कविता

आयुष्य

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
28 Dec 2021 - 5:22 pm

डिसेंबर हा आला, चालला
जाता हाती काय उरेल ? ,
तारखा वार ते तसेच असतील,
आयुष्यही हे असेच सरेल !!

अशीच वर्षे येतील जातील,
एकवीस गेले बावीस येईल,
आयुष्य असेच वाहत राहील
न कळे कुठे मुक्कामी नेईल !!

कशास हवे मनावर ओझे,
नकोशा चिंतांचे वाहणे,
आयुष्य सरण्याआधी आपली
पुण्याची ती झोळी भरणे !!

आपुल्या न हाती काही,
तरीही फुकाचे 'मी' मीपण,
आनंद वाटत जगताना ,
मनात असावे ईश स्मरण !!

-वृंदा

कविता

कळले तुजला?

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
28 Dec 2021 - 8:23 am

कारण काढून भेटायाचे
किती दुरूनी आलेला तू!
लपवलेस तू मनातले तरी
किती बाभरा झालेला तू!
कळले मजला...

विचारसी तू देऊन हाती चित्रे काही
सापडते का यांच्यामधले लपले अक्षर?
इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे
आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर
कळले तुजला?

मधुभासांचे रिंगण पडले सभोवताली
गोंधळले मी तुझा गंध का होते अत्तर?
केसांवरती तव श्वासांची मोहक फुंकर
क्षणाक्षणाला वितळत होते मधले अंतर
कळले तुजला??

मुक्त कविताकवितामुक्तक

चिंब

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
27 Dec 2021 - 3:08 pm

वृक्ष जसा -
अंकुरण्या आधी
बीजस्वरूपी
अस्फुट असतो

बाण जसा-
सुटण्याच्या आधी
प्रत्यंचेवर
सज्ज राहतो

मंत्र जसा -
स्फुरण्याच्या आधी
बीजाक्षरी
निद्रिस्त राहतो

अर्थ तसा
उलगडण्या आधी
शब्दांच्या
निबिडात राहतो

ओथंबून मग
येतो अवचित
कोसळतो अन्
चिंब भिजवितो

मुक्त कविताकविता

शीर्षक सुचले नाही

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
21 Dec 2021 - 12:18 pm

झोप येईनाच आज
झोप हवी असताना
जांभयाच्या येती लाटा
वर तारे मोजताना

काय आणून वहावे
निद्रादेवीच्या चरणी
झोप येऊन निवांत
उद्या उजाडेल झणी

किती थकून भागून
देह दिला पसरून
डोळ्यात बाहुल्यांना
काय दिसते अजून?

दिसे कालचा प्रकाश
अन्, तम भेसूर उद्याचे
त्यांच्या मध्ये भांबावले
पाऊल हळव्या झोपेचे

एक मायेचा, माथ्याला
हवा सांगणारा हात
सोड उद्यावर, नीज
खूप झाली आहे रात

- संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)

कविता माझीरतीबाच्या कविताशांतरसकविता

मालाडचा म्हातारा...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
19 Dec 2021 - 9:40 pm

म्हातार्‍याचे भिरभिर डोळे-
आठवणींचा भुगा भुगा
छटाक उरले खोड, पोखरी
कभिन्न काळाचा भुंगा

म्हातार्‍याचे वखवख डोळे-
लवथव गोलाई बघती
दारु संपला जसा फटाका
दावू न शकतो स्फोटभिती

म्हातार्‍याचे टपटप डोळे-
पापणीत पाऊसमेघ
जसा वळीव कोसळतो कधिही
तसा कढांचा आवेग

म्हातार्‍याचे विझुविझू डोळे-
पैलतिरी काऊ बघती
कोकुनी हाकारितो अहर्निश
उडून जा त्याला म्हणती

मुक्त कविताकविता

किचनमधून ती सांगते

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जे न देखे रवी...
18 Dec 2021 - 5:32 pm

किचनमधून ती सांगते, पोहे करते आहे
मी धावत जाऊन, शेंगदाणे तळून देतो

किचनमधून ती सांगते, पुलाव करते आहे
मी धावत जाऊन, भाज्या बारीक चिरून देतो

किचनमधून ती सांगते, वरण करते आहे
मी धावत जाऊन, फोडणी करून देतो

किचनमधून ती सांगते, चहा ठेवते आहे
मी धावत जाऊन, चहा तयार करून घेतो

किचनमधून ती सांगते, काहीतरी नवीन करते आहे
मी शांत राहून, मनाची तयारी करून ठेवतो

-- घरून काम करताना.

कैच्याकैकविताकविता

कोळीगीतः समींदरा, जपून आण माझ्या घरधन्याला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
18 Dec 2021 - 2:09 am

समींदरा रे समींदरा,
तू जपून आण माझ्या घरधन्याला
लई दिवसांन परतून येईल घराला ||धृ||

नको उधाण आणू तुज्या पाण्याला
नको मस्ती करू देऊ वार्‍याला
काय नको होवू देऊ त्याचे होडीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||२||

नारळ पौर्णिमेचा सण आता सरला
तुला सोन्याचा नारल वाढवला
नेल्या होड्या त्यानं मासेमारीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||३||

मी कोलीण घरला एकली
सारं आवरून बाजारा निघाली
म्हावरं विकून येवूदे बरकतीला
तू जपून आण माझ्या घरधन्याला ||४||

festivalskokanकोळीगीतसंस्कृतीनृत्यसंगीतकविताप्रेमकाव्यसमाजजीवनमानमत्स्याहारी

" समजूत "

रश्मिन's picture
रश्मिन in जे न देखे रवी...
13 Dec 2021 - 4:37 pm

जरी नाहीस समोर तू, कायम सोबत असतेस तू ..
एकांत रात्री ही सरतात सहज, कारण स्वप्नांमध्ये असतेस तू ..

माझ्या ध्यानी मनी वसतेस तू, सुंदर विभ्रम करतेस तू ..
कल्पांती नेतील प्रेमदूत माझे, मला मोहित करतेस तू !

वाऱ्याच्या झुळूकेबरोबर येतेस तू ,
आरशातही पाहताना दिसतेस तू ..
पण प्राण अडकतो श्वासात,
जेव्हा अवचित कधी दिसतेस तू !

अव्यक्त राहूनही जिंकतेस तू, कधीही कशीही आवडतेस तू ..
कोरडी पडली होती जीभ सांगताना, "मला खूप आवडतेस तू" !

थोडी गडबडलीस तू, तरीही माफी मागत होतीस तू ..
"मला नाही जमणार" सांगताना, मात्र निर्विकार होतीस तू !

कविता

तुझे गाणे

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
12 Dec 2021 - 11:51 am

मी पाऊस झालो सखे
तू माती होशील का?
स्पर्शाने माझ्या अलगद
तू सुगंध होशील ना?

मी दरीत येऊन पडलो
तू वारा होशील का?
शीर्षासन करून मग मी
जग पायाखाली घेईल ना.

तू रात्र अबोली हो ना
मी चंद्र सखा तुज भेटेल.
तू पहाट होशील तेव्हा
मी तुझ्याच कुशीत झोपेन.

सुख बिंदू झेलायला
तू गवताचे पाते हो ना.
आयुष्याच्या धक्क्यांना मग
मी अलगद सोशीत जाईल.

जरी विस्कटली घडी जीवनाची
तू अशीच हसरी राहशील?
मी वचनाने मज बांधून घेतो
हे गाणे तुझ्याच साठी गाईल.

प्रेम कवितामाझी कवितामुक्त कविताकविताप्रेमकाव्य

ऐसे ऐकिले आकाशी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 Dec 2021 - 11:06 pm

(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा
वितान अवकाशाचे व्यापून-
अचूकतेची लय सांभाळीत-
परस्परांशी अंतर राखून-
कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो,
फिराल तुम्ही अथकपणाने
विश्वांताचा क्षण आला तरी
अमुच्या आभासी पण तरिही
अभेद्य ऐशा बेड्या घालून?"

(२) पिठूर केशरी चंद्रधगीने
स्फटिकतळ्यातील मासोळीला
म्हटले बिलगून जललहरीतून,
"झगमगणारे लोलक दाहक
त्वचेवरून देशील का काढून?
मावळतीवर जेव्हा तारे-
भल्या पहाटे फिक्कट होतील-
तेव्हा त्यांना तेज त्यातले
थोडे थोडे देईन वाटून"

मुक्त कविताकविता