उतरत्या संध्याकाळी....
उतरत्या संध्याकाळी खिडकीत बसू नये.
हरवल्या नजरेला काही काही दिसू नये.
चुलीपाशी दुधावर साय दाटे आठवांची,
धुरकट कंदिलाची काच तेव्हा पुसू नये.
उतरत्या संध्याकाळी नको ओवी गुणगुणू,
उतू उतू जाईल गं काळजाचा मेघ जणू.
सरेलही सांज बघ, नको भिजवूस वाणी.
हूरहूर अंतरीची नको बघायला कुणी.
उतरत्या संध्याकाळी वळ थोड्या फूलवाती.
जपताना धागा धागा धर थोडी राख हाती.
मिटुनिया डोळे हळू लाव दिवा अंगणात,
इडा पिडा टळो सारी समईच्या प्रकाशात..