नेताजीचे सहवासात - भाग २ - आ

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
17 Sep 2022 - 12:58 am

३

८

नेताजींचे सहवासात

लेखक -कॅप्टन पुरुषोत्तम नागेश ओक

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश

सुभाषचंद्र बोस यांचे ते वीरश्रीपूर्ण भाषण

महायुद्ध संपल्यावर केंव्हा एकदा घरी जाऊन पडतो असे सर्व सैनिकांस वाटू लागते. युद्धकालात लोकशाही राष्ट्रे सुद्धा सुलतानशाही गाजवून स्वतःचे सैनिकास व नागरिकांस मारून मुटकून युद्धासाठी कंबर बांधावयाला लावतात. स्वतःची घरेदारे सोडून परप्रांती हाल अपेष्टात व प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत जीवन कंठणारे शिपाई युद्ध संपताच स्वगृही परतण्यास अधीर होतात अशा पराजयाची मानसिकता असलेल्यांच्या समोर नेताजींनी केलेले ओजस्वी भाषण प्रेरणादायी आहे.
“हे युद्ध आता जरी लवकर संपणार असे वाटत असले तरी स्वातंत्र्य प्राप्तीची वेळ निघुन गेली असे मात्र समजू नका.
युद्धोत्तर नव्या संधीचा योग्य उपयोग करून घेण्याची तयारी करा.... कसल्याही परिस्थितीत जिवात जीव असेतोवर आपण लढत राहू, शरण जाणार नाही किंवा हताशही होणार नाही हे लक्षात ठेवा..." असे नेताजींनी सर्व हिंदी लोकांस बजाविले. सामान्यजनास अत्यंत निराशाजनक वाटणाऱ्या परिस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ते वीरश्रीपूर्ण भाषण ऐकून सर्व श्रोतृवृंद आश्चर्यान थक्क झाला. एखादा पहाड खालून कोणी पोखरावा व आता अंगावर ढासळणारच अशा भावनेने भोवतालच्या लोकांनी त्याकडे पाहत रहावे; एवढ्यात कोणी त्याला आपल्या करांगुलीच्या आधाराने थोपवून धरावे, इतका आश्चर्यकारक आधार नेताजींच्या वीरवृत्तीने सर्व लोकांस मिळाला. तानाजीच्या मृत्यूने धीर सोडून सैरावैरा पळू लागलेले मराठे ज्याप्रमाणे सूर्याजीच्या निर्वाणीच्या उद्गगारांनी भानावर येऊन चेवाने लढण्यास पुढे सरसावले, त्याचप्रमाणे आपला पराजय झाला असे समजून रणांगणातून पळू पाहणाऱ्या हिंदी लोकांस नेताजींच्या शब्दांनी पुन्हा परत फिरविले. “तुमचा पराजय झालेला नाही. कोण म्हणतो तुम्ही पराजित आहा म्हणून?" असा सरळ सवाल नेताजींनी सर्व हिंदी लोकांचे समोर टाकल्याबरोबर या सर्व लोकांनी सर्व परिस्थितीचे या नव्या दृष्टीने परीक्षण करण्याचे ठरविले. नेताजींच्या धीरोदात्त संदेशाने त्या सर्वांस दिव्य दृष्टी प्राप्त करून दिलेली होती. या दिशेने जो जो विचार करावा तो तो खरोखरच प्रत्येकास असे वाटू लागले, “अरेच्च्या... खरेच की!
आपला पराजय झाला असे आपण समजत होतो, पण कोणी आपल्याला पराजित केले? आणि कधी केले पारजित? छे:! आपल्याला काही भ्रम झाला असावा किंवा स्वप्न पडले असावे. बरे झाले नेताजींनी आपल्याला वेळीच जागे केले म्हणून, नाही तर आपण खुळचटासारखे स्वातंत्र्यरण सोडून, पाठ फिरवून अगदी पळ काढण्याच्या विचारात होतो.” “चला, परत फिरू या...” असाच सर्व हिंदी लोकांनी तेथल्या तेथे निग्रह केला.

7

सैनिकांविषयी भोजन आस्था
नेताजी व आम्ही सुमारे चारशे लोक होतो. या प्रवासाचा उल्लेख पुढेही येईलच. परंतु येथे सांगावयाचे एवढेच की, पीछेहाटीत आम्हाला सर्वांना स्वत:चे सामान डोईवर घेऊन दरमजल दरकूच करीत चालण्याचे अनेक प्रसंग आले, त्यात दर मुक्कामास सर्व सैनिकांनी काय काय खाल्ले या गोष्टीकडे नेताजी बारकाईने लक्ष देत असत. हवाईहल्ल्यामुळे दिवसा जंगलात तळ द्यावयाचा व रात्री वाट क्रमावयाची असा आमचा क्रम होता. वाटेत एके ठिकाणी सकाळी सात वाजण्याच्या सुमाराला पाचचार झोपड्याच्या समीप झाडीत आम्ही सर्वांनी मुक्काम केला. एका आंब्याच्या झाडाखाली नेताजींकरिता एक चटई टाकण्यात आली. इतरांनी आपापले सोईप्रमाणे आजुबाजुस मुक्काम ठाकला नेताजींची आता झोपण्याची वेळ होती. प्रवासात त्यांच्या दुय्यम आधिकाऱ्यांचे, चिटणिसाचे वगैरे काम करण्याचे प्रसंग माझ्यावरच अनेकवार आले. कामे करणारे त्यांचे नेहमीचे सहाय्यक अधिकारी इतर तुकड्यांबरोबर इतर विभागले जाऊन कोणी पुढे तर कोणी मागे असत. नेताजींनी मला बोलावून आमचेबरोबर सर्व तुकड्यातील एकूण एक सैनिकांस त्या मुक्कामापुरता सकाळचा चहा, दुपारी ११ वाजता एक जेवण व सायंकाळी पुढे कूच करण्यास निघण्याचे अगोदर सुमारास एक जेवण एवढे तरी मिळावेच असे सांगून या कामावर व त्याबाबत योग्य ती व्यवस्था करण्यास मला सांगितले. दर जेवणात फोडणीचे वरण दोन भाज्या व भात एवढे तरी असावेच असे ते म्हणाले. एवढे सांगून ते झोपी गेले. सर्व तुकड्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांना त्याबाबत योग्य त्या सूचना देऊन डाळ, भाजी, तांदूळ इत्यादी काय काय पदार्थ आसपास मिळतात ते तपासण्यास सैनिक पाठविले. थोड्याच वेळात भाजीकरिता कच्चे फणस, नारळ,गूळ, दूध वगैरे माल तेथे आला. मी पैसे देऊन तो माल विकत घेतला व सर्व वाटून दिला. सैनिकांना अमक्याच वेळी जेवावयास मिळाले पाहिजे व परिस्थिती अनुरूप त्यात इतके पदार्थ असावेच याची नेहमी नेताजी फार दक्षता बाळगीत. वरील गोष्टीवरून सहज निदर्शनास येण्यासारखे आहे.
खडतर प्रवास संपवून आम्ही बँकॉक शहरी येऊन पोचलो तो सर्व सैनिक, रात्रीची जायणे. प्रवासाचा शीण, अनियमित राहणी, घाणेरडे हवापाणी, पौष्टिक अन्नाचा अभाव, औषधांचा तुटवडा यांमुळे अशक्त होऊन फिक्के पडलेले होते. बँकॉक ही सयामची राजधानी असून सयाम युद्धाच्या वावटळीतून सुरक्षित राहिल्यामुळे सयामला त्या मानाने अनधान्य, दूधदुभते इत्यादींची रेलचेल होती. मलायात व विशेषत: ब्रह्मदेशात यातले काहीच उपलब्ध नसे. बँकॉकला आल्याबरोबर नेताजींनी हुकूम सोडला की, ब्रह्मदेशातून आलेल्या प्रत्येक सैनिकास रोज पाऊण शेर दूध मिळावे. सयाममध्ये दुधाचा व्यापार आपल्या युक्तप्रांतीय गवळ्यांच्या ताब्यातच असलेमुळे त्यांचेकडील सर्व दूध स्वातंत्र्य-सैनिकांचेकरिता घेण्यास काहीच त्रास पडला नाही. रोज प्रत्येक सैनिक पाऊण शेर निभेळ दूध पिऊ लागला. अवघ्या दीड महिन्यात सर्व सैनिकांची प्रकृती सुधारली. भारतीयांची शारीरिक अवनती होत असेल तर ती निर्भेळ दूध पुरेसे न पिण्यामुळे, नियमित व्यायाम न घेतल्यामुळे व चहा, कॉफी, तंबाखू आदि अपायकारक पदार्थांचे सेवनामुळे. वरीलपैकी दोन अथवा तीन कारणे एकत्रित झाली म्हणजे केवढे घोर परिणाम ओढवत असतील याची ज्याची त्याने कल्पना केलेली बरी.
आपल्या सैनिकांनी पराक्रम गाजवावा अशी इच्छा असे खाण्यापिण्याकडे कसोशीने लक्ष द्यावयास हवे असे फ्रान्स देशात नेपोलियन याने म्हटलेले आहे. नेताजीही हिंदी स्वातंत्र्य-सैनिकांचे दक्षता बाळगीत. अधूनमधून, ते जेव्हा आघाडीवरील अथवा पिछाडी छावण्यांची पहाणी करण्यास जात तेव्हा इतर गोष्टींबरोबर मुख्यत: सैनिकासी कशा प्रकारचे मिळते याबद्दल ते विशेष कसोशीने चौकशी करीत. ते स्वत: सैनिकों अन्न चाखून पाहत व अनेक वेळा त्यांचेबरोबर भोजनास बसत. त्यांचे निवासस्थानी मात्र आंतरराष्ट्रीय व हिंदी पाहुणे बहुधा नेहमी जेवणास हजर असल्यामुळे भात, दोनतीन भाज्या, फोडणीचे वरण, अंड्यांचे सांबारे, तळलेले मासे अथवा मासे घातलेली आमटी, कोंबडीच्या किंवा बकऱ्याच्या मांसाची आमटी, अंड्याचा खरवस किंवा रसगुल्ले वगैरेंसारखा एखादा गोड पदार्थ ह्यांचा रोजचे भोजनात अंतर्भाव होत असे. नेताजींचे निवासस्थानी रोजची जेवणारी माणसे व एखादा आला-गेला मिळून पन्नाससाठ माणसे तर रोज सहजच जेवून जात. एवढ्या लोकांना पुरावे म्हणूनही पुष्कळसे पदार्थ जरूर होते. आठवड्यातून एक दिवस म्हणजे दर बुधवारी मात्र, नेताजी दुपारचे वेळी एकच संमिश्र असा पदार्थ खात असत. रणांगणावर किंवा आघाडीवर कूच करीत असताना भांडी व इतर वस्तू शक्य तितक्या कमी असाव्यात याबद्दल दक्षता बाळगावी लागते. वेळेचे महत्त्व वगैरे गोष्टी लक्षात घेऊन तीन धोंड्यांच्या चुलीवर ठेवून त्यात तांदूळ असले तर तांदूळ, डाळ असली तर डाळ, भाजी, मीठ गूळ इत्यादि ज्या काही खाद्य वस्तू मिळतील त्या एकात शिजवून ते खावे लागते. प्रत्येक वस्तू निराळी शिजविण्यास वेळही नाही आणि भांडीही. बरे भात तर भातच किंवा फार तर खिचडी शिजवून खाल्ली तर, शरीरपोषणास आवश्यक अशी भाजीपाल्यांतील जीवनसत्त्वे शरीरास मिळणार नाहीत.
आज मिळत असलेली भाजी, शिजविण्याचे सोडून खाल्ली नाही तर उद्या ती मिळेल की नाही याचा नेम नसतो म्हणून आघाडीवर अथवा कूच करताना, गूळ, साखर, पालेभाजी, फळभाजी असे जेवढे पदार्थ मिळतील तेवढे शिजवून खाणे जरूर असते. अशा आहाराचीही सवय असावी म्हणून नेताजींनी बुधवारी सर्व पदार्थ एकत्र शिजवून खाण्याची प्रथा ठेविलेली होती.
ज्या दिवशी बाहेरील पाहुणे-मंडळी नसत त्या दिवशी आपले बंगल्यातील शक्य तितक्या अधिकाऱ्यांस स्वत:चे बरोबर भोजनास ते बोलावीत. एरव्ही सातआठ माणसांपेक्षा अधिक माणसे एकाच वेळी त्या मेजाशी भोजनास बसत. अधिकारी वर्गातील माणसे नेताजींचे बरोबर त्यांचे मेजाशी भोजनास बसत. परंतु पहाऱ्यावरील शिपाई व इतर नोकर-चाकर यांचेशी आपला संबंध तुटू नये, आपण कोणी शिष्ट आहो असा स्वत:चा व इतरांचाही भ्रम होऊ नये म्हणून ते दोन-चार महिन्यांनी एखादे दिवशी आपले बंगल्यातील सर्व मंडळीस बरोबर घेऊन खाली सतरंज्या आंथरून त्यावर सर्वांशी मोकळेपणी गप्पा मारीत भोजनास बसत. त्या दिवशी भजी, शिरा असे. काही पदार्थ मुद्दाम केले जात.
विशेष अडीअडचणीच्या प्रसंगी, जीवावरील व राष्ट्रावरील संकटाचे वेळी माणसाने खाण्यापिण्याबाबतची सनातनी बंधने खुशाल सैल करावीत, एवढेच नव्हे तर अशी बंधने झुगारून देणे हे त्याचे कर्तव्य ठरेल असे नेताजींचे मत असे.

11
चेष्टेचा प्रसंग
सिंगापुरात आझाद हिंद सरकार स्थापन झाल्याचे दुसरे दिवशी म्हणजे इ. स. १९४३ चे ऑक्टोबर महिन्याच्या २२ तारखेस हिंदी स्वातंत्र्य सरकारतर्फे आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांस व प्रतिष्ठित स्थानिक लोकांस सिंगापूर क्रिकेट क्लबचे इमारतीत मध्यान्हीस एक थाटाचा खाना दण्यात आला....
... जेवताना बहुधा इकडच्या तिकडच्या गोष्टी निघत. हाँगकाँगला एक कृ--- नावाचे गृहस्थ होते. गृहस्यांचा स्वभाव काहीसा तऱ्हेवाईक होता. अतिपूर्वेतील इतर प्रमाणे ते ही स्वातंत्र्यचळवळीत सामील झाले असून हाँगकाँगच्या हिंदी अध्यक्ष होते. नेताजी अतिपूर्वेत येऊन त्यांनी हिंदी स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व हाती घेतल्यापासून ह्या गृहस्थांनी प्रसंगाप्रसंगाने नेताजीस अनेक तऱ्हेवाईक पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता. एका पत्रात या गृहस्थांनी नेताजींस लिहिले -

सुभाषचंद्र बोस यांस 'जयहिंद'.  तुम्ही अतिपूर्वेत येऊन या चळवळीचे नेतृत्व स्वःकडे घेतले हे ठीकच झाले, परंतु तुम्ही स्वत:च्या हिकमतीवरच अवलंबून न राहणे चांगले. भारतीय युद्धात धनुर्धारी अर्जुनाला श्रीकृष्णाची मदत व उपदेश घ्यावाच लागला. प्रस्तुतच्या आपल्या स्वातंत्र्ययुद्धात तुम्ही अर्जुनाच्या जागी आहात व मी कृष्ण आहे. मी तुमचे सारथ्य करीन व तुम्ही नेहमी माझ्या सल्ल्याने वागावे. अशी कृष्णार्जुनांची जोडी जमल्यावर शत्रूवर विजय मिळविण्यास काय उशीर! जय हा ठेवलेलाच...' हे पत्र अणि अशा तऱ्हेची यापुढील पत्रे मिळाली म्हणजे क्वचित् भोजनसमयी ह्यासंबंधी गोष्टी निघून हशा पिकावयाचा. इसवी सन १९४४ च्या डिसेंबर महिन्यात नेताजी सिंगापुरास आले असताना हे गृहस्थही काही कामानिमित्त हाँगकाँगहून सिंगापुरास आले. त्यांची व नेताजींची ओळख करून देण्यात आली. हाँगकाँगहून 'कृ--- या नावाने ज्यांच्याकडून मला पत्रे येत ते गृहस्थ हेच तर! असा विचार नेताजांच्या मनात आला. त्या दिवशी रात्री कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या निवासस्थानी भोजनसमयी मी उपस्थित होतो. सहज बोलता बोलता नेताजींनी श्री. अय्यर यास प्रश्न केला “का हो अय्यर हॉंगकाँगहून मला त-हेवाईक पत्र लिहिणारे गृहस्थ तुम्हीच ना?" श्री. अय्यर यांनी होकाराथीं मान हलविली…!

४

झाशीची राणी नाटक लेखन
१. जनरल डोईहारा मोटारीत बसून परत गेल्यावर माडीवर जाण्याकरिता म्हणून नेताजी जिन्यापाशी परत आले. मी समोरच खालच्या दिवाणखान्यात बसलो होतो. त्या दिवशीचा समारंभ उत्तम त-हेने पार पडल्यावर सर्वांस भार हलका झाल्यासारखे वाटत होते. थोडे मोकळेपणी बोलण्यास नेताजीस वेळ होता. पिछाडीस दिसणाऱ्या समुद्राच्या अखंड लीलांकडे मी पाहत काहीतरी विचार यात गुंग झालो होतो. मला पाहून नेताजी म्हणाले, “या हो ओक, वर या.” ते वर जाण्यास वळले. त्यांनी परिवेषकास चहा वर घेऊन येण्यास सांगितले. नेताजींचे बोलणे ऐकून मी वर जाण्याकरिता पाठ वळविली, तरी पण नेताजी अगोदरच पायऱ्या चढू लागल्यामुळे मी त्यांचे बोलणे ऐकले किंवा नाही ही शंका त्यांच्या मनात आली व आपल्या चिटणीसास त्यांनी सांगितले, “ओकसाहेबांना वर बोलवा हो!" मी वर जाण्यास निघालोच होतो. त्या दिवशीच्या समारंभास हजर असलेले इतर तीन-चार अधिकारीही आमच्याबरोबर वर जाण्यासाठी जिना चढू लागले. नुकत्याच उरकलेल्या समारंभासंबंधीच आमचे मुख्यत: बोलणे चालले होते. त्या दिवशी माझेही नेताजींशी थोडेसे काम होते. मी जे “झांशीची राणी” ना टक लिहिले होते ते नेताजींना अर्पण केले होते; परंतु ते लिहिले त्या वेळेस नेताजी ब्रह्मदेशातच होते. या खेपेस ते सिंगापुरास १४ डिसेंबर १९४४ रोजी विमानातून सायंकाळी सहा वाजता उतरले व ते दिवशीच ७॥ वाजता म्हणजे अवघ्या दीड तासानंतर “झांशीची राणी” नाटकाचा शेवटचा प्रयोग होता. मी ते दिवशी नेताजींना घ्यावयास विमानतळावर आलो तेव्हाच त्यांना नाटकाबद्दलची एकंदर हकीकत सांगून, त्यांस प्रयोगास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. सहा वाजता विमानातून उतरल्याबरोबर त्यांस इतर बरीच महत्त्वाची कामे होती ती सर्व कामे उरकून ते आठ वाजता नाट्यगृहात आले. ते आल्याबरोबर प्रयोगास सुरवात झाली. ते नाटक त्यास फार आवडले. त्या प्रयोगानंतर जनरल डोईहारांस दिलेला भोजनसमारंभ झाला. भोजनसमारंभानंतर नेताजी सापडेल तेवढ्यात, मी लिहून त्यास अर्पण केलेल्या नाटकाच्या प्रतीत्ंना सादर कराव्या असे मी माझ्या मनाशी ठरविले होते व त्याच तयारीने मी ते दिवशी त्यांचे भोजन समारंभासंबंधीच्या गोष्टी जेव्हा ओसरू लागल्या तेव्हा मी पुढे होऊन "झांशीची राणी या इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतील प्रत्येकी एक एक प्रत अशा तीन प्रती नेताजींस सादर केल्या. ते माझ्या समोरच्याच कोचावर बसले होते. त्यांनी नाटकही दिवशी पाहिलेलेच होते. या प्रसंगी मी तीन प्रती देताच त्यांनी इंग्रजी, हिन्दी प्रत चाळून पाहिल्यानंतर त्या प्रती शेजारच्या तिपाइवर ठेवून त्यांनी सिगारेटचा झुरकाओढीत मला विचारले. "किती उत्पन्न झाले या नाटकाचे?" मी म्हटले सत्तर हजार डॉलर्स (सव्वा लाख रुपये).” आणि लगेच त्या रकमेची थैली त्यांच्या हातात मी ठेवली. नेताजींच्या स्वातंत्र्ययुद्धफंडास हे उत्पन्न देत असल्याचे मी त्यांस सांगितले नंतर अधूनमधून त्या नाटकासंबंधी त्यांनी मला काही प्रश्न विचारले.
६

…सिंगापुरातील हिंदी स्वातंत्र्यसंघाच्या सर्वोच्च मध्यवर्ती कचेरीत नेता सकाळा सुमारे १० वाजल्यापासन दुपारी १।। वाजेपर्यंत बसत असत... पुष्कळशी मंडळी अवतीभवती असताना नेताजी प्रत्येकाशी थोड्या वेळाने एक एक वाक्य बोलत असत. एका विशिष्ट व्यक्तीशीच एका विषयावर बोलत राहून तिच्या विषयाचा निकाल लावावयाचा अशी नेताजींची सवय नसे. त्यामुळे त्यांनी कोणाला तरी एखादा प्रश्न विचारावा, थोडा वेळ शांत रहावे, मग लगेच दुसरा कोणत्या तरी विषयावर दुसऱ्याला काही प्रश्न विचारावा, पुन्हा इतर पुष्कळशा विषयांवर इतरांशी काही प्रश्नोत्तरे झाल्यावर त्यांनी पहिल्या व्यक्तीस पूर्वीच्या विषयावर पुन्हा एखादा प्रश्न विचारावा असे चाले. यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणाऱ्या चारपाच मंडळींची मोठीच पंचाईत होत असे. मागील प्रश्नाच्या अनुरोधाने नेताजी आमच्या एका विषयावर विचार करीत असावेत असे समजावे तोच अगदी निराळ्या विषयावर त्यांनी एकदम एखादा प्रश्न विचारावा असे होई. यामुळे उत्तर देणाऱ्याचा त्या अनपेक्षित प्रश्नाने थोडा गोंधळ उडत असे; कारण तो समजे की आता एखादा प्रश्न विचारून विषय बदलल्यावर आता या विषयावर पुन्हा काही बोलणे निघणार नाही; हा विषय संपला…
...

२ कठीण प्रसगी मला निवडले म्हणून अभिमान वाटला...
नेताजींनी मला बोलाविणे पाठविल्याचे वर सांगितलेच आहे. मी येथे येऊन पोहोचल्याचे त्यांनी पाहिले व सुमारे अर्धापाऊण तासानंतर हे प्रकरण मिटल्यावर ते माझ्याशी बोलू लागले. तेच दिवशी रात्री दोन वाजण्याचे सुमाराला झांशीराणी पथकाच्या पंचेचाळीस स्त्री-सैनिकांची एक तुकडी नदी पार करून येणार होती. पुढील वाहनांची वगैरे व्यवस्था न लागल्यामुळे सतांग नदीच्याच दक्षिण तीरावर दोनतीन दिवस रहावे लागण्याचा संभव होता. आम्ही ज्या ठिकाणी तळ दिला होता ते ठिकाण सुरक्षित नव्हते हे त्या दिवशीच्या भयानक हवाई हल्ल्यावरून सिद्ध झालेच होते. अर्थात येणाऱ्या झाशीराणी पथकाच्या स्त्री-सैनिकांनी कोठेतरी जवळपास राहण्याची व जेवणाची व्यवस्था करणे भाग होते. तेथून सुमारे चार मैलांवर असलेल्या एका खेडेगावी हिंदी स्वातंत्र्य-संघाचे काम बघणारे एक बंगाली गृहस्थ नेताजीस भेटण्याकरिता तेथे आलेले होते. झांशीराणी पथकाच्या छावणीकरिता शेजारच्या खेड्यापाड्यात एखादी सुरक्षित जागा शोधून तेथे रात्री दोन वाजण्याचे आत पंचेचाळीस स्त्री-सैनिकांस राहण्याजोगी छावणी तयार करण्याचे काम त्यांनी माझ्यावर सोपविले. रंगूनहून निघाल्यापासून मलेरियाचा आजार, सामान पाठीवर घेऊन रातोरात चालण्याचे श्रम, औषध नाही, पौष्टिक आहार नाही, विश्रांती नाही व त्या दिवशीच्या हवाई हल्ल्यानंतर झालेली धावपळ यामुळे मला इतका थकवा आलेला होता की, रात्र पडून आपल्याला विश्रांती केव्हा मिळेल याच विवंचनेत मी होतो. अशा परिस्थितीत अंगावर आलेले हे काम बिकटच होते. आधी आपले सर्व सामान डोक्यावर घेऊन चार मैलांवरच्या त्या खेड्यात जावयाचे, तेथे सर्व प्रदेशाची पहाणी योग्य आणि सुरक्षित ठिकाण कोणते हे ठरवायचे, त्यानंतर कुदळी, चटया, लाकडे, फळ्या, खिळे इत्यादि सामान जमवून माणसे गोळा करून रात्री दोनच्याआत छावणी उभारण्याचे काम म्हणजे एक अरिष्टच होते. परंतु एखाद्या नि:स्वार्थी नेत्याने आपणाकडे सोपविलेल्या कामगिरीस नाही म्हणणे कोणाही माणसास शक्यच नसते. उलट अशा नेत्याने आपणावर काम सोपविल्याबद्दल विश्वासास आपण पात्र असल्याबद्दल तशा परिस्थितीतही आनंदच वाटतो. एवढे इतर अधिकारी उपलब्ध असताना आपल्यालाच या कामाकरिता निवडले अशाबद्दल अभिमान वाटतो. शारीरिक सहनशीलतेची परिसीमा झाली असताना देखील वर वर्णिल्याप्रमाणे माझ्या भावना असल्यामुळे मी निघालो, अंगीकृत कार्यातील अडचणी डोळ्यापुढे काजव्याप्रमाणे चमकत होत्या तरी केवळ नेताजींवरील निष्ठेने मी निघालो व रात्री दोनवाजेपर्यंत खरोखरच सर्व कार्य पूर्ण झाले.

४

11

६
२

मांडणीसमीक्षा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Sep 2022 - 10:58 am | मुक्त विहारि

वाखूसा

कर्नलतपस्वी's picture

18 Sep 2022 - 6:47 am | कर्नलतपस्वी

आझाद हिंद सेनेतील सैनिकांना जेव्हा स्वातंत्र्योत्तर काळात सेवानिवृत्ती वेतन देण्यात आले तेव्हा वैद्यकीय सेवेतील सैनीकाचे अभिलेख वाचावयास मीळाले.

एक अशीच केस संदर्भासाठी,
https://www-hindustantimes-com.cdn.ampproject.org/v/s/www.hindustantimes...

शशिकांत ओक's picture

18 Sep 2022 - 5:30 pm | शशिकांत ओक

उशीरा का होईना शिपाई हरबन्स सिंह यांना भारतीय आझाद हिंद सेनेत प्रवेश केल्यानंतर डिसमिस होऊन पण निवृत्ती वेतन मिळावे म्हणून कोर्टात निर्णय मिळाला!