भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीचे व. पु. नी केलेले "जिंदादिल' रसग्रहण ऐकत पडलो होतो. "आहे स्मृतींचा गंध येथे....... असा शेर ऐकता ऐकता डोळा लागला. जाग आल्यावर स्मृतींचा गंध ,गंधांच्या स्मृती असे उलट सुलट काहीतरी आठवू लागले.आणि अचानक अनेक गंधांच्या आठवणी जाग्या झाल्या. अगदी पहिला स्मृती गंध आला तो मधुमालतीचा. अगदी लहानपणीच या फुलाशी परिचय झाला. खेडच्या लक्ष्मी नारायण मंदिरा भोवती बागडण्यात सारे लहानपण गेले. घराकडून देवळाकडे जाण्याच्या वाटेवर मार्च एप्रिल महिन्यात मधुमालती बहरलेली असायची. राम नवमीचे दिवस आले कि दिवस रात्र देवळातच असायचो. जाता येता मधुमालतीचा सुवास यायचा. तेव्हा त्याचे काही विशेष वाटायचे नाही पण परवा घरी परतताना मंदसा सुगंध आला, आणि मधुमालती बरोबरच सारे बालपण आठवले. परीक्षा झाल्या कि सुसेरी नदीत डुंबायला जाण्याचा कार्यक्रम ठरलेला.नदीकडे जायची वाट दगड मातीची आणि दोन्ही बाजूला मेंदीचे कुंपण असायचे. मेंदीला तुरे आले कि सगळी वाटच गंधमय होऊन जायची. नदीत डुंबून परतताना ओले कपडे पिळले कि तापलेल्या मातीतून येणारा मृदगंध आणि मेंदीच्या फुलांचा वास यांचा मीश्र सुवास मनात कायम घर करून राहिला आहे.
लहानपणी दारावर रायवळ आंबे टोपल्या भरून विकायला यायचे. भाव असायचा शेकडा १५ ते ४० रुपये फक्त.(फक्त शब्द आज काल add झालाय या आठवणीत) आंबा वाली/ वाला आणि खरेदी करणारा यांच्यात पुढील संवाद ठरलेला. " खरेदीदार : कसे देणार ? आंबेवाला/लि :सांगायचे पान्नासानी द्यायाचे चालीस्नी. खरेदीदार : बघू ,(आंबा हातावर पिळून रस चाटत) बरा आहे पण पातळ आहे/घट्ट आहे. बाठीशी आंबट असणार. आंबेवाला/लि .: त अजून निव्ल्ला नाय उदयाला साखरेवानी लागेल. खरेदी दार : हे काय वरती मोठे आहेत पण खाली साफ बारीक. विक्रेता : हाताची बोटे काय येक्सार्की अस्तात? या साऱ्या सोपस्कारा नंतर खरेदी व्हायची आणि रायवळ आंब्यांच्या वासाने खोली दरवळायची एकाच दिवसात दोन तीन प्रकारचे आंबे घरात असायचे त्यांचा मिश्र सुवास आख्का मे महिना घरात असायचा.खेड तालुक्यातील रसाळ गडाच्या रस्त्याला असलेले तळे हे गाव आमचे आजोळ. लहानपणी आजोबा फणस घेऊन यायचे ते पिकले कि आमच्या नाकाना त्याची खबर सर्वात आधी लागायची.लहानपणी कित्येक वेळा फणसाच्या वासाने जाग आल्याचे आठवते. (अलार्म टोन लाऊन जागे करण्यापेक्षा विशिष्ट वेळेला विशिष्ट सुगंध येउन जागे करण्याचे एखादे यंत्र बनवणारा कोणी अवलिया आहे का याचा शोध घ्यायला हवा.) दापोली रस्त्याला संध्याकाळी फिरायला जाणे हा एक मे महिन्यातील प्रमुख कार्यक्रम असायचा. नारिंगी नदीच्या आसपास वीटभट्ट्या पेटलेल्या असायच्या, त्यांच्या धुराचा वास का कुणास ठाऊक पण हवा हवासा वाटायचा. परवा पालघर जवळील "आसावा" किल्ल्याला जाताना वीट भट्टीचा वास आला आणि पुन्हा लहानपण आठवले. फणसू ,आयनी ,तळे या खेडच्या आसपास च्या गावातील नातेवाईकांकडून भेट म्हणून कोकम (रातांबे) यायचे. ते फोडून सरबत करायचा घाट घातला कि एक आंबूस पण हवाहवासा वास दरवळायचा.घराच्या मागे एक मुचकुंदाचे झाड होते त्याची पांढऱ्या पाकळ्या आणि जाड पिवळी देठे असलेली फुले पडायची ती फुले हुंगणे हा एक विरंगुळा होता लहानपणीचा, झाडांची आवड निर्माण होण्यामागे हा वास हि कारणीभूत आहे. शेजारच्या घराच्या परसात एक कवठी चाफ्याचे झाड होते त्याच्या जवळ कळकाचे (काटे बांबू ) बेट होते त्यामुळे फूल काढणे अशक्य. पण तो फुलला कि वाऱ्या बरोबर त्याचा उग्र गंध लांबून छान वाटायचा.
फणसू हे माझ्या ताई चे सासर. तिकडे काजू भरपूर काजूची बोंडे झाडाखाली पडलेली असायची. त्यांचा आंबूस वास आजही आवडतो. खेड ते लोटे परशुराम या मार्गावर २३ वर्ष प्रवास झाला. काजू मोहरला कि येणारा उग्र गंध काही औरच असतो. पावसाला सुरवात होताच खेडला सर्वाधिक असणारी निवाची झाडे रात्री एक अनोख्या वासाने मोहरतात. तळ्याच्या वाकणातून जाताना एकदा एक मित्र म्हणाला अरे मधा सारखा वास येतोय. त्याला पूर्ण बहरलेले बेह्ड्याचे झाड आणि त्यावर घोंगावणाऱ्या मधमाशा दाखवल्या.
केरळ ट्रीप ला एक दिवस कोट्टायम या गावात "केरळ बंद " आंदोलनामुळे जास्तीचा मुक्काम करायला लागला.वातावरण निवळल्या वर हॉटेल बाहेर पडलो रस्त्यावर शुकशुकाट होता. एक ओळखीचा सुवास येऊ लागला वळण टाकून थोडे पुढे गेलो तो एक कैलासपतीचे झाड खोडावर शकडो फुले मिरवीत उभे होते. आज हि कुठे कैलासपती दिसला कि त्या झाडाची आठवण होते. केरळ मध्ये त्रिशूर येथील "वद्क्कुनाथन" मंदिरा बाहेर फुललेली दोन बुटकी बकुळीची झाडेहि आठवतात.
कोकणात होळीत नारळ टाकायची प्रथा आहे. होळी पेटली कि लोक त्यात नारळ टाकत, ते नारळ पळवण्यासाठी एकच झुंबड उडे, ओला नारळ खरपूस भाजल्यावर येणारा गंध आणि जिभेला सुटणारे पाणी वाह क्या बात है. पावट्याच्या शेंगा,ओवा,मीठ,आणि भाम्बुर्डी ची पाने मडक्यात घालून ते मडके भाजतात, याला महाड मध्ये "पोपटी" तर खेड चिपळूण ला "मोंगा" असे म्हणतात या मडक्यात अंडी ,कांदे ,बटाटे, चिकन असे काही जिन्नस हि घालतात. हा मोंगा तयार झाल्याची खुण म्हणजे त्याचा येणारा एक विशिष्ट दर्प, तो समजण्यासाठी नाक हि जाणकार हवे आणि रसिकताहि हवी.
हळदीच्या पानात तांदुळाचे पीठ,गुळ शिजवून केला जाणारा पदार्थ म्हणजे "पातोळा'" त्याचा सुगन्ध अख्या घरात नव्हे तर शेजारी हि पसरायचा.
हा पातोळा बरेच जणांनी खाल्ला असेल पण हळदीचे पान उखळीत/वाइनात टाकून कांडलेले पोहे गरम असतानाच खाण्याचे भाग्य ज्याला लाभले तो खरा भाग्यवंत.
घराच्या पुढच्या दारी रातराणीचे एक झुडूप आहे त्याला वर्षातून दोन तीन बहर येतात तेव्हा सारा आसमंत दरवळून जातो, एका वृक्ष शत्रूने "रातराणी काढून टाक. याच्या वासाला साप येतो " असा मोफत सल्ला दिला त्याच्या सल्ल्याला मान देऊन रातराणीची १०० लागणे पुढच्या मृगात मोफत वाटली. एक अंधश्रद्धा दूर केल्याचे पुण्य हि त्या निमित्ताने मिळाले.अजूनही कोणी तरी फोन वर सांगतो अरे तू दिलेली रातराणी मस्त बहरली आहे तेव्हा फोन वरून हा गंध सुद्धा मोफत माझ्या पर्यंत पोहोचतो. हे झुडूप इतके वाढले पण साप काही आला नाही बहुदा त्याला सर्दी झाली असावी पण जेव्हा रातराणीला पांढऱ्या रंगाची फळे आली तेव्हा कोकीळ मात्र त्यावर रोज दिसू लागली. पुढे पुढे तर कोकीळ इतकी धीट झाली कि अंगणातून कोणी गेले तरी उडून जायची नाही. या निमित्ताने स्वर गंधाचे एक नवीन नाते हि उलगडले.
कोळथरे गावात गणपतीच्या दरम्यान भात खाचराच्या बांधावरून चालताना आलेला भाताच्या लोब्यांचा मोहक वास, मित्र सुहास च्या घरात परडीभर ओसंडणाऱ्या सोनचाफ्याच्या फुलांचा वास, कोळथर ला कोणत्याही ऋतूत गेलो तरी एक वेगळाच गंध वातावरणात भरून राहिलेला जाणवतो.
कोल्हापूर च्या एका निवांत रस्त्यावर दोन्ही बाजूना पडलेली बुचाची नाजूक फुले आणि त्यांचा मंद गंध निव्वळ अविस्मरणीय.खेड चे मित्र द्वय जागुष्टे बंधू यांच्या हॉटेल ची मिसळ फेमस, फक्त सकाळी मिळणार दुपारला खलास बट नो तडजोड विथ क्लास, संध्याकाळी गप्पा मारायला निघालो कि गांधी चौकात वासानेच खबर लागायची कि जागुष्टे मिसळ चे 'वाटण' बनवायचे काम चालू आहे.
एकदा दादर ला शिवाजी मंदिर च्या परिसरात एका गजरे वालीच्या टोपली वर मधमाशा दिसल्या म्हणून मुद्दाम जवळ गेलो तो टोपलीत 'वळेसर' होते.(सुरंगी चे गजरे) आता या माशा दादर ला पोळे बांधतील कि त्यांना पण विरार गाठावे लागेल कुणास ठाऊक ?
मधमाशा ,मुंग्या हे खरे तर श्रमिकांचे आदर्श.
"माथे के पसीने कि महक आये न जिसमे वो खून मेरे जिस्म में गर्दिश नही करता" या ओळी मुजफ्फर वारसी ला कदाचित मधमाशांचे गुणगुणणे ऐकून सुचल्या असाव्यात.
प्रतिक्रिया
18 Aug 2013 - 4:07 pm | कवितानागेश
सुंदर स्मृती. :)
18 Aug 2013 - 4:39 pm | प्रभाकर पेठकर
चिपळूण म्हणजे माझे सासर. पण जास्त पाहिलेले नाही.
मात्र मुंबईत, दहिसरात, १९५४ ते १९८१ आयुष्य घालविले. तिथे आंबा, फणस, चिकू, पेरू, बोरे, करवंदं, कमरकं, काजूची बोंडं, जांभळं, केळी, शहाळी, चिबुड भरपूर भरपूर खाल्ले. विकत नाही. थेट झाडावरून तोडून. फुलांमध्ये गुलाब, मोगरा, जाई-जुई, कृष्णकमळं, जास्वंद, चाफा, रातराणी, सुरंगी वगैरे वगैरे अनेक फुलांनी बालपण सुगंधी केलं. दुर्दैवाने कोणी जाणकार न भेटल्याने दुर्मिळ झाडाफुलांची, रान भाज्यांची ओळख झाली नाही. त्याची खंत जरूर आहे.
19 Aug 2013 - 4:22 am | स्पंदना
कृष्ण कमळ...आहाहा काय मंद गंध धुंद धुंद...
18 Aug 2013 - 7:26 pm | आदूबाळ
झकास लेख!
आमच्यासारख्या शहरी वातावरणात वाढलेल्या पोरांना असले छान छान वास कुठून येणार? हातभट्टीसाठी टायर जाळल्याचा वास, ट्रकच्या चोंदवणार्या डिझेल धुराचा वास, पोहोण्याच्या तलावावर येणारा क्लोरीनचा गंध, असलेच गद्य वास जवळचे.
18 Aug 2013 - 8:06 pm | पिशी अबोली
वा.. सुंदर लेख. यातील अनेक वास अनुभवले आहेत या ना त्या रुपात. सगळे एकदम दरवळले.. :)
18 Aug 2013 - 9:56 pm | चित्रा
सुंदर लेख. आवडला.
19 Aug 2013 - 12:55 am | किसन शिंदे
वाह! गंधमय लेख आवडला!!
19 Aug 2013 - 7:27 pm | भ ट क्या खे ड वा ला
धन्यवाद
19 Aug 2013 - 4:25 am | अर्धवटराव
सुवासाची मोहकता अचुक शब्दात टिपली आहे.
अर्धवटराव
19 Aug 2013 - 4:30 am | स्पंदना
सुरेख लेख.
काही आठवणी या फक्त आणी फक्त गंधाशीच निगडीत असतात. विशेषतः बालपणीच्या .
जेंव्हा त्या गंधात, दरवळात आपण न्हाउन निघत असतो तेंव्हा त्याच अप्रुप नसत आपल्याला. मला कित्येक वर्ष दवाला पारिजातकाचा गंध असतो असच वाटायच. फार लवकर जाग यायची लहाण्पणी. मग उठुन पलिकडच्या घरात उडी मारायची. कोणाचीही चाहुल नसायची. अगदी पाखरांची सुद्धा. अन मग त्या टप टप अश्या टपटपणार्या पारिजातका खाली उभा रहायच. न अकळत डोळ्यातुन दवबिंदु ओघळायचे. आद्ल्या दिवसाच सारं मलिन्पण धुवुन निघायच. पुन्हा खळ्खळुन हसायला, जमेल तस जगायला बळ मिळायच.
रातराणी तशी बक्कळ असायची पण संध्याकाळी कधी रम्य नसायच्या.
हल्ली गावाकडच्या "माही" च्या वासाची आस लागलीय. सार्या गावात, लिंबु, कांदा अन कमी मसाल्याचा रस्सा...एक वेगळाच घमघमाट..सामुहिक.
मातीचा वासही असाच...धाटांचा वास...मोहराचा वास..अन तरुणपणी कधीतरी वेडावणारा,पावसाने लगडलेला ऑस्ट्रेलीयन बाभळीचा वास.
19 Aug 2013 - 7:31 pm | अनिरुद्ध प
अजुन येवुदेत.
26 Oct 2013 - 12:51 am | एस
दरवळत राहणारा लेख...
26 Oct 2013 - 4:16 am | प्यारे१
खूप सुंदर लेख!
28 Oct 2013 - 12:30 am | चतुरंग
सुंदर लेख. गंधांच्या निमित्ताने आठवणींच्या गल्ल्यांमधून फिरवून आणत, तिथल्या कुप्या उघडून स्मृतिगंध दरवळत ठेवणारा.
-रंगा
28 Oct 2013 - 9:03 am | सुबोध खरे
प्रत्येक गंधाबरोबर एक एक आठवणी जोडल्या गेलेल्या असतात त्यांना उजाळा मिळतो. लेख अजून विस्ताराने लिहा म्हणजे अधिक आनंद मिळेल. लिहिते रहा.
6 Nov 2013 - 9:36 pm | भ ट क्या खे ड वा ला
नक्कीच प्रयत्न करेन
28 Oct 2013 - 5:35 pm | सूड
आठवणी आवडल्या !!
7 Nov 2013 - 6:28 pm | आतिवास
लेख अनेक आठवणी जागवून गेला :-)
7 Nov 2013 - 9:17 pm | अमेय६३७७
अशा अनेकविध स्मृतींचाच खजिना बनतो, आणि उधळूनही हा कधीच लुटला जात नाही. गंधाशी स्मृती निगडीत असावी याचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे. कोकणात बालपण गेल्याने तुम्ही लिहिलेल्या बर्याच स्मृतींशी रिलेट करता आले.
<<या निमित्ताने स्वर गंधाचे एक नवीन नाते हि उलगडले.>> हे वाक्य फार आवडले.
अतिशय सुंदर लेख.
7 Nov 2013 - 9:18 pm | अमेय६३७७
या निमित्ताने स्वर गंधाचे एक नवीन नाते हि उलगडले.> हे वाक्य फार आवडले, असे वाचावे.
7 Nov 2013 - 9:53 pm | राजेंद्र मेहेंदळे
थोडी भर माझ्याकडुनही
मे महिन्यात मित्रांबरोबर खाडीवर पोहायला गेल्यावर येणारा खारट पाण्याचा गंध..हिवाळी ट्रेक करताना येणारा कोरड्या गवताचा वास...आंब्याच्या मोहराचा मंद सुवास..देवळातला धुपाचा सुगंध