कविता

#तू म्हणालास...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
18 May 2021 - 9:28 am

तू म्हणालास, पाऊस मला मुळी सुद्धा आवडत नाही.
चिखल ओला सगळीकडे, एक काम होत नाही.

ऐकून इकडे माझ्या डोळ्यात काळे ढग जमून आले.
बरसणार होतेच पण मी निग्रहाने घालवून दिले.

पाऊस म्हणजे वेडेपणा, खूप मस्ती तुझ्या कुशीत,
पाऊस म्हणजे कटींग चहा अर्धा कप अर्धा बशीत.

पाऊस म्हणजे चिंब मी, थोडी धीट थोडी भित्री.
पाऊस म्हणजे आशिकीच्या पोस्टरवरची मोठ्ठी छत्री

पण तुझ्यासारखं असं कुणी पावसावरती रुसतं का?
भिजणं बिजणं सोडून कोरडं पावसात घरी बसतं का?

भावकविताकवितामुक्तक

पॉझिटिव्ह - निगेटिव्ह

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
17 May 2021 - 10:25 am

पॉझिटिव्ह - निगेटिव्ह

पॉझिटिव्ह निगेटिव्हचा खेळ,
जणु फुली अन् गोळा,
सर्वांच्याच स्वप्नांचा,
करतोय चोळामोळा...

कोणीही आता कोणाकडे,
जराही नाही फिरकत,
प्रत्येकाच्या मनात लपलीय,
मृत्यूची मोठी दहशत...

पशुपक्ष्यांची भरते शाळा,
ते करती सारे मजा,
बंदिवान झालीत माणसं,
भोगतात घरी सजा...

कधी सारं संपेल,
घेईन मोकळा श्वास,
मानवाच्या अंतरीची,
ही एकच आस...

ह्या नियतीची क्रूर परीक्षा,
पुरे झाली आता,
देवा लवकर धाव घे,
तूच आमचा त्राता.....!!

जयगंधा..
१७-५-२०२१.

कविता

सांग कधी कळणार तुला (विडंबन)

OBAMA80's picture
OBAMA80 in जे न देखे रवी...
16 May 2021 - 6:01 pm

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला?
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला?
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला? /१/

गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला?/२/

निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला?/३/

कविताचारोळ्याविडंबन

मधाळलेल्या कुण्या मिठीची...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
14 May 2021 - 2:48 pm

मधाळलेल्या कुण्या मिठीची
चव लाघवी पीठीसाखरी,
झळा भोवती वैशाखी तरी
गोड सावली आम्र पाखरी.

एकच पुरतो कटाक्ष तिरका
नजर अशी की तिख्खी मिर्ची,
पेटवते मग रंध्रांध्रातून
अन्वर ज्वाला आसक्तीची.

दातांचा तो चिमणी चावा
करकरीत जणु कैरी कच्ची,
शिरशिर अंगी हवीहवीशी
कशी लपावी नाजूक नक्षी?

स्पर्श असा की शामक अमला
तनामनाचा दाह उतारी,
कषाय जणू तो प्याल्यामधला
क्षणात देतो कशी उभारी.

खट्ट्या मिठ्ठ्या श्वासांमध्ये
शब्द बिचारे हरवून जाती.
नमकीन काही घडून जाते
अर्थ उगाचच शोधत बसती..

कविताप्रेमकाव्य

आज जरी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 May 2021 - 11:23 am

चंद्रधगीने रातराणी
उत्फुल्लपणे-
परिमळेल तेव्हा

व्याधविद्ध मृगशीर्ष जरासे
मावळतीवर-
ढळेल तेव्हा

केतकीत नागीण निळी
टाकून कात-
सळसळेल तेव्हा

नि:शब्दांची धून खोलवर
रुजून ओठी-
रुळेल तेव्हा

वास्तवतळिचे अस्फुट अद्भुत
कणाकणाने-
कळेल तेव्हा...

....वीज शिरी
कोसळली तरीही,
सावरेन मी

अद्भुत अवघे विरून, वास्तव
क्षणोक्षणी मग-
छळेल तेव्हा...

....आज जरी
निष्पर्ण तरी
बहरेन उद्या मी

कविता माझीकवितामुक्तक

काही बोलायचे आहे ( विरसग्रहण)

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जे न देखे रवी...
11 May 2021 - 9:39 am

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

हाय का डेरिंग बोलायचं? डेरिंगच नाय तर कसा बोलशील. अन डेरिंग करुन बोललाच तर फुकाट जोड खाशीन याच भ्याव हाये ना. आन नको तोलु देवळाच्या दारात भक्ती. भक्तीत खोट निघाली तर चारचौघात खोटा पडशीन!

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही

विडम्बनकविताविडंबन

देव

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
5 May 2021 - 3:01 pm

देव म्हणजे हवा, नाही अगरबत्तीचा सुगंध
तो अन्नात आहे, उपवासात नाही.
देव दानशूर मोठा, लाचार नाही
न्यायी आहे देव, नवसाचा व्यापारी नाही.

देव आहे सदाचारात, अन्यायाचा शत्रू
देव मुहूर्त नाही, अनंत काळ आहे.
देवही भक्त आहे, भावाचा भुकेला
देव नाही खजिनदार-पुजारी.

देव देवळात नाही फक्त, आहे सगळीकडे
देव दाढीत नाही, शेंडीतही नाही.
जीवन देव आहे, मृत्यूही तोच
प्रचारात देव नाही, तो प्रकांड आहे.

देव म्हणजे गंभीर गोष्ट
माणूस त्याची गंमत करतो.
गुलाबजाम जणू पाकातला
हलवायाची व्याख्या करतो.

अव्यक्तजाणिवभक्ति गीतमुक्त कविताश्रीगणेशधर्मकवितासाहित्यिक

......अजूनही !

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
4 May 2021 - 8:21 am

......अजूनही !

आसमंत व्यापून टाकलेल्या त्या मखमली ढगांमधून
वीज चर्र्कन धरणीमध्ये निघून जावी ....
------असेच त्यांचे ते शेवटचे शब्द ....
सगळं काही भेदून
विस्कळीत करून टाकणारे..... अगदी क्षणार्धात !

स्वप्नांनी तुडुंब भरलेल्या आपल्या मनाला .....
अगदी रिक्त करून डोहाच्या तळाशी नेऊन ठेवल्यासारखे !

आता सगळं अगदी रिकामं झालंय .....

जे ते जिथल्या तिथल्या किनाऱ्यावर सोडून
खळाळत निमूटपणे वाहणाऱ्या नदीसारखी ....
मीही वाहत आहे आता ...... एकटीच !

कविता

जपून ठेव!

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
1 May 2021 - 12:08 am

मी जरा बाहेर जातोय
माझे शब्द जपून ठेव.

काही तुला आवडलेले
काही मुद्दाम न वाचलेले.
रात्रीचे, पहाटेच्या स्वप्नांतले
बोललेले आणि अबोल राहिलेले.

अर्थाच्या शोधात पडू नको
तो मलाही लागत नाही.
आता शब्दही तुझेच आहेत
माझा कोरा कागद पतंग व्हायचं म्हणतोय.

अलगद हाताळ या शब्दांना
मुलायम असले तरी घावही घालतात.
दिसत नाहीत नेहमीच पण असतात जरूर
अश्वत्थाम्याप्रमाणे शब्दांनाही शाप आहे अमरत्वाचा.

अव्यक्तआयुष्यजीवनकविता

सवय

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 Apr 2021 - 8:43 pm

साखरझोपेच्या डोळेजड सीमेवरून
हाकारणार्‍या अनघड कल्पनांची
वास्तवाच्या धगीत
कापूरवाफ होताना बघण्याची
आता सवय करून घेतोय

मास्कावगुंठित श्वासात
अवकाळी पावसाचा विषण्ण मृद्गंध
ऊरफोड भरून
पाऊसगाणे गाण्याची
आता सवय करून घेतोय

हताशेच्या महासाथीची "न"वी लाट
सकारात्मक विचारांच्या प्लासिबोने
नेस्तनाबूत होईलच
हे स्वत:ला वारंवार पटविण्याची
आता सवय करून घेतोय

मुक्त कविताकवितामुक्तक