सुदामा
काय वर्णन करू, त्या पामराचे
सदनी दारिद्र्य, अठरा विश्वाचे
जाहला गृहस्थ, पाश गरिबीचा
स्मरे परंतु मेळा, गोकुळाचा ll १ ll
दशा वाईट, भविष्य होय अंध
उदर भरण्या, रोजचा आक्रंद
स्मरणात तरी, होता गोपालवृंद
इच्छा पाहण्या, पुन्हा तो मुकुंद ll २ ll
करुनी विचार, निश्चय केलासे
मनोमनी स्मरण, माधवाचे
भेटस्वरूप काय, मित्रास न्यावे?
कल्लोळ मनी, त्यास काय आवडावे ll ३ ll
घरात नाही, एकही उपलब्ध दाणा
कृष्णाचा मित्र, उगीच का रे म्हणा !
शिळे पोहे पुरचुंडी, घेतली शेवटी
त्याच्या ठायी, तीच शक्य होती ll ४ ll