणि तीन दिवस लागलेली आमची आनंद समाधी साक्षात राज्याचे मुख्यमंत्री आमच्या दर्शनासाठी आश्रमात आल्याने भंग पावली.
मिडिया वाल्यांच्या कॅमेरा समोर माझे चरणस्पर्ष करून, केंद्राच्या अखत्यारीतील सी.बी.आय. ने आपल्या पोलीस खात्याच्या खांद्यावर बंदुक ठेउन केलेल्या कारवाईमुळे तुमच्या सारख्या संत महंताला कसा नाहक त्रास झाला वगैरे वगैरे भाषणात मोजून १८८ वेळा माझी माफी मागत आपला राजकीय हेतु साधुन ते लवाजम्यासहीत चालते झाले.

आता जेलमधे अपुरे राहीलेले शोधकार्य पुन्हा सुरू करणे भाग होते.

माझ्या खाजगी पर्णकुटीतला लॅपटॉप उघडून मी पुन्हा वडापाव. कॉम वरचे साहित्य वाचायला नव्या जोमाने सुरूवात केली.

अनेक अल्पज्ञानी, ज्ञानी. महाज्ञानी प्रभुतींचे साहित्य वाचुन काढले. पण सर्वज्ञानी गुरूदेवांसारखी तेज धार कुणाच्याही लेखणीत दिसुन आली नाही.

शोधकार्यात कुठली उणीव रहायला नको म्हणून टिनपाट वाद चर्चाही वाचुन काढल्या. त्यात हिरीरिने सहभागी होणारे अनेक विध्वानही जोखुन पाहिले पण छे, सर्वज्ञानी गुरूदेवांची सर नाही कुणाला!
त्यात चर्चेपेक्षा दोन विरोधी पंथीयांची भांडणेच जास्त असायची. अमुक पंथीय तमुक पंथीयांना आणि त्यांच्या श्रद्धास्थानांना शिव्याशाप द्यायचे तर तमुक पंथीय अमुक पंथीयांना आणि त्यांच्या श्रद्धास्थानांना शिव्याशाप द्यायचे! सार्वजनिक नळावर तावातावाने भांडणाऱ्या खेडवळ बायका जणू!

सुरूवातीला आमच्या अतिसुक्ष्मपंथी अध्यात्मात ज्याला अनन्यसाधारण महत्व आहे तो क्रमांक नावापुढे लावलेल्या एका प्रभुतीने आमचे लक्ष वेधून घेतले होते. पण आचार्य पापा रणजीत यांचा “सुक्ष्मातुन अतिसुक्ष्माकडे” या महान ग्रंथाचा आणि या प्रभुतींचा दुरान्वयेही काही संबंध आलेला नसून हा क्रमांक त्यांनी निव्वळ हौसेखातर किंवा अपघाताने आपल्या नावापुढे जोडला असावा हे आम्ही झटक्यात ओळखले.

तसा दोन आयडींपैकी एका किंवा त्या दोन्ही आयडींच्या रूपाने आजही गुरूदेव तीथे वावरत असल्याचा आम्हाला दाट संशय आलेला आहे, पण अजुन पक्की खात्री झालेली नाही!

असाच एका प्रसन्न सकाळी वडापाव. कॉम वर गुरूदेवांचा शोध घेत असताना एक तेजस्वी सहित्य लेख रूपाने आमच्या दृष्टीस पडले.
चाचा आणि बापु अशा भारतीयांनी उगाचच डोक्यावर चढवून ठेवलेल्या दोन टुकार व्यक्तींचा पर्दाफाश करणारा तो महान लेख वाचला आणि आमच्या मनुष्यजन्माचे सार्थक झाले.

काय ती सुसंस्कृत भाषा आणि काय ती दिव्य लेखनशैली ! आहाहा.. आहाहा..
थोडी वारूणी प्राशन केल्यावर असे तरल जळजळीत विचार झरझर लिहुन काढता येतात असा गौप्यस्फोटही त्या लेखात केला होता. स्वतंत्र्यपुर्व कालात या विदुषी लिहीत्या असत्या तर लोकमान्यांना आपल्या जहाल लेखनाबद्दल न्यूनगंड येऊन त्यांनी केसरीची घुरा या विदुषींच्या हाती सोपवून स्वत: काशीयात्रेला निघुन गेले असते या बद्दल आमच्या मनांत तीळमात्र शंका नाही!

आमच्या पहिल्या गुरूदेवांसारखे अशुद्ध लेखन व विस्कळीत लेखनशैली आणि दुसऱ्या गुरूदेवांपेक्षा काकणभर सरस अशी उद्धट भाषा आणि सर्वज्ञानीपणाचा आाव अशी आमच्या पुर्वाश्रमीच्या दोन्ही गुरूंची गुणवैशिष्ट्ये या विदुषींच्या ठायी एकवटलेली आम्हाला दिसली.
तो लेख वाचताक्षणीच आम्ही सर्वज्ञानी गुरूदेवांचा गंडा तोडुन टाकला आणि या नव्या गुरूमैयांचे एकतर्फी शिष्यत्व पत्करून टाकले.

“हसाना मातेऽऽऽ या शिष्योत्तमास आपली दिक्षा देउन उपकृत करावे” असा प्रतिसाद त्या तेजस्वी लेखावर आम्ही टंकला आणि प्रकाशित करा नावाची कळ दाबली.. पण हाय रे दैवा! वडापाव. कॉम च्या नियामक संस्थेने अविश्वसनीय जागरूकता दाखवत प्रकाशित झाल्यापासुन अवघ्या काही मिनीटांत तो लेख अदृष्य करण्याची किमया करून दाखवली. यावरून तो लेख किती तेजस्वी असेल याची कल्पना तुम्हाला आलीच असेल!

तर मंडळी, आता थोड्या काळासाठी तुमचा निरोप घेतो. मला माहिती आहे तुम्हाला माझ्या नव्या गुरूमैयांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे पण बुसाबा समाधीअवस्थेत जाण्यासाठी माझ्या खाजगी पर्णकुटीत माझी आतुरतेने वाट पहात असेल. समाधीतुन बाहेर येताच तुम्हाला पुढची ष्टोरी सांगायला मी पुन्हा येईन.

गुरूमैयांनी मला दिक्षा दिली का?
गुरूमैयां कडुन मी काय नवीन शिकलो?
व्यापक लोककल्याणाचा कोणता मार्ग गुरूमैयांनी दाखवला आहे?

अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला नक्की मी पुन्हा येईन!

तुम्हाला हक्काने ताटकळवत ठेऊ शकतो पण बुसाबाला नाही!

जय हो गुरूमैया की!!!

क्रमश:

----------
विशेष सूचना (तीच आपली नेहमीची) - सदर लेखन वाचून खरोखरीच कोणाच्या डोक्याला शॉट लागल्यास लेखकाचा उत्तरदायित्वास नकार लागू :P

अतिविशेष सूचना -

सर्व पात्रे आणि नावे काल्पनिक आहेत. त्यांचा कुठल्याही जिवंत अथवा मृत अथवा पुनर्जन्म झालेल्या व्यक्तींशी संबंध नाही. तरी संबंध अथवा साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

वरील लेखनाचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा उपमर्द करणे नसून निव्वळ मनोरंजनात्मक आहे.

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यधर्मइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रआईस्क्रीमआरोग्यउपहाराचे पदार्थओली चटणीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थग्रेव्हीडावी बाजूपारंपरिक पाककृतीमत्स्याहारीमांसाहारीमेक्सिकनऔषधोपचारभूगोलदेशांतरवन डिश मीलवाईनव्यक्तिचित्रणशेतीसिंधी पाककृतीगुंतवणूकसामुद्रिकमौजमजास्थिरचित्रप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षालेखसल्लाप्रश्नोत्तरेविरंगुळा

प्रतिक्रिया

गड्डा झब्बू's picture

21 Jul 2021 - 11:54 am | गड्डा झब्बू

जय हो गुरूमैया की!!!

Rajesh188's picture

21 Jul 2021 - 12:09 pm | Rajesh188

तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले.
गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती.
धन्य ते गुरुदेव!

नि३सोलपुरकर's picture

21 Jul 2021 - 12:26 pm | नि३सोलपुरकर

गुरूमैयांनी मला दिक्षा दिली का? ...वाचण्यास उत्सुक.

जय हो

येत्या श्रावणी

ऐका हसाना माता तुमची कहाणी,

आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे...

...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण.

असे काही अवश्य वाचायला मिळो

_/\_
गुरूमैया की जय

रंगीला रतन's picture

23 Jul 2021 - 1:55 pm | रंगीला रतन

||बोलो हसाना माते की जयऽऽऽ||
मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :)
एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध!

पुभाप्र.