लिहिणं
लिहिणं म्हणजे नेमकं काय आणि मी का लिहितो या प्रश्नांचं उत्तर शोधावसं वाटतं कधी कधी, आणि मी लिहायला घेतो. खरं तर, एवढं सांगून हे लिहिणं संपू शकतं एवढं सोपं आणि सहज आहे, किंवा असायला हवं, लिहिणं!
एकटेपणा ते एकांत अशा प्रवासात सोबत म्हणून असेल कदाचित, लिहिणं मला जवळचं वाटलं. आणि लिखाणाशी झालेली मैत्री व जवळीक जास्त प्रकर्षाने जाणवली. मी पाहिलेलं आणि पाहत असलेलं भोवतालचं विश्व माझ्या शब्दात मांडणं, आठवणींमध्ये रमणं, आणि त्या लिहिणं मला भावलं. खूप काही वाचायचं राहून गेलं, अशी खंतही वाटते, पण जे थोडं फार वाचता आणि वेचता आलं, त्यातून लिहिण्यासाठी ऊर्जा मिळाली.