युगांतर आरंभ अंताचा भाग १४
ऱथ महाली पोचला. भीष्म व्यथित मनाने आपल्या कक्षात जाऊन बसले. 'गुरुंनी केलेले शाब्दिक आघात, त्यांचा अपूर्ण राहिलेला न्याय, आपल्यामुळे दुखावलेली, उधवस्त झालेली अंबा..... ! हस्तिनापूरा, वचनबद्ध नसतो, तर गुरुंवर हत्यार चालवण्याचे महापाप करण्याआधीच इच्छामृत्यू घेतला असता मी!'
विचित्रवीर्य तोल सांभाळत भीष्मांच्या कक्षाबाहेर आला, "भ्राता भीष्म...." त्याच्या हाकेने विचारांतून बाहेर पडत भीष्मांनी मागे वळून बघितले. उठून त्याला धरत आसनावर बसायला भीष्मांनी मदत केली,"युवराज, आपण का आलात? मला बोलावले असते.... मी सेवेत हजर झालो असतो."