मागचा भाग--
मागच्या भागात शेवटी समाप्त असे लिहिले होते. पण विचार करता करता असे लक्षात आले की अजूनही सांगण्यासारखे बरेच काही आहे डोक्यात. शिवाय काही वाचकांनी पुढचा भाग टाकायची सूचना केली होतीच. तेव्हा सर्वांचा मान ठेवून हा भाग टंकायला घेतला.
तर मीटिंगमध्ये विनिपेगचा मुक्काम हलवण्याचे ठरले आणि माझ्या डोक्यात भराभर चक्रे हलू लागली. आता ऑफिस आणि घर अशा दोन आघाड्यांवर लढाई चालू झाली. जरी विनिपेग ऑफिसात नसलो तरी मला पुढचे काही दिवस रिमोटली इथे सपोर्ट द्यायचा होताच. त्यामुळे माझा डेस्कटॉप आणि इतर महत्वाचे सामान प्रथम डेटासेंटर च्या एका कोपऱ्यात हलवले. बाहेरून डेस्कटॉप ऍक्सेस करता येतो आहे याची खात्री करून घेतली. एका विकांताला ऑफिसमध्ये जाऊन डेटासेंटर मधल्या केबल्सचे जाळे साफ केले. हे फारच जिकिरीचे काम होते, कारण आधीच्या कोण कोण व्यावसायिक केबलिंग वाल्यांनी ते सगळे काम केले होते. तेव्हापासून फॉल्स फ्लोरिंगच्या खाली सगळ्या केबल्स वर्षनुवर्षे गुंतून पडल्या होत्या. त्यातल्या नक्की किती वापरात आहेत आणि किती निरुपयोगी आहेत हे ठरवणे जरा अवघडच होते. पण एकेका रॅकपासून ट्रेस करता करता जेव्हढे जमेल तेव्हढे वायरींचे जाळे साफ केले. आता डेटासेंटर जरा आटोक्यात आल्यासारखे वाटायला लागले. मग पुढचे २-३ दिवस सगळे रॅक डायग्रॅम अद्ययावत करण्यात गेले. जेणेकरून मला किंवा टीममध्ये कोणालाही विनिपेगला न जाता रिमोटली काही काम करायला मदत होऊ शकेल किंवा एखाद्या स्थानिक माणसाला सूचना देऊन काम करून घेता येईल. शिवाय ऑफिसमध्येही बातमी पेरून टाकली की मी आता इथून जाणार आहे आणि रेजिना ऑफिसमधून रिमोट सपोर्ट देणार आहे. त्यामुळे आयत्या वेळची घाई टाळता आली.
घराच्या आघाडीवर काही महत्वाची कामे होती. एक म्हणजे माझी दातांची कॅप तुटली होती, त्यामुळे ती तत्परतेने बसवणे भाग होते.ऑफिसजवळच्याच एका डेंटिस्टकडून ती करून घेतली. अर्थात कॅनडामधील दातांच्या महागड्या ट्रीटमेंट बघता (आणि माझा डेंटल इंशुरन्स नसल्याने ) मी तात्पुरती कॅप घेतली होती आणि पुढे लवकरच जेव्हा भारतवारी होईल तेव्हा कायमस्वरूपी कॅप करून घेऊ असे ठरवले होते.
दुसरी म्हणजे मी रेजिना ला कधी जाणार याची तारीख निश्चित होत नव्हती आणि केनकडे अजून एक दोन भाडेकरू आले होते. त्यामुळे मी नक्की कधी जागा सोडतो आहे हे त्याला वेळेत सांगणे भाग होते. ऑफिसमध्ये माझा एक केशव नावाचा तेलगू मित्र झाला होता. तोही सेम क्लायंट साठी पण दुसऱ्या भारतीय कंपनीमधून आला होता. त्याला माझी ही विनिपेग-रेजिना स्टोरी माहित होती. एक दिवस दुपारच्या जेवणात बोलताना हा विषय निघाला . तेव्हा केशव म्हणाला "अरे काळजी कशाला करतोस? सध्या मी एकटाच फ्लॅट मध्ये राहतोय, फॅमिली यायला वेळ आहे. तेव्हा आठवडाभर माझ्याकडे राहा. दोन चार दिवस इकडे तिकडे झाले तरी वांधा नाही." पडत्या फळाची आज्ञा म्हणून मी लगेच केनच्या कानावर ती गोष्ट घातली आणि विकांताला केशवकडे सामान नेऊन टाकले . भारतातून येताना २ बॅगा घेऊन आलो असलो तरी आता सामान थोडेफार वाढले होते. ते केनला आणि थोडे साल्वेशन आर्मी वगैरेला देऊन टाकले आणि पुन्हा पहिल्यासारखा सुटसुटीत झालो.
आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रेजिनाला धडकण्याआधी राहायची सोय करणे. बंगलोरच्या ऑफिसातील सगळे सहकारी तिकडेच असल्याने तो प्रश्न लगेच सुटेल आणि कोणाबरोबर तरी फ्लॅट शेअर करून काही दिवस राहता येईल असा माझा अंदाज होता. पण जसजसे मी एकेक माणसाशी बोलू लागलो तसतसा तो भ्रमाचा भोपळा फुटू लागला. कारण आता बरेचसे लोक भारतातून त्यांची फॅमिली घेऊन आले होते आणि राहिलेले सिंगल लोक दाटीवाटीने एकत्र राहत होते. अजून एक समस्या म्हणजे मी महिन्याच्या मध्यावर मुक्काम हलवणार असल्याने मला कुठेही १ तारखेशिवाय फ्लॅट भाड्याने मिळेना. बोर्डवॉक वगैरे ऑनलाईन साईटवर कुठेही फ्लॅट बघून फोन केला तर एजन्सीवाले लोक समोरासमोर घर बघून डिपॉझिट भरायला सांगायचे आणि मी तर तिथे नव्हतो. दुरूनच फोनाफोनी करून फार काही जमणार नाही हे मला कळून चुकले आणि फाजील आत्मविश्वासाच्या भरात "बघू काहीतरी तिकडे पोचल्यावर" अशा विचारात मी स्वस्थ राहिलो. पण तेव्हा मला कल्पना नव्हती की पुढे ही चूक मला महागात पडणार होती.
तर काही दिवस केशवकडे राहून आणि ऑफिसचे काम मार्गी लावून फेब्रुवारीच्या मध्यावर एका रविवारी सकाळी मी विनिपेगला विमानात बसलो आणि तासाभराचा प्रवास करून रेजिनाला उतरलो.विमान लँडिंग करता असताना प्रथमदर्शनी मला सगळीकडे झाडीच दिसत होती नाहीतर दूरवर पसरलेले बर्फ. अतिशय तुरळक कुठेतरी लांब काही उंच इमारती दिसत होत्या. हे काय शहर म्हणायचे की खेडेगाव ? कॅनडातही अशा प्रकारची मागासलेली शहरे आहेत? इथे लोक राहतात तरी की नाही? असे उलट सुलट विचार करता असतानाच विमान उतरले आणि काही वेळातच बेल्टवरून सामान घेऊन मी बाहेर पडलो. राहायची सोय म्हणून ऑनलाईन एका स्वस्तातल्या हॉटेलची रूम बुक करून ठेवली होती. हॉटेल ऑफिसपासून जरा लांब होते, पण दोन आठवडे राहण्याचा खर्च लक्षात घेता कमी भाडे असलेले हॉटेलचं परवडले असते. त्यामुळे नाईलाज होता. कॅब करून सामान हॉटेलवर आणून टाकले आणि काउंटर वरच्या माणसाशी व्यवहाराचे बोलू लागलो. भारतीय तोंडावळ्याचा दिसत होता. पंजाबी हिंदी आणि कच्चे इंग्लिश बोलत होता. मी सलग आठवडाभर राहिलो तर तो भाड्यात सूट देईल असे म्हणाला. पण तेव्हा माझ्या डोक्यात तसा काही विचार नसल्याने मी त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. बाहेर बर्फ चमकत होते आणि उनही होते. तो पावती वगैरे बनवत होता तोवर मी आपला बावळटासारखा बाहेर उन्हात येऊन रस्त्यावरची रहदारी बघत उभा राहिलो.
दोन पाच मिनिटे झाली असतील नसतील तोच काउंटरवाल्याने मला हाक मारून बोलावले. "कोण कोण नमुने येतात कुठून कुठून?" अशा प्रकारचा भाव त्याच्या चेहरयावर होता. "आर यु फ्रॉम इंडिया?" त्याने विचारले "येस, बट राईट नाऊ कमिंग फ्रॉम विनिपेग" मी उत्तरलो. म्हणजे तुला जरी वाटत असलो तरी मी काही तितका येडपट नाही असा माझा म्हणण्याचा उद्देश होता. त्यावर तो शांतपणे म्हणाला" हे बघ, तू आत्ताच आलायस म्हणू सांगतो. हा क्राईम एरिया आहे. तू असा खिशात हात घालून बाहेर उभा राहशील आणि कोणीतरी मवाली येउन तुझे पैसे मोबाईल वगैरे लुटून जातील, तेव्हा गपचूप आत जाऊन बस" रेजिनाला मला मिळालेला हा पहिला धडा. त्याचे प्रत्यंतर त्याच रात्री मला आले. माझी रूम तळ मजल्यावरच होती आणि रात्रभर बाहेर काही न काही आवाज चालू होते. बहुधा एक दोन वेळा पोलीस व्हॅनही चक्कर मारून गेली .कुठेतरी काचा फुटल्याचा आवाज आला. दारू पिऊन जोरजोरात भांडणाचे आवाज तर येत होतेच. सकाळ होईपर्यंत हे हॉटेल काय असावे याची मला बऱ्यापैकी कल्पना आली. पण आलिया भोगासी म्हणून मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करून वेळेत उठलो आणि झटपट आवरून हॉटेलसमोरच्या बस स्टॉप वर मिळालेली बस पकडून ऑफिसला पोचलो. ऑफिसातले काही सहकारी ओळखीचे होतेच आणि क्लायंटलाही मी येणार असे माहित होते. त्यामुळे पहिला दिवस ओळखी पाळखी आणि स्थिर होण्यात पटकन निघून गेला. तोवर मी कुठे राहतोय हे सर्वांना माहित झाले होते आणि काही जणांनी तिकडे जास्त दिवस राहू नकोस बेकार वस्ती आहे, असाही सल्ला दिला होता. पण राहण्याची दुसरी काय सोय होईल हे मात्र कुणीच सांगत नव्हते. शिवाय हे मुख्य ऑफिस असल्याने इकडचे वातावरण एकदमच बिझी होते. सतत काही न काही मिटिंग ,डिस्कशन किंवा तत्सम घडामोडी चालू असायच्या. त्यामुळे दिवसभर कामात जायचा आणि घराची शोधाशोध करायला वेळच मिळत नव्हता. असे करता करता विकेंड आला आणि घर शोधायला मी बाहेर पडलो.पूर्ण शनिवार आणि अर्धा रविवार फिरूनही मला ऑफिस जवळ एखादी जागा सापडेना. एक तर लांबची जागा मिळायची, किंवा कमी अंतर असल्यास भाडे जास्त असायचे. आणि मुख्य म्हणजे इथे जास्ती इमारती या एक-दोन मजली होत्या आणि दारावर "मुले आणि पाळीव प्राणी यांना प्रवेश नाही " अशी पाटी असायची. ही टोकाची कॅनेडियन माणूसघाणी म्हणा किंवा शांतताप्रेमी वृत्ती मला इथेच प्रथम समजली. मलातर एक दोन महिन्यात फॅमिली घेऊन यायचे होते त्यामुळे या इमारती माझ्या कामाच्या नव्हत्या.
शेवटी थकून भागून मी हॉटेलवर आलो आणि एक आठवडा मुक्काम लांबवायची मनाची तयारी केली. तितक्यात मला काउंटर वरच्या माणसाने सुरुवातीला दिलेली ऑफर आठवली आणि मी त्याबद्दल त्याच्याशी जाऊन बोललो. माझा मुद्दा होता की मी दोन आठवडे हॉटेलवर सलग राहणार असल्याने त्याने जी काही डिस्काउंट ऑफर दिली होती ती लागू करावी. पण अनपेक्षित रित्या त्याने तो प्रस्ताव फेटाळून लावला आणि एखाद्या व्यावसायिकाला( त्यातही कॅनेडियन माणसाला) न शोभेल अशा रीतीने बेताल बडबडीला सुरुवात केली. "तुम्ही इंडियन्स असेच असता , तुम्हाला एकदा सांगितलेले समजत नाही. तिकडे इंडियात हे सगळे मॅनेज होते, पण मी आता ती ऑफर देणार नाही" वगैरे वगैरे. त्यावरून आमची चांगलीच झकाझकी झाली आणि मी तडका फडकी ते हॉटेल सोडायचा निर्णय घेतला. पैसे देऊन एव्हढी बेइज्जत कोण करून घेईल? तेव्हा झालेले बिल चुकते करून दोन बॅगा ओढत मी तिथून तडक निघालो आणि कॅब करून शहराच्या मध्यभागी असलेल्या कॉर्नवाल मॉलमध्ये येउन थडकलो. पण लवकरच डोके शांत झाले आणि मी कसल्या संकटात सापडलोय त्याची मला जाणीव झाली. डोक्यात राग घेऊन मी अक्षरश: रस्त्यावर आलो होतो आणि रात्र काढायला मला जागा हवी होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने ५ वाजता अंधार पडणार होता. त्यानंतर मॉलही बंद झाले असते आणि बाहेर पडायलाच लागले असते.
काहीतरी हालचाल करणे भाग होते.
प्रथम एका मित्राला फोन केला आणि माझे सामान त्याच्याकडे ठेवायची विनंती केली. त्याची फॅमिली बरोबर असल्याने मी तिथे राहू शकत नव्हतो. माझ्यावर आलेला बिकट प्रसंगही त्याला सांगितला. त्याच्याकडे सामान टाकून मी चालतच हॉटेल शोधू लागलो. हातात फोन, पॉकेट डायरीमध्ये काही नंबर आणि पत्ते आणि पाकिटात थोडे पैसे एव्हढेच होते. थंडी मी म्हणत होती आणि अंधारु लागले होते.पुन्हा मॉलमध्ये येऊन बसलो आणि डायरीत असलेले नंबर फिरवून कुठे कुठे बोलून राहायची सोय होतेय का बघितले. ऑफिसमधले एक दोन तोंडओळखीचे सिंगल भारतीय लोक दिसले (केशवच्या कंपनीतले) त्यांनाही हटकून "फक्त आजच्या पुरती राहायची सोय होईल का" असे विचारून बघितले. पण काहीच मार्ग निघेना. आता मात्र सकाळी केलेल्या मूर्खपणा बद्दल मला राग येऊ लागला. एकतर जी घरे मला १५ तारखेपासून मिळणार होती ती मी काही ना काही कारणाने नाकारली होती आणि मित्राच्याच बिल्डिंग मध्ये १ तारखेपासून मिळणारा ऑफिसजवळचा फ्लॅट बुक केला होता. वर अजून एक आठवडा हॉटेलात राहणे मला परवडले नसते. आणि जे स्वस्तातले हॉटेल मिळाले ते मी घालवून बसलो होतो. डोळ्यात पाणी येणेच बाकी होते, आणि मनात देवाचा धावा चालू होता. आता मॉलमधले रक्षक चेकिंग करत फिरताना दिसू लागले आणि मॉल बंद होण्याची वेळ जवळ आल्याचे कळू लागले. वेळ भराभर निघून चालला होता आणि अचानक पुन्हा त्याच मित्राचा फोन आला.
ऑफिसच्या मागील बाजूला असलेले एक बेड आणि ब्रेकफास्ट त्याने कुठूनतरी शोधून काढले होते आणि त्याचा नंबर मला कळवला होता. मी तडक तिथे फोन केला आणि मालकाशी बोललो. क्रिस म्हणजे त्याचा मालक बोलायला चांगला वाटला. त्याने रूम उपलब्ध असल्याची सुवार्ता दिली आणि १ दिवसापासून १ महिन्यापर्यंत कितीही दिवस राहता येईल असे सांगितले. मीही फार चिकित्सा न करता डील नक्की केले आणि माझे सामान घेऊन लागलीच क्रिसकडे जाऊन थडकलो. हि सोय सुद्धा विनीपेग च्या केनच्या घराप्रमाणेच होती पण क्रिस जरा जास्त व्यवसायिकपणे ते चालवत होता. माझ्या क्लायंट कडे काम करणारा अजून एक अमेरिकन माणूस त्याच्याकडे राहत होता त्यामुळे त्याला आमच्या क्लायंटची आणि कामाची साधारण कल्पना होती. आणि आमच्या सारखे वेगवेगळ्या देशाचे फिरस्ते पाहायची सवयही होती. गेल्यागेल्या त्याने मला माझी पहिल्या मजल्यावरची खोली दाखवली आणि त्याचबरोबर बाथरूम, किचन आणि वॉशिंग एरिया अशा बाकी लागणाऱ्या गोष्टी समजावल्या. रोजचा सकाळचा नाश्ता तो देणार असल्याने नाश्त्याला काय चालेल वगैरेही विचारून घेतले. एक अडचण म्हणजे रूम फारच छोटी होती, म्हणजे एक बेड आणि टेबल खुर्ची ,कपाट आणि आरसा बस. तीन पावलात रूम संपायची. पण एकदाची सोय झाली या आनंदात तिकडे दुर्लक्ष केले आणि थोडेफार खाऊन बेडवर आडवा पडलो. प्रथम घरी फोन करुन रहायची सोय झाल्याचे कळवले आणि मित्रालाही फोन करुन त्याचे आभार मानले.
जिथे कोणीच ओळखीचे नव्हते त्या विनिपेगमध्ये सुखात राहिलो आणि इथे सहज सोय होईल असे वाटत होते तिकडेच वांधे झाले. कुठे ते विनीपेगचे रम्य दिवस आणि कुठे हे रेजिनाचे वाळवंट असा विचार करता करता कधी झोप लागली समजलेच नाही.
प्रतिक्रिया
25 May 2022 - 6:11 pm | कुमार१
खूप छान अनुभवकथन.
25 May 2022 - 6:51 pm | सौंदाळा
तब्बल ५ महिन्यांनी पुढचा भाग लिहिलात पण भारीच झालाय.
अति शहाणपणा करुन दुसर्याचा अपमान करणारे लोक डोक्यात जातात. मी तुमच्या जागी असतो तरी हेच केले असते. रहायची सोय झाली शेवटी हे बरे झाले.
क्रमशः आहे का? पुढचा भाग (लवकर) लिहाच. तुमचे लिखाण ओघवते आहे त्यामुळे वाचायला मजा येते.
27 May 2022 - 3:37 pm | असंका
अगदी सुरेख वर्णन केलंय.
धन्यवाद..!
27 May 2022 - 10:17 pm | सुखी
दोन्ही भाग एका दमात वाचून काढले... छान लिहिलं आहे
28 May 2022 - 5:23 pm | सिरुसेरि
थरारक वर्णन .
28 May 2022 - 5:43 pm | विवेकपटाईत
फारच भारी.
28 May 2022 - 11:01 pm | श्रीरंग_जोशी
अनुभवकथन भावले.
अवघड परिस्थितीतून मित्र / सहकार्यांच्या मदतीने तुम्ही मार्ग काढू शकलात हे जाणून समाधान वाटले.
29 May 2022 - 6:34 pm | राजेंद्र मेहेंदळे
आपणा सर्वांच्या प्रतिक्रियांमुळे पुढे लिहायला हुरुप आला.
30 May 2022 - 5:48 pm | मुक्त विहारि
हा पण भाग उत्तम आहे
30 May 2022 - 6:36 pm | Nitin Palkar
दोन्ही भाग एकापाठोपाठ वाचून काढले. जे अनेक प्रतिसादकांनी लिहिलेय तेच म्हणतो, तुमची लेखनशैली खूपच छान आहे.
पुभाप्र.